प्रेमा तुझा रंग कसा…

©® मृणाल शामराज.
‘सुखदा..आज, घरी जायच्या आधी भेटून जा मला.’
‘हो, येतें.’
आज काय बरं काम असेल मॅडमच ? नेमकं आजचं घरी जायची घाई आहे.
आईंचा डॉक्टरकडे फॉलोअप आहे. समीरला वेळ नाही आहे. मिटिंग आहे त्याची. स्वराची प्रिलीम जवळ आली आहे. तिचा अभ्यास कसा चाललाय बघायला हवं.
ही मुलगी पण अशी, ट्युशन आवडत नाही. सगळा सेल्फीस्टडी करायचा. आहे हुशार पण धाकधूक वाटतेच ना.. बघू काय म्हणताहेत.

हातातलं पुस्तकं तिनं मिटलं तोपर्यंत जोशीसर म्हणालेच, “काय मॅडम.. झाला का सिलॅबस कंप्लिट?”
“होत आलाय..”
“मुलं खूप नावाजतात तुम्हाला.. गणित शिकवण्यात हातखंडा आहे तुमचा.”
मंद हसत ती तिथून बाहेर पडली आणि मुख्याध्यापिकेच्या खोलीत आली.
“ये, सुखदा. मी तुला एवढ्यासाठी बोलावलं..”त्या बोलताना थांबल्या.
“अगं, तुला एक सांगायचं होतं. भौतिकशास्त्र शिकवणारे कदम सर काल..”
सुखदानी त्यांच्याकडे बघितलं.

“अगं accident झालाय त्यांना. पायालाच लागलंय बरंच. महिनाभर तरी येऊ शकणार नाही. परीक्षा तोंडावर आहेत. मुलांच नुकसान होईल. तु शिकवू शकशील का?”
“बाई, माझ्या घरी पण खूप अडचणी आहेत. कसा वेळ काढू?”
“सुखदा, तु मुलांना मन लावून शिकवते. विषय सोपा करून शिकवण्याची तुझी हातोटी मुलांना खूप आवडते. बघ. तु शिकवावंस असं मला मनापासून वाटतं.”
सुखदानी क्षणभर विचार केला. समीर चा वैतागलेला चेहरा  पटकन तिच्या डोळ्यासमोर आला. पण असं आपण केलं तर मुलांच नुकसान होईल.
“बरं. करते ऍडजस्ट. कधी नाही जमलं तर सांभाळून घ्या.”

बाईच्या चेहऱ्यावर हसू आलं.
“येते मी..”
बाईंनी तिच्याकडे पाहिलं. काळीसावळी नीटस असणारी ही शिक्षिका. हुशार,सतत हसतमुख, कधीही कुठलीही जबाबदारी अंगावर टाकली तर हसत पार पडणारी.आत्ताही त्यांना खात्री हॊती की हॆ काम सुद्धा ती लिलया पेलेल.
सुखदा घरी आली. स्वराच्या खोलीत डोकवली.
“आई, बरं झालं आलीस. अगं हॆ बघ गणित. केव्हाच सोडवतेय पण..”
“बघू..” पर्स तिथेच ठेवत तिनं पाहिलं.
“अगं, इथंपर्यंत अगदी बरोबर सोडवलंयस, पण इथे..”म्हणत तिनं ते तिला समजवून सांगितलं. मग, अजून काहीतरी करत मायलेकी गणितात रंगल्या.

एकदम सुखदाला आठवलं. सहा वाजले. डॉक्टर..पर्स उचलत ती बाहेर आली.
“आई, आवरलत  का तुम्ही?”
“अगं, जरा टेक. पाय सुद्धा धुतले नाहीस. मी चहा आणते.”
“नकॊ, आई. उशीर होईल. निघू यात का?”
“स्वरा, जावून येतों ग.”
रिक्षानी दोघी डॉक्टरकडे पोचल्या. आधीचे नंबर होते.
सुखदा फोन बघत हॊती. किती मेसेज आहेत व्हाट्सअप वर.. बघायला वेळ सुद्धा मिळत नाही.

