दरवळ

©® मृणाल शामराज
मधुमालती.. टुमदार बंगली आज जराशी विसावली होती. अंगणातल्या मांडवातील दाराशी लावलेल्या लेकुरवाळ्या केळीच्या खांबांनी आता मान टाकली हॊती.
येणाऱ्या वाऱ्याबरोबर झुलणाऱ्या मंडपाच्या कनातींची फडफड नकळत जाणवतं हॊती.
सारं घरं कसं सैलावून, दमून भागून पहुडलं होतं.
हॉलमधे सोफयावर मधुकरराव पण डोळे झाकून निवांत बसले होते.
मालतीची आतबाहेर चाललेली लगबग त्यांना जाणवत हॊती.
शेवटी तें न राहवून तिला म्हणाले, “अग, जरा शांत बस. किती गडबड चालली आहे तुझी.”

“शांत कशी बसू? चारच तर दिवस झाले लेकाचं लग्न होऊन. हा एवढा नंतरचा पसारा! कोणी आवरायचा?”
“अग, बस ग जरा. बस बघू.”
त्यांचं हॆ बोलणं ऐकून ती खुर्चीवर टेकली.
“दमलीस ना ?”
अंग सैलावत ती म्हणाली, “हो, पण किती समाधान वाटतंय,काय सांगू!”
“खरंय ग! सगळं कार्य कसं ठरवल्यासारखं आखीव, रेखीव पार पडलं. अवि पण आनंदात आहे अगदी.”
“हो, असणारच. सगळं मनासारखं झालं ना त्याच्या.”
“म्हणजे,तु खूष नाहीस का?”

“तसं नाही हो. नाराजी अशी नाही.”
“मग?”
“सगळं त्यांनीच ठरवलं. घरच्यांचं ही काही मत असतं ह्याचा विचार नाही केला त्यानी.”
“अग, लग्न त्यानी केलंय. काही विचार केला असेलच ना.”
“हो, हो. पण..”
“अग, काय कमी आहे तिच्यात. सारे कौतुक करत होते सुन किती देखणी, उच्चशिक्षित मिळाली आहे म्हणून.”
थोडयाश्या ठेक्यातचं मालती म्हणाली, “मिळणारच. काय कमी आहे इथे? विद्वत्ता, वैभव, सुखं, शिग भरून वाहतंय.”
“अग, तुला साजेशीच आहे ती.”

मालती ह्या कौतुकानी मोहरली.
“काहीतरीच तुमचं! उठते आता. कामाचा डोंगर पडला आहे. अवि, आसावरी गेलेत काश्मीरला.
तें परत आले की त्यांची ऑफिसची गडबड सुरु होईल. तोपर्यंत सगळं आवरायला हवं.”
“किती अट्टाहास तुझा पण. करशील दमानं.”
“नकॊ, आटोपते.” म्हणतं ती आत गेली.
मधुकरराव त्या दिशेने बघत होते.
अजूनही किती सुंदर दिसते ही. मुळातच देखणी त्यात परिस्थितीमुळे आलेला सधनपणा.
समाधान कसं ओसंडून वाहतंय चेहऱ्यावरून.
सुखाचा सुस्कारा टाकून मधुकर रावांनी डोळे मिटले.

खरंच, किती सुखी आहे मी. सरकारी उच्चपदस्थ . आता नुकतीच निवृत्ती घेतली आहे. सधन घरात जन्मलो मी. आयुष्यात कशालाच कमी नव्हतं. उच्च शिक्षण, त्यानंतर मिळालेली चांगली नोकरी. मालती सारखी सुंदर, सुविध्य पत्नी.
अवनी, अवि सारखी हुशार मुलं. परमेश्वरानी अजून काय दयावं. अवनी लग्न होऊन सासरी गेलेली.
अविच आत्ता नुकतचं लग्न झालं. कृतार्थता आली जीवनाला.
“अग,कशी वेंधळी तु! सांडलं ना. नीट भरता येतं नाही का तुला.?”
“वहिनीसाहेब चुकी झाली.”
“नीट काम कर, नाहीतर काढून टाकेन तुला.”
“एकदा माफ करा, परत नाही होणार.” त्यांची तंद्री भंगली.

