सुगंध दरवळला स्वादाचा

©®सौ. प्रतिभा परांजपे.
अर्चनाने टेस्ट पेपर मधले मार्क पाहून त्याची बेरीज करत मागच्या व वरच्या पानांवर लिहून सही केली. अजून सात आठ वह्या तपासायच्या होत्या.
तेवढ्यात तिला नवऱ्याची चाहूल लागली.
“अहो चहा करून ठेवला आहे”  अशोक ने काही उत्तर दिले नाही. तो टॉयलेट मध्ये निघून गेला.
अर्चना पटापट वह्या तपासत होती.
खरंतर आज रविवार सुट्टीचा दिवस, पण तरीही ती लवकर उठली वेळेवर काम पूर्ण व्हायला हवे. सोमवारी शाळेत रिझल्ट द्यायचा होता.

प्रत्येक वही तपासायला चार-पाच मिनिट लागत. संस्कृत चा पेपर होता त्यात हलंत्, विसर्ग  वगैरे सर्व चुका पाहून मार्क द्यावे लागत. अर्चनाला आठवलं लहानपणी ती व लहान भाऊ छोटू, शेजारच्या भाऊकाकांकडे संस्कृत शिकायला जात. सुभाषितं, गीता अध्याय, राम रक्षा असे बरेच काही काका शिकवत.
स्पष्ट उच्चारणासकट आणि बिनचूक म्हणेल त्याला खाऊ म्हणून साखर फुटाणे किंवा खडीसाखर मिळे. कधीकधी काका खुश झाले की चॉकलेटही देत. त्या एक चॉकलेटच्या पायी अर्चना छान पाठ करून म्हणून दाखवायची.
काकू तिला आत बोलावून घेत. त्यांचा सुगरणपणा, पदार्थ करायची पद्धत अर्चना पहात असे. काकू तिला चव म्हणून खायलाही देत आणि कसे केले तेही सांगत.

काकूंना बर नसल कि काकांना काम पडत असे तेव्हा अर्चना काकांना पोळ्या कर, भाजी चिरून दे अशी मदत करे.
संस्कृत विषयात दहावीत  विशेष योग्यता मिळाल्याने तिने बी.ए मधे ही  संस्कृत विषय घेतला..  
बी.एड ही करायची इच्छा होती पण– त्या सुमारास अशोकचे स्थळ बाबांना पसंत पडले आणि तिचे लग्न झाले.
लग्नाच्या आहेरात काकूंनी तिला रुचिरा हे पाककृतींचे पुस्तक दिले . 
“छान छान  पदार्थ करून घरच्यांना तृप्त कर, अन्नपूर्णा तुझ्या वर प्रसन्न होवो”.. असा आशीर्वाद दिला.
अशोक बरोबर ती सुखात होती. एक वर्षातच बिट्टू चा जन्म झाला आणि बी.एड करायचे राहून गेले.

बिट्टू जेव्हा शाळेत जाऊ लागला तेव्हाअर्चनाने पण एका प्रायव्हेट शाळेत नोकरी धरली. पगार दोन ते तीन हजार च होता पण आपण सुद्धा काहीतरी करतोय याचं तिला समाधान होतं.
“अर्चू ,चल ना बाहेर बाल्कनीत  बसून चहा पिऊ या”.
अशोक सुट्टी असल्याने आरामाच्या मूडमध्ये होते.
” हो- येते, जरा या चार-पाच वह्या…….!”
“अरे यार..….. तू पण, आज तरी कमीत कमी…” असे बडबडत अशोक चहा घेऊन एकटेच बाल्कनीत जाऊन बसले. 

