माई

©️®️ सौ.हेमा पाटील.
वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी साऊ लग्न होऊन सासरी आली, आणि त्या एकत्र कुटुंबातील सर्वांची माई बनली. अर्थात त्या काळात शिक्षणाबाबतची निकड फारशी जाणवत नसल्याने आणि मुलीला काय करायचेय शिकून..चूल आणि मूलच तर सांभाळायचे आहे असा दृष्टिकोन असल्याने मुलींच्या शिक्षणाबाबत बहुजनसमाज उदासीनच असे.
स्वातंत्र्यपूर्व काळ होता तो! महात्मा जोतिबा फुले सावित्रीबाई फुले यांचे मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न सुरू असले तरी तळागाळातील लोकांना त्याचे काही देणेघेणे नव्हते किंबहुना आपला यांच्याशी काही संबंध नाही इतके अलिप्तपणे याकडे पाहिले जात असे.
आणि साऊबद्दल बोलायचे म्हंटले तर तिच्या बाबतीत तर दैव तिच्यावर जणू रुसले होते.

जन्माला आल्यावर वर्षभरातच आई आणि त्यानंतर सहा महिन्यांनी वडीलांचा ही मृत्यू झाला,अन् ती पोरकी झाली. नाही म्हणायला आज्जी होती, पण सावित्री आणि हिच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा असणारा हिचा भाऊ यांच्यात आपल्या मृत मुलाचे प्रतिरुप पहावे अन् यांचा संभाळ करावा अशी इच्छा असूनही तरुण एकुलत्या एका मुलाच्या मृत्यूने खचून गेलेल्या मातेला दु:खातून बाहेर पडणे जमेना. मुलांची होत असलेली आबाळ पाहून साऊच्या आईच्या वडीलांनी आपल्या नातवंडांना आपल्याकडे घेऊन जाण्याची परवानगी मागितली, ती मिळाली अन् तिथून सुरु झाले साऊच्या आयुष्यातील एक नवे पर्व !
आजोळी कधीतरी चार दिवस येणारी नातवंडे, माहेरवाशीण,भाचरे यांची खूप अगत्याने उठबस केली जाते. माहेरवाशिणीवर प्रेमाचा जो वर्षाव केला जातो, त्याच्या जोरावर सासरी संसाराचा गाडा किती ही जोर लावावा लागला तरी ओढायची तिची ताकद वाढते,कारण मन प्रफुल्लित झालेले असते….पण इथे माहेरवाशीणच नव्हती.

नातवंडांना आपल्या मुलांसोबत सांभाळायचे त्यामुळे आजोळी रहाण्यातील सुखाला मुले पारखी झाली.अर्थातच यात काहीच वावगे नव्हते. पाहुणा चार दिवस राहिला तरच त्याचा पाहुणचार केला जातो. आश्रित म्हणून आल्यावर दुय्यम वागणूक मिळणार हे साहजिकच होते. आश्रित म्हणून रहाताना कामाच्या विभागणीत ही आपसूकच ही दोन्ही मुले सहभागी झाली. परंतु घरातील सदस्यांचा दर्जा नकळत का होईना पण कधी मिळालाच नाही.
छोट्याशा साऊची अन् तिच्या दादाची आता आपल्यापेक्षा वयाने मोठे असणाऱ्या चार मामा अन् दोन मावश्यांसोबत दिनचर्या सुरु झाली. 
मोठ्या मामांचे बोट धरुन रात्री मचाणावर वस्तीला जाण्याची साऊला कोण हौस ! रोज रात्री मामा निघाले की, ही तयारच असायची. कालांतराने मामांनाही तीची सवय लागली, आणि लहान वयातच साऊला शेतीच्या कामांची आवड निर्माण झाली, की बालवयात आईवडिलांपासून दुरावल्याने एकाकी झालेल्या मनाला कुठेतरी गुंतवण्याचे तीने शोधलेले ते एक ठिकाण होते कुणास ठाऊक? येईल त्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी तीने केलेली तडजोड…ती तर पुढील आयुष्यात ती सततच करत आली.

