जत्रा

©® मृणाल शामराज.
“अरे.. अरे.. हो.. हो..अरे.. अरे.. हो.. हो..तिकडेच चाललोय ना आपण?” राधाच्या हाताला आता ओढ असाह्य झाली हॊती, शेवटी ती वैतागून राजसला म्हणाली.
त्याने एक क्षण आईकडे पहिलं, तिचा अंदाज घेतला आणि तो खुदकन हसला.
ते निष्पाप हसू पाहून राधा विरघळली. अजाणतेपणे ती पण सौम्य हसली.
“अरे!तिकडेच जातोय ना. ते बघ पाळणे दिसतात आहेत ना तुला. पोचू पाच मिनिटात.”
“हॆ.. आली जत्रा. आता मी मजा करणार. पाळण्यात बसणार, गोल चक्रात फिरणार, जादूचे खेळ बघणार.
अजून काय बरं करायचं आहे? ऊं.. ऊं.”

“काय रे?कसल्या विचारात पडला एवढा?”
त्या निरागस चेहऱ्यावर दिसणार प्रश्नचिन्ह पाहून राधानी विचारलं.
“आई.. अजून काय बरं!…परत तो आठवण्यात गुंतला.
राधा बघत हॊती. अवघं पाच वर्षाचं वय त्याचं.
लग्नाला दहा वर्ष झाली आपल्या. सगळ्या आशा संपल्या होत्या आपल्या.
कुणाचं छोटं मुलं पाहिलं की जीव कासावीस होई.
काय चुकलं आपलं?रस्त्यावर भीक मागणाऱ्यांची त्या ट्रॅफिक मधुन बेधडक फिरणारी छोटी मुलं पाहून तिचा जीव खालीवर होई. ह्यांची ऐपत नसून देवं हयांना मुलं देतो, मग मी काय केलंय?
खुप डॉक्टरांना दाखवून झालं.

सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत दोघांचे. देवधर्म चालूच आहे. पण..
हा पणचं सगळीकडे आडवा यायचा.
सासर, माहेरचे समजूतदार होते. ते तिच्या जवळ हा विषय काढत नसतं.
पण.. कुठे गेलं की, किती टाळू म्हटलं तरी कुणी तरी हा विषय काढे, मग राधा ढासळून जाई.
बांधलेला धीर.. ती कोलमडून जाई.
एकदा सासूबाईंच्या माहेरी गेली हॊती त्यांच्या बरोबर.. त्यांच्या भावाच्या नातवाच्या बारशाला. खरं तर तिची अजिबात इच्छा नव्हती.
पण सासूबाईंपुढे काही चाललं नाही.गेल्या गेल्या त्या मामींनी विचारलं, “अगबाई! काही विशेष आहे का?”
“नाही अजून.”
“अग, दहा वर्ष झाली ना लग्नाला… आमची वसू बघ. दुसरा चान्स घेतला तिने.
तुमची लग्न बरोबरचं झाली ना?”

राधा गोरीमोरी झाली.
ते पाहून सासूबाई पुढं झाल्या, “होईल ग ! असतो उशीर एखाद्याला.”
“उशीर म्हणजे किती? अघटितच आहे सगळं.
राधा रडायलाचं आली हॊती.
सासुबाई म्हणाल्या, “हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे वहिनी. दुसऱ्यांनी यात पडू नये.”
कसतरी तो कार्यक्रम पार पाडून त्या घरी आल्या.
पण राधा पार खचली हॊती. काय करावं? घरचे हवालदिल झाले.
परत तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला.

