©️® रश्मी लाहोटी.
पंचाहत्तर वर्षांपूर्वीची गोष्ट. देशात फाळणीचं वारं वहात होतं. बरीच कुटुंब स्थलांतरीत होणार होती. रक्ताची माणसं आणि मातीशी असणारी नाळ दुरावणार होती , तुटणार होती. फाळणीच्या गोंधळात आणि दंगलीत काही कुटुंबं स्वेच्छेने तर काही नाईलाजाने स्थलांतरीत झाली होती, तर काही विस्थापीतही झाली होती.
संपूर्ण देशाचीच आर्थिक घडी विस्कटलेली होती. आधी यवनांनी लुटलं , नंतर इंग्रजांनी रिकामं केलं. साधारण मध्यमवर्गीय गट कधीचाच गरीबीचे चटके सोसू लागला होता.देशातल्या देशातही लोकं रोजीरोटी कमावण्यासाठी जागा , प्रदेश , रहाण्याचे ठिकाण सुबत्ता, समृद्धीच्या आशेने बदलत होते.
मणिराम अशाच एका देशोधाडीला लागलेल्या कुटुंबाचा प्रमुख. चार मुलं, तीन मुली, पत्नी, छोटे तीन भाऊ आणि त्यांचा परीवार असा सगळा कबिला घेऊन लगतच्या राज्यात आला.
सगळे भाऊ आपापले परीवार घेऊन आसपासच्या खेड्यात वस्तीला राहीले.
शिक्षणाचा अभाव, साधारण बुद्ध्यांक आणि स्थानिक लोकांचा सुरूवातीला असणारा विरोध यामूळे विशेष प्रगती कुणाचीच झाली नाही. चटणीभाकरी तर मिळू लागली, पण स्वतःचा निवारा ,आडोसा करायला काही कोणत्याच भावाला यश मिळालं नाही.
गंगारामचाही असाच कबिला ,इकडे येऊन राहिलेला. मुळतःच चतुर आणि उद्योगी असणाऱ्या गंगारामने काही वर्षातच आपल्या व्यापारात जम बसवला. तिकडून येताना आणलेल्या लक्ष्मीने आता महालक्ष्मीचं रूप घेतलं होतं. एकंदरीत गंगाराम ॲण्ड कंपनी आता इथलीच झाली होती, चांगली स्थिरावली होती.
चारूलता, गंगारामची सुकन्या आता उपवर झाली होती. मुलीला मूळ गावी द्यायची गंगारामची मुळीच इच्छा नव्हती. पण त्यांच्या जमातीतले इकडे आलेल्यांपैकी कुणीच तोलामोलाचं नव्हतं.
व्यापार भरभराटीचा होता, विश्वासू मनुष्यबळ असलं तर हवंच होतं. घरजावई हाच पर्याय उत्तम होता.
मणिरामचा थोरला मुलगा रणछोडदास हा सर्वच दृष्टीने योग्य पर्याय होता. धूमधडाक्यात लग्न झालं. रणछोड सासरी आला.
ना कामाचा अनुभव ना माहिती ना नविन काही शिकण्याची इच्छा ! आठ नऊ वर्षातच ज्यात हात घातला त्याचं दिवाळं काढलं. जावयामुळे कुटूंबात वाद होऊ लागले.
रणछोड गाफील, व्यापाराच्या ,धंद्याच्या दृष्टीने जेमतेम हुशारी असणारा होता ,पण तितकाच अडमूट आणि संतापीही होता.
शेवटी सासरेबुवांनी त्याला काही रोख रक्कम , कन्येला ठोस दागिने आणि दहा एकर कसायला जमीन इतकं देऊन त्यांची रवानगी केली. सोबत आता चार चिल्लीपिल्लीही होतीच.
ऐषोआरामाची सवय लागलेल्या रणछोडदासवर तर आता कुणाचाच अंकुश उरला नाही. पुढच्या पाचसहा वर्षात तीन मुलांची अजून भर पडली आणि होतीनव्हती ती सगळी मालमत्ता, शेती ,दागिने सगळं गमवलं. याला संधी असून त्याचं सोनं करता आलं नाही आणि मणिरामचा बाकीचा कबिलाही तसाच हातमजूरी करून रोजीरोटी कमवायचा.
निवाऱ्याच्या शोधात परमुलुखात येऊन पंचवीस वर्षे झाली तरी अजून काही त्यादिशेने कुणाचीच प्रगती होत नव्हतीच.
