उपरती

©️®️सायली जोशी.
“अहो, आपल्या लेकीला इकडे आणूया म्हणते मी. किती त्रास होतोय तिला सासरी!” सुमन काकू नाराज झाल्या होत्या. यावर शरदराव काहीच बोलले नाहीत.
वर्तमानपत्र उघडून वाचलेल्या बातम्या पुन्हा पुन्हा वाचत राहिले.
‘आधी हे किती बोलायचे माझ्याशी! आणि मी मात्र किंमत दिली नाही यांना. आपल्याच विश्वात दंग होते.’ काकू मनातल्या मनात म्हणाल्या.
“अहो, बोला ना काहीतरी. आणखी किती दिवस अबोला धरणार आहात माझ्याशी? काय चूक झाली, ते तरी सांगा. या इतक्या मोठ्या घरात आपण दोघेच राहतो. एक सखू सोडली तर बाकी कोणी येत नाही इथे. तुमचा लाडका मुलगा तिकडे परदेशात जाऊन बसला आहे. आपले आई – वडील हयात आहेत हे त्याच्या गावी देखील नाही.
आपल्या मुलीला इतका त्रास होतोय तो आपण नुसता पाहत राहायचा का?” सुमन काकू काकुळतीने म्हणाल्या.

“हम्म.. बोला. काय त्रास होतोय तुमच्या लेकीला?” आज कितीतरी दिवसांनी शरदराव बोलले म्हणून काकूंनी बसल्या ठिकाणाहून जगदंबेला हात जोडले.
“आपल्या शिल्पाला किती काम पडतं सासरी! तिची सासू काही करत नाही. शिल्पाला घरातलं सगळं करावं लागतं. सासरे आजारी असल्याने त्यांचं पथ्य-पाणी तिलाच बघावं लागतं. दिर लहान असल्याने सारखा वहिनी, वहिनी करतो.” सुमन काकू काळजीने म्हणाल्या.
“मुलगी सासरी गेली म्हणजे तिने सगळं करायलाच हवं. तुम्ही फार लक्ष घालू नका त्यात. तिचं ती बघून घेईल. मुलीचं एकदा लग्न करून दिलं की आपला संबंध संपला.” शरदराव.

“असं कसं? लेक आहे ती या घरची. ते काही नाही. मी चार दिवस राहायला जाते शिल्पाकडे. तिथे काय चालत, हे प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितल्याशिवाय चैन पडायचे नाही मला.” असं म्हणत सुमन काकू आवरायला आत गेल्या.
शरदराव डोळे मिटून आराम खुर्चीत बसले. ‘मुलाच्या बाबतीत हेच केलं म्हणून तो परदेशात निघून गेला. आता लेकीच्या संसारात ढवळाढवळ करू नका म्हणून किती वेळा बजावलं! पण ऐकायचे नाव नाही.’
“मी जाते. जेवणाचा डब्बा पलीकडे आरतीला द्यायला सांगितला आहे. बाकी तुमची मित्रमंडळी येतीलच म्हणा. पण मी परत येईन ते चार दिवसांनीच.” सुमन काकू लगबगीने बाहेर पडल्या.
—————————————

आईला असं अचानक आलेलं पाहून शिल्पाला आश्चर्य वाटलं.
“आई, अचानक कशी आलीस?”
“आठवण आली म्हणून आले.” सुमन काकूंनी तिच्या सासऱ्यांची चौकशी केली आणि त्या स्वयंपाकघरात आल्या.
“शिल्पा, जेवणाची वेळ झाली आहे. काय मदत करू ते सांग.”
“अगं, आई सांगतील ना आणि तसंही संध्याकाळचा स्वयंपाक त्याच करतात. मी बाकी आवरून घेते. झालं तर मग.” शिल्पा म्हणाली.बोलत बोलत तिच्या सासुबाईंनी तासाभरात सगळा स्वयंपाक केला. 

जेवणं झाली आणि शिल्पा आवराआवर करायला लागली.
“अगं, तुझी आई आली आहे ना, जा तिच्याशी गप्पा मार. आज मी करते आणि काम काय रोजचं आहेच. ” सासुबाई आत येत म्हणाल्या.
“नको आई. मी करेन सगळं. जा तुम्ही दोघी गप्पा मारा.” शिल्पाच्या बोलण्याने सुमन काकूंना आपल्या सुनेची आठवण आली.
‘रितू घरात काही काम करू देत नव्हती मला. मी करेन सगळं म्हणायची आणि मला वाटायचं, आपला हक्क हिरावून घेते ती!’ सुमन काकू आपल्याच विचारात हरवून गेल्या.
—————————-

रात्री उशीरा डोळा लागल्याने सकाळी काकूंना जरा उशीरा जाग आली. खाली येऊन पाहतात तर, शिल्पा आणि सासुबाई नाश्त्याची तयारी करत होत्या. सासुबाई सांगतील तशी शिल्पा तयारी करत होती.
“शिल्पा, कालपासून पाहते मी. सगळी कामं तुझ्या सासुबाई करतात. तूही जबाबदारी अंगावर घेत जा.” सुमन काकू न राहवून म्हणाल्या.
आपण कल्पना केली त्याऐवजी वेगळचं चित्र पाहायला मिळालं याचं मात्र काकूंना नवल वाटलं.
“अहो, इतके दिवस तिच करत होती सगळं. पण आपण नुसतं बसून काय करायचं? म्हणून मी तिची मदत करते. सकाळचं सगळं तिच आवरते म्हणून संध्याकाळचा स्वयंपाक मी करते.
सुनेला प्रतिस्पर्धी मानण्याऐवजी तिला आपली सावली बनून घरात वावरू द्यायचं. असं माझं मत आहे.” शिल्पाच्या सासुबाई हसत म्हणाल्या.