अगदीच आशा संपल्यावर, शेवटी मुलं दत्तक घ्यायचं ठरलं. अनाथाश्रमातून एक गोंडस,निरोगी बाळ त्यांनी दत्तक घेतलं.
त्याचं ते सुंदर रुप बघुन त्यांनी त्याचं नावं ठेवलं राजस.
राजस.. गोबरा, गोबरा, गोल चेहरा. टपोरे डोळे, कुरळे, कुरळे केस.
कुणालाही पटकन त्याला उचलून घ्यावं आणि त्याचा पापा घ्यावा अस वाटायचं. खुप मोहक होता तो.
राधा, मोहन त्याच्यात गुंतले.
त्याला सांभाळताना तिला दिवस अपुरा पडायचा.
सतत त्याला पडणारे प्रश्न.. आणि द्यावी लागणारी उत्तरं. राधा त्याला जीव की प्राण करी.

वेगवेगळी पुस्तकं खुप आवडायची त्याला.
मोहन खुप सारी गोष्टींची पुस्तकं घेवून आला होता.
राधा त्याला ती वाचून दाखवत हॊती. त्यातली चित्र पाहून ती गोष्ट समजावून घ्यायचा तो प्रयत्न करत होता.
आणि अचानक पुढच्या पानावर आलेली एक गोष्ट त्याला खुप आवडली.
गोष्ट हॊती गावची जत्रा. त्या गोष्टीत जत्रेची चित्र हॊती. वेगवेगळ्या रंगातली ती चित्र!
ते खेळण्याचे स्टॉल, फुगेवाले, उंच गोल फिरणारे पाळणे त्याला खुप गंमत वाटली.
“आई, हयाला काय म्हणतात? किती छान आहे. मला ने ना तिकडे.”
“बाळा, हॆ गावाला असतं. आपण शहरात राहतो.”

“आई, जावू या न ग आपण.” तो आईच्या गळ्यात पडला.
आईच्या गालाला, गाल घासत त्यानी आईचं नाक पकडलं.
राधाला त्याचा हा लडिवाळपणा खुप आवडला.
त्याला छातीशी धरत ती म्हणाली, “जाऊ बरं आपण. आजीच्या गावाला चैत्रीपुनवेला जत्रा असते. तेव्हा नक्की जाऊ.
चल, लाडू देते तुला.”
ती उठून गेली तरी राजस तिथेच बसून होता. पुस्तकातलं तिचं पानं तो न्याहळून बघत होता.
हॆ सारं कसं असेल, ह्याचा तो विचार करत होता.
राधा वाटीत लाडू घेवून आली.
“अरे, आवरतोस ना, ग्राऊंडवर जायचंय ना?”

तो काहीश्या नाराजीनेच उठला. तयार झाला. निघतांना राधानी पाहिलं तर ते पुस्तकं त्याच्या हातात.
“राजस, पुस्तकं घरी ठेवून जायचं हं.”
“अं.. आई, मी नेणार.”
“अजिबात हट्ट करायचा नाही. ठेव. चल पटकन.”
नाईलाजाने त्यानी ते पुस्तकं घरी ठेवलं. ग्राऊंडवर सगळे मित्र भेटले.
खेळून झालं. सगळ्यांच्या आया गप्पा मारत होत्या. मुलं पण गप्पात रंगली.
“प्रणव, मोहित तुम्हाला माहिती आहे का ? मी जत्रा बघायला जाणार आहे.” राजस त्यांना सांगत होता.

“म्हणजे रे काय.. मॉल आहे का हा?”
“नाही रे, जत्रा गावाला असते. तिथे काय असतं सांगू!” मग त्याला जसं आठवेल तसं तो मित्रांना सांगत होता.
मित्रांनाही गंमत वाटली. असं काय असेल बरं.. सर्कस तर अशी नसते.
मॉलमधे ही असं काही नसतं.
“मला पण नेशील का रे.? मी पण येणार! मी तुझा बेस्ट फ्रेंड ना?” मोहित म्हणाला.
राजसनी क्षणभर विचार केला नी म्हणाला, “अरे, ती लांब आजीच्या गावाला असते. तुम्ही कसे येणार?”
“हो रे खरंच! लकी आहेस तु.”
“मोहित.. लकी म्हणजे रे काय?” मोहित राजसहून थोडासा मोठा.
“अरे, लकी म्हणजे तुला हवं ते तुला मिळतं ना!”
“ओ.. आय सी.” हा बाबांच्या तोंडातला शब्द अनाहुतपणे राजसने घेतला होता.