आईची नजर सुखदावर खिळली हॊती.काळी असलीतरी तरतरीत आहे.  हलक्या गुलाबी रंगाची कलकत्ता साडी तिच्या उंच शेलाटी बांध्याला शोभून दिसतं हॊती.
लांबसडक केसाचा तो शेपटा. काळेभोर, बुद्धिमत्ता दर्शवणारे डोळे, चौकसं नजर.
किती गुणी आहे माझी सुन. माहिती आहे इतकी वर्षं झाली ह्यांच्या लग्नाला पण समीर अजून नाराजच आहे हिच्यावर.
फोन बघताबघता सुखदा  समीरनी एका फॉरवर्ड केलेल्या मेसेजवर रेंगाळली. तिचा चेहरा एकदम उतरला.
समीरच्या मित्रांच्या फॅमिली ग्रुपवर हा मेसेज होता.
दाखवायला आणलेल्या मुलीबद्दल तो मुलगा मित्रांना सांगत असतो..
रंग गेला तर पैसे परत.. टाकावू माल. त्याच्या मित्रांच्या यावर खाली😝😆इमोजी होत्या.

कालच रात्री झालेलं  संभाषण तिच्या डोळ्यासमोरून सरसर गेलं.
“काय अवतार तुझा ! काकूबाई नुसती.. बघ कशा राहतात बायका.. टकाटक. एकतर काळी घुस.. त्यात काकूबाई.. माझंच नशीब खोटं..”
“किती चिडचिड करतोस.. चांगलं नाही. ब्लडप्रेशर  वाढतंय तुझं हल्ली. मधे छातीत दुखत होतं. तेव्हा डॉक्टरनी सांगितलं  होतं. आणि राहिला प्रश्न माझा. माझा रंग लग्न ठरलं तेव्हा असाच होता. राहणीमान म्हणशील तर मी शिक्षिका आहे. असं उथळ राहणं माझ्या पेशाला साजेसं नाही.”
समीर चिडचिड करतच झोपला. कामाच्या नादात ती हॆ विसरली हॊती. पण आता ती जखम परत वाहू लागली.

काय करावं तिला समजत नव्हतं. आईंनी तिचा असा बावरलेला चेहरा पाहून काय झालं असं नजरेनीच विचारलं.
काही नाही म्हणत तिनं फोन दुर ठेवला.
परतताना त्यांनी परत विचारलं तेव्हा तिनी ते त्यांना दाखवलं.
हद्द झाली ह्याची. किती समजवावं हयाला. घरी आली तर समीर अजून आला नव्हता.त्याला यायला बराच उशीर झाला.
आज मात्र एक शब्दही न बोलता जेवण करून तो झोपायला गेला.
बराच बेचैन दिसतं होता तो.
“काय झालं.. सांगणार नाही का?”
“काही नाही कामाचा ताण. झोप तु.”

दुसऱ्या दिवशी तो लवकर ऑफिसाला निघून गेला. तिलाही आजपासून जास्तीचा तास घायचा म्हणून ती ही भरभर आवरत हॊती.
फोन वाजला. वैतागत तिनं फोन उचलला.
“वहिनी..” वरदचा , समीरच्या मित्राचा फोन होता.
समीरला हॉस्पिटल मधे नेतोय.छातीत दुखतय त्याच्या.
“बापरे.. देवा !”
“घाबरू नका. आम्ही आहोत. तुम्हाला लोकेशन पाठवतो.”
“येतेच मी.”

 “काय ग, इतका घाम का आलाय तुला. काय झालं?”
“आई.. समीरला ऍडमिट केलंय.मी निघते. तुम्ही स्वरा जवळ थांबा. मी फोन करत राहीन.”
तिने पैसे, कार्ड लागणाऱ्या सर्व गोष्टींनी पटापट पर्स मधे टाकल्या. थोड्याच वेळात ती हॉस्पिटला पोचली.
सगळ्या तपासण्या झाल्या. बायपासला पर्याय नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
“डॉक्टर, काय करावं लागेल नीट समजवून सांगाल का?” समीर स्वतःच खूप घाबरला होता.
पण सुखदा नीट समजावून घेतं हॊती.
तिनं आईना फोन करून मोजक्या शब्दात सगळं सांगितलं.

