मोरपंख मैत्रीचा

©®सौ.दिपमाला अहिरे.
दारावरची बेल वाजते तशी घाईघाईने अवनी दार उघडते. कोण आले ते न बघता ती सरळ किचन मध्ये जाते. कारण तिला माहित होते कला मावशीची येण्याची ही वेळ..
कला मावशी अवनीची कामवाली बाई.
“काय हे मावशी आजपण उशीर? तुम्हांला माहित आहे ना, सकाळी माझी किती धावपळ असते ती, कधी एकदा तुम्ही याल आणि कधी एकदा किचन तुमच्या हातात सोपवुन मी ऑफिस साठी निघेल.असं झालेलं असतं मला..”. अवनी क्लास वन अधिकारी आहे आणि तिचे यजमान ही पोलीस खात्यात अधिकारी आहेत ‌. अवनीला एक मुलगी आहे.तिचे नाव माया.

अवनी ची बडबड सुरु होती.
“ताई माझ्या गावाकडे जरा काम आहे जमीनीचं. मला आठ दहा दिस तिकडं जावं लागणार हाय.. म्हणून सुट्टी पायिजे हाय मला.” कला मावशी जरा अडखळत बोलत होती.
“असं अचानक? असं कसं मावशी तुम्हाला माहिती आहे. मला बाईची किती गरज आहे ते आता एवढे दहा दिवस कुठे बाई बघु मी?”
“तसं नाही ताई माझ्या ओळखीची बाई आहे चांगलं काम करते ती आणि शांत बी हाय कुणाच्या घेण्यात नाही की, देण्यात नाही.मी तिला आणलयं सोबत मी गावी जाऊन माघारी येते तोवर ती करणार तुमचं काम.” 

“बरं तुमच्या ओळखीतली आहे ना ठीक आहे मग. कधी येणार पण ती?”
“हे काय माझ्या सोबत आणलयं म्या बाहेर उभी हाय बोलवु काय?”
“बोलवा आणि बरं तिला सर्व कामे समजावून द्या.मला खुप उशीर झालाय.माझी महत्वाची मिटींग आहे मी निघते आहे. तुम्ही यांच्याशी जरा सवीस्तर बोलुन घ्या प्लीज.” अवनी तिच्या नवऱ्याला इशाऱ्याने सांगुन घाईघाईने आपली पर्स घेऊन निघुन जाते.
दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर वेळेवर नवीन बाई कामाला येते. त्यावेळीच अवनी अंघोळीला गेलेली असते. जातांना मुलीला सांगुन गेलेली असते, ‘कामवाली बाई आली तर तिला आधी सर्व रुम्सचे पडदे आणि बेडशीट बदलुन घ्यायला सांग. दुसरे पडदे, बेडशीट तिथेच ठेवले आहेत. लगेच ते लावुन घ्यायला सांग.’

सांगितल्याप्रमाणे प्रमाणे मुलीने नव्या बाईला सर्व सांगितले आणि ती बाई आपल्या कामाला लागली. 
अवनीच्या बेडरुम पासुन सुरवात केली. बेडशीट बदलुन घेतले. उशी कव्हर ही नवीन लावले. खिडकीचे पडदे काढायला गेली. तेव्हा तिचे लक्ष खिडकीच्या बाजुला लावलेल्या एका फ्रेमवर पडली. सुंदर मोरपीस त्या काचे मध्ये फ्रेम करवून घेतले होते.
इतके आकर्षक मोरपीस पाहुन ती ते पाहण्यासाठी जवळ जाते. फ्रेमला हात लावण्यासाठी हात उंच करते तर तिच्या धक्क्याने बाजुला असलेला टेबल लॅम्प खाली पडतो आणि फुटतो.
जोरात आवाज ऐकुन अवनीची मुलगी धावत येते. ऐव्हाना अवनी देखील अंघोळ आटोपुन बाहेर आली होती. त्या बाईच्या हातात मोरपीस ची फ्रेम असते आणि ती एकसारखी तिच्या कडे पहात असते.
अवनीची मुलगी जोरात ओरडते “फ्रेम…? हा शब्द ऐकून अवनी धावतच आली.