रणछोडदासची चार मुलं आणि तीन मुली. मोठ्याला , नारायणला आजोळी अनुभवलेलं ऐश्वर्य लक्षात होतं. हुशारीने केलेली धडपड आणि कठोर मेहनतीशिवाय ,बसल्याजागी आपोआप नशीब उजळत नाही हे त्याला त्याच्या वडिलांवरून आणि आजोबांवरून चांगलंच डोक्यात बसलं होतं.
तिकडचे आजोबा आणि मामाचं व्यवहारचातुर्यही तो जाणून होता. पुढे जाण्यासाठी, स्वतःची प्रगती करण्यासाठी त्याची वाट्टेल ते कष्ट करण्याची मानसिक आणि शारीरिक तयारी होतीच.
सत्तरीच्या दशकात नारायण दुसऱ्यांच्या घरी काम करून, मोबदल्यात दोन वेळचं जेवण आणि रहायला छप्पर मिळवून ,तालुक्याच्या ठिकाणाहून त्याकाळची बारावी करून सरकारी नोकरीला लागला.
आर्थिक स्थैर्य आणि प्रगती हेच ध्येय असणाऱ्या नारायणला कामताव्यतिरिक्त अगदी सुपारीचंही व्यसन नव्हतं. दहा ते पाच सरकारी नोकरी, उरलेल्या वेळात चांगला नफा देणारा जो जमेल तो व्यवसाय हिच त्याची दिनचर्या. योगायोगाने पत्नीही त्याच विचारांची ,धोरणी आणि कष्टाळू! आर्थिक स्थैर्यासोबत चांगल्या सामाजिक स्थानाची अपेक्षा करणारी. मग काय पहाता, दिवस बदलायला वेळ थोडीच लागतो?
स्वतःचा बाकी सगळा सख्खा परीवार आणि भाऊबंद अजून मजूरी करून स्वतःच्या निवाऱ्याच्याच शोधात होते आणि इकडे नारायणाचा सहा खोल्यांचा बंगला झाला. बाकीच्यांची चारचार पाचपाच लेकरं गरिबीत जगत होती , तर याची दोनच मुलं चांगलं शिक्षण घेत होती. बायकोचं हे धोरणीपण खरंच कौतुकास्पदच !
वेळोवेळी घरी आर्थिक मदत देऊन बाकीच्यांची लग्नकार्ये उरकली.
मणिरामची चौथी पिढी ,म्हणजे नारायणाची मुलंही आता पन्नाशीच्या आसपास पोहोचली. मोठ्या हुद्यांवर दोन्ही मुलं होती. भरपूर पैसा, इज्जत, ओळख सगळंच होतं.
त्यांची मुलंही आता उच्चशिक्षण घेऊन बाहेर पडतील आणि प्रगतिचा आलेख अजून उंचावतीलच !!
पण भावाबहिणींपैकी नारायणाव्यतिरिक्त कुणीच मेहनतही केली नाही, शिक्षणही घेतलं नाही, सगळ्यांनीच वेगवेगळे व्यवसाय केले, पण त्यात लागणारी, हुशारी, सचोटी , सातत्य,वाट पहाणं किंवा जाणकारांचा सल्ला घेणं हे काहीच केलं नाही आणि दर वेळी व्यवसायाचं गणित चुकवलं.
त्यातल्या काहींना नारायणाने , पूढे त्याच्या दोन्ही मुलांनी त्यांच्या उद्योगात मदत करायला विश्वासाने बोलावलं, पण तिथेही ते खरे उतरले नाही. उलट तिथे भाऊबंदकीचा अहंकार पाळला.
नारायण म्हणायचा “प्रगती करणाऱ्या माणसाची चाकरी केली तर, त्याच्या सानिध्यात सतत राहिलो तर आपलीही महात्वाकांक्षा जोर धरते आणि आपोआपच मेहनत करण्याची उर्जा मिळते !” पण हे साधं समिकरण त्यांना समजलं नाही. सगळ्यांनीच रणछोडदासचाच धडा गिरवला. आळस आणि अव्यवहारिकता!
