मार्ग

©® सौ. शितलादेवी सुनिल कुळकर्णी.
वैशाली आत आली वृंदाने तिला बसायला सांगितले.
 खुर्चीवर बसुन वैशाली आपली कहाणी सांगू लागली.
” मी जन्माला येण्याच्या अगोदरच वडील अपघातात गेले होते. जन्मल्या नंतर आई काही दिवसात गेली. मी काका, काकीकडे रहायला लागले.
काकी म्हणून माझा सारखाच राग राग करीत असायची. मी म्हणून घरातील सर्व कामे करायची तरी काकी सर्वांना सांगत असे की आम्हाला हिचा सांभाळ करावा लागतो. मी हे ऐकून घेण्या शिवाय काहीच करू शकत नव्हते. शाळेत मी हुशार नसले तरी बरी होते.
मी दहावी पास केले तेव्हा काकी म्हणाली, पुरे आता शिक्षण नोकरी बघ आता. 

तेव्हा मी म्हणाले हवे तर मी नोकरी करून शिकेन. मी बारावी चांगल्या मार्काने पास झाले तेव्हा मी ठरवले की आता सकाळी कॉलेज आणि दुपारी नोकरी करायची. मला एके ठिकाणी सेल्सगर्ल ची नोकरी मिळाली त्यांनी जेव्हा विचारले की पगार किती घेणार?
तेव्हा मी म्हणाले ” तुम्ही द्याल तो ” . मग त्यांनी 20/ रुपये दिवसाला असा पगार ठरवला.
नंतर मला समजले की इतर गाळ्यावर ज्या मुली आहेत त्यांना 25/ रुपये रोज मिळतात, मी काम तेवढेच करायचे, तेव्हा ते म्हणाले की तू अगोदर तयार झालीस ना तेवढेच मिळणार. 

ते लोक खुपदा मजा करायला मला गाळ्यावर बनवून बाहेर जायचे, कमी पैशात काम मी करायचे आणि विचारले तर म्हणायचे की तुला तर बरे वाटले पाहिजे की तुझ्याकडे विश्वासाने आम्ही काम सोपवून जातो. म्हणजे पहा त्यांनी दाखवले असे की तेच माझ्यावर उपकार करत आहेत!
मग मी ती नोकरी सोडली आणि दुसरीकडे कामाला लागले. एका ऑफिस मध्ये काम होते.
चेक वगैरे भरायला हाताखाली एक माणूस होता. तो खूपदा गैरहजर असायचा म्हणून मला बाहेर चेक भरायला जावे लागत असे पण पगार मात्र त्याला पूर्ण मिळत असे.
मी जेव्हा त्या माणसाला म्हटले, तू खूपदा रजेवर जातोस तुझे काम मात्र मला करावे लागत आहे. 

तेव्हा तो म्हणाला त्यात काय एवढी जाड आहेस ते बारीक तरी होशील! म्हणजे बघ मी काम केले म्हणून धन्यवाद न म्हणता मलाच वाईट म्हटले. मला समजत नाही की प्रत्येक वेळेला लोकांचे काम करून सुद्धा लोक असे दाखवतात की मीच वाईट आहे!
एकदा मी आगगाडीत बसले असताना एक भिकारी मुलगा भीक मागू लागला मी त्याला पाच रुपये दिले तेव्हा तो म्हणाला दहा रुपये द्या महागाई वाढली आहे, मला हे त्याचे वागणे उर्मट वाटले, मी नाही म्हटले तेव्हा तो रागाने म्हणाला ” दहा हजार कमावते दहा रुपये नाही देऊ शकत ?” मला तर तेव्हा दोन हजार पगार होता म्हणजे बघ ! दान करून सुद्धा शेवटी तो वाईट बोलून गेला.
माझ्या लग्नाचे पहावे लागणार म्हणून काकी नाराज होती. 

एक स्थळ काकीच्या मावस भावाच्या ओळखीचे होते पण मला वय खूप जास्त वाटले तब्बल बारा वर्षाने मोठा होता तो! 
मी नकार दिला तेव्हा काकी म्हणाली “आम्हाला आमच्या मुलींचे पण लग्न करायचे आहे असे एक एक स्थळ नाकारत गेलीस तर कसे चालेल?
शेवटी मला एक स्थळ पसंत पडले. सर्व ठीक होते पण तो दारू सिगारेट घ्यायचा. 
मला निर्व्यसनी नवरा हवा होता पण हे स्थळ पण असेच घालवले तर काकी चा राग ठरला होता म्हणून नाईलाजाने तयार झाले. 
त्यांचे नाव नितीन होते .नोकरी सुद्धा चांगली होती. घरात ते आणि सासुबाई होत्या.
काही वर्षे ठीक गेली नंतर मला चाहूल लागली की मी आई होणार म्हणून. हे आणि सासुबाई माझी सर्व प्रकारे काळजी घेत होते. मला मुलगी झाली. हे जरा नाराज झाले कारण त्यांना मुलगा हवा होता. तू माझी निराशा केलीस असे ते म्हणाले. 