‘रितू म्हणायची आई, तुम्ही सांगा. तसं मी सगळं करेन. अगदी चहा सुद्धा हातात आणून द्यायची. यावरून एकदा मीच बोलले तिला. ती इतकी घाबरली की सगळा चहा माझ्या पायावर सांडला.
मग मी काय केलं? तिच्यामुळे पाय भाजला म्हणून सगळ्या गावभर सांगितलं. हे पाहून रोहन तिला किती ओरडला!
पण चूक माझी होती, हे मात्र तिने कोणाला सांगितलं नाही.
सून आली म्हणून सखूला सुद्धा कामावरून काढून टाकलं. पण तिने मन लावून सगळं काही केलं.
“आणि सुमन ताई, हे सुध्दा शिल्पाचं सगळं ऐकतात म्हणून त्यांचं पथ्य -पाणी तिच बघते.” शिल्पाच्या सासुबाई मधेच म्हणाल्या.

‘रितू सुद्धा घरात सगळ्यांची काळजी घ्यायची. तिचं आणि शरदरावांचं बाप -लेकीसारखं छान जमायचं. तरीही मला वाटायचं, सून येणार म्हणून इतकी वर्ष आपण आपल्या नवऱ्याची काळजी घेतलीच नाही की काय? हे जेवढं तिचं ऐकायचे तेवढा मान मला मिळाला नाही. पण सासरा आणि सुनेचं नातं हे बहुतेक असंच असावं.
पण शिल्पा फोनवर जे सांगायची, तसं चित्र घरात अजिबात दिसत नाही की मीच आपल्या मनाची समजूत तशी करून घेतली होती? सासुबाई तिच्या बरोबरीने घरातलं सगळं करतात. दोघी अगदी माय -लेकीप्रमाणे वागतात.
आपण मात्र सून आल्यावर सासूचा मान लगेच मिळायला हवा म्हणून हट्ट धरला. या हट्टापायी सुनेशी कसं वागायचं हे कधी कळलंच नाही मला. वाटायचं, सून आपल्याशी नीट वागणार नाही, आपल्याला मान देणार नाही. आपणच प्रश्न उपस्थित करायचे आणि आपणच त्यांची उत्तरं मनातल्या मनात सोडवायची.’

सुमन काकूंचे विचार संपतच नव्हते. त्यांना आपल्या सुनेची तीव्रतेने आठवण झाली.
“आई, अगं काय झालं? कधीची हाक मारते आहे मी.” शिल्पाच्या हाकेने काकू भानावर आल्या.
“काही नाही गं. आज संध्याकाळी घरी जाईन म्हणते.”
“हे काय? आलात काय नि लगेच चाललात काय?शरदरावांना इथेच बोलावून घेऊ. आज दोघे राहा आणि उद्या जा.” शिल्पाच्या सासुबाई.
“नको. ते काही यायचे नाहीत. मी जास्त दिवस इथे राहिले तर पुन्हा अबोला धरायचे माझ्याशी. तसंही आईने लेकीकडे जास्त दिवस राहू नये असं म्हणतात.”

‘रितूचं आणि शिल्पाचं गुळपीठ जमू नये म्हणून आपणच दूर ठेवलं दोघींना. पण आपल्या माघारी रीतू तिचं माहेरपण करणार, हे लक्षातच आलं नाही आपल्या.’
काकूंना मनापासून सुनेची आठवण आली.
संध्याकाळी घरी गेल्यावर आपल्या सुनेला कधी एकदा फोन लावते असं झालं त्यांना.
‘आपलंच चुकलं. समोरच्याला समजून न घेता आधीच त्याला आपल्या नकारात्मक विचारांच्या पिंजऱ्यात बंदिस्त करून रिकामे झालो आपण. घरची सून असून सुद्धा दुय्यम स्थान दिलं तिला.’

सुमन काकूंनी शरदरावांना गडबडीने त्यांनी कळवून टाकलं, “मी येते आज. खूप काही बोलायचं आहे.”
हे ऐकून शरदरावांना मनापासून आनंद झाला.
शिल्पाच्या घरी सारं काही आलबेल असून आपल्या बायकोला तिची चूक कळली असेल तर फार उत्तम झालं! त्यांनी बसल्या ठिकाणाहून जगदंबेला हात जोडले.
..आणि सुमन काकू अधिरतेने आपल्या घरी यायची तयारी करू लागल्या.
समाप्त.
©️®️सायली जोशी.
सदर कथा लेखिका सायली जोशी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखिकेची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी. कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ ( नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!