रानावनात,वाऱ्याच्या झुळकीत,पाटाच्या झुळुझुळू वाहणाऱ्या पाण्यात तीला जणू आईचा उबदार स्पर्श जाणवत होता. सकाळी उजाडताना पाखरांच्या मंजुळ किलबिलीने साऊला जाग येई.
सुर्याची पृथ्वीच्या अंतरंगाला स्पर्श करण्यासाठी आसुसलेली कोवळी किरणे अजून पृथ्वीवर पोहोचायची असत. त्या कोवळ्या किरणांचा दररोज पृथ्वीला होणाऱ्या कोमल स्पर्शाचे स्वागत करण्यासाठी जणू निसर्गाने पक्ष्यांच्या मंजुळ स्वरांत स्वर्गीय संगीताच्या पार्श्वभूमीची योजना केली गेली असावी. खूप विहंगम दृश्य दिसते ते..
जर आपण त्यावेळी नदीकिनारी असलो तर सुर्याचे हळूहळू आपली प्रकाशकिरणे फैलावत उगवणे आणि त्याचवेळी पक्ष्यांची किलबिल, नदीच्या पात्रात दिसणारे सुर्याचे केशरी रंगाचे प्रतिबिंब,अन् त्यानंतर पसरलेली सहस्त्र किरणे.. वातावरणाला अगदी मुग्ध करुन टाकतात.
हे सगळे पाहून साऊ रोज रात्री आभाळाच्या अमर्याद छत्राखाली रात्र घालवून सकाळी उठल्यावर सुर्याच्या कोवळ्या किरणांनी सुस्नात होत मैलोनमैल दूर असलेल्या सुर्याच्या पृथ्वीवरील सजीवांना दररोज प्रकाशाचे, ऊर्जेचे दान देणाऱ्या भास्कराच्या या दानशूरपणासाठी हात जोडून नमस्कार करत आभार मानत असे.

ही समोरच्या व्यक्तीच्या परोपकारी वृत्तीची जाणीव तिला तिच्यावरील परिस्थितीमुळे बालपणीच आली होती. ती जर चार भिंतींच्या आत गोधडीवर झोपून अंगावर घेऊन गुडूप झोपत असती तर तिला या वयात ही जाणीव होणे अशक्य होते. परिस्थिती माणसाला घडवते हेच खरे!
अगदी लहान वयात पिकांवर आलेली पाखरे हाणणे, पिकांना पाणी पाजणे, गुरांसाठी गवत कापणे,आणि अशीच सगळी कामे हळूहळू साऊ शिकली. अन एक दिवस जरी ती रानात आली नाही तर मामांना हात मोडल्यागत वाटू लागले. घरी असताना मामींच्या हाताखाली स्वयंपाक करायला ही ती शिकली होती. चमचमत्या चांदण्यांची कलाकुसर असलेल्या नभाच्या चादरीला रात्रभर आपल्या अंगाभोवती वेढून सकाळी लवकर पिकांवर बसलेल्या पक्ष्यांना गोफणीतून दगड भिरकावत हाकलून लावून मग ती घरचा रस्ता पकडत असे.
घरी गेल्यावर कधी भूक लागली तरी कुणाला सांगायचे.. जेव्हा पुढ्यात येईल तेव्हाच खायचे ही लागलेली सवय आयुष्यभर पुरली. कारण भुकेपेक्षा कामालाच प्राधान्य देणे अंगवळणी पडले.

सकाळी घरातील कामे उरकली की, मामांचा,दादाचा जेवणाचा डबा घेऊन ती शेतात जात असे. तिथे गेल्यावर मग गुरांना चरायला सोडणे हे तिचे व दादाचे रोजचे ठरलेले काम असे.कधी कधी दादा तिला उचलून म्हशीवर ठेवत असे व म्हणत असे, रस्ता सोडा रस्ता सोडा! राणीसाहेब येत आहेत हो…मग हे ऐकून त्यांच्यासोबत गुरे चारण्यासाठी आलेली बच्चेकंपनी हसत असत.
तिथे सर्वांची गुरे पडीकात, डोंगराच्या कडेने चरत असताना एक डोळा गुरांवर ठेवून मुलांचे खेळ रंगात येत असत. सूरपारंब्या,लगोरी,चिंचा,कैऱ्या पाडणे,मामाचे पत्र हरवले ..हे उद्योग सुरु असत‌.
एकदा असेच खेळत असताना ‘हरणी’ म्हैस चरत चरत दूरवर गेली याकडे दुर्लक्ष झाले. जेव्हा गोठ्याकडे गुरे परत घेऊन जायची वेळ आली तेव्हा लक्षात आले की, हरणी दिसत नाहीय.. साऊचे धाबे दणाणले.

