आशेचा कवडसा

©® प्रज्ञा पवन बो-हाडे.
घराण्याला वारस हवा या आपल्या आईच्या हट्टापायी विनयला एका मागून माग चार मुली झाल्या.
रमा, निशा, नेहा, स्पृहा.
मुलगा होईल या आशेवर ठाम असलेली आई आजच्या काळात देखील विनय आणि मोहिनी ला वारस हवा म्हणून अट्टाहास करत होती.
मोहिनी खरतर चार सिजर झाल्यनंतर अशक्त झाली होती. तिची अवस्था फक्त विनयला समजत होती. आईच्या हट्टापुढे विनयच्या तोंडातून एक शब्द देखील निघत नव्हता. 
शेवटी ईश्वराची कृपा झाली विनयला मुलगा झाला होता. आईला आणि घरच्यांना खूप आनंद झाला होता. लाडाने त्याचे नाव सोनू ठेवण्यात आले होते.

मोठी मुलगी रमा आता घरातल्या कामांना हातभार लावावा इतकी समजूतदार झाली होती. तिच्यामागे निशा होतीच, परंतू तिला अभ्यासाची आवड असल्याने घरातली कामांकरता ती टाळाटाळ करत होती. 
विनयला त्याच्या नातेवाईकाने रमा करता उत्तम स्थळ सुचवले होते. योग्य असेल तर लग्नाचा  बार उडवून द्यावा असे विनयच्या आईने घरात जाहिर केले होते. रमा तशी अठरा वर्षाचीच होती. मोहिनीला देखील मुलींच योग्य वयात लग्न झालेलं चांगल. स्थळात नाव ठेवायला कुठ कमी नव्हते. म्हणून मोहिनी देखील रमाचे लग्न लावून देण्याकरता तयार झाली होती.
अखेर दोन्ही कुटूंबात लग्नाची बोलणी ठरुन लग्नाची तारीख काढण्यात आली होती.

रमा देखील आनंदी तरी कधी हिरमुसलेली वाटत होती. आपल्या भावडांना सोडून परक्या घरी जायला तिचं मन तयार होत नव्हते. 
अखेर रमा आणि शेखरचा विवाह दणक्यात पार पडला होता.
मोहिनीला रमाचा मोठा आधर वाटत होता. घरातल्या कामांची जबाबदारी स्वखुशीने अंगावर घेत आवडीने काम करत होती. निशा तिच्या अभ्यासात मग्न होती. रमा नंतर स्पृहा सगळ्यात लहान पण ती देखील आपल्या ताईप्रमाणे जमतील तशी आईला स्वयंपाकात मदत करत होती.
नेहाला खेळायची प्रचंड आवड होती. ती शाळेतल्या सर्व खेळांमधे भाग घेवून ट्राॅफी आणि मेडल मिळवत होती. अशीच वर्ष उलटून जात होती. रमाला दिवस गेले होते. लग्नानंतर रमाच आयुष्य बहरुन गेले होते. त्यांच्या संसारावर सुंदर फुल उमलणार होतं.

रमा बाळंतपणाकरता माहेरी आली होती. रमाला आठवड्याभरात कळा सुरु झाल्या होत्या. दवाखान्यात दाखल केल्यावर रमाला गोंडस मुलगा झाला होता. देखणा अगदी राजबिंडा दिसत होता.
शेखरच्या घरात आनंदी आनंद झाला होता. मोठ्या थाटामाटात रमाला न्यायला शेखर सासरी घेवून गेला होता.
विनय आणि मोहिनीच्या चेह-या वरचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. तीन महिने बाळ आणि बाळंती सोबत कसे निघून गेले कोणालाच कळले नव्हते.
एक दोन महिने असेच निघून गेले होते. इकडे निशाला एका कोर्स करता दुस-या शहरात तीन-चार महिन्याकरता जावे लागले होते. एकट्या मुलीला कस सोडायचे म्हणून घरातले काळजीत होते. सोबत मैत्रीणी देखील असल्याने वाटणारी चिंता निशाने बुद्धी कौशल्याने मिटवली होती. 

विनय या सगळ्यांसोबत जावून पोरींची राहायची सोय करुनच घरी जायचे असे ठरवून दोन दिवसाच्या तयारीने निघाला होता.
निशा तरी समाजावत होती, तिथेच सगळी सोय केली जाणार होती आणि तसेच झाले होते. त्या कोर्समधे लांब शिकण्याकरता येणाऱ्या विद्यार्थांची सोय केली होती.
विनय पोरींना एकमेकांना सांभाळून घ्या म्हणून घरी निघून जातो.
घरात पाऊल ठेवताच मोहिनीची बडबड कानावर ऐकू येत होती.
नेहमीचचं सासू-सूनेच काहीतरी कारण म्हणून विनय घरात आला होता. पाहतो तर काय., रमा आपल्या मुलाला घेवून आली होती. तिचे डोळे अश्रूंनी डबडबले होते.