एक वही तपासून होते न होते तेवढ्यात बिट्टू उठून आला.
“अहो– जरा याला ब्रशला पेस्ट लावून देता का प्लीज.”
“अरे यार, काय कटकट आहे…. सुट्टीचा सगळा मूड खराब केला, कां एवढा आटापिटा करतेस? या जराशा पैशाने काय होते?
‘मी कमावतो आहे ना ,ते आहे न पुरेसं?’ अशोक चिडून बडबडायला लागला.
जरासे पैसे?…. अशोकचे म्हणणे खरे होते. पण –ते खरे बोल अर्चनाला झोंबले.
‘जरासे पैसे’ खरंच आहे. जर ती बीएड असती तर पंधरा-वीस हजाराची नोकरी सहज मिळाली असती पण —.   

बिट्टू दूध पिऊन अर्चना जवळ येऊन बसला .
“मम्मा मी पण ड्रॉइंग करू का?” 
“हो- ड्रॉइंग कॉपी घेऊन ये..,”
बिट्टू कॉपी घेऊन आला.
“मम्मा -पेन्सिल ची नोक तुटली…..”
” दे,… शार्पनर दे” ,अर्चनाने कंपास मध्ये पाहिलं .
हरवले वाटतं शाळेत….. असे बडबडत अर्चनाने ब्लेड घेऊन पेन्सिल शार्प करायला सुरुवात केली.
तेवढ्यात बिट्टू मांडीत बसायला आला आणि त्याचा धक्का लागून ब्लेड बोटात घुसली.
अर्चनाच्या तोंडातून किंकाळी निघाली .रक्त पाहून बिट्टू रडायला लागला. 

बिट्टू च रडणं ऐकून अशोक चरफडत आत आले ,कापूस व डेटाल घेऊन अर्चनाच्या बोटाला लावत बिट्टू ला चुप केले, पण तोंडाने बडबड चालू होती.
अर्चनाने वह्या उचलून ठेवून दिल्या. बोटाला लागलेला ब्लेडचा घाव हळूहळू भरत गेला, पण अशोक रागाने जे बोलला ते मनाला खूप लागून गेले.
राहून राहून त्याचा त्रास होत होता. काय करावे? नोकरी सोडावी कां? अडीच तीन हजार छोटी रक्कम असली तरी घराचे राशन सहज मॅनेज होत होते.
अशोकला नाराज करून नोकरी करण्यात अर्थ नाही असे लक्षात येतात अर्चनाने शाळेत राजीनामा पाठवला.

एक-दोन दिवसातच तिला घरी कंटाळा येऊ लागला.
शिवणकाम करावे कां ? पण त्यातही फारशी मिळकत नाही, ट्युशन घ्यावा तर तिचे योग्य असे विषय नाहीत.
एक दिवस तिच्या खास मैत्रिणीचा, रीमा चा फोन आला  “अर्चू काय करतेस?”
“अगं बोर होतं ग घरी ….”,वगैरे बऱ्याच गोष्टी झाल्या.
“अर्चना, मला तुझी एक मदत हवी आहे. काय आहे ना, यांना प्रमोशन मिळाले, त्याची पार्टी द्यायची आहे , म्हणून गुलाबजाम बनवायचे होते. तुझ्या हातचे खूप छान असतात…. ,”
“मी करून पाठवू का ?”अर्चनाने विचारले?

“हो ग, मी तुला विचारणारच होते पण–“
“अगं मैत्रीण म्हणतेस मग …? अजून काही हवे?….पुलाव ?”
“हो,…वाSवा…अगं, चालेल काय,धावेल..”
मग अर्चनाने गुलाबजाम व पुलाव करून पाठवला .
दोन दिवसांनी रीना चा फोन आला “अर्चना गुलाबजाम मध्ये काय घातले होते..?”.    
“कां ग जमले नाही कां?”
“अगं खूप छान झाले होते, यांच्या एका मित्राने तर ऑर्डर दिली आहे दोन किलो ची ,देशील का?..  पैसे किती ते आधीच सांग.”