तिने बाकीची गुरे घेऊन दादाला घरी पिटाळले अन् ती हरणीच्या नावाचा पुकारा करत डोंगराच्या कडेने फिरु लागली. दादा तिला एकटीला सोडून जायला तयार नव्हता, पण इतर गुरे पण इथेतिथे पांगतील हे समजून सांगितले तेव्हा दादा गुरे घेऊन परतीच्या मार्गाला लागला. पण गुरे गोठ्यात बांधून त्याच पावली तो कंदील घेऊन डोंगराच्या रस्त्याला लागला.
साऊ हरणीच्या नावाचा पुकारा करत होती,अन् दादा साऊच्या नावाने! अखेर साऊचा आवाज ऐकून वाट चुकलेली हरणी जोरात हंबरली व साऊच्या दिशेने पळतच आली तेव्हा साऊचा जीव भांड्यात पडला.
तिच्या डोक्यावरुन हात फिरवत साऊ उभी होती तेवढ्यात दादा तिथे पोहोचला. साऊला पाहून दादाला हायसे वाटले. त्याने धावत येऊन साऊला मिठीत घेतले.

दादाच्या डोळ्यांत साऊच्या काळजीने अश्रू उभे राहिले होते.ते टपटप साऊच्या खांद्यावर पडत होते.अन त्या अश्रूंच्या वर्षावात ती बंधूप्रेमात न्हाऊन निघत होती. हे बहिणभावाचे प्रेम पुढेही आयुष्यभर टिकून राहिले. किती पावसाळे आले अन् गेले पण दोघांचे अकृत्रिम नाते मात्र तसेच टिकून राहिले.
अशी ही कामसू साऊ नजरेनेच मुलांची पारख करणाऱ्या एका हाडाच्या शिक्षकाच्या नजरेस पडली. त्यांनी आपल्या धाकट्या भावासाठी तिला पसंत केले व ती लग्न होऊन सासरी स्वतः च्या हक्काच्या घरी आली.
सासरी आपल्या प्रेमळ स्वभावामुळे अल्पावधीतच तीने सर्वांची मने जिंकली. नवरा मुंबईत पोलीस, ही मात्र सुरवातीची काही वर्षे गावी एकत्र कुटुंबात राहिली.सतत कार्यमग्न असल्याने अन् लहान वय असल्याने सासरी लवकरच रुळली.
दिर,जावा,नणंदा,पुतण्ये, पुतण्यांच्या गराड्यात ती आपला एकाकीपणा विसरली अन् सर्वांना हवीहवीशी वाटणारी साऊ एक दिवस नवऱ्यासोबत भुर्रकन उडून मुंबईला गेली,ती मुंबईकरच झाली.

तरीही तीने सासरशी असलेली आपली नाळ कापली नाही‌. सासुसासऱ्यांना तर तीने मुंबईत आपल्याजवळ रहाण्यासाठी आणलेच,पण दीर नणंदा,त्यांची मुले यांच्याशी तिचे सौहार्दपूर्ण संबंध असल्याने सर्वांचे येणे जाणे सुरुच असायचे,आजही आहे.
मुंबईत ही तीच्या मनमिळाऊ स्वभावामुळे कुणाची ती वहिनी बनली,तर कुणाची ताई! कुणाची मामी तर कुणाची मावशी. तोंड गोड असल्यामुळे अन् परोपकारी वृत्ती असल्याने,अन् यासर्वापेक्षाही परिस्थितीची जाण असल्याने तिच्याभोवतीचा जोडलेल्या नात्यांचा गराडा वाढतच गेला.
तो इतका वाढला की,तिची चार बाळंतपणे या जोडलेल्या नात्यांनीच अगदी मनापासून पार पाडली. तिला तिच्या आठवत नसलेल्या आईची आठवणही होऊ दिली नाही.
कधीकधी प्रश्न पडतो,शाळेचे तोंडही न पाहिलेली माई नाती सांभाळताना इतरांचे मूल्यमापन करण्यात व दुर्गुणांकडे दुर्लक्ष करुन सर्वांना सामावून घेण्यात इतकी कुशल कशी झाली!