“माझे मोरपीस??? फ्रेम फुटली का? रुम मध्ये आली. त्या बाईच्या हातातुन फ्रेम हिसकावून ती पाहु लागली.. “काय करताय तुम्ही?नीट काम नाही करु शकत का तुम्ही? फ्रेम फुटली असती तर?”
ती बाई अवनी कडे निरखुन पहात होती. जणु तिला ओळखण्याचा प्रयत्न करत होती..
“अवनी??अवनीच का तु?? हळुच तिच्या तोंडून शब्द निघाला आणि शब्दापाठोपाठ डोळ्यांतुन अश्रू ही.
अवनी तिच्या कडे प्रश्नार्थक नजरेने पहाते आणि जोरात ओरडते “माया…?”
दोघींनाही एकदम रडु कोसळते रडता रडताच माया विचारते. “अवनी तु हे मोरपीस खरंच इतकी वर्षे सांभाळून ठेवले आहे म्हणजे तु मला विसरलीस नाहीस ना? “

“कशी विसरेन माया? हे काय आहे पण काय अवस्था केली आहे तु स्वतःची?” दोघांची गळाभेट होते  
आज वीस वर्षांनंतर दोघी भेटत होत्या.
पण या दोघी आहेत कोण हे जाणून घेण्यासाठी जरा त्यांच्या भुतकाळात जाऊयात….
आपल्या चित्रकलेच्या वहीत पिसारा फुलवून नाचणारा सुंदर मोर अवनी काढत होती. बाजुला बसलेली माया तिच्या चित्राकडे एकटक बघत होती. अवनी तिच्या कडे पाहुन हसते. तशी माया आपल्या तीन बोटांचा मोर करुन चित्र किती सुंदर आहे ते इशाऱ्याने सांगते. अवनी परत आपले राहिलेले चित्र पुर्ण करते.
माया आपल्या दप्तरातुन एक गोष्टींचे पुस्तक बाहेर काढते आणि सर्वात शेवटच्या पानावर असलेले मोरपंख बाहेर काढते आणि बेंचवर अवनी समोर ठेवते. त्या मोरपंखाला पाहुन अवनीच्या डोळ्यात चमक येते.

ती मायाला काही सांगणार तेवढ्यात बाई वर्गात येतात आणि माया ते मोरपंख पटकन पुस्तकात ठेवते.
बाई शिकवत असतात पण अवनीचे पुर्ण लक्ष मात्र त्या मोरपंखाकडे असते. ती मायाला हळु आवाजात सांगते “देना ते मोरपीस मला.”
बाईंचे लक्ष दोघींकडे जाते.
“काय कुजबुज चाललीये तिकडे. शिकवण्याकडे अजिबात लक्ष नाही..माया उभी रहा.” 
माया बाईंच्या आवाजाने दचकते आणि खाली मान घालून उभी रहाते. लगेच अवनी सुद्धा उभी रहाते.
” बाई ती नाही मी बोलत होती तिच्याशी.”
“अवनी तुला किती वेळा सांगितलं आहे तिच्या बाजूला बसत जाऊ नकोस म्हणून. ती स्वतः ही अभ्यास करत नाही आणि तुलाही करु देणार नाही. चला जा दोघीही वर्गा बाहेर उभ्या रहा.” बाई रागातच बोलल्या.

दोघीही बाहेर जातात. 
माया काही बोलत नाही. अवनीची आपली सारखी बडबड चालू असते.
“किती सुंदर आहे गं ते मोरपीस? कुठुन आणले आहे तु? आणि कित्ती मोठे सुद्धा आहे. ए. माया मला देशील ना तू ते, मला हवंय ते.”
माया एक बोट तोंडावर ठेवत अवनीला शांत बसायला सांगते. कधी एकदाची मधली सुट्टी होते याचीच अवनी वाट बघत असते. घंटा वाजताच बाई वर्गाबाहेर येतात.
“जा आता दोघीही वर्गात आणि याच्या पुढे माझ्या तासाला बडबड करायची नाही बर का?”
दोघीही धावतच जातात वर्गात.

