भास आभास

©️®️ सौ.हेमा पाटील.
ओह..नो यार… ! मोबाईल गाडीतच विसरला. रात्री साडेनऊ वाजता काॅन्फरन्स मिटींग आहे.आता परत खाली गेले पाहिजे.पण आधी फ्रेश होऊन चहा तर घेऊ,असे मनाशी म्हणत त्याने लॅचकी ने दरवाजा उघडला.
हाॅलमध्ये मनु रोजच्या सारखीच टिव्ही वर सासु सुनेच्या नात्यात जेवढा तणाव आणता येईल तेवढा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या विविध चॅनलपैकी एका चॅनेलवरील सिरियल मध्ये बिझी होती.
रोजच्यासारखीच त्याच्या एंट्री ची दखल घेतली जाणार नाही हे माहीत असूनही त्याने मनुकडे एक कटाक्ष टाकला.पण ती टिव्ही वरील सुनेच्या ए़ंट्रीत एवढी दंग होती की तिने त्याच्याकडे पाहिले देखील नाही. उलट तो टिव्ही समोरुन जाताना तिला डिस्टर्बच वाटला, कारण तेवढे क्षण टिव्ही दिसत नव्हता. 

रिकामा टिफीन किचनमध्ये ठेवून तो बाथरुममध्ये शिरला.
फ्रेश होऊन तो बाहेर आला तरीही चहाचा पत्ताच नव्हता. रोज चहा ठेव असे सांगण्याचा ही त्याला आताशा कंटाळा येऊ लागला होता. ग्लासभर पाणी घटाघटा पिऊन तो आत बेडवर आडवा झाला. सिरियल संपली अन् मनु बेडरूममध्ये डोकावली.
चहा ठेवू का या प्रश्नावर त्याने नकारार्थी मान हलवली.
खरं तर तिने हा प्रश्न न विचारता वाफाळत्या चहाचा कप मगाशीच हातपाय धुवून बाथरुम मधून बाहेर आल्यावर हातात द्यायला हवा होता असे त्याच्या मनात आले.पण तो काहीच बोलला नाही.

मनु किचनमध्ये उरलेला स्वयंपाक सिरियलच्या ब्रेकमध्ये आटपण्याच्या मागे लागली. डाळीला फोडणी घालतानाच चालू असलेल्या टिव्ही वर तिच्या सिरियल चे शिर्षक गीत सुरु झाले. पटकन फोडणी आटपून ती टिव्ही समोर आली.
रोजच्यासारखे मधल्या ब्रेकमध्ये तीने ताटे वाढून घेतली व त्याचे ताट डायनिंग टेबलवर ठेवून त्याला जेवायला या अशी हाक देऊन ती आपले ताट घेऊन टिव्ही समोर आली.
तो य़ंत्रवत उठला व जेवणाच्या ताटावर येऊन बसला.रोजच्यासारखेच एकट्याने मुकाट्याने जेवण आटोपले व हात धुवून हाॅलमध्ये आला.

तिच्या रंगात आलेल्या सिरियल मध्ये त्याला काडीचाही इंटरेस्ट नव्हता. त्याने सरळ गाडीची चावी घेतली चप्पल घातली व घराबाहेर पडला. मनु टिव्ही मध्ये इतकी दंग झाली होती की तिच्या हे लक्षात ही आले नाही.
तो खाली आला अन् रस्त्याच्या दुभाजकावर बसला. माणसे ,वाहने येत जात होती. एकमेकांशी गप्पा मारत पाय मोकळे करायला आलेली तरुण जोडपी, वयस्कर व्यक्ती,दंगा करत चाललेली मित्रमंडळी, कुणी आईस्क्रीम चा आस्वाद घेत रमतगमत चाललेली कुटुंबे पाहून त्याला अजूनच एकटेपणा जाणवला.
त्याने मोबाईल घेण्यासाठी गाडीचे दार उघडले,पण वर मनुच्या त्या रटाळ सिरियल अकरापर्यंत चालू असणार ! त्यामुळे जरा फिरून यावे म्हणून त्याने गाडी सुरू केली व विना उद्देश जिकडे जावेसे वाटेल तिकडे जाऊ असे म्हणत जुनी गाणी लावली.

