भिमा अर्जुनाची जोडी

©️®अर्जुन विष्णू जाधव
भिवा हा धामणवाडीतील तरूण कष्टकरी शेतकरी.. त्यांच्या गोठ्यात भिमा अर्जुनची वाघासारखी जोडी होती. तो सुशिक्षित तरुण होता. त्याने नोकरीच्या नादाला न लागता चांगला , यशस्वी शेतकरी होण्याचा मनी ध्यास घेतला. त्याची वडिलोपार्जित पाच एकर सुपीक व नापीक जमीन होती. तो गावात सर्वात सुशिक्षित व तरूण कष्टकरी शेतकरी म्हणून ओळखला जात होता.
शेतात नवनवीन प्रयोग करून, सुधारीत बियानाचा वापर करून शेतातून चांगली पीक काढत असे… त्यांच्या या सुखी संसाराला साथ देण्यासाठी गोठ्यात पांढरी शुभ्र भिमा अर्जुनची जोडी होती. भिमा अर्जुन दिसायला रूपवान,देखणी , दणकट, मजबूत लय भारी होती. किती ही भरलेली गाडी चढावाणे,अवघड रस्त्यातून अंगाला काठी न लावून घेता फक्त भिवाच्या प्रेमळ हाकेवर धूम ठोकत ओढत असायची. जणू भिवाला.. भिमा अर्जुनचया रूपाने धनदौलत लाभली होती.

भिवा, भिमा अर्जुनवर जीवापाड प्रेम करायचा. त्यांना रोज मोठ्या उत्साहाने पुसायचा,धुवायचा. चांगलं हिरवगार गवत खायला घालायचा. भिमा अर्जुनला उन्हाळ पाऊस हिरवगार गवत खायला मिळाव म्हणून त्याने शेतातील अर्धा एकर जमीनीवर गाजर गवताची लागवड केली होती.
तो रोज संध्याकाळी पेंड, मक्याचा भरडा त्यांना खायला द्यायचा. त्यामुळे भिमा अर्जुनची जोडी शरीराने मजबूत व दणकट झाली होती. अधूनमधून भिवा त्यांना चिखल गुट्टा, बैलगाडा या शर्यतीत सहभागी करी..या शर्यतीत ती हमखास पहिला..दुसरा क्रमांक मिळवून आपल्या मालकाचा मान उंचावत. त्यामुळे भिवाला त्यांचा खूप अभिमान वाटायचा. पंचक्रोशीत भिमा अर्जुनचा गवगवा व्हायचा.

भिवाला सतत आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी लोक, ” अरे भिवा ..तू तुझी भिमा अर्जुनची जोडी… बैलं र कधी विकणार आहेस….लेका आम्हाला विकत दे की..! ” अशी बोलत असतं.
” अरे माझ्या मित्रांनो , मी माझ्या भिमा अर्जुनला .. माझ्या धनदौलतला कधीच विकणार नाही.  ही माझी लाख मोलाची जोडी आहे. मी त्यांना मरसतोवर बाळगणार… माझ्या शेतात त्यांना माती देणार… माझ्या घरच्या लक्ष्मी गाईची ही पांढरीशुभ्र,देखणी वासर, लेकरं आहेत. मी त्यांना माझ्या जीवापाड जपलय. माझे हे दोघं जीवाभावाचे सवंगडी आहेत. खूप हुशार व चपळ आहेत. माझ्या या हातांना आपल्या खरबरीत जीभेनी किती प्रेमाने चाटत असतात. माझं त्याच्यावर व त्यांच माझ्यावर खूप प्रेम आहे.खूप जीव जडला आहे. मित्रांनो, तुम्हाला बैलं हवे असतील तर बाजारात जा अन् घ्या. बाजारात खूप विकायला येतात. उगाच माझ्या डोक्याचा भुंगा करू नका समज…?” भिवा बोलायचा.

” अरे भिवा.. आम्हाला बाजारातील नको. तुझ्या गोठ्यातील ही भिमा अर्जुनची जोडी पाहिजे. बोल किती लाखाला देतोस? फक्त किंमत सांग.” भिवाचे मित्र बोलायचे.
” मला विकायची नाहीत. तर किंमत कशाला बोलू . चला ..निघा येथून .. माझ्या भिमा अर्जुनला नजर लावाल. चहा घ्या.. नाही तर तसेच फुटा..?” थोडा राग भरत भिवा बोलायचा. हे असं बोलणं ऐकून आजूबाजूच्या परिसरातील त्याचे मित्र गप्प, शांत व्हायचे.
खरंच भिमा अर्जुनची जोडी भिवाची धनदौलत होती. या जोडीच्या साथीनं दुःखावर मात करून सुखाची वाट शोधली होती.  भिमा अर्जुनची जन्मदाती आई भिवाची साक्षात लक्ष्मी होती. या लक्ष्मीच्या पोटी भिमा अर्जुनचया रूपाने धनदौलत जन्माला आली होती. त्या लक्ष्मीला तर भिवा आपल्या जीवापेक्षा जास्त जपत होता. 

