©®अनुराधा पुष्कर
“अहो , तो मुलगा मला आवडला होता.. घर पण चांगलं होतं आणि एकाच शहरातला तर होता” सुमन ताई.
“हो ना, मुलगा होता हुशार, पण रेवा ची पसंती महत्वाची….”प्रदीप राव
“तिला काय कळतंय… उगीच नाही ते कारण देते… नव्या पिढीच्या नव्या अपेक्षा नव्हे ,जास्तीच्या अपेक्षा..”आज्जी
“ते काही असो मला वाटतं एकदा बोलावं पुन्हा रेवाशी.. अस किती दिवस थांबायचं….. पुन्हा चांगली स्थळ हातातून गेल्यावरती काहीही राहणार नाही. आपल्याला तडजोड करावी लागते..तुम्ही बोलणार आहात का, की मी बोलू आज तिच्याशी…?” आईने प्रदीपरावांना सवाल केला.
तर असं हे रेवाचं छोटस कुटुंब, रेवाच्या कुटुंबामध्ये आई सुमन, वडील प्रदीप आणि आज्जी एवढे मेंबर होते.
जसं सामान्य घरामध्ये चालू असतं तसेच तिच्या घरात सुद्धा तिच्या लग्नासाठी योग्य वर संशोधन सुरू आहे .आत्तापर्यंत रेवाने 15 मुलं नापसंत केली आहेत आणि आता तिच्या आईची चिंता वाढत चालली आहे.
रेवा ऑफिस मधून निघून मैत्रिणीसोबत कॉफी प्यायला आली होती.
“काय झालं रेवा,तू आज शांत का आहेस?” निता
“काही नाही नेहमीचच, आईंला वाटतं की मला लग्नच नाही करायचं आणि आज्जी ला वाटते की मी खुप अपेक्षा करते..”रेवा
“तुला नक्की काय हवंय रेवा? आईची चिंता वाढत जाणार आहे आणि मग तुला emotional होऊन निर्णय घ्यावा लागेल..”नीता
“काही नाही ग,मला फक्त समजदार मुलगा हवा… माझ्या कुटुंबाला समान मानणारा हवा… आता पर्यंत जे बघितले ते चांगले होते, काही चांगले कमावत होते, काही स्मार्ट होते तर घरचे सगळे गर्विष्ठ होते..सगळ्या बाजूंनी विचार करते मी…”रेवा
“बरोबर आहे…. माझं फक्त हे म्हणणं आहे की घरच्यांशी मोकळं बोलून बघं….. होईल नीट सगळं..”नीता
रेवा घरी येऊन फ्रेश होवून जेवायला बसते.
“रेवा बेटा मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी….”बाबा
“नको ना बाबा पुन्हा तोच विषय..”रेवा
“हे बघ रेवा आम्ही जबरदस्ती करत नाहि,पण मला सांग ह्या मुलामध्ये काय वाईट होत..तू का नाही विचार करत त्याचा?”आई
“आई अग वाईट नाही कही म्हणून हो म्हणू का? आयुष्याचा प्रश्न आहे माझ्या.. थोडा विचार करून निर्णय घेण्यात यावा एवढंच..”रेवा
“आम्ही विचार करत नाही असं म्हणायचं आहे का तुला?”आईं
“अग,थांब जरा..”बाबा
“जाऊ दे.. मला नाहि बोलायचं.. घ्या तुम्हाला हवा तो निर्णय..”रेवा उठून जाते..
“मी बोलणार होतो ना.. कशाला वाढवला विषय?”बाबा
“मी वाढवला का? ठीक आहे.. ठरवा तुम्ही दोघच, उशीर झाला ना खूप की मग कळेल मी काय आणि का म्हणत होते..”आई
बाबा हतशा होऊन बसले.
रात्री गॅलरीत रेवा गाणी ऐकत डोळे लावुन खुर्चीवर बसली होती ,तिचे बाबा तिथे आलेले ही तीला कळलं नाही..
“रेवू, ए रेवु “बाबा
“बाबा तुम्ही कधी आलात?”रेवा
“आत्ताच आलो,हे बघ बेटा ,तुझी आई आज जे काही बोलली त्याचा तुला खूप वाईट वाटलं का? अगं पण ती तुझ्या भल्याचा विचार करते ना”बाबा
“हो बाबा मला माहित आहे की, तुम्ही दोघेही माझ्यासाठी चांगलाच विचार करता पण मला काही वेळ हवा आहे”रेवा
“पण असं किती वेळ तू घेणार आहेस? खूप उशीर करून काही उपयोग होत नाही. मी हे म्हणत नाही की तू लगेच तुझा निर्णय कळव पण मला वाटतं की त्या यश सोबत तू एकदा भेटावं आणि पुन्हा एकदा बोलावं कदाचित तुला निर्णय घ्यायला सोपं पडेल.
तुझ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मनमोकळ्या त्याच्याशी बोल आणि हे बघ बेटा लग्न हे असं नातं आहे की त्यामध्ये प्रेम आणि विश्वास जर असला तर सगळं साध्य होतं, जरुरी नाही की लगेच होईल पण एकमेकांच्या साथीने समजूतिने सगळं काही चांगलं होतं त्यामुळे एकदा विचार कर..”बाबा एवढं बोलून झोपायला गेले..