मी मनात म्हणाले ” मुलगा किंवा मुलगी होणे हे सर्वस्वी पुरुषां वर अवलंबून असते हे आता सिद्ध झाले आहे तरी इथे सुद्धा मलाच वाईट म्हटले जात आहे. पण मी शारदा ला वाढवू लागले. सासुबाई कोविड मध्ये गेल्या. आम्हा दोघांची नोकरी सुद्धा गेली.
पुढे लॉकडाऊन काढल्यावर मी नोकरी शोधायला गेले .तेव्हा मला ही नोकरी मिळाली पण ह्यांनी नोकरी न शोधता व्यसन वाढवले. मला मुलीला सांभाळून नोकरी करणे जड जाऊ लागले. ह्यांची व्यसने तर वाढत होती.
माझ्या एका ओळखीच्या बाई ने यांच्या साठी नोकरी आणली होती, नोकरी चांगली सुद्धा होती पण ते रागाने म्हणाले ” तुझ्या उपकाराने मिळालेली नोकरी मला नको मी स्वतः नोकरी शोधून काढेन. 

मला नोकरी लावून सर्वाना सांगत बसशील की मी ह्यांना नोकरी लावली म्हणून!”
तेव्हा मी म्हणाले ” अहो मी असे का करीन?, माझी खूप ओढाताण होत आहे. ” 
तेव्हा ते म्हणाले ” आई वडिलां शिवाय होतीस म्हणून मला तुझी दया आली. म्हणून मी तुझ्याशी लग्न केले त्याचे असे पांग फेडतेस ?”
हे ऐकल्यावर मला वाईट वाटले, मी मनात म्हटले ” आता लग्नानंतर माझी दया सर्व करत आहे त्याचे काय? मी एवढे कष्ट करून सुद्धा ह्यांचे माझ्या बद्दल असे विचार आहेत. उलट मी कॉलेजला होती तेव्हा माझ्या मैत्रिणी म्हणायच्या की ” इतकी छान दिसतेस एखाद्या राजाची राणी होशील “. पण मला मात्र एवढे काम करून सुद्धा लोक असे बोलणारे मिळाले. माझा फायदा घेऊन मला बोलणारे! 

मला लहानपणी वाचलेली गोष्ट आठवते, एक कोल्हा बकरीची शिकार करुन खातो तेव्हा त्याच्या गळ्यात तिचे हाड अडकते तेव्हा तो एका करकोच्याला म्हणतो की माझ्या गळ्यात अडकलेले हाड काढले तर मी तुला काही तरी बक्षीस देईन.
करकोचा आशेने मोठ्या कष्टाने कोल्हयाच्या घशात अडकलेले हाड काढतो .पण बक्षीस देण्या ऐवजी कोल्हा म्हणतो की ” तू तुझे डोके माझ्या तोंडात घातले तेव्हा तोंड मिटले असते तर तू मेला असतास मी तुझे प्राण वाचवले हेच तुझे बक्षीस!
माझे सुद्धा असेच त्या करकोच्या सारखे आहे कष्ट करुन सुद्धा समोरची व्यक्ति असे दाखवते की तुच चुकीची आहे.” असे म्हणून वैशाली रडू लागली. 
तेव्हा वृंदा म्हणाली ” यातून आपण मार्ग काढूया.”
वृंदा नितीन ला फोन करून म्हणाली “मी वैशाली ची मैत्रीण, मला तुमच्याशी महत्त्वाचे बोलायचे आहे. तुमच्या पत्नीबद्दल, मुली बद्दल.” 

” बरे, उद्या या. ” नितीन म्हणाला. 
दुसर्‍या दिवशी वृंदा त्यांच्या घरी गेली. वैशाली कामावर गेली होती. 
वृंदा म्हणाली ” मी मुद्द्यावर येते. तुमच्या बायकोला घटस्फोट द्या. ” 
” अरे तू तिची मैत्रीण असून तिचे आयुष्य उध्वस्त करायला निघालीस?” तो म्हणाला. 
वृंदा म्हणाली” मैत्रीण आहे म्हणून तिच्या भल्याचे सांगते. स्पष्ट बोलते, तुम्ही घटस्फोट दिल्यावर माझा मामे भाऊ तिला तिच्या मुलीसकट स्विकारेल, तिचे आणि तुमच्या मुलीचे सुद्धा भले होईल. वैशालीला हे माहीत नाही. तुम्ही नोकरी शोधत नाही आणि आणलेली नोकरी सुद्धा करायला बघत नाही म्हणून मीच असा निर्णय घेतला वैशालीला सुद्धा हे पटेल, तुम्हाला हिरा मिळाला तरी तुम्ही तिला काच समजता, तुम्ही तिला पोसू शकत नाही म्हणून घटस्फोट मिळू शकतो ” 

“थांबा, मी कुठलीही नोकरी करायला तयार आहे ” नितीन तिला थांबवत म्हणाला. 
पुढे तो म्हणाला ” माझे डोळे आता उघडले!”
हे सर्व समजल्यावर वैशालीने वृंदा चे खूप आभार मानले. वृंदा म्हणाली ” एक गोष्ट होती की एक माकड पाण्यात उभे होते, आणि पुराचे पाणी वाढत होते तरी ते माकड माकडचाळे करत बसले होते.पण जेव्हा पाणी
नाका तोंडात जाऊ लागले तेव्हा ते हालचाल करू लागले. मी पण तशीच परिस्थिती निर्माण केली म्हणून बघ सर्व ठीक झाले.”
“तुझे खूप आभार ” वैशाली म्हणाली.
****
समाप्त.
©® सौ. शितलादेवी सुनिल कुळकर्णी.
सदर कथा सौ. शितलादेवी सुनिल कुळकर्णी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!