सगळं छान आहे हीच, पण ही शिस्त. सगळीकडे नेमकेपणा लागतो हिला. आता नवीन सुन घरी येणार.
वेगळ्या रिती, पद्धती तिच्या असणार. कसं व्हायचं हिचं?
“येताय ना जेवायला ?”
“अग, किती प्रकार केलेस ? दोघेचं होतो ना जेवायला.”
“जेवण नकॊ का नीट? ताकद नकॊ राहायला अंगात.”
“दमतेस ना तु मग? तुला एक सांगू का, स्वयंपाक करायला बाई बघ. आता आसावरी येईल. तीच ऑफिस. तुला खुप पुरेल सारं.”
“असू दे. मी करू शकते. अविला माझ्याचं हातचं आवडतं सारं.”
“तु खुप हट्टी आहेस. कर तुझ्या मनासारखं.”
चार दिवसातअवि आणि आसावरी आले.

“आई.. चहा.”
“उठलास का.. आणते. आसावरी..”
“झोपलीय ग ती अजून.”
“ऑफिसला जायचंय ना तिला?”
“हो, उठेल ग. मला देतेस ना चहा.”
त्याचं आटोपलं तेव्हा आसावरी उठली.
“अरे, निघालास तु. मला उशीर होणार आज.”
“अग.. लवकर उठायचं ना मग.”
“हो आई, उशीर झाला ना झोपायला.” अवि कडे मिस्किल बघत ती म्हणाली.
“जा, आटोप. अंघोळ करून घे. डबा भरून ठेवलाय. ब्रेकफास्ट तयार आहे.”
“मी पटकन कपडे बदलून येतें. आणि पळते.”

“अग, ब्रेकफास्ट.”
“आज नकॊ.”
मालतीच्या कपाळावर उमटलेली आठी मधुकररावांना लांबून सुद्धा दिसली.
“तो डबा ठेवलाय. एक मिनिट थांब.” पटकन एक सफरचंद उचलून आसावरीला देतं ती म्हणाली, “जाताना खा. उपाशी राहू नकोस.”
“अग, चहा दे बघू फक्कडसा. तु पण घे थोडा.
वा, झक्कास झालाय, एकदम कडक आहे,तुझ्यासारखा.”
त्यांचा अविर्भाव बघुन ती खुदकन हसली.
“आता कशी छान दिसतेस बघ.”
“चला, काहीतरच तुमचं.”
दिवस जात होते.

आसावरी.. एक कोडं झालं होतं मालतीसाठी. हॉस्टेलवर राहायची. खुप हुशार पण शिस्तीचं आणि तिचं वाकडं. मनानी निर्मळ पण सडेतोड. अवि आणि तिचं कॉलेज एक. अवि,साधा, सरळ. आईच्या शिस्तीत वाढलेला. त्याला ही बिनधास्त आसावरी खुप आवडली.
आणि ती त्याच्या हुशारीवर भाळली. मग काय, दोघांच्या घरच्यांचा प्रश्नच नव्हता.
पण आता, रोजचीच तिची सकाळी होणारी धांदल.. संध्याकाळी उशिरा घरी आल्यावर अवि बरोबर उशिरा पर्यंत बाहेर जाण. त्यामुळे जेवायला होणारा उशीर. झोपेच्या बदललेल्या वेळा. वागण्यातली बेफिकरी.
मालतीची चिडचिड होई. महत प्रयत्नानी ती शांत राहायचा प्रयत्न करी.
तरी एक दिवस बिनसलंच.

“साडेदहा झाले, ह्यांचा अजून पत्ता नाही. वेळेचं भान ठेवावं ना जरा.”
“अग, आपण जेवून घेवू. बसतील तें नंतर.”
“नकॊ.. दिवसभरात एक तरी जेवण बरोबर नकॊ का? आलेच बघा तें.”
“काय रे, किती उशीर. आम्ही थांबलोय ना जेवायचे.”
“आमचे मित्र भेटले रस्त्यात. गप्पा मारत उभे होतो.”
“आमचं वय आहे का आता इतक्या उशिरा जेवायचं?” नाही म्हटलं तरी त्यांच्या आवाजात एक खरखर आली.
“आई, तुम्ही कशाला थांबता? जेवून घेतं जा तुमच्या वेळेला. आम्हाला दिवसभरात हाच वेळ रिकामा मिळतो आमच्यासाठी.” आसावरी सटकन बोलली.

मालतीनी चमकून वर पाहिलं. तिला कुणाकडून असं ऐकायची सवयचं नव्हती. ती काही बोलणार इतक्यात मधुकररावांनी तिला डोळ्यांनी शांत बसवलं.
“मालती.. तू गप्प गप्प का आहेस?” रात्री खोलीत आल्यावर मधुकररावांनी त्यांना विचारलं. खरं कारण त्यांना माहिती होतं.
पण तिला बोलतं करणं गरजेचं होतं.
“तुम्ही ऐकलं नाहीत का?”
“अग, काय चुकीचं बोलली ती. उशीर झाला तर जेवून घ्या म्हणाली. आपल्याला त्रास होतो तर उद्यापासून लवकरच जेवून घेवू यात.
पटतंय का तुला बघ.”
मालतीने क्षणभर विचार केला,बरोबरच म्हणाली ती. काय चुकीचं आहे.
“बरं..”
“शहाणी ती बायको माझी.”
नरम, गरम.. वातावरणात बदल चालू होते.

