ते खरचं आलेत…?

©® नंदकुमार वडेर.
पावसाळा सुरू झाला कि आणि त्यात जर जुलै महिन्यात सलग तीन चार दिवस अहोरात्र मुसळधार पाऊस  कोसळू लागतो तेव्हा माझ्या पोटात त्या भीतीने गोळा येतो,अंगावर रोमांच उभे राहतात.
कितीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी  त्या थरारक अनुभवाची मुळ मात्र जी खोलवर रुतून बसली आहेत ती सतत टोचत असतात . दरवर्षीचा चढत्या भाजणीचा पाऊस मात्र मनाचा थरकाप उडवल्याशिवाय राहात नाही. जगाच्या पाठीवर मी कुठेही असलो तरी पाऊस दिसला की तो प्रसंग जसाच्या तसाच आठवतो.. अगदी काल परवा घडल्या सारखा…
खरं तर हि घटना घडूनही बरीच  वर्षे लोटली आहेत.. तरी आजही अंगावर अनामिक.. भितीचे शहारे उभे राहतात.. एक अनाकलनीय, अकल्पित घटनेचा तो थरारक अनुभव होता.. झालं असं…

बाशिंगबळ जड असलेल्या माझ्या एका मित्राच लग्न ठरल्याची पत्रिकाच हाती पडली होती. फोनवर त्याने आग्रहाच निमंत्रण देताना आधीच दोन दिवस येशील म्हणून तंबीच दिली होती.
मेरे यार की शादी में और मै न जाऊं ,ये कैसे हो सकता है ? रवीवारच लग्न तेही सांगलीमध्ये मग ही पर्वणी मी कशी सोडणार. त्यानिमित्ताने घरी दोन तीन दिवस जायाला मिळते म्हटल्यावर शुक्रवारी संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर पुण्याहून गाडी घेऊन निघालो..
पाऊस देखील आनंदाने बेहोशहून उधळू लागला होता… मी त्याची पर्वा करत बसलो नाही … चार साडेचार तासात हां हां म्हणता आपण पोहचणार तर आहोत..मग डर काहे का..अस म्हणून नॉनस्टॉप गाडी दामटली ..   

कराड सोडून पुढे सांगलीकडे कार निघाली…रात्रीचे नउ वाजून गेले होते… भुक लागली होती… अजूनही तास दिड तासाचा प्रवास होता… कधी नव्हे तो आभाळ फाटल्या सारखा पाऊस कोसळत होता….पेठ नाक्यावरील एक धाबा बघून रस्त्यावर गाडी ऊभी केली.. धाब्यात शिरतो न शिरतो तोच वीज गेली म्हणून दिवे रुसून बसले..
गल्ल्यावरील मालकाने वीजमंडळाला  सणसणीत ठेवणीतली शिवी हासडली..
एक दोन मिणमिणते कंदील प्रकाशले.. दोनचारच गिऱ्हाईक होती ती पण लाइट गेल्या नं उठून गेली.. मी एकटाच तिथं बसलो..
मालकानं आपणहून मला काय हवं नको विचारून आँर्डर सेवा केली.. पावसाचा जोर वाढता वाढे होता..

मी खाणं उरकून गल्ल्यावरच्या मालका कडे आलो… एव्हाना त्या धाब्यावर गुडघाभर पाणी साचलं.. मालकाने मला सांगलीकडे जाणार असालं तर कोल्हापूर मार्गे जा म्हणून सांगितले.. गेले आठवडाभर सांगलीचा रस्ता पाण्याखाली गेला आहे.. 
पूर नव्हे तर महापूराच आलायं.. नद्या ओढे, कालवे  शेती भाती जलमय करून सोडलीय.. नदीकाठची  गाव पाण्यात बुडाली.. सगळा वाहतूकिचा मार्ग सद्या बदलून गेलाय…
मी, बरं झालं सांगितले ते आता तुम्ही म्हणता तसाच निघतो असं सांगून त्या गुडघ्याभर पाण्यातून गाडी कडे आलो…  पण पण गाडी सुरू होईना… खुप खटपट झटपट करून बघितली पण छे गाडी ढिम्मच…