“चल राजस. बाबा आला असेल घरी.” त्याला घेवून राधा तिथून निघाली.
बाकी मैत्रिणी गप्पात रंगल्या. ‘अग राधा किती छान सांभाळते राजसला.’
‘हो ना, कोण म्हणेल हयाला अनाथाश्रमातून आणलंय. अग, किती वाईट वागू शकते आई..
इतक्या गोड मुलाला टाकून दिलं होतं म्हणे तिथल्या दारात.’
प्रणव, मोहित तिथेच होते.
प्रणवनी विचारलं, “आई, अनाथाश्रम म्हणजे काय?”
त्या भानावर आल्या.
“काय करायच्यात चौकश्या तुम्हाला? चला घरी.”
घरी आलं तरी मोहितला चैन नव्हतं. तो सात वर्षाचा.
त्यानं आजीला विचारलं, “आजी, अनाथाश्रम म्हणजे काय ग?”

“अरे, ज्यांना आईबाबा नाहीत, कुणीही नाही त्यांना तिकडे सांभाळतात. पण तु का विचारतोयस हॆ सगळं?”
“सहजच ग आजी.” मोहित खिडकीत जावून बसला.
त्याच बालमनं कळवळलं. बिचारा राजस.. पण त्याची ही आई तर त्याची माया करते ना.
सगळं त्याला पटलं तरी दुसऱ्या दिवसापासून तो राजसची अजून काळजी घेवू लागला.
त्याला मोठ्या भावाप्रमाणे सांभाळू लागला.
इकडे राजस घरी येईतो बाबा घरी आला होता.
त्यानी ते पुस्तकं बाबाला दाखवत सगळी उजळणी परत सांगितली.
जेवून झोपताना पण तो ते पुस्तकं जवळ घेवूनचं झोपला.
त्याला मायेनी थोपटत राधा म्हणाली, “आता या जत्रेला, मी हयाला घेवून आईकडे जावं म्हणते.”
“नक्की जा, आता समजतंय सगळं त्याला.”

“आई.. बघ ना प्रणव,मोहित ice-cream खातात आहेत. मला दे ना.”
“नाही. सर्दी होते ना तुला. नकॊ.” राजस नाराज होऊन बाकावर बसून होता.
मोहितने हॆ ऐकलं. त्याला खुप वाईट वाटलं. त्याची खरी आई असती तर तिनं त्याला नक्कीच दिलं असतं. बिचारा..
दिवस चालले होते.
चैत्र पौर्णिमा जवळ आली.
एक दिवस राधानी राजसला सांगितले, उदया आपण आजीकडे जाणार आहोत. जत्रा बघायला.
राजस आनंदात उडया मारू लागला.
“आई, माझं हॆ घेतलंस? ते घेतलंस का?”
“सगळं घेतलं रे.”
“आणि बाबाची बॅग?”
“बाबाला ऑफिसचं काम आहे. आपण दोघच जाणार आहोत.”
संध्याकाळी राजसनी आपण उदया जत्रेला जाणार असं मित्रांना सांगितलं. वा, मजा आहे तुझी. प्रणव म्हणाला.