तेव्हा बालपणी तिचे अमर्याद असणाऱ्या आकाशाच्या सोबतीने जगणे आठवते अन् आकाशाने तिच्या नकळत तिच्या पदरात हे अमर्यादतेचे देणे टाकलेय याची प्रचिती येते.
आईच्या प्रेमाला पारखे झालेल्या माईने आपल्या मुलांवर मात्र अमर्याद प्रेम केले. माणसाला जी गोष्ट मिळत नाही त्या गोष्टींबाबत तो फार पझेसिव्ह असतो हा मानवी स्वभाव आहे. मुलांवर अमर्याद प्रेम करताना ती स्वतः आईवडिलांच्या प्रेमापासून पारखे झालेली असल्याने मुलांना अगदी काळजाच्या आत ठेवत असे.
त्याकाळातही मुलगा मुलगी हा भेदभाव तिच्याकडे नव्हता. बहुधा तिला निसर्गाच्या सान्निध्यात राहून मिळालेली ही शिकवण होती. पण अजूनही तिच्या नशिबाचे भोग संपले नव्हते. तिच्या नवऱ्याचा अकाली अपघाती मृत्यू झाला. त्याच्या निधनानंतर दुःख करत बसण्याचा अवधीही तिला मिळाला नाही.

पदरात तीन लहान मुले होती.मुंबईसारख्या ठिकाणी ही मुले लहानाची मोठी करायची म्हणजे दिव्यच होते. नाही म्हणायला दिरांनी मुंबईतील चंबूगबाळे आवरुन गावी या असे सांगितले होते. पण ही चूक ती करणार नव्हती. तिने बालपणी या उपरेपणाचे दाहक वास्तव भोगले होते. आपल्या मुलांना ते अनुभवायला लागू नये म्हणून तिने स्वतः कंबर कसली व दुःख बाजूला सारत खंबीरपणे ती आपल्या मुलांसाठी उभी राहिली.
तिच्याकडे शिक्षण नव्हते तरीही अनुकंपा तत्त्वावर तिला पोलिस खात्यात नोकरी मिळत होती,पण पोलिसाची नोकरी करायची म्हंटले तर छोट्या मुलांचे काय हा प्रश्न असल्याने तीने ती स्वीकारली नाही. मग सुरु झाला तिचा रोजचा संघर्ष!
तीने एकटीने अपार कष्ट करत संसाराचा गाडा ओढत आपल्या लहान मुलांना शिक्षणाची कास धरायला लावून सक्षमपणे या जगात जगण्यासाठी तयार केले.

कष्ट करुन पैसे मिळवणे हा एक भाग आहे, आणि मिळवलेल्या पै न पै चा योग्य विनियोग हा ही तितकाच महत्त्वाचा भाग आहे हे माईने उत्तम पद्धतीने समजून घेतले होते. त्यामुळे तर नवरा भाजी, वाणसामान आणण्यासाठी जे पैसे देत असे त्यातील काही पैसे ती दर आठवड्याला बाजूला ठेवत असे.
एकदा नवऱ्याचा अगदी जवळचा मित्र गावाजवळच्या शहरात आपण दोघे दहा दहा गुंठे जमीन खरेदी करुयात म्हणून मागे लागला होता. गावीही गावच्या एकत्र कुटुंबपद्धतीमध्ये पैसे पाठवावे लागत आणि इथेही कुटुंबाचा चरितार्थ चालवणे यामुळे अजिबात शिल्लक पडत नसे. त्यामुळे पैसे कुठून आणायचे हा प्रश्न त्याच्यासमोर होता. पण हे कानावर पडताच तिने हे बाजूला ठेवलेले पैसे आणून नवऱ्याच्या हातावर ठेवले व मोजायला सांगितले. चक्क दहा हजार रुपये भरले ते!