विनयला पाहताच रमाने आपल्या तान्हाबाळा सह वडिलांना घट्ट मिठी मारुन रडायला लागली होती.
कारण समजायला मार्गच नव्हता. मोहिनीने या प्रकरणाचा उलगडा केल्यावर सत्य बाहेर आले होते.
शेखरने रमाच्या चारीत्र्यावर संशय घेवून ते बाळ स्वत:च नसल्याचा आरोप लावला होता.
आपल्या मुलीला सावरत त्याच्याकडे परत न जाण्याचे सुचवून तू काही आम्हांला जड नाही. आपल्या नातवंड आणि मुलीला शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळू शकतो हा विनय. तू काळजी करायची नाहीस असे बोलून विनय घरातून निघून जातो.
वाटत नसले तरी हे मुलीच दु:ख लपवून विनय बागेतल्या एकांतात जावून ढसाढसा रडत होता. आपणच जर खचलो तर आपलं कुटूंब कोलमडून पडेल या विचाराने डोळ्यातले अश्रू पूसत विनय घरी परतला होता.

नातवंडाला बाहेर फिरायला घेवून जाणे, रमाला वेगवेगळ्या गोष्टीत गुंतवत ठेवण्याचे प्रयत्न सुरु होते. रमा देखील आठवणींमधून बाहेर पडायचा प्रयत्न करत होती. मनाने मात्र खचत चालली होती. तिला अचानक नैराश्याने ग्रासले होते. कोणतेचं काम तिला करवेसे वाटत नव्हते. अशक्तपणामुळे ती सारखी आजारी पडत होती.
दवाखान्यात दाखल करताच तीला मानसिक धक्का बसला असून त्यातून बाहेर येण्याची ट्रिटमेंट करता गोळ्या सुरु करण्यात आल्या होत्या. 
एवढ्या लहान वयात असला काहीतरी आजार पाठिमागे लागल्याने मोहिनी देखील आपल्या मुलीच्या काळजीने खचली होती. पण तीच्याबरोबर अजून चार मुलांची जबाबदारी तितकीच असल्याने वेळीच सावरुन सावधान राहून शांतपणे पाऊल उचलण्याचे मोहिनीने ठरवले होते.

तिकडे निशा घरापासून दूर शहरात असल्याने तिची देखील चिंता वाटत होती. अधून-मधून विनय निशाला भेटायला जात होता. पुढच्याच महिन्यात आपला कोर्स पूर्ण करुन निशा घरी परतली होती. ती यावेळी जरा स्वत:मध्ये हरवलेली वाटत होती.
अभ्यासात आता तिचे मन गुंतत नव्हते. तिला अनेकवेळा विचारल्यानंतर नेहा जवळ तिने आपले मन व्यक्त केले होते.
तिचं तुषार नावाच्या मुलावर प्रेम होते. दोघेही एकाच कोर्समधे शिकत होते. तुषारच्या घरच्यांना निशा पसंत देखील होती. आपल्या ताईसारखे जर आपले झाले तर., या काळजीने निशा लग्न करण्याचे टाळत होती.
मोहिनी, घरातल्यांनी निशाला समजवल्यावर निशा लग्नासाठी तयार झाली होती.
रीतसर कार्यक्रम पार पाडून निशाची पाठवणी करण्यात आली होती.

स्पृहा आता प्रोफेसर होवून काॅलेजला शिकवायला जात होती. सोनू देखील आय.टी. आय चा कोर्स करुन नामांकित कंपनी नोकरीला लागला होता. 
सगळी मुलं आपआपल्या पायावर उभी राहिलेली पाहून विनय स्वत:ला भाग्यवान समजावत होता. चित्र मात्र याउलटच निघाले होते. निशा आपल्या आवडीने संसाराला लागली हा आनंद फार काळ पाहता आला नव्हता. निशाला नोकरी करण्याकरता घरच्यांनी थांबवले होते. तिला फक्त घरातली कामे करायला सांगण्यात आले होते.
विनयने निशाशी बोलून तू देखील कुठलाही त्रास सहन न करता माहेरी निघून येण्याबाबत सुचवले होते.
आपल्या वडिलांना आणखी त्रास होवू नये याकरता निशाने त्यातूनही मार्ग सुचवला होता. तीने घरातूनच मुलांचे क्लास घेण्यास सुरवात केली होती.

सगळ्यांना माझी अडचण समजतच नाही या कारणाने स्पृहा नाराज होती. तीचे देखील लग्न उलटून चालले होते. तिच्या लग्नाबाबत घरात काहीच बोलणी न झाल्याने ती आता स्वत:ला एकटी समजायला लागली होती. फारशी कोणात मिसळत नव्हती. नातेवाईकाच्या लग्नाकरता सगळे गावी जाणार होते. स्पृहा मात्र एकटीच घरी थांबेल या हट्टाने पेटली होती. सगळे गावी निघून गेले होते. स्पृहाच्या मनात मात्र आत्महत्येचा प्रयत्न येत होता. तिने तसा प्रयत्न देखील केला होता.
त्याचवेळी सोनूकडे घराची एक चावी असल्याने तो काही कामाकरता घरी येवून पुन्हा कामावर जाणार होता. सोनूने ते दृश्य पाहून स्पृहाला वाचवले होते. तिला या सगळ्याचे कारण विचारताच मंगेश नावाच्या मुलाने सोशल मिडियावरुन काही महिन्यापूर्वी मेसेज आणि नंतर फोनवर संवाद साधत मैत्री निर्माण करुन एक दिवस भेटायला बोलवून प्रेमाची कबुली देखील दिली होती.