सकाळी आईनी न उठवताचं राजस उठला. पटपट सगळं आटपून तो आईबाबांबरोबर स्टॅण्डवर पोचला.
बसमधे बसताना बाबांनी त्याला समजवून सांगितलं. खुप मजा कर. तिथे खुप गर्दी असते. आईचा हात सोडू नकोस.
सगळ्या गोष्टींना तो मान हलवतं होता. पण त्याचं सगळं लक्ष बस कधी सुटते इकडे होतं.
बस सुटली.
ती सुटल्याचा आनंद आणि त्या बरोबर बाबा लांब लांब चाललाय हयाचं दुःख. तो वाकून वाकून बघत होता.
अखेर बस स्टॅंडच्या बाहेर पडली. आता मात्र त्याचं लक्ष खिडकीच्या बाहेर होतं.
शहर मागे सुटत होतं.
त्याच्या घराच्या जवळपास असणाऱ्या ओळखीच्या खुणा दुर जात होता. खिडकीतून भिरभिरत येणाऱ्या वाऱ्यानी त्याचे डोळे पेंगुळले.
तरी डोळे ताणून तो ते सारं डोळ्यात भरून घ्यायचा प्रयत्न करत होता.

राधाच्या ते लक्षात आलं. तिनं हळूच त्याला कुशीत घेतलं. आईच्या शरीराच्या चिरपरिचित सुगंधानी तो अलगद गाढ झोपला. राधा त्याच्या कुरळ्या केसातून हात फिरवीत हॊती. केवढं अनमोल असं मातृसुखं दिलं हयांनं मला. मातृत्वाशिवायं जीवन व्यर्थ वाटतं होतं.
कशी असेल ह्याची आई. क्षणभर नजरेआड झाला हा तर जीव व्याकुळ होतो माझा. माझ्या नशिबातं होता हा म्हणूनच..
बस नी एक गचका दिला.
त्या धक्क्यानी राजस अर्धवट जागा झाला.
“आली का ग आई, जत्रा?”
“नाही रे राजा, अजून वेळ आहे. झोप तु.”
गावाला पोचेपर्यंत अंधार झाला होता.
राधाचे बाबा तिला घ्यायला आले होते. आजोबा!म्हणतं त्यानी त्यांच्याकडे झेप घेतली.
आजी तर त्याचे खुप लाड करत हॊती. गडी खुप ख़ुशीत होता.

“आजी.. जत्रा.”
“हो बाळा. आजचं आला ना तु. उदया जाऊ बरं.” त्यानी शहाण्या बाळासारखं सगळं ऐकलं.
अखेर सकाळ उजाडली. अंगणतील बैल जोडी आजोबांनी झुलं घालून सजवली.
राजस बाजेवर बसून सारं बघत होता. आजोबा त्याला समजावून सांगत होते.
शेजारच्या आया, बाया येऊन त्याला बघुन गेल्या. जिला जसं जमेल तसं ती त्याच्या हातात पैसे घालत हॊती.
आता तर राजस अजून खूष झाला.
“आई.. हॆ बघ किती पैसे. मला खुप खेळणी घ्यायची आज.”
“हो, बरं.”
ऊन थोडं कललं. आजोबांनी गाडी काढली. राजस आजोबांबरोबर गाडी हाकत होता.
त्याला खुप मजा येतं हॊती.

गावाच्या बाहेर आता जत्रेच्या खुणा दिसू लागल्या.
लोकं गाड्या भरून तिकडे निघाली हॊती. काही परततं हॊती.
त्या मुलांच्या हातातल्या पिपाण्या, खेळणी बघुन राजसला तिकडे कधी पोचू असं झालं होतं.
ग्रामदैवत सिद्धेश्वराच्या मंदिराजवळ आजोबांनी गाडी लावली. राधा, आजोबा आणि राजस देवळात निघाले.
लोकं रामराम करत हॊती. राजसशी बोलत हॊती. त्याला खुप गंमत वाटली.
किती लोकं ओळखतात आपल्या आजोबांना.
तुम्ही जाऊन या.. मी इथेच बसतो. मला धुळीचा त्रास होईल. खोकला थांबत नाही मग.
हो, आबा. आम्ही येतों जाऊन. तुम्ही बसा इथे.
उड्या मारत राजस निघाला. ती खेळण्यांची दुकानं .. तो आनंदाने वेडा झाला.
इतकी खेळणी.. कशालाही हात लावला तर हॆ काका रागवत नाहीत.