दोन दिवसात सर्जरी करायचं ठरलं.
तिनं समीरला विचारून पैशाची व्यवस्था, इन्शुरन्स सर्व समजवून घेतलं. त्याला धीर दिला.
त्याला ऑपेरेशनला नेल्यावर मात्र तिचा धीर खचला. तिच्या डोळ्यातून अश्रू पाझरू लागले.
“सुनबाई.. अगं, तुच असं करायला लागलीस तर कसं ग.. लग्न झाल्यापासून पाहतेय मी समीर असा तुसड्यासारखा वागतोय तरी किती प्रेम करतेस त्याच्यावर. सगळं सांभाळून घेतलसं. देव आहे ग. होईल बरं नीट सारं.”
तसंच झालं. एवढं अवघड ऑपेरेशन नीट पार पडलं.

ते I. C. U च  गंभीर वातावरण, ती समोरची लावलेली वेगवेगळे मॉनिटर्स, डॉक्टरांची सतत वर्दळ, आजूबाजूच्या पेशंटच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर दिसणारा ताण..
सुखदा आता मुळापासून हादरून गेली हॊती.
समीरच्या समोर खुर्चीवर बसून ती एकदा त्याच्याकडे एकदा त्या मॉनिटर कडे बघत हॊती सुन्नपणे.
सतत दोन दिवस आड अवघडवून राहण्यानी ती मानसिक, शाररिक कोलमडून गेली हॊती. उदया कसा असेल ह्याच्या विचारांनी तिची तहानभूक हरवली हॊती.

समीरनी हलकेच डोळे उघडले. त्याच लक्ष सुखदाकडे  गेलं.
ती उदास एकटक भिंतीकडे बघत हॊती.
तिच्या चेहऱ्यावर असलेले ते काळजीचे भाव,तिचे ते केविलवाणे  डोळे, सुकलेले ओठ..
किती काळजी करते ही.
त्याच कॅलेंडरकडे लक्ष गेलं. चार दिवस झाले. ही नक्कीच घरी गेली नसणार.
“सुखदा..सुखदा..”
“अं.. तुम्ही हाक मारली?”

“हो, इकडे ये..”
“कसं वाटतंय..?”
“छान आहे मी. इकडे ये.”
तिचे हात हातात घेतं तो म्हणाला.. “खरंच, खूप चुकलं माझं. मी तुझा खूप रागराग केला.”
“बोलू नका जास्त आराम करा. मी आईना कळवते.”
घरी आल्यावर समीर आईला म्हणाला..”आई, खूप चुकलं माझं. मला हॆ कधी कळलंच नाही. संसार करायला नुसतं रुप असून चालत नाही. मी कधी ओळखलंच नाही तिला.”

“हो, खरंय.. त्याशिवाय का तु वॉट्सअप वर अशा फालतू कंमेंट्स टाकत होतास?”
“म्हणजे आई तुला..तु..”
“हो, मी वाचलंय ते. अरे, मुलगी आपलं सगळं सोडून ह्या घरात येतें. बायको, आई, बहीण, मैत्रीण सगळ्या भूमिकातून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. आणि तुम्ही व्हाट्सअप वर तिची खिल्ली उडवता. हॆ कितपत योग्य आहे..”
“आई, खरंच चुकलो ग !”
“काय चाललंय माय लेकाचं?”
“अगं, व्हाट्सअप पुराण..”

“आई.. काही नाही ग.. छान दिसतेस ह्या साडीत तु.. बाहेर निघालीस का?”
“जावं लागेल.. परीक्षा जवळ आल्यात. एक्सट्रा तास आहे. जावू ना..?”
“जा ना. आई आहे. काळजी करू नकोस. आणि हो जाताना तेवढा व्हाट्सअप उघडून बघ.” तो मिस्किल हसत म्हणाला.
तिनी दार बंद केलं.
जिना उतरताना व्हाट्सअप उघडलं तर इमोजी होता.
🥰🥰🥰
💐💐💐
तिनं त्या फुलांचा मनभरून सुगंध घेतला. आणि रिप्लाय केला.
🤔🥰
©® मृणाल शामराज.

सदर कथा लेखिका मृणाल शामराज यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही. या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखिकेची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी.
कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ ( नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
धन्यवाद.!!!
📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!