एकदा रविवारी कोथिंबीरवडी करायचा घाट मालतीनी घातला.
“आसावरी.. इकडे बघतेस का. हॆ असं भिजवायचं पीठ. मग, असे रोल करायचे.” पीठ मळतं तिचं बोलणं चालू होतं.
तीच आसावरीकडे लक्षही नव्हतं. आसावरी फोन बघण्यात दंग हॊती. अवि,तिथेच बसून उपमा खातं होता.
“आसावरी, मी काय सांगतेय? तुझं लक्ष आहे का?” चिडूनच मालती म्हणाली.
“नाही. माझं कामं चाललय.”
“सुट्टीच्या दिवशी पण. अग, कधी येणार तुम्हाला? कठीण आहे.”
“कुणाचं कठीण? आई, स्वयंपाक येणं म्हणजे सर्व काही आहे का ?”
“मग, काय सगळ्यांनी उपाशी राहायचं?” आता मालती खुप चिडली.
“सगळं विकत मिळतं. सारखी कटकट.. सुट्टीचा एक दिवस मिळतो,तो पण.” आसावरी पण चिडून उठली.

“कशात लक्ष नाही, दिवसभर ऑफिस, ऑफिस. कसा संसार करणार देवं जाणे, तिकडे चालत होतं कसही. पण इकडे.”
“तिकडे म्हणजे कुठे माझ्या माहेरी? त्यांच नावं काढायचं नाही.” आसावरी पण खुप चिडली.
अविला कळेना, काय करू, कुणाची बाजू घेवू?
तो आसावरीला शांत करायचा प्रयत्न करत होता, तर ती तडकन उठली. आपल्या खोलीत गेली आणि दार जोरात आपटलं.
अवि सुन्न होऊन खुर्चीवर बसला.
मालती पण मुसमूसत तिच्या खोलीत गेली.
मधुकरराव खुप वेळ एकटक अवीकडे बघत होते. तो खुपच डिस्टर्ब वाटला त्यांना.
साहजिकच होतं तें. आजपर्यंत घरात कधी चढलेला आवाज त्यानं ऐकलाच नव्हता.
मधुकररावांनी स्वतःला कामात झोकून घेतलं होतं. मालतीनी संसाराची धुरा स्वतःच्या जबाबदारीवर समर्थपणे पेलली हॊती.
स्वतःसारखं व्यवस्थित, जबाबदार असं मुलांना ही घडवलं होतं.

सगळं नीट होतं होतं म्हणून मधुकरराव निर्धास्त होते. पण आज त्यांना हॆ प्रकर्षाने जाणवलं की चुकलंय, काहीतरी..
मालतीचं हॆ एकहाती सर्व करणं, तिच्या अभिमानाला खतपाणी देणारं ठरलंय.
अवि दरवाजा ठोठवूनं दमला, पण आसावरीने दार उघडलं नाही.
तो वैतागून सोफयावर आडवा झाला.
तें खोलीत आले तर मालती रडतच अवनीशी बोलत हॊती.
त्यांना बघुन तिने उदया बोलू, म्हणून फोन ठेवून दिला.आणि त्यांच्याकडे पाठ करून झोपली.
आज मधुकररावांनी तिची समजूत काढली नाही.
तेही कुस बदलून झोपले.
दुसरा दिवस उजाडला, तो ही धुसमसत.

“आसावरी, जाता, जाता सोडतो तुला.” अवि म्हणाला.
“नकॊ, मी कॅबनी जाईन” म्हणत ती गेली सुद्धा.
तो स्वयंपाकघरात गेला तर आज तिकडे शांतता.
“आई..बाबा, आई उठली नाही का?”
“नाही, डोकं दुखतय तिचं. असू दे.. मी देतो चहा तुला.”
“बाबा.. कसं होईल हो ह्या दोघींचं?”
“मी बघतो. तू जा शांतपणे.”
तो ऑफिसला गेलेला पाहून मालती बाहेर आली. “इतकं डोकं दुखतंय माझं, कुणाचं लक्षही नाही.”
“मालती, बस इथे. बोलायचं थोडं तुझ्याशी. जरा दाबातचं तें बोलले.
मालतीनी चमकून पाहिलं. असं आजपर्यंत कधी झालं नव्हतं. काय चाललंय हॆ ?