एक दिवस भिवाच्या बापानी लक्ष्मीला बाजारातून विकत घरी आणलं होतं. तेव्हा भिवा आठवी शिकत होता.  हळूहळू लक्ष्मी भिवाच्या गळ्यातील ताईत बनली होती. लहानपणी शेताशिवारातून तिला चारवत, तिच्यासोबत खेळत,बागडत. तिचं अमृतरूपी दूध पित भिवा लहानाचा मोठा झाला. आता लक्ष्मी वयस्कर झाली होती. 
” तिला मी माझ्या शेतात मूठमाती देणार… तिला कसाबाच्या दावणीला बांधून देणार नाही. लक्ष्मी म्हणजे माझं सुख, वैभव आहे. तिची ही भिमा अर्जुन लेकरं,वासर माझी धनदौलत आहेत. लक्ष्मी आता वयस्कर होतं आहे म्हणून काय झालं. ती गेल्यावर.. मेल्यावर मी माझ्या शेतात तिला मूठमाती देऊन तिच्या नावाच लहानस देऊळ बांधणार.. त्या देवळात ही माझी लक्ष्मी असेल…?” असं भिवा सर्वांना सांगत असे.

भिवाच्या बापानं लक्ष्मीला बाजारातून घरात आणल्यापासून घरात दूध उत्पादन कमी पडलं नाही. दूधाची कमतरता जाणवली नाही. साक्षात लक्ष्मीचया रूपाने लक्ष्मी घरात नांदत होती. या लक्ष्मीला तिचा पहिला मालक ही बाड आहे. गाभाला  जात नाही म्हणून बाजारात कसाबाला विकत होता.
ही देखणी लक्ष्मी पाहून भिवाच्या बापाचं ह्रदय फाटलं, मन गहिवरून आलं. अशी देखणी गाय कसाबाच्या दावणीला गेल्यापेक्षा मीच विकत घेऊन माझ्या घरी जातो. माझ्या नशिबानं गाभाला गेली तर माझं नशीब फळफळेल. अशी त्यांच्या मनात भावना जागृत झाली. कसाबाशी सुरू असणारा व्यवहार तो जवळून पाहत होता. व्यवहार होऊ नये अशी मनोभावे इच्छा व्यक्त करत होता. 

कसाबाचा व्यवहार थोडक्यात मोडला. कसाब बाजूला गेल्यावर भिवाचा बाप तेथे गेला.
त्याने गाईच्या अर्थात लक्ष्मीच्या पाठीवर हात मारून प्रेमाने हळूहळूवारपणे हात फिरवला. नाचणारी लक्ष्मी पाठीवर प्रेमाचा हात फिरता शांतपणे उभा राहिली. तिच्या डोळ्यातून अश्रु गळू लागले. तिला कळून चुकले असावे. कसाबाच्या दावणीतून, तावडीतून मला वाचवणारा व्यक्ती आला आहे.
” पाहुण..गाय विकायला आणली आहे का? ” भिवाचा बाप बोलला.
” होय.. विकायला आणली आहे.”  लक्ष्मीचा मालक बोलला. 
” हिची काय किंमत सांगितली आहे पाहुण…” 

” किंमत काही जास्त नाही. दोन हजार रुपये आहे. पण… गाभण नाही बरं का? “
” नसू दे हो. माझ्या नशिबानं गाभण झाली तर बघू…. नक्की कितीला देता सांगा. मला बाळगायला घेऊन जाणार….मी कोणी दलाल नाही. हिच्या येण्यानं माझा ओस पडलेला गोठा भरून जाईल.  कसाबाला कशाला विकता. मला ठरवून द्या.” भिवाचा बाप बोलला.
” पाहुण.. तुम्ही किती देता तेवढे दया. जातवन चांगली आहे. गोठ्यात जनावरं जास्त आहेत. त्यात ही गाभण नाही म्हणून विकायला आणली आहे. दूधाला बरी आहे. फक्त एक वित ( इत) झालंय. बघा घेऊन जा. तुमच्या नशिबाने गाभाला गेली. गाभण झाली तर अक्षरशः तुमच्या घरी लक्ष्मी नांदेल. हिची आईही माझ्या गोठ्यात लक्ष्मी रूपाने नांदत आहे.” लक्ष्मीचा मालक बोलला. 