असो! सत्तरीच्या नारायण आता भरल्या गोकूळात , संयुक्त कुटुंबात नातवंड पतवंडात रमलेला राज्याच्या राजधानीत ! सर्व सुखे , सगळ्या सोयी ! गरिबी मात्र विसरला नाही, त्यामुळे रहाणं साधं , पण विचार मोठे! दुसऱ्या कुणी तरी मदत केली म्हणून त्याला शिक्षण मिळालं, तो ही कित्येक अडलेल्यांची शैक्षणिक मदत करतो ! होतकरू तरूणांना व्यवसायासाठी बिनव्याजी भांडवल देतो. मंदिरातले अन्नछत्र , पाणपोया चालवतो. एकंदरीत सगळ्याच दृष्टीने त्याने नाव कमवलंय !
पण इतर भाऊबहिण? त्यांचीही मुलं कमावती आहेत, नातवंडं आहेत. त्यांच्या नशिबी समृद्धी तर नाहीच, पण सौख्यही नाही . अजून एकालाही स्वतःचा निवारा कमावता आला नाही. छोट्या छोट्या खुराड्यासारख्या किरायाच्या जागेत रहाणंच नशिबी
आहे अजून ! सौख्य नाही म्हणून वाद आहेत , विसंवाद आहेत, भरीस भर द्वेष मत्सरही पाळलाय मनात, तेच विष पूढच्या पिढीच्या मनात ! एकजात सगळे सारखे! आपसात सगळे भांडतील , पण नारायणाविरूद्ध सगळे एक होतील!! नारायणाने तर दरवेळी मदतीचा हातच पूढे केलाय, पण दोषही त्यांचाच आणि रोषही त्यांचाच !!
पेरलेलं बी त्याच गुणवत्तेचं फळ देणार! नारायणाने सत्कर्म , मेहनत, चिकाटी, सातत्याचं बी पेरलं आणि नशीब फळफळलं, समृद्धी आणि सौख्याची बरसातच! बाकीच्यांनी आळस , द्वेष, अहंकार आणि अय्याशी पेरली आणि दुःख , हाल अपेष्टाच नशिबी आल्या.
नारायणाची लहान बहिण आणि तिचा व्यसनी नवरा आता बेघर झालेत , मुलांना त्यांचा खर्च चालवणं म्हणजे भार होतोय म्हणे . तिच्या पाठच्या भावाची आणि भावजयीची त्यांच्या एकुलत्याएक मुलाने आणि सुनेने एका वृद्धाश्रमात रवानगी केलीय !
नारायणाच्या कानावर ही बातमी पडताच तो अस्वस्थ झाला. कितीही केलं तरी रक्ताचं नातं ! भलेही त्यांनी चूका केल्या असतील, द्वेष केला असेल , पण ही वेळ ते उगाळण्याची नक्कीच नव्हती, उलट आताच खराखुरा आधार देण्याची गरज होती.
त्या चौघांचा प्रवास सुरू होता. भली मोठी गाडी धावत होती. नारायणचा मोठा मुलगा स्वतः गाडी चालवत होता आणि मोठी सुन त्या चौघांची काळजी घेत होती , हवं नको पहात होती. पाचसहा तासांनी गाडी एका बंगल्यासमोर थांबली. फुलांनी सजवलेला तो बंगला पाहून या चौघांना काहीच कळेना. एक एक करत सगळे खाली उतरत नाही तोच नारायण आणि त्याची पत्नी स्वागतासाठी सामोरे आले. मागचे हेवेदावे विसरून गळाभेट झाली. हसतखेळत जेवणं पार पडली.
“ हा रमेश आणि ही त्याची पत्नी सुनंदा, हे दोघंही तुमचे काळजी वाहक , स्वयंपाकाला दोनवेळा बाई येईल, सगळ्या वाणसामानाची व्यवस्था केलेली आहेच, अधूनमधून आम्ही दोघंही इथे येऊन रहात जाऊ…शिवाय आपल्या परिवारातल्या किंवा भाऊबंदापैकी कुणावरही बेघर होण्याची वेळ आता मुळीच येणार नाही, ही वास्तु सगळ्यांनाच सामावून घेईल.” त्या चौघांचा निरोप घेत नारायण म्हणाला .
मागच्या आठ दशकांपासून निवाऱ्याच्या शोधात निघालेल्या कुटुंबाला , नारायणाचा तालुक्यातला सहा खोल्यांचा बंगला आता मात्र हा हक्काचा निवारा म्हणून लाभला होता.
©️® रश्मी लाहोटी
सदर कथा लेखिका रश्मी लाहोटी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही.धन्यवाद.!!!
📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.