रेवा ने त्यांच्या बोलण्याचा विचार केला. तसा यश दिसायला देखणा होता आणि तिच्याही नजरेत भरला होता. पण का कोण जाणे लग्नाची तिला भीती वाटत होती आणि म्हणूनच इतके दिवस ती निर्णय घेऊ शकत नव्हती पण आता जसं तिच्या बाबांनी सांगितलं तसं ती पुन्हा एकदा यशला भेटायला तयार होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी रेवा घरच्यांना सांगते किती यश ला पुन्हा एकदा भेटायला उत्सुक आहे आणि मगच लग्नाचा निर्णय घेणार आहे.
हे ऐकून आईला खूप आनंद होतो आणि दुपारी तिचे बाबा यशच्या आई-वडिलांना फोन करून भेटीची वेळ ठरवतात. यश कामानिमित्त बाहेर गेल्यामुळे दोन दिवसानंतर यश आणि रेवाची भेट होणार असते.
यश आणि रेवा भेटीचा दिवस उजाडतो . दोघेही कॉफी शॉप मध्ये भेटतात.
“हाय, कशा आहात?”यश
“मी बरी आहे ..तुम्ही कसे आहात ?काम कसे सुरु आहे?”रेवा
“काम काय रोजचंच आहे .तुमचं काम कसं सुरू आहे?”यश
यश आणि रेवा एक तासभर गप्पा मारत होते .दोघही आता खूप खुलले होते आणि रेवा ला त्याची बाजू आणि समजूतदारपणा कळत होता .
“यश हि आपली दुसरी भेट आहे त्या दिवशी जास्त काही बोलले नाही पण मला फक्त एक समजदार मुलगा हवा आहे . मी तुमच्या कुटुंबाला आपल मानणार तसेच तुम्ही माझ्या कुटुंबाचा भाग व्हावा एवढेच माझं म्हणणं आहे.
बऱ्याच घरांमध्ये सूनेच नातं आणि जावयाचा नातं यामध्ये खूप फरक असतो . मी लग्न करून तुमच्याकडे आल्यानंतर सुद्धा माझ्या आई-वडिलांसाठी माझं कर्तव्य कमी होणार नाही त्यांच्या अडचणीच्या वेळेस आणि बिकट परिस्थितीमध्ये मी त्यांच्यासोबत उभी असेल आणि त्यात तुम्ही आडकाठी आणणार नाही एवढेच मला हवं आहे” रेवा
“मी समजू शकतो एका मुलीसाठी तिचं सगळं सोडून येणं आणि नवी सुरुवात करणं खूप अवघड असतं पण मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन आणि माझ्या घरच्यांचं म्हणशील तर ते खूप जुन्या विचाराचे नाहीये नव्या गोष्टी आत्मसात करायला आणि नव्या विचारांच्या सोबत जगायला त्यांना आवडतं……. आणि कोणत्याही परिस्थितीत आडकाठी न आणण्यासाठी आधी आपण लग्न करणार आहोत हे कन्फर्मेशन मला लागेल नाही का?” यश मस्करी करत बोलला..
रेवा नुसतच हसली.. एकंदरी दोघांच्या गप्पांमधून त्यांनी एकमेकांना पसंत केल्याची खात्री झाली आणि तसेच दोन्ही घरांमध्ये बातमी कळवली गेली .खूप उत्साह होता दोन्हीं घरामध्ये , लवकरच साखरपुडा आणि लग्न असे मुहूर्त काढले गेले.
यश सारखेच त्याच्या घरचे लोकही खूप समजदार होते. अखेर तो दिवस उजाडला.
रेवा आज एकदम सुंदर दिसत होती. गुलाबी रंगाचा घागरा तिचा गोऱ्या रंगावर खुलून दिसत होता. केसांची हलकी वेणी, त्यावर गजरे, आणि चेहऱ्यावर आलेली बट, उफ! अप्सरा जणु.. कपाळवर छोटीशी टिकली हातभार बांगड्या आणि मेंदीचा रंग. नव्हे यशच्या प्रेमाचा रंग लाले लाल.
तर अशी ही रेवा , यशची होणारी बायको आज साखरपुडा होता दोघांचा. जितकी सुंदर रेवा तितकाच यश ही स्मार्ट,दिसायला देखणा, उंच गोरापान. ते म्हणतात ना काही जोड्या लाखात एक असतात तशी ही जोडी.
दोन्ही घरातल्या माणसांनी रीतसर कांदे पोहे चा कार्यक्रम करून आणि दोघांनी एकमेकंना पारखून हा निर्णय घेतला होता.
रेवाचे बाबा एका कंपनीत नोकरी करत होते. रेवा स्वतः अकाउंटट होती एका कंपनीत पण स्वभाव लाघवी होता ,अगदी तिच्या रूपा एवढा सुंदर…
यश एकलुता एक होता आणि त्याचे बाबा बँकेत होते.. गावाकडे शेती होती. मोठे काका तिकडेच होते आणि सगळं बघत होते. त्यांचा मोठा मुलगा एका अपघातात गेला होता पण यशची वहिनी खुप समजदार होती. तर असे हे रेवा आणि यश उद्या विवाह बंधनात अडकणार होते.