शेवटी व्यवहार अठराशे रूपयाला ठरला. भिवाचा बाप लक्ष्मीला बाजारातून… कसाबाच्या दावणीतून, तावडीतून सोडवून घेऊन घरी आला. येताना लक्ष्मीच्या दोन्ही डोळ्यातून अश्रू गळत होते. तिच्या अश्रूनी वाटेवरील माती भिजत होती. 
घरी आल्यावर आल्यावर लक्ष्मीची पूजा करण्यात आली. तिचं नाव भिवान आवडीने लक्ष्मी ठेवलं. काही दिवस निघून गेले. कालांतरानं लक्ष्मी गाभण झाली आणि भिवाच्या बापाचं नशीब पालटलं. 
पहिल्यांदा लक्ष्मीन भिमाला जन्म दिला. सकाळ संध्याकाळ दूध घरात मिळू लागलं. भिवाच्या बापाचं अर्थकारण हळूहळू सुधारण्यासाठी मदत होऊ लागली. भिवाला प्यायला दूध मिळू लागलं.

नंतर दोन वर्षांनी लक्ष्मीन अर्जुनला जन्म दिला. भिवाच्या बापाच्या घराला घरपण आलं . लक्ष्मीच्या रूपाने घरात सुख, वैभव नांदू लागलं. भिमा अर्जुन मोठे होऊ लागले. हळूहळू त्यांना औताला,जौताला जुपायची सवय भिवाचा बाप करू लागला.
शेतात वाकडी तिकडी नांगरट करून त्यांना शिकवू लागला. भिवा ही नागरी धरायला शिकू लागला.
काही दिवसांतच भिमा अर्जुन नांगर , बैलगाडा ओढण्यात तरबेज झाली.आता भिवाच त्याची सारी देखभाल करू लागला. आपल्या हातावरील फोडाप्रमाणे जपू लागला.

दिवसामागून दिवस जात होते. भिवाच नावलौकिक,वैभव वाढत होते. पंचक्रोशीत नाव गाजू लागलं. यामध्ये भिमा अर्जुनचा महत्वाचा वाटा होता. 
एक दिवस भिवा आपल्या शेतात भिमा अर्जुनला जुंपून नांगरणी करत होता. बाजूच्या बांधाला वाढलेलं गवत लक्ष्मी खातं होती. माथ्यावर सुर्य चढत होता. झाडांवर पाखरं चिवचिवाट करत होती. नांगरणी करण्यात भिवा दंग होता. घामाच्या धारा सांडत होत्या. इतक्यात हातात काठी लाठी घेऊन येणारी चार माणसं लक्ष्मीला दिसली. ती माणसं माझ्या मालकाला मारायलाच येत आहेत. अशा अचूक अंदाज लक्ष्मीन बांधला असावा. ती दोनदा मोठ्याने हबरली. तरी भिवा आपल्या नांगरट करण्यात मग्न होता. 

ती हातात लाठी काठी घेऊन येणारी चार माणसं सरळ भिवाजवळ जाऊन त्याला दमदाटी देत मारहाण करू लागली. 
” जमिन कुणाची नागरतोस..? ही आमच्या नातेवाईकांची आहे..चल येथून नाही तर जीवानीशी ठार मारू..?” 
अशी धमकी देत भिवाला मारू लागले. ते चौघे एकट्या भिवाला भारी पडू लागले. आपल्या मालकाला मारलेले पाहून लक्ष्मी धावत त्या चौघांच्या दिशेने आली आणि त्यांना मारू लागली.
भिमा अर्जुन खांद्यावर जू घेऊन नाचू लागले. उड्या मारू लागले. कसंबसं स्वतः ला सावरत भिवाने भिमा अर्जुनचया गळ्यातील सापतया ( बार ) सोडले तसे भिमा अर्जुन त्या चौघांपैकी दोघांच्या पाठी लागले. लक्ष्मीन तर एकाच्या ढुंगणावर शिंग लावलं होतं तो ओरड ओरड पळतं होता. 

भिमा अर्जुनने ज्या दोघांची पाठ घेतली होती ते दोघं बांधावरून उड्या मारत. हातपाय मोडून घेऊन पळतं होते. ते रक्त बबाळ झाले होते. आपला जीव वाचवण्यासाठी कसे बसे पळतं होते . भिमा अर्जुन  त्याचा पाठलाग सोडत नव्हते. आता ही बैलं जीवानीशी ठार मारणार या भितीने पुर्णपणे घाबरून गेले होते.
समोरच्या बांधावर एक भलं मोठं झाड होते . त्या झाडावर कशीबशी गडबड करून ते दोघे चढले. त्या झाडाखाली येऊन भिमा अर्जुन उंच उंच उड्या मारत हबरत नाचू लागले. त्या दोघांना मारण्यासाठी झाडा जोरात टक्कर देऊ लागले. आपली टोकदार शिंगे झाडाला मारू लागले.