कुणाला हाक मारावी म्हणून पाहिले तर…बाहेर पाण्याची पातळी पुरुष भर उंचीवर गेली होती… माणूसच काय आता धाबा सुद्धा निट दिसत नव्हता..महामार्गावर आता इकडून तिकडे पाण्याचे लोट वाहताना दिसत होते.  हाँर्न वाजवला पण कुणीच मदतीला येईना… खिडक्या, समोरची, मागची काच बाष्प धरून पांढरी धोट झाली होती..पाऊस थांबण्याचीच वाट बघण्याशिवाय मार्गच नव्हता…
आ वासून पसरलेला गडद काळोख.. प्रलयंकारी पाऊस…. बराच वेळ तसाच बसून राहिलो तोच कुणी तरी खिडकीच्या काचेवर टकटक केल्याचा आवाज ऐकू आला..
मी तिकडे बघितलं तर कुणीच दिसलं नाही.. रस्त्यावर वाहनांची  तुरळकच येजा होती आणि ती वेगात होती..माझ्या गाडीच्या  पार्किंग लाईट कडे पाहूनच पुढे पळत होती… मदत मिळणे खुप कठीण होते.. आणि असं असताना खिडकीच्या काचेवर टकटक कोण करेल?.. भास असावा म्हणून सोडून दिले…

परत थोड्या वेळाने पुन्हा तसाच आवाज.. मी आता चक्रावलो, मनात भिती वाटू लागली.. पुन्हा धिर करुन पाहिले तर कुठे काय कुणीच दिसतं नव्हतं.. आता जरा खिडकीची काच आतून पुसून घेतली तरीपण पांढरट्पणा कमी होईना…  
मी खिडकीतून बाहेरचं बघत राहिलो.. आणि पाहतो तो काय  महाकाय काळीकुट्ट  उंचआकृती खिडकीच्या काचेवर थापा मारत होती.. वीज चमकली तेव्हा अंगावर काळा कोटच दिसला.. चेहरा दिसलाच नाही.. मी आता घाबरून गेलो..
काही झालं तरी खिडकी दार अजिबात उघडायचं नाही हे मनाशी पक्क ठरवलं..आतुनच अदमास घेत राहिलो.. मी त्याच्या थापेला काहीच प्रतिसाद देत नाही हे पाहून त्या आकृतीने समोरच्या काचेतून डोकावून पाहू लागली..
पावसाच्या पाण्याने चेहरा ओथंबून गळत होता.. ओठांवर शब्द पुटपुटत होते.. पण माझ्या पर्यंत ते पोहचतच नव्हते.. त़ो चेहराही नीट ओळखता येईना..आता मात्र माझी चांगलीच  फाटली होती..

मी त्याला कुठलाच प्रतिसाद देत नाही म्हणून खिडकीच्या काचेवर थापा मारत राहिली …मी कसलीच दाद दिली नाही… हे पाहून त्याने मग चारी खिडक्या, मागची नि समोरच्या काचेवर एकाचवेळी थापा मारू लागला  आता तर आणखीनच माझी गाळण उडाली.. एकाचे चार-सहा झाले… आता आपली धडगत नाही.. मनात रामनाम जपणं सुरू केले.. मी पण डोळे रोखून  बघत राहिलो.. झोप घेण्याचा गाफील पणापासून लांब राहू पाहात होतो…
मोबाइलवरून मदत काही मिळते का पाहावं म्हटलं तर तो ऐंनवेळेलाच डिस्चार्ज होऊन मान टाकून बसला…तो धुवाधार पाऊस,कडकडणारी वीज ,ती काळी महाकाय आकृती नि  मी  असा हा रात्री चा खेळ आमचा पहाटे पाचापर्यंत चालला..त्यानंतर पाउस कमी कमी होत होत थांबला..  ..हळूहळू फटफटीत उजाडू लागलं.. आता ती काळी महाकाय आकृती दिसायची हि बंद झाली .. मला थोडसं हायसं वाटलं..