आज साखरपुडा होता आणि संगीत रजनीचा कार्यक्रम सुद्धा ..
“ये बात है उन दिनों कि जब इक रिश्ता आया था,
ये बात है उस रिश्ते की जब वो गहराया था
एक मुलाकात और कुछ बाते कॉफी के साथ,
दिल मिलते ही उम्रभर के लिए थाम लिया एक दूसरे का हाथ
इश्क की गहराई, थोड़िसी तनहाई,
मिलो का फासला तय कर हो रही है आज हमारी सगाई।“- निवेदक.
कार्यक्रम सुरू झाला होता.
सर्व पाहुणे मंडळी एकदम उत्साहात कार्यक्रमाला हजर होते .आत्या मामा ,काका ,मावशी सगळ्यांचे रुसवे फुगवे हेवी देवी घेणं देणं सगळ्या कार्यक्रमात असणार आहे कारण लग्न आहे ना….
(लग्नाच्या दिवशी)
“काय नाही आज कालच्या मुली अजिबात पद्धत माहिती त्यांना आमच्या वेळी नव्हतं असं काय तर म्हणे वेगळ्यावेगळ्या कलर पाहिजे थीम्स पाहिजे किती हा पैसा लागतो पाण्यासारखा”- लांब राहणाऱ्या चुलत आत्या चे हे बोल…
खुर्चीवर बसून ह्या चार बायका बोलत होत्या.. रेवाची चुलत बहीण हे ऐकत होती.. त्यातल्या एका बाई ने मध्येच काही शंका ही बोलून दाखवली, ” अहो मी तर ऐकलंय की लग्नाचा खर्च जास्तीत जास्त मुलाकडेच केलाय.. नशीबच म्हणायचं ., आमच्याकडे तर एवढा खर्च झाला होता ना मालतीला सगळं काही केलं होतं आम्ही..” बाई
“नाही काकू, हे खरं नाहीये लग्नाचा खर्च दोघांनी समान केलेला आहे. लग्नामध्ये मान पान रितीरिवाज सगळे बरोबरीने आहे. कोणी कमी नाही की कोणी जास्त नाही आणि त्याचेच प्रतीक म्हणून हे घ्या..” रेवची चुलत बहीण आणि यश ची बहिण हातात फुलांच्या पाकळ्या आणी एक बॅच त्यांना देत होत्या.
“हे काय आहे?”त्या बाई
“काकू ही लग्नातली खास गोष्ट आहे. अक्षता जमिनीवर पडतात आणि त्याच्यावरती पाय पडतो व त्याचा अनादर होतो म्हणून तांदळाच्या अक्षते ऐवजी या फुलांच्या पाकळ्या आणि हा बॅच.. जो तुम्हाला लावायचा आहे. ज्या वरती ‘ एक कुटुंब ‘असं लिहिले आहे म्हणजे इथे कोण वधू पक्ष आणि कोण वर पक्ष हे कळणारच नाही, कारण वधु पक्ष आणि वर पक्ष मिळून एक कुटुंब तयार होत आहे मुलीकडचं आणि मुलाकडचं असं वेगळं काही नसतं ते दोघं मिळून एक कुटुंब तयार करतात म्हणून हा बॅच लावा आणि फुलांच्या अक्षता नवविवाहित जोडप्या वरती टाकून आपले आशीर्वाद त्यांना द्या.”दोघीही एवढं बोलून निघून गेल्या .
काकू तर बघतच बसल्या आणि तिकडे यश आणि रेवा ने वरमाला एकमेकांच्या गळ्यात टाकून नवी सुरुवात केली.
खरंच आहे ना लग्न म्हणजे फक्त वर किंवा वधू एवढेच नाहीये तर ते दोन कुटुंबांचं मिलन आहे दोन परिवार एकत्र येऊन एक मोठा परिवार बनतो मग त्यामध्ये कशाला वधुपक्ष आणि वरपक्ष, दोघं मिळून आम्ही एक कुटुंब किंवा एक परिवार एवढंच पुरेस आहे.
कारण एक परिवार असला की सगळं सोप्प होत, परक कुणी नसतं आणि जिथे परके पणा संपतो तिथे प्रेमाचा हक्क अनुभवता येतो.
नातं जपायला सोपं होत आणि नव नातं रुजायला वेळ ही लागत नाही..
पटतंय ना?
तुम्हालाही असं वाटतं का की लग्नामध्ये वधू पक्ष आणि वर पक्ष असण्यापेक्षा ‘ एक परिवार ‘ असावा…
सहमत असाल तर नक्की कॉमेंट करून कळवा.. आणि इतरांसोबत शेअर करा
©®अनुराधा पुष्कर
सदर कथा लेखिका अनुराधा पुष्कर यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही. या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखिकेची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी.
कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ ( नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
धन्यवाद.!!!
📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.