अन,तो मॉल, घराजवळचा. सगळी खेळणी काचेत. कशाला हात लावायला गेलं की आई डोळे मोठे करते.हळूच लेबल बघते. मग उदया घेऊ म्हणते. पण आईने आज खुप खेळणी घेवून दिलीत.
माझी आई.. किती चांगली आहे. पुढे गेलं की गोल चक्रात तो बसला. छोट्या ट्रेन मधे बसला.
पुढे एक मदारी बसला होता. तिथे तो उभा राहिला. बाजूला खुप मुलं हॊती.
तो मदारी, जसं करी तसं ते माकड करे. सगळी मुलं हसत हॊती. राजसला पण खुप गंमत येतं हॊती.
ते पुढे गेले. तिथे मृत्युचा गोल.. हा खेळ चालू होता. राजस ते बघत होता.
ती मोटारसायकल वेगानी गोल फिरत हॊती. त्याचे डोळे विसफ़ारले. बापरे, आता हा पडणार. घाबरून त्यानं आईचा हात घट्ट धरून ठेवला. डोळे गच्च मिटून घेतले.
“अरे, असं घाबरायचं नसतं. नीट बघ. तो कसा चालवतोय. शूरवीर आहे तो. अजिबात घाबरत नाही. तू पण शूरवीर होणार ना ?”
त्यानी जोरात हो म्हणून मान हलवली.

मग आईनी त्याला भाजलेल्या शेंगा घेवून दिल्या. उसाचा रस दिला. त्याला खुप मजा येतं हॊती. आता हॆ सगळं तो प्रणव, मोहितला सांगणार होता. थोडं पुढं गेल्यावर त्याला नंदीबैलवाला दिसला.
“अबब.. आई, केवढा ग हा बैल आई!”
“अरे, आता गंमत बघ.”
नंदीबैलवाला त्याला प्रश्न विचारत होता आणि तो बैल बरोबर उत्तर देतं होता.
दादा, तु विचार ना काहीतरी? त्या माणसानी राजसला म्हटलं.
माझे बाबा इथं येतील का रे? मला त्यांची खुप आठवण येतें. डोळ्यात पाणी आणून राजसनी बैलाला विचारलं.
नंदीबैलवाला पण भारवला. बैलानी बुगुबगु मान हलवली.
येतील बरं तुझे बाबा दादा. त्याच्या डोक्यावर हात ठेवत तो म्हातारा नंदीबैलवाला म्हणाला.
राजसनी आईकडून पैसे घेवून त्याला दिले.

आता ते पुढे आले. समोर मोठा पाळणा दिसतं होता. त्याचे रंगीबेरंगी light लांबून सुद्धा चमकत होते.
आई.. ह्याच्यात बसायचं. हो.. राधा म्हणेपर्यंत कुणीतरी तिला हाक मारली.
मागे बघते तो तिच्या शाळेतल्या मैत्रिणी. ती त्यांच्याशी गप्पा मारण्यात रमली.
राजस कंटाळून कधी आई इथून निघेल ह्याची वाट बघत होता आणि अचानक एकच कल्ला उठला.
सगळी लोकं वाट मिळेल तशी पळत हॊती. तीन चार गाढवं उधळली हॊती. गर्दीच्या रेट्यात राजसचा आईने धरलेला हात सुटला.
त्याला काही कळेना. तो गर्दीबरोबर पळत सुटला. आपण कुठे चाललोय हॆ त्याला कळेना. तो पळतचं होता.
इकडे राधापण काही अंतर गेली. तिच्या लक्षात आलं की राजस आपल्या जवळपासही नाही आहे. तिचा धीर खचला.
कुठे गेलं असेल माझं बाळ. ती सैरभैर होऊन त्याला शोधू लागली.