एका मोठ्या अरिष्टातून आपण वाचलो हि देवाची कृपा म्हणायची… असं मनात म्हणत असताना  मी गाडी सुरु करण्याचा प्रयत्न केला तर काय आश्चर्य ती सुरू झाली..
मी क्षणाचा विलंब न लावता गाडी पुढे घेऊन निघालो.. पुढच्या वळणावर चहाची टपरी दिसली… दोन चार पांढर्‍या मारुती गाड्याही उभ्या असलेल्या दिसल्या…  बऱ्यापैकी गर्दी पण तिथं मला दिसली..
रात्रभर कातावून गेलो होतो आणि चहाची तलफ होती.. कपभर चहा घेऊन तरतरी आणावी नि सरळ सांगली गाठावी.. गाडीतून खाली उतरलो .. चहा सांगितला..
एक गरमागरम चहाचा कप घेऊन उंच च्या उंच काळा कोट घातलेला माणूस माझ्या समोर ऊभा राहीला… मी रात्री पाहिलेला तोच तर  हा …त्याने माझ्या हाती कप दिला व म्हणाला,

“काय पावणं लै नशिबवान हायसा बघा.. अवो तुम्ही रात्री त्या फेऱ्यात अडकला व्हता.. म्यां तुम्हाला तत बघितलं आणि तिथनं तुम्ही म्होर जाशिला म्हणून काचेवर थापा मारुन सांगाया बघत होतो.. उंच असल्यानं वाकून खिडकीत त्वांड बी दावता येईना.. म्हणूनशान मागच्या म्होरच्या काचंतून सांगून बघत होतो.. पण तुम्ही काही खिडकी उघडाय तयार नव्हता.. मी जर तसचं तुम्हाला सोडून गेलो असतो तर.. आजचा दिवस काही तुम्हाला दिसलाच नसता..’
“ ते तुम्ही होतात होय.. मी पार घाबरलो होतो रात्री.. तुम्ही माझ्या वर खुप खुप उपकार केलेत व मला यातून वाचविले..'”
“ अहो या आठवड्यात लै खुटाणा झालाय.. चार पाच गाडीवाल्यांची दैवगती अशीच ओढवली असल बघा….”

मी पुन्हा एकदा त्याचे आभार मानून गाडी घेऊन निघालो..पाउस आता उघडला होता..अजूनही सगळी कडे पाणीच पाणीच वाहताना दिसत होत…घर गोठे,दुकानं,शेतभात पाण्यात बुडून गेलेली दिसली .. रेस्क्यू ऑपरेशनची टिम बोटी फिरवत दिसेल त्याला मदतीचा हात देताना दिसत होत्या…स्थानिक तरुण त्यांना मदतीचा हात देत होते …
धरणक्षेत्रात पाऊस अजून चालूच असल्यानं पाण्याचा विसर्ग थांबला नसल्यान… महापुराच पाणी लगेचच  ओसरेल अस वाटत नव्हतं… रस्त्यावर देखील वाहनांची भलीमोठी रांग लागलेली…मुंगीच्या पावलाने पुढे पुढे सरकत होती…या गतीन मला घरी पोहाचायला दिवस सरणार असच वाटू  लागलं होतं…रस्त्यात पुरात अडकलेले लोक सुरक्षित स्थळी सोडण्यासाठी प्रत्येक गाडीला वाल्याला विनवत होते…त्या गावकर्‍याच्या अलोट गर्दीला आवारता येण मुश्किल होत..दिसेल त्या गाडीत बसत होते..

माझ्याही गाडीत असाच एक तरुण बसला..बहुतेक त्या रेस्क्यू ऑपरेशनची टिम मधला असावा ,त्याचे ते कपडेच सांगत होते…नखशिखांत तो भिजलेला,रात्रभर मदत कार्यात असल्याने खूपच थकलेला वाटत होता..चेहरा निट दिसत नव्हता…
“मला टिळक चौकात सोडा ,” अस तो म्हणाला नि मी तीनताड उडाल.
तो आवाज माझ्या मित्राचा होता ,ज्याच्या लग्नासाठी म्हणून मी निघालो होतो..पण तो आता असा याठिकाणी मला दिसेल अस स्वप्नात पण वाटलं नव्हतं.
मी विचारले, “ अरे रमेश ,तू आणि इथे काय करतोस आहे ? रविवारी लग्न आहे ना तुझ मग या गावात कसा आलास ? आणि हे रेस्क्यू ऑपरेशनचे कपडे घालून काय चाललय ?….

