शालन वेगळी राहते

©®सौ.दिपमाला अहिरे.
एक असे पात्र रेखाटण्याचा प्रयत्न जे प्रत्येक स्त्री मध्ये लपलेले एक व्यक्तीमत्व असु शकते.
शालन तीन मुलींची आई. अजुन कदाचित दोन मुली राहिल्या असत्या तिला पण सासु सासऱ्यांनी गर्भपात करवुन घेतले. शालन च्या तिन्ही मुली शांत,सालस आणि हुशार.
आईचे सर्व गुण आले होते तिघींमध्ये. पण तरीही सासुबाई ला त्या नकोशाच होत्या.
तिघी मुली सारख्याच. तीन चार वर्षांचे वयाचे अंतर. मोठी मुलगी बारा वर्षांची.
इतक्या वर्षात शालनच्या एकाही मुलीला सासुने प्रेमाने जवळ घेतले नाही की, डोक्यावर मायेचा हात फिरवला नाही. कारण एकापाठोपाठ एक मुलीच झाल्या म्हणुन .

तिघी मुलींना आपल्या आजीचे प्रेम, लाड तर मिळत नव्हते पण त्या पहात होत्या. जेव्हा आजी त्यांच्या काकांच्या मुलांना जवळ घेत, लाड करत, बाजारात जातांना सोबत घेवून जात ,खाऊ घेत असत तशीच माया आजी आत्याच्या मुलांवरही करत असे.
शालन च्या घरात हा भेदभाव आधीपासूनच होता. शालनच्या सासुला मुली म्हणजे नकोच .
घरातल्या कुठल्याही सुनेला दिवस राहिले की, ती ठरवुनच टाकायची की, पहिला मुलगाच झाला पाहिजे.
मुलगा मुलगी भेदभाव ती फक्त बोलत नसे तर वागणुकीतुन दाखवून देत असे.
शालनला मुलीच झाल्या मुळे आता तिला सासु कुठलाच मान सन्मान देत नसे उलट सतत तिचा अपमान करत असे.

मुलीच जन्माला घातल्या तु तर काही कामाची नाही. मुली काय करणार आहेत. वंशवेल मुलगाच वाढवतो. शालनला ती अगदीच मोलकरीण सारखी वागणूक देत असे.
तिच्या घरात एक विचित्र प्रथा ही होती तिच्या सासुनेच पाडली होती .
घरात कुणालाही मुलगी झाली तर तिला साधे झबले टोपडे ही ती घेत नसे आणि घरातील इतरांना ही घेऊ देत नसे. याऊलट जर नातु झाला तर सोन्याची वस्तु कपडे सर्व काही अगदी रिती प्रमाणे ती करत असे.
शालनला पहिली मुलगी झाली तर सासुने तिला हात लावला नाही की, पाहिले नाही . दिराला आणि नणंदेला मुलं होते त्यांना आपल्या हाताने सासु तेल मालीश करत,न्हाऊमाखु घालत असे आणि शालन ने आपल्या मुलीला अंघोळ घालण्यास सांगितले की सरळ नाही म्हणत असे.

शालनच्या मुलीचा आणि नणंदेच्या मुलाचा दोन महिन्यांच्या अंतराने वाढदिवस येत असे.
नणंदेच्या मुलाचा वाढदिवस सासु आपल्याच घरी मोठ्या धामधुमीत करत असे. आणि दोन महिन्याने शालन च्या मुलीचा वाढदिवस आला तर एक दिवस आधीच सांगुन टाकले मुलीच्या वाढदिवस साठी खर्च करुन पैसा वाया घालवायचा नाही.
नंतर मुलीच्या शिक्षणाच्या वेळेस ही तेच झाले. शालन ला मुलीला चांगल्या शाळेमध्ये टाकायचे होते तर सासुने मुलाला फर्मान सोडले मुलगी ही परक्याच्या घरी जाते तीला इंग्लिश मिडीयम ला शिकवून आपला पैसा विनाकारण खर्च करायचा नाही.
शिकुन मोठी कलेक्टर होणार नाही ती. घरी भाकरीच तर थापायच्या आहेत तीला.चार इयत्ता शिकली कि लग्न लावुन द्यायचे.