नवऱ्याने ती जमीन आनंदाने खरेदी केली. काटकसर कशी आणि किती करावी याचे ज्वलंत उदाहरण होती ती ! आणि आपल्या शेजारणी, मैत्रिणी यांनाही ती काटकसरीचे, पैसे साठवण्याचे महत्त्व सांगत असे व तिच्या वागणुकीतूनही ते दिसत असे.
ढवळ्याशेजारी बांधला पवळा वाण नाही पण गुण लागला..या उक्तीप्रमाणे शेजारणींनाही पैसे जपून वापरणे,शिल्लक ठेवणे जमू लागले. हे पैसे घरात ठेवण्यापेक्षा त्या माईकडेच आणून देत .
निरक्षर असणारी माई या शेजारणींसाठी सुरक्षित बॅंक बनली होती.यातूनच परत भिशीची कल्पना पुढे आली व अगदी दहा रुपये महिना या पद्धतीने सुरु झालेली भिशी बराच काळ टिकली.
या भिशीच्या पैशातून माईने सोने खरेदी केले. पदरात दोन मुली आहेत याची तिला जाणीव होती. पैसा भरपूर प्रमाणात उपलब्ध असताना सोनेनाणे घेणे,जमीनी खरेदी करणे वेगळी गोष्ट आहे ,पण एक एक पैसा साठवून घेतलेल्या गोष्टी मात्र अनमोल असतात. बरोबर ना?

आयुष्यात फक्त मुले हीच कायम प्रायोरिटी असल्यासारखीच ती आपले पूर्ण आयुष्य जगली, किंबहुना तीने आपले आयुष्य पूर्णतः मुलांनाच समर्पित केले. दोन्ही मुलींना शिकवून स्वतः च्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम केले आणि त्यानंतरच त्यांची लग्ने केली. एकच वर्ष शाळेचे तोंड पाहिलेल्या माईला जगाकडून मिळालेल्या अनुभवांच्या शाळेतून शहाणपणा, व्यवहारज्ञान इतके मिळाले होते की तिच्या मुलांना कधीकधी प्रश्न पडतो की,आपण शाळेत जाऊन काय मिळवले?
माई सारखे बनणे मुलांना मात्र शक्य झाले नाही.अन माईंनी तशी अपेक्षाही कधीच केली नाही.आईविना आयुष्य काढलेल्या आईलाच आईच्या प्रेमाची खरी किंमत समजू शकते !
अशा या माईंच्या सुरकुतलेल्या चेहऱ्याकडे आज पहाताना प्रत्येक सुरकुतीमधून तिचे कष्ट,तिचे बालपणीचे आईविना गेलेले आयुष्य, तिची सदोदित परोपकारी वृत्ती ,तिची आपल्या कुटुंबाविषयीची आस्था,माया अगदी ठळकपणे जाणवते, अन् तिच्या शेजारी बसायची आपली लायकी नाही हे समजून तिची मुले तिच्या पायाशीच बसण्यात धन्यता मानतात.

आज ब्याऐंशीव्या वयातही तीला नातवंडे,पतवंडांची काळजी करताना पाहून मुले रागे भरतात की,आता तरी स्वतः कडे लक्ष दे, पण तीच्यात काहीही फरक पडत नाही. अशी आई मिळण्यासाठी आपण भाव़ंडांनी नक्कीच मागील जन्मी काहीतरी पुण्य जोडले असावे, त्याविना का असे दैवत मिळते !असे मुलांना वाटते हीच तिच्या प्रेमाची तिला मिळालेली पावती आहे…
हेमा उवाच
©️®️ सौ.हेमा पाटील.
सदर कथा लेखिका सौ.हेमा पाटील यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखिकेची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी. कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ ( नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!