त्याने माझ्याकडे पाहिलं आणि हसून म्हणाला ,” लेका नेमका तूच भेटलास की , अरे काही नाही रे …त्या महापुरात अडकलेल्या अख्ख्या गावाला ती रेस्क्यू ऑपरेशनची टिम कितीशी पुरी पडणार म्हणून आमच्या तरुण मंडळातील मुलांनी पण त्यांच्यात सहभागी झालो…दोन तीन दिवसात पुर ओसरेल अस वाटल्यान मी ही त्यांच्या सोबत होतो..
ते करत असताना मधेच पाण्याची पातळी एकाकेकी वाढली पाऊस तर थांबत नव्हता… मी रिकामी झालेली बोट परत गावात नेत होतो, तोच त्या वाढलेल्या पाण्याच्या खालून मोठी मगर आली तिने माझ्या बोटीवर आपल्या शेपटीचा जोरदार तडाखा दिला… काय होतय हे मला कळायच्या आत बोट भरकटली गेली.. नि ती गाव सोडून नदीच्या पात्रात शिरली..
तिथे असणार्‍या लोकांनी बरीच आरडाओरड केली.. त्या मगरीच्या फटकार्‍याने बोटीला चांगळेच भगदाड पडून पाणी जोराने आत शिरले…मी ती बोट सोडून पोहू लागलो आणि या पुराच्या पाण्यातून इकडे वाहत वाहत आलो …

मला इथल्या लोकांनी हात देऊन बाहेर काढले … आता सरळ घर गाठावे म्हणून रस्त्यावर जी दिसेल त्या गाडीत बसण्यासाठी आलो आणि नेमकी तुझी गाडी आणि तू भेटलास बघ….ते असू दे …. आज संध्याकाळी हॉल वर आपण नक्कीच भेटू ….”
या आणि अशाच गप्पा मारत आम्ही सांगलीत पोहचलो … टिळक चौकात तो उतरला संध्याकाळी लवकर ये रे अस सांगून वळणावर निघून गेला. हा चक्रम तर नाही ना अस झपाटल्या सारखं वागत का कुणी असा विचार माझ्या मनात चमकून गेला.  
मी घरी पोहचलो.. घडलेले प्रसंग घरी सांगितले.. घरच्यांनी मिठमोहऱ्यांनी माझ्यावरून  उतरवून टाकले.. देवाजवळ साखर ठेवली.. चहा नाष्टा झाला .. आंघोळ करण्यास वेळ होता..
सहज काँटवर पडलेला पेपर उचलला दोन दिवस आधीचा पेपर होता .. वाचता वाचता एका बातमी वर डोळे खिळले..

पेठ नाक्याजवळील नौबतवाडी गावावर शोककळा,  पुरात अखं गाव वाहून गेले.. माणसांच्या बाँडीज मिळाल्या नाहीत. काशिनाथ धाबेवाला नि साडेसहा फुटी उंच हैबती… चहाची टपरीवाला .. हे दोघेही या पुरात दोन दिवसापूर्वीच वाहून गेले…
तसेच सांगलीच्या तरुण मंडळातील एका  युवकाचे बचाव कार्यात मदत करत असताना मगरीच्या तडाख्याने बोट उलटुन जलसमाधी ….अजून हि माणसं हाती लागली नाहीत….
हि बातमी वाचून माझ्या पाया खालची वाळू सरकु  लागली.. कशा कशा वर विश्वास ठेवावा.. काही कळेनाचं..
आतातरी मी माझ्याच घरी आहेना…का इथही ते  खरचं आलेत ?….
©® नंदकुमार वडेर.
सदर कथा लेखक नंदकुमार वडेर यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!