शालन च्या मुली मोठ्या झाल्या. आपल्या सोबत आणि आपल्या आईबरोबर होणारा भेदभाव तिघींना कळत होता. आपली आजी आपल्याला नेहमीच मारत असते, छोटी जरी काही चुक झाली तरी खुप रागवते, मारते आणि आपल्या आईला बोलते तुझ्या मुलींना आवर, जरा वळण लाव दुसऱ्याच्या घरी जायचे आहे त्यांना, काकांच्या मुलांना काजु बदाम,खारिक खाऊ घालते, रोज दुध प्यायला देणे. आणि आपल्याला आधी उरलेले शिळं अन्न आधी संपवायला सांगते नंतर गरम खायला देते.
शालन ची सासु इतर दोन सुनांना मुलगा होता म्हणुन त्यांना चांगली वागणूक देत असे.
तर शालन ला एकटीने घरातील सर्व कामे करायला सांगत असे , तिला घालून पाडून बोलत असे. पहिली बेटी धनाची पेटी ही म्हण सर्वत्र प्रचलित आहे..पण शालनच्या सासुने तिला ही आपल्या सोयीनुसार बदलली होती.

ती शालनला सतत टोमणा मारत असे ” जिला पहिली बेटी ती खोटी.” ‌
शालन एकाच समजुतीत तिचं आयुष्य जगत होती, मला तीन मुली म्हणुन मला यांचे सर्व बोलणे ऐकावेच लागेल, यांचा सर्व त्रास सहन करावा लागेल शालनच्या मुली मोठ्या झाल्या तर त्यांना आपल्या आईचा सतत विनाकारण होणारा अपमान बघवत नसे.
शालन ची मोठी मुलगी आईला एके दिवशी म्हणाली आई असं अपमानास्पद जिवन आपण किती दिवस जगायचं मुली म्हणुन जन्माला आलो यात आमची किंवा तुझी काय चुकी आहे या घरात फक्त नौकर आणि आश्रीतासारखे राहण्यापेक्षा आपण दुसरीकडे रहायला जाऊ.
ही गोष्ट जेव्हा शालन ने आपल्या पतीला बोलुन दाखवली. तर त्याने काही उत्तर दिले नाही.

थोड्याच दिवसात नवरात्र आली आणि दरवर्षी प्रमाणे शितला पंचमी च्या दिवशी शालन ने घरात कन्याभोजन ठेवले होते. कॉलनीतल्या सर्व मुलींना बोलावले होते. आपल्या तिन्ही पऱ्यांना छान तयार केले होते आणि स्वयंपाकाला लागली होती. इतक्यातच काहितरी पडण्याचा आवाज आला. लहान्या मुलीच्या हातुन टिव्ही चा रिमोट पडला होता. आणि तुटला होता.
आजीच्या भितीने ती रडायला लागली. शालन किचन मधुन पळतच आली.
तिची सासू तिच्या मुलीला पाठीवर जोराजोरात मारत होती आणि दुसऱ्या दोघी मुली तिला पाहुन त्याही रडत होत्या.
बाजुलाच शालनची जाऊ आणि नणंद दोघी बसल्या होत्या. पण साधं आईला थांबवण्याचा प्रयत्न ही त्या दोघी करत नाही.हे पाहून शालन ला वाईट तर वाटले. पण आपल्या एवढ्याशा मुलीला सासु इतकं मारते आहे हे पाहुन शालन तिच्या जवळ गेली.

सासुच्या हातातून आपल्या मुलीला सोडवुन घेत ती जोरात सासुला मागे ढकलत बोलली “सोडा माझ्या मुलीला हात लावायचा नाही बिलकुल, आज शितला पंचमी आज देवीचे रुप मानुन घरोघरी मुलींची पुजा करतात आणि तुम्ही इतक्या बेरहमीने मारत आहात. अहो, तीन वर्षांची लहान मुलगी आहे ती. तुटली तिच्या कडुन एखादी वस्तू तर काय झाले ? इतर वेळी तर तुम्ही मारतातच ना आजच्या दिवस तर सोडा तिला”. आज शालनच्या अंगात दुर्गामाता च संचारली होती जणू,
तिचे डोळे ही आग ओकत होते. इतक्या वर्षांपासून मनात दाबलेले सर्व त्रास, दु:ख, यातना आज तिच्या बाहेर निघत होत्या.
तिने तिच्या पतीला फोन करून घरी बोलावून घेतले.
आज काय तो सोक्षमोक्ष लावयचा तिने ठरवले होते. तिने तिच्या सासुला सांगून टाकले, “मी आता तुमच्या घरातील मोलकरीण बनुन राहणार नाही आणि माझ्या मुलींना तुमच्या गुलामगिरीत राहु देणार नाही.”