अन राजस.. तो खुप लांब आला होता. पळून पळून दमला अन एका झाडाखाली बसला. त्याला खुप रडू येतं होतं.
कुठे जावं? माझी आई!बाबा! कुठे असतील? मी कसं घरी जाऊ? इथं मला कुणीही ओळखत नाही.
तो बेचैन होऊन रडत होता. तेवढ्यात त्याला घंटेचा आवाज आला. पाहतो तर तो नंदिबैलवाला तिकडेच येतं होता.
हा मुलगा.. मगाशी आईबरोबर होता. आता एकटा. म्हाताऱ्याला प्रश्न पडला.
त्याचा सुकलेला चेहरा.. रडून लाल झालेले डोळे, विस्कटलेले केसं. काय बरं झालं असेल.
एकदम मगाचा उठलेला गोंधळ त्याच्या लक्षात आला.
चुकलंय जणू हॆ लेकरू.
“काय रे लेकरा? इथे एकटा काय करतो आहेस? आई कुठे तुझी?”
“माझी आई हरवली. मला सापडत नाही.”
“अं.. अं..”
“रडू नकॊ. येईल आई शोधत तुला. मी थांबतो सोबत तुझ्या.”

इकडे राधा सगळी दुकान शोधत हॊती. राजस सापडत नव्हता. तिला सुचेना, काय करावं तिनं मोहनला फोन लावला.
तोही घाबरला. असा कसा हात सोडला तु त्याचा. घाबरू नकॊ. पोलीसचौकी वर तक्रार कर. मी निघतो लागलीचं.
आबांना कुणीतरी सांगितलं हॆ सारं. तें ही दोघांना शोधत तिकडे आले.
पोलिसानी तक्रार नोंदवून घेतली. तें पण त्याला शोधू लागले.
इकडे रडून, रडून राजस कंटाळला. त्याला खुप भूक लागली हॊती. त्यापेक्षा आईच्या मांडीवर झोपायचं होतं.
आई.. आई.. एकदम त्याला काहीतरी आठवलं. तो नंदीबैलाजवळ गेला.
रडत रडत त्याला विचारलं त्यानी. “आई सापडेल नं रे माझी? आणि बाबा.”
म्हातारा कळवळला, “हो, लेकरा, येईल रे तुझी आई. ये! भुकेजला आहे जणू. ही भाकर खा थोडी.”
राजस खाता खाता तेथेच पेंगुळला. म्हाताऱ्यानी त्याचं एक धोतर काढलं आणि त्यावर त्याला झोपवलं.

आता हयाला कुठं नेवून सोडावं ह्याचा तो विचार करू लागला.
इकडे राधा मैत्रिणींना विचारत हॊती दिसला का ग मुलगा माझा.
काय बाई तु आई.. असा लेकराचा हात सोडतात का. स्वतःच पोरं असतं तर असं केलं असतं का?
राधाच्या उरात भाला खुपसल्यासारखं झालं.
स्वतःच पोरं.. खरंच वेगळं वागवलं का त्याला मी. देवानी असं का करावं.
ती विचार करत हॊती तोपर्यंत एक पोलीस तिला शोधत आला. बाई, तुमचा मुलगा सापडलाय. चला.
तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वहातं होते.
सगळे त्या झाडाखाली पोचले. त्या म्हाताऱ्याला पोलिसानी ताब्यात घेतलं होतं.
“बाई. हा तुमचा मुलगा का?”