“बरं…. पण, थोड्यावेळाने फोन करून सांगते.”
अर्चना विचारात पडली काय हरकत आहे दोन तासाची मेहनत आणि इतके पैसे मिळणार असले तर ?तसेही ती दिवसभर घरीच असते.
अर्चना ला एक वाट दिसायला लागली ज्यात श्रम तर आहे, पण पैसेही लगेच आणि तेही घरी बसल्या…… .
तिने होकार कळवला, आता अर्चनाने आपली प्रत्येक रेसिपी डायरीमध्ये नोट करायला सुरुवात केली.
गुलाबजाम पासून सुरू झालेल्या गोड प्रवासात पुढचे स्टेशन किटी पार्टी, बर्थडे पार्टी चे मेनू पर्यंत गाडी पोहोचली.
खाण्याचे आवड असलेल्या अशोक ची सुद्धा काही हरकत नव्हती. त्याच्या वागण्यात सुद्धा आता तिच्या कामाचे कौतुक जाणवू लागले. तो तिला हवं असलेलं सामान कटकट न करता आणून देऊ लागला.

एक दिवस आईचा फोन “अर्चू आता तू रिकामीच असते तर ये ना माहेरपणाला , तुझ्या वहिनीची पहिली मंगळागौरआहे, आठ दिवस आधीच ये आणि राखी करूनच जा, थोडी मदत ही होईल ग मला आणि तुझं,  राहणं पण होईल.”. 
अर्चनालाही आईची खूप आठवण येत होती आईकडे गेल्यावरही अर्चना सतत स्वयंपाक घरात .
भावजय म्हणाली सुद्धा,… “ताई अहो इथे तरी आराम करा”.. पण अर्चनाने या आठ दहा दिवसात आई कडून बरेच पदार्थ अगदी मापा सकट शिकून घेतले. 
एक दिवस शेजारच्या शांता काकूंकडे जाऊन, त्यांना विचारून, उकडीचे मोदक करून पाहिले. मंगळागौरीच्या दिवशी अर्चनाने स्वतः पुरणपोळ्या केल्या सर्वांना खूप आवडल्या.

परत आल्यावर आईने माहेरपणाचे व राखीचे दिलेले पैसे व आपले साठवलेले पैसे मिळवून अर्चनाने एक छान स्मार्टफोन घेतला. त्यावर आपल्या भिशीच्या मैत्रिणी अशोकच्या ऑफिसच्या लेडीज स्टाफ चे व्हाट्सअप नंबर घेऊन एक ग्रुप केला, म्हणजे कॉन्टॅक्ट करायला सोपे. इतर स्थानिक ग्रुप्स मध्ये सुद्धा जहिरातवजा, खाद्यपदार्थ आणि त्यांच्या रेट्स विषयी माहिती, मधून मधून देण्यास सुरुवात केली.
हळूहळू महिन्यातून दोन-तीन ऑर्डर तिला मिळू लागले. शेजारच्या ताईने तिला कुकिंग क्लास उघडण्याचा सल्ला दिला. तेव्हां अर्चनाच्या लक्षात आले कि आज काल आवडणारे  पदार्थ पिझ्झा, केक आणि इतर बेकरी आयटम्स तिला तितके येत नाही.

गणेश चतुर्थीला बिट्टूचा वाढदिवस असतो बिट्टूला तीन मजली चॉकलेट केक हवा असा त्याचा हट्ट होता.
अर्चनाने युट्युब वर पाहून तसाच्या तसा केक बनवला .
अशोक व त्याच्या सगळ्या मित्रांनी खूप खूप प्रशंसा केली व एक ऑर्डर ही तिला मिळाली.
अर्चनाने मग वेगवेगळ्या तऱ्हेचे केक करून पाहिले. त्याकरता लागणारे साहित्य अशोक तिला आणून देऊ लागला.
आई अन्नपूर्णेचा आशीर्वाद आणि अर्चनाची मेहनत दोन्ही कामी आले.
आता तिला केक्स व बेकरीच्या ऑर्डर्स सुद्धा मिळू लागल्या. 