” यात अडचण ती काय? ” सोनू बोलला.
” त्याच आधीच लग्न झालेलं होतं. त्याला दोन मुल देखील आहेत. तरी त्याने प्रेमाच्या जाळ्यात पाडून मला फसवलं.” स्पृहा.
यात त्याची नाही तर तुझी सुद्धा चूक होती. तुला अस सोशल मिडीया वर जावून बोलायची गरजच नव्हती.
सोनूच्या या बोलण्याने स्पृहा ओरडून सोनूला म्हणत होती, माझ कुणाला काही देण-घेण नाही. सगळ्यांचा विचार करतात मी नाही दिसत कोणालाच. 
सोनू आपल्या बहिणीला शांत करत आपल्या आई-वडिलांच दु:ख किती मोठे होत याची जाणीव करुन देत होता. रमा ताईच दु:ख पचवलं, निशा ताईच देखील दु:ख. पण त्यातून तिने स्वत:हूनच मार्गच शोधला खरा पण तिला तिच्या मनाप्रमाणे जगता येत नाही याची तक्रार होती. ती आई- बाबांना न सांगता सगळ त्यांना कळत होती. 

तुझ्या लग्नाकरता देखील त्यांची धडपड होतीच. तुला या गोष्टींचा सामना करावा लागू नये म्हणून बाबा योग्य स्थळाच्या शोधात होते. तुला त्रासात जगलेलं त्यांना पाहवणारं नव्हते. म्हणून आता ज्या नातेवाईकाच्या लग्नाकरता गेले आहेत तिथे एका स्थळाची चौकशी करायला गेले होते. माझ्यजवळ बोलताना त्यांच्या भावना दाटून आल्या होत्या.
स्पृहाला सांभाळ तू तिची काळजी घे. स्थळाची खात्री पटली की तिला सांगेन  याबद्दल काही. आणि तू हे असे कृत्य करावं. सोनू आकांताने आपल्या बहिण स्पृहाला सांगत होता.
स्पृहाने सोनूला झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली होती. घरातल्यांना याबाबत न कळवण्याचे वचन देखील घेतले होते. व असा कोणताच प्रयत्न पुन्हा न करता स्वत:ला कधीही एकाकी समजणार नाही याची कबुली दिली होती.

सोनूला हेच तर हवे होते. आपली बहिण आता योग्य वळणावर उभी होती. स्पृहा करता योग्य मुलाची निवड करत बाबांनी स्पृहाला स्थळाबद्दल सांगितले होते. स्पृहा वडिलांना बिलगून रडत होती.
इतक्यात सोनू विनोदाने बोलला होता, ” लवकर जा लग्न करुन सासरी,माझ्या वाटेतला अडथळा दूर होईल ना मग मी  घरातली सूनबाई आणायला रिकामा.” यावर स्पृहा सकट सगळ्यांना हसू आले होते.
कितीही जबाबदारी संपली असे म्हणालो तरी त्यातून सुटका नाही . एक झाले की एक पुढे कर्तव्य जन्मत:च रेखाटलेली होती. सोनूच्या लग्नाकरता स्थळांची शोधाशोध सुरु असताना रेवाचा चेहरा मात्र पडलेला होता. ते विनय च्या अचूक लक्षात आले होते.

रेवा ही विनयच्या शेजारीच राहणा-या मुकेशची मुलगी होती. दोघांच एकमेकांवर असणार प्रेम जाहिर न केल्यामुळे आधांतरीतच होते.
विनयने गंमत करायचे ठरवून सोनूच लग्न ठरल्याचे घरी आणि शेजा-यांना पेढे देवून सांगायचे असे ठरवले होते. या गोष्टीने सोनू देखील दुखावला होता. सोनू आपलं रेवा वर असणार प्रेम विनयला सांगणार तेच रेवा देखील तीचं कबुली द्यायला आली होती. 
या सगळ्यात विनय हसून आपण याचेच तर पेढे वाटले असे जाहिर करत दोघांना नांदा सौख्यभरे हा आशिर्वाद देवून तिथून निघून गेले होते.
गंमतीशीर कुटूंबात असेच सुख-दु:खाचे क्षण वेचत काळ आणि वेळेनुसार मार्ग शोधत प्रवाहा बरोबर चालताना एकमेकांची सोबत कधीच सोडायची नसते. हो ना.
©® प्रज्ञा पवन बो-हाडे.
सदर कथा लेखिका प्रज्ञा पवन बो-हाडे.यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

2 thoughts on “आशेचा कवडसा”

Leave a Comment

error: Content is protected !!