माया तो मोरपीस काढते पुस्तकातुन बाहेर. आणि अवनी च्या हातात देते. अवनी खुश होऊन तो मोरपीस कधी आपल्या गालावर कधी मायाच्या गालावर फिरवत असते.
“माया माझ्या साठी आणला का तु? मला माहित होते..”
किती वेळा पासुन शांत असलेली माया वर्गात दुसरे कोणतेही विद्यार्थी नाही हे पाहून आता बोलते.
“अवनी हा मोरपीस ना माझ्या बाबांनी दिला होता मला. मी पाच वर्षांची होती तेव्हा मी जपुन ठेवलाय आजपर्यंत.बाबा सोडुन गेल्यानंतर त्यांची आठवण आली की, मी आणि आई रोज हा मोरपीस पहायचो..आता तर काय आई पण नाही माझ्या सोबत.”
अवनी – “माया अगं मग नकोय मला हा मोरपीस. तुझ्या आई बाबांची आठवण आहे ना तो ? तुझ्या कडे ठेव. मला का देतेस?”

माया-“मी जेव्हा पासून या शाळेत आली तेव्हा पासून माझी कुणीच मैत्रिण नव्हती. माझ्याशी कुणी बोलायचे सुद्धा नाही. कुणी डबा खायला द्यायचे नाही तुझ्या सारखे. आई बाबां नंतर कुणी माझ्या साठी महत्वाचे आणि जिवाभावाचे असेल तर ती तुच आहेस.. हे मोरपीस आपल्या मैत्रिची आठवण म्हणून कायम जपुन ठेव तुझ्याकडे.
जेव्हा आपण एकमेकींसोबत नसु तेव्हा हा मोरपीस तुला माझी आठवण करुन देईल. तु मला कधीच विसरु नये. म्हणून हा मोरपीस मी तुला देते आहे.”
माया आणि अवनी दोघीही जिवाभावाच्या मैत्रिणी. अवनीचे वडिल सरकारी अधिकारी म्हणून दर तीन वर्षांनी त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी बदली होत असायची. म्हणुन अवनी ची शाळाही बदलत रहायची.

इयत्ता आठवीच्या वर्गात असतांना अवनी मायाच्या वर्गात आली.
अवनी मुळात खुप हुशार, चंचल, बोलकी माया मात्र अती साधारण बुद्धीमत्ता असलेली मुलगी.
खुप शांत आणि एकटी एकटी रहाणारी. कमी वयातच तिला तिच्या आई वडीलांच्या प्रेमाला मुकावे लागले. दोघेही वेगवेगळ्या अपघातात मायाला एकटीला सोडून देवाघरी गेले होते. दुसरीच्या वर्गात असलेली माया तेव्हापासून अशी एकलकोंडी झाली होती. तिच्या बालमनावर मोठा आघात झाल्याने ती कायमची अशी शांत आणि अबोल झाली होती. मामा मामीने तिचा सांभाळ केला होता. पण शेवटी त्यांची ही परीस्थिती गरीबीची होती.
अवनीला मायाचे हे शांत आणि एकांत रहाणे खुप खटकत होते. ती स्वतः हुनमायाशी मैत्रि करते. तिच्या सोबतच रहाते. तिला बोलतं करण्याचा कायम प्रयत्न करते.

मायाच्या आयुष्यात जणु एक आनंद घेऊन आलेली ही अवनी लवकरच तिला सोडून दुसऱ्या शहरात चालली जाते.
मायाचे मामा तिला अजुन पुढे शिकवु शकत नाही. हालाखाची परीस्थिती असल्याने पुढच्या दोन वर्षातच तिचे लग्न ही केले जाते. मायाचा नवरा मु़ंबईत मिल कामगार म्हणून काम करतो. तिथेच एका खोलीत माया आपला संसार मांडते.
संसाराला हातभार लागावा म्हणून ती सुद्धा चार घरची धुणीभांडी करते.
आज माया आणि अवनी ची अशी भेट होईल याचा विचारही कधी दोघींनी केला नव्हता.
अवनी आपल्या मायाचे अश्रु पुसत होती. माया आपल्या अवनीकडे मोठ्या कौतुकाने पहात होती.
फ्रेम मधला मोरपीस जणु आज जरा जास्तच चमकत होता.
कारण जसा कृष्ण सुदामाच्या मैत्रिचा तो साक्षीदार होता. तसाच या दोघींच्या मैत्रीचाही होता तो “मोरपंख मैत्रीचा.”
©®सौ.दिपमाला अहिरे.

सदर कथा लेखिका सौ.दिपमाला अहिरे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही. या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखिकेची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी.
कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ ( नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
धन्यवाद.!!!
📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!