“अग, दुसऱ्या घरातली मुलगी आणली ना आपण, आपल्याकडे!”
“म्हणून काय करायचं? सगळं मी करते. तिला काही करायला नकॊ. परत काही सांगायची सोय नाही.”
“कसं कळत नाही तुला? काळ बदलला आहे. मुली आता खुप शिकतातं. चांगल्या नोकरीत, चांगल्या दर्जावर स्थिरावतात.
तिथेही त्यांना नवीन, नवीन आव्हानांना तोंड दयावं लागतं. वेगवेगळ्या लोकांना , वेगवेगळ्या पद्धतीने सांभाळून घ्यावं लागतं. मानसिक ताण असतो त्यांना. एवढं सगळं करून आल्यावर घरी सगळं त्यांनी बघावं. कसं जमेल तिला.?”
“मी कुठं म्हणते तिने सगळं करावं. पण सगळं असं अचानक येतं का? काही जबाबदारी घ्यायला नकॊ का तिने?”
“अग, आपण इतकी शिकलेली, नोकरीं करणारी मुलगी केली, तेव्हा आपण हॆ लक्षात घ्यायला हवं की, ती इतर गृहिणी सारखी सतत घरात रमणार नाही. आणि ती वेगळी मुलगी आहे. नाही आवडतं एखादीला.”

“तुम्ही तिची बाजू घेवू नका. कसं होईल अविचं देवं जाणे!”
“ती त्याची बायको आहे. आता तुझा हक्क जरा कमी कर.”
“किती चिडून बोलताय!”
“तो माझा ही मुलगा आहे. तु अविला पाहिलंस का काल? काय करेल तो? एकीकडे आई, एकीकडे बायको.
विचार कर तु. ती अजून लहान आहे, पण आपल्याला तर कळतंय ना.”
मालती विचार करू लागली. खरं आहे हॆ म्हणतात तें. काल अवि कसा हवालदिलं झाला होता.
पण ती.. जावू दे, दुर्लक्ष करू या का थोडं. मी जरा झोपते. डोकं दुखतंय माझं म्हणतं ती गेली.
“मुलखाची हट्टी आहेस झालं!” म्हणतं मधुकरराव येराझारा घालू लागले.

दुखणं लहान आहे तोपर्यंतच इलाज करावा नाहीतर अवघड आहे. असा विचार करून त्यांनी आसावरीला फोन लावला.
“हॅल्लो.. बाबा. काय झालं?”
“काही नाही बेटा. काही खाल्लंस का?”
“अं..”
“म्हणजे नाही ना? अन्नावर राग काढू नकोस. खाशील ना काहीतरी. ऐकशील ना?”
आसावरीला त्यांच्या आवाजातील आर्जवं कळलं.
“हो, बाबा खाते.”
“अविचा फोन आला होता का?”
ती क्षणभर गांगरली, हॆ त्यांना फोनवरून लक्षात आलं.
“मला माहिती आहे, त्यानी फोन केले असतील पण तु उचलले नाहीत.”

“म्हणजे हॆ ही त्यानी तुम्हाला सांगितलं?”
“नाही ग. मी बाप आहे त्याचा. त्याला चांगलं ओळखतो. त्याला फोन कर. तो काळजीत असेल. करशील ना?”
“हो. ठेवते.” म्हणतं तिने फोन ठेवला.
संध्याकाळी मालती मैत्रिणीकडे गेली हॊती. अवि अजून ऑफिस मधुन आला नव्हता. आसावरी आली तर मधुकरराव एकटेच घरी होते. आसावरीनी चाहूल घेतली.
“तुम्ही घरी एकटेच का?”
“हो.जा. फ्रेश होऊन ये. मस्त चहा केलाय मी. मिळून घेवू.”
ती आली तर टेबल वर ते तिची वाट बघत होते.
सामोसे, ढोकळा्यांनी भरलेल्या डिश समोर होत्या.
“घे. पुढच्या चौकात मधुर मिठाईवाला आहे. त्याच्याकडे ह्या गोष्टी खुप छान मिळतात. खुप गर्दी असते तिथे. घे. काही खाल्लं नाहीस ना दिवसभर.”