तेव्हा सासुने तिला सांगितले, “तिन मुली आहेत तुला. सासु सासऱ्यांना आणि आपल्या घराला सोडून राहशील तर, मुलींची लग्ने कशी करशील? अगं सर्व समाज तुला वाईट म्हणेल ! मग कोण करेल तुझ्या मुलींशी लग्न ? लग्न जमवतांना लोकं विचारतात काका चुलते,आत्या,आजी आजोबा तुमचे भाऊबंद कुठे आहेत आणि नसले तर मुलीला कोणी सुन करून घेत नाही. ज्या मुलींची आई सासु सासरे वागवत नाही तिच्या मुलीही घरचं फोडतील असे म्हणतात लोकं. मग तुझ्या मुली लग्नाच्या झाल्यावर माझे पाय धरायला जरी आलीस ना तरीही मी येणार नाही आणि कुणाला येऊ पण देणार नाही.”
हे ऐकून शालन जास्तच संतापली. सासुला म्हणाली, “आजवर तुम्ही माझ्या सोबत जे वागलात ते मी सहन केले पण तुमच्या या मुलगा, मुलगी भेदभावाच्या अडाणीपणाच्या छळात मी माझ्या मुलींना राहू देणार नाही आणि कोणत्या समाजाची आणि भाऊबंदाची गोष्ट सांगुन तुम्ही मला घाबरवता. असे कमी डोक्याचे आणि मागासलेल्या विचारांचे लोकं ज्या समाजात असतील त्या समाजात मी माझ्या मुलींचे लग्न करणार नाही.

त्यांना चांगले शिक्षण देऊन,स्वताच्या पायावर उभे करेल ,त्या स्वता सक्षम पणे विचार करून आपल्या आयुष्याचे योग्य निर्णय घेतील या लायक मी त्यांना बनवेल.
आणि त्याच दिवसापासून शालन आपले सासर सोडुन वेगळी राहु लागली एक सकारात्मक गोष्ट म्हणजे तिच्या नवऱ्याने तिला या निर्णयात साथ दिली.
मला विचारायचे आहे की, शालन ने वेगळं राहण्याचा निर्णय घेऊन काही चुक केली आहे का? नवरा आणि मुलींना सोबत घेऊन संसार करण्याचा तिचा निर्णय चुकीचा आहे का?

फक्त मुलींची आई आहे आणि पुढे जाऊन तिच्या मुलींचे लग्न कशी होणार या गोष्टीचा विचार न करता नातलग आणि भाऊबंद आणि सासु सासऱ्यांचा त्रास सहन करण्याचा केविलवाणा प्रयत्न न करता तिने वेगळे घर घेतले हे चुकीचे आहे का, आपल्या पुढारलेल्या विचारांच्या समाजात असे अनेक घरं आहेत जिथे मुलगा मुलगी भेदभाव होतो.
अशा अनेक शालन आहेत ज्या समाजाच्या भितीने सर्व त्रास बरिच वर्ष मुकाट्याने सहन करतात. फक्त आपण मुलींच्या आई आहोत म्हणून. पण अशी एक तरी शालन हवी या सर्वच आव्हानांना तोंड देऊ शकेल आणि ज्या गोष्टीची आणि आव्हानांची भिती तिला वाटते त्याच आव्हानांचा स्विकार करून यशस्वी वाटचाल करु शकेल.
(वरील कथा आणि कथेतील पात्रे पुर्णपणे काल्पनिक आहेत तरी कुठल्याही व्यक्तीचा किंवा व्यक्तीच्या आयुष्यातील मिळताजुळता प्रसंग असेल तर केवळ योगायोग समजावा लिखाणात व्याकरणाच्या किंवा कुठल्याही चुका असल्यास क्षमस्व.)
©®सौ.दिपमाला अहिरे.

सदर कथा लेखिका सौ.दिपमाला अहिरे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही. या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखिकेची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी.
कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ ( नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
धन्यवाद.!!!
📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

2 thoughts on “शालन वेगळी राहते”

  1. ही सत्यपरिस्थिती नाही असे समजून मी लिहीत आहे. वाईट वागणूक जर मुलींना आणि शालनला मिळत असेल तर वेगळं होणं नक्कीच चांगलं आहे.

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!