“हो.. हो.. माझाच.” त्याला उचलून घेतं ती म्हणाली.
आईचा आवाज ऐकून राजस जागा झाला.
आईगं.. माझी आई.
मला सोडून नकॊ ग जावू.
नाही रे राजा.. आता कुठे सोडणार नाही तुला.
पोलीस त्या म्हाताऱ्याला पकडून नेत होते.
तो खुप गयावया करत होता.
राजसनी तें पाहिलं, “पोलीसकाका, त्या आजोबांना रागवू नका. त्यांनी मला पळवलं नाही. माझी आई हरवली हॊती.तें माझ्याबरोबर बसून होते. त्यांनी मला खायला दिलं. झोपवलं. तें खुप चांगले आहेत हो.”
पोलिसानी मग त्या म्हाताऱ्याला सोडून दिलं.
“बाई, गर्दीत मुलं सांभाळा. कुणी पळवून नेलं असतं तर त्याला.” नुसत्या विचारांनी तिला घाम फुटला.
घरी परतताना ती आठवत हॊती. कुठल्या कुठल्या देवांना नवस बोलले तें.
रात्री तो आईला घट्ट मिठी मारुन झोपला. झोपेत पण त्याला हुंदके येतं होते. रात्री उशिरा मोहन आला.
राजसला सुखरूप पाहून त्याचा जीव भांड्यात पडला.

आज किती मोठ्या संकटातून आपण वाचलो हॆ त्यांना जाणवले. सकाळी उठल्यावर बाबाला बघुन त्याला खुप आनंद झाला.
त्यानी सगळ्या गंमती बाबाला सांगितल्या.
“बाबा, नंदीबैल सगळं खरं सांगतो बरं का.. बघा तुम्ही आलात की नाही?”
सगळे खुप हसले.
“आज, आपण त्या उंच पाळण्यात बसायला जावू बरं.”
“नकॊ.. नकॊ. बाबा, आपण घरी जावू. मला घरी जायचंय.”
“अरे, जत्रा बघायची नं तुला”
“नकॊ, घरी जावू यात.” दुसऱ्या दिवशी तें घरी परतले.
आता राजसला मित्रांना सारं कधी सांगू असं झालं होतं.
संध्याकाळी ग्राउंड सुटल्यावर त्यानी सगळं, सगळं मित्रांना सांगितलं.

तिथली मजा ऐकून त्यांना पण तिकडे जावं वाटलं.
पण जेव्हा राजसनी तो कसा चुकला हॆ सांगितलं. तेव्हा सगळे खुप लक्ष देऊन ऐकत होते.
बघ.. लकी आहेस तु मी म्हणतो नं तुला. प्रणव म्हणाला.
पण मोहित काही तरी विचारातचं घरी आला.
“काय.. राजे.. आज बोलायचं नाही का काही?” आजी म्हणाली.
मग मोहितनी आजीला राजसची सगळी गोष्ट सांगितली.
“आजी.. ती मेहरा काकू म्हणतं हॊती, राजस कुठे राधाकाकूंच बाळ आहे? तिला इतकं वाईट वाटायला. असं असतं का ग, बिच्चारा राजस. मला त्याच खुप वाईट वाटतं.”

त्याला जवळ घेतं आजी म्हणाली..,”बाळा.. असं अजिबात नसतं. तुला कृष्णाची गोष्ट माहिती आहे ना. त्याला देवकीनी जन्म दिला, पण यशोदेनी सांभाळ केला ना. आई म्हणून कुठं कमी पडली का ती. मी राधाला चांगली ओळखते. ती राजसला खुप प्रेमानी सांभाळते. तु ही पाहतोस ना? लोकं काहीही बोलतात, आपण लक्ष देऊ नये. आणि, हो.. त्याला ह्यातलं काहीही कळू देऊ नकोस. आई ही आईचं असते बाळा. ती कधीही वाईट नसते.”
मोहितला हॆ पटलं. त्याच्या मनातलं राधाकाकुबद्दलचं किल्मीष पूर्ण दुर झालं होतं आणि आदर वाढला होता.
त्यानी ठरवलं होतं की आता तो ही पुढच्यावर्षी जत्रेला जाणार.. राजस बरोबर, त्याचा घट्ट हात धरून.
पुन्हा न हरवण्यासाठी…
©® मृणाल शामराज.
सदर कथा लेखिका मृणाल शामराज यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही. या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखिकेची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी.
कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ ( नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
धन्यवाद.!!!
📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!