“बाबा, तुम्हाला..”
“हो, तुझा चेहराच सांगतोय.”
“खुप छान आहे टेस्ट बाबा.”
“चहा घे आता. बाळा, एक सांगू. रागवणार नाहीस ना? मान्य आहे, तु या घरात नवीन आली आहेस. इथल्या पद्धती आत्मसातं करणं तुला जड जातंय. पण बाळा, आम्ही सारे ह्या घरात एका ठराविक पद्धतीने अनेक वर्ष राहतो आहोत.. आमच्यातही बदल घडवायला आम्हाला थोडा वेळ लागेल. पण तुलाही थोडं बदलावं लागेल असं वाटतंय का तुला?”
“बाबा, मला अशी सवय नाही आहे.”
“हो बाळा. सवय लावावी लागते. बदल घडवावे लागतात.”
“पण आई.”.

“हो, मला कळतंय ते. तशी ती वाईट नाही आहे ग. फक्त पटवून घ्यायला वेळ लागतो तिला. आपण सगळ्यांनीच एकमेकांना समजवून घेतलं तर”
आसावरी विचारातं पडली. बाबा, म्हणताहेत तसं आई वाईट नाही आहेत. किती काळजी करतात माझी. ऑफिस मधे ऐकतो ना आपण. प्रत्येकाच्या घरची तऱ्हा निराळी.
“हो, बाबा. मी प्रयत्न करीन.”
“अग, घरातल्याना खूष ठेवायचा रस्ता पोटातून जातो बरं. बघ कसं करता येईल ते.”
आसावरी हसतच म्हणाली, “मी शिकेन सगळं आईनं कडून.”
“शहाणी ती माझी सुनबाई.”
दोघांच्या हसण्याचा आवाज आत येणाऱ्या मालतीने ऐकला.
काय असं नजरेनी म्हणतं त्यांनी मधुकररावांकडे पाहिलं.

“अग, ये, ये. हॆ बघ. तुझ्या आवडतीचे सामोसे आसावरी घेवून आली आहे.”
आसावरी आश्चर्यांनी बाबांकडे बघत हॊती.
“अग बाई, असं का.? कुठून आणलेस ग.”
“तिने..”
“थांबा,तिला सांगू दे.”
“आई, पलीकडच्या चौकात मधुर sweet आहे ना. तिथे सामोसे खुप छान मिळतात असं माझी मैत्रीण म्हणाली. तुम्हाला सामोसे खुप आवडतात असं अवि म्हणाला होता. म्हणून आणले मी.”
“तरीच दाराशी घमघमाट आला. चल खाऊ या.”
“आम्ही खाल्ले. तुम्ही घ्या. तोपर्यंत मी चहा आणते.” असं म्हणतं ती आत गेली.
विसफारलेल्या नजरेनी मालतीनी नवऱ्याकडे पाहिलं.
त्यांनी खांदे उंचावून, मला काय माहिती अशी खूण केली.
मालती हसली आणि खाण्यात रमली.

तेवढ्यात अवि बिचकतचं, अंदाज घेतं घरात आला.
“चला चहा तयार आहे,” म्हणत येणाऱ्या आसावरीकडे बघुन,त्याला हुश्श झालं.
“अवि, लवकर आटोप. आसावरीने मूवीची तिकिटं काढलीत. पटकन आवरा. उशीर होईल.”
“आसावरी,अग, तु काही बोलली नाहीस. लवकर नसतो का आलो?”
“आटपा. लवकर. आसावरी,अग अशी काय बघत बसलीस. आटोपतेस ना.?”
“बाबा..”
“जा.. आटोप. आणि हो.. अविनी तो गजरा ठेवलाय तुझ्यासाठी फ्रिज मधे. तो घाल.”
आता अवि आश्चर्यांनी त्यांच्याकडे बघत होता.

“आटोपताय ना? असे काय बघताय सगळे माझ्याकडे.काही लागलंय का माझ्या तोंडाला?”
“बाबा.. “आसावरीचा आवाज भरून आला.
“कळलंय बरं,सारं आम्हाला.किती सांभाळून घेताय तुम्ही आम्हाला. ज्या घराचा पाया, तुमच्यासारखा, मजबूत असतो ना, त्याच्या भिंती कधी ढासळत नाहीत.”
“पटलं ना. झालं मग. जा, उशीर होतोय.”
“आई, जेवणाच काय करायचं ?”
“आम्ही आज बाहेरून मागवतो. चालेल ना हो?”
आता मधुकरराव चकित झाले आणि हॆ तिघे खळखळून हसले.
तिढा कसा अलगद सुटला होता.
©® मृणाल शामराज.
सदर कथा लेखिका मृणाल शामराज यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही. या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखिकेची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी.
कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ ( नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
धन्यवाद.!!!
📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!