भिवानी एका मारून गार केलं होतं. लक्षमीन दुसर्‍याचं ढुगाण मोडल होतं तो कसाबसा मुठीत जीव घेऊन ओढ्यात उडी मारून पळून गेला. ज्याला भिवान मारलं त्याला मारायला लक्ष्मी रागारागाने येतं होती. त्याला धडक मारुन अर्धमेला करायचा तिचा विचार होता. 
” थांब लक्ष्मी.. थांब.. याला मारू नकोस? मी याला खूप चोपल आहे. आता याला पळण ही अवघड झालं आहे…याला आता पोलीस स्टेशनला हवा खायला पाठवू या..” धावत येणार्‍या लक्ष्मीला बघून भिवा मोठ्याने बोलला. तशी लक्ष्मी जागच्या जागी गप्प उभा राहिली. नाही एका ढोसणीत ( टक्करीत) लक्ष्मीनं त्याचा कोथळा काढला असता. 
भिमा अर्जुन त्या दोघांना मारण्यासाठी झाडाखाली उंच उंच उड्या मारत होते. पायाच्या टाचाने रागारागाने माती कोरत होते. त्यांचे चेहरे रागाने लाल झाले होते. डोळ्यातून रागाची आग ओकत होती. कोणत्याही क्षणी त्यांना मारायचे हाच मनांत तर्क धरून भिमा अर्जुन नाचत होते.

आपल्या मालकाला विनाकारण मारण्याचा प्रयत्न केला आहे . यांना हिसका दाखवू या.. असंच भिमा अर्जुनला वाटतं असावं. 
झाडांवर जीव वाचवण्यासाठी चढलेले ते दोघे जीव मुठीत घेऊन उंच झाडाच्या शेंड्यावर चढून लपून बसले होते. त्याचं शरीर थरथरत होते. अंगभर घाम फुटला होता. घामाने अंगावरील सर्व कपडे भिजून चिंब झाले होते. आता आपण जगणार नाही असं त्यांना वाटतं होतं.ते मोठं मोठ्याने ओरडून मदतीसाठी हाका मारत होते. त्याचा आवाज ऐकू दूरवर शेतातून काम करणारी माणसं भिवाच्या शेताकडे येऊ लागली.
भिवाने ज्याला धरलं होतं. त्याला मारायला लक्ष्मी अधूनमधून प्रयत्न करत होती. हे भिवाच्या लक्षात येता त्यानं लक्ष्मीला दूर हुसकावून लावलं.

लक्ष्मी थोडे अंतर दूर जाऊन आपल्या मालकाकडे व लेकराकडे ( भिमा अर्जुन ) पाहत होती . माझे भिमा अर्जुन त्या दोघांना जीवंत सोडणार नाहीत . त्यांना झाडावरून उतरायला देणारं नाहीत असं नक्कीच लक्ष्मीला वाटलं असावं. 
बघता बघता आजूबाजूच्या शेतातील लोकं भिवाच्या शेतात जमू लागली पण तो भिमा अर्जुनचा अवतार पाहून, घाबरून दूरच उभा राहू लागली.
भिवा रागाने बैभान होऊन उड्या मारणार्‍या भिमा अर्जुनजवळ गेला. त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करू लागला. तेवढ्यात लक्ष्मी ही भिवाजवळ पळत आली . ही तिन्ही माईलेकर भिवाला चाटू लागली. आपल्या डोळ्यातून पाणी गाळू लागली. 
झाडांवर चढून लपून बसलेले ते दोघे खाली उतरायला घाबरू लागले. भिमा अर्जुनचा तो अवतार पाहून त्याच काळीज फाटून गेले होते.

शेतात जमलेल्या लोकांनी त्यांना झाडावरून कसेबसे खाली उतरवलं. ते खाली उतरलेले बघून भिमा अर्जुन भिवाच्या हातातील कासरे खेचून घेऊन त्यांना मारण्यासाठी तळमळ,थडपड करू लागले. पण भिवानी त्यांना सोडलं नाही. त्यांना कसंबसं आवरत सावरत बाजूला असणाऱ्या झाडाला बांधल.
शेतात जमलेल्या लोकांनी त्या दोघांचा भरपूर चोप काढला आणि पोलिस स्टेशनला संपर्क साधून पोलीसांना शेतावर बोलवून घेतलं. पोलीसाने चार चार फटके मारून गाडीत कोंबले. गाडी निघाली. तशी भिमा अर्जुन आणि लक्ष्मी उड्या मारू लागली.
पुन्हा ही माईलेकर भिवाला आपुलकीने, प्रेमाने चाटू लागली. त्यांच्या सरक्षण कवचमुळे भिवा सुखरूप राहिला.
©️®अर्जुन विष्णू जाधव.

सदर कथा लेखक अर्जुन विष्णू जाधव यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही. धन्यवाद.!!!
📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!