गणपतीच्या दहा दिवसांत तिला १०८ उकडिच्या मोदकांची आर्डर मिळाली, महाराष्ट्र समाजा कडून.
ती पूर्ण करताना अर्चना ची खूपच धावपळ झाली पण बप्पा मोरयाच्या कृपेने जमून गेलं आणि एक विश्वास मनात जागा झाला.
अशा तऱ्हेने एक वर्ष निघून गेले.
या काळात तिने बरेच फूडब्लॉग, प्रसिद्ध शेफ चे प्रेझेंटेशन, बोलायची स्टाईल वगैरे बारकाईने पाहिले. मग एक दिवस रीना व अशोकच्या मदतीने तिने एक रेसिपी शूट करवली आणि व्हाट्सअप वर मित्रांना पाठवली.
त्यावर तिला खूप छान कमेंट्स आले हळूहळू तिने बऱ्याच रेसिपी शूट करवल्या.
रीना ने तिला युट्युब वर स्वतःचे वेगळे चॅनेल सुरू करण्याचा सल्ला दिला पण इतका पैसा कुठून आणायचा, हा प्रश्न होताच.

कारण त्याकरता  छान स्वयंपाकघर आणि इतर भांडी गॅस सर्वच नीटनेटके हवे. असा विचार करता करता अर्चनाचा हात त्या जखमेवर गेला जिथे ब्लेड लागली होती तो घाव वरून जरी बरा झाला होता पण मनातला घाव अजूनही ठसठसतच होता त्याने मनातला विचार अजून पक्का झाला. अशोकनेही आता तिला लोन मिळवून देण्याची तयारी दाखवली तेव्हा अर्चनाने स्वाद आस्वाद नावाने 15 ऑगस्ट च्या सुमुहुर्ता वर आपले चॅनल सुरू केले आणि काही रेसिपी त्यात टाकल्या. पहिल्याच प्रयत्नांना भरभरून यश मिळाले बरेच सबस्क्राईब झाले .हळूहळू अर्चनाच्या ‘स्वाद आस्वाद’  चा जादू सर्वत्र पसरू लागला व हळूहळू मिळक सुद्धा वाढू लागली. अर्चनाचे ‘अर्चनाज स्वाद आस्वाद’ नाव प्रसिद्ध झाले.

आपल्या नव नवीन रेसिपीज बरोबर ती  पदार्थाचे प्रमाण व त्यातून किती पीस तयार होतिल हेही सांगत असे.
एकदोन विडियो तिने पदार्थ बिघडला तर त्याला कसे सुधारता येईल ते दाखवून दर्शकांच्या समस्या दूर करण्या साठी काही टिप्स दिल्या.दर्शकांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली त्या मुळे अल्पावधीतच ती आवडती कुक झाली.
एक एक पायरी चढत असताना  अर्चना ने आपली सखी रीना आणि पती अशोक दोघांना नेहमीच मान दिला.
एका कुकींग स्पर्धेत परिक्षक म्हणून  तिला निमंत्रण आले.
स्पर्धे नंतर बोलताना  तिने तिच्या यशस्वी वाटचालीचे श्रेय  पती  अशोक व सखी रीनाला प्रामुख्याने दिले.
इतक्या काळा नंतर सुद्धा जखमेवर हात गेला की  दुःखा च्या जागी अर्चनाला मनात, स्वकर्तृत्वाने जीवनाची नवी वाट घडविण्याच्या आनंदाची अनुभूती देऊन जाते.
अब हवाएं ही करेंगी, रौशनी का फैसला….
जिस दिये में जान होगी,वो दिया यह पाएगा !!
©®सौ. प्रतिभा परांजपे

सदर कथा लेखिका सौ. प्रतिभा परांजपे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही. या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखिकेची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी.
कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ ( नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
धन्यवाद.!!!
📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!