लताची सदाबहार गाणी ऐकायला त्याला फार आवडे. झिलमिल सितारों का ऑंगन होगा….हे गाणे ऐकत तो शहराच्या बाहेर पडला. कुठे जायचे हे ठरवलेले नसल्याने तो शांतपणे ड्रायव्हिंग करत होता.तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजली.तेव्हा तो भानावर आला,अरे! आपली काॅन्फरन्स मिटींग आहे.
त्याने गाडी जरा बाजूला घेण्यासाठी आजूबाजूला पाहिले,तर आपण बरेच लांब आल्याचे त्याच्या लक्षात आले. साडेनऊच वाजले होते, पण तिथे रस्त्यावर रहदारी कमी झाली होती, त्याने एका बंद हाॅटेलसमोर गाडी बाजूला घेतली,पण तेवढ्यात ही त्यांच्या मनात विचार डोकावून गेला की,एवढ्या लवकर हे हाॅटेल बंद कसे?
पण मोबाईल वाजत होता, त्यामुळे त्याने मोबाईल वर मिटिंग अटेंड केली.महत्वाच्या विषयावर बोलणे सुरू असल्याने तो मिटिंगमध्ये अगदी गुंग झाला.

आपली मिटिंग कितीवेळ सुरू आहे,आपण जिथे आहोत तिथली रहदारी कमी होत होत पूर्णपणे थांबली आहे हे त्याच्या गावीही नव्हते. एवढ्यात समोरच्या बंद हाॅटेलमध्ये सगळीकडे लाईटस् लागलेत व सगळी टेबल्स माणसांनी भरुन गेली आहेत,वेटर्सची ऑर्डर्स पुरवण्यासाठी इकडून तिकडे लगबग सुरू आहे हे त्याच्या लक्षात आले.
कदाचित हाॅटेल आत्ता उघडले असावे असे त्याला वाटले. त्याची मिटिंग एव्हाना आवरत आली होती,समारोपाची चार-पाच वाक्ये बोलून त्याने फोन कट केला.
त्याचक्षणी आले,वेलची घातलेल्या मसालेदार चहाचा वास त्याच्या नाकात शिरला व चहाची त्याला विलक्षण तलफ झाली. मनुचा मिस्ड कॉल दिसला, म्हणून त्याने तिला मेसेज टाकला की,तू झोपून घे,मला उशीर होईल.
आणि चहाच्या ओढीने त्याची पावले त्या हाॅटेलकडे वळली.

कोपऱ्यातील एक टेबल रिकामे आहे हे पाहून त्याने आपला मोर्चा तिकडे वळवला. तिथे बसल्यावर त्याने सभोवताली नजर फिरवली. सगळेजण खाली मान घालून आपापल्या पुढ्यातील डिशचा फडशा पाडत आहेत असे दिसले.सर्व टेबलवरील व्यक्तींच्या हालचालीत एकसारखेपणा आहे असे त्याला वाटले.पण तो भास असावा,कारण हाॅटेलमध्ये सर्वजण एकाच कामासाठी येतात त्यामुळे सगळ्यांच्या हालचाली समानच असणार असे स्वतःशीच म्हणत तिकडे जास्त लक्ष न देता त्याने टेबलवरील मेनू कार्ड उघडले.
तसेही त्याला फक्त चहाच हवा होता,पण वेटर येईपर्यंत सहज चाळा म्हणून त्याने मेनू कार्ड उघडले होते.
मेनूकार्डच्या पहिल्या पानावर एका सुंदर मुलीचे चित्र होते. मेनूकार्डवर असे चित्र पहाण्याची त्याची ही पहिलीच वेळ होती.तो गोंधळून गेला व त्याने पुढचे पान उलटले.पुढील पानावर सर्व मांसाहारी पदार्थांची लिस्ट होती.तो पाने उलटत गेला पण स्नॅक्स व चहा काॅफी त्याला दिसेना.

तेवढ्यात आपल्या टेबलाजवळ कुणीतरी उभे आहे असे त्याला जाणवले. चला वेटर आला एकदाचा,असा विचार करून तो म्हणाला, एक स्पेशल चहा…अन् त्याने वर बघितले.
टेबलजवळ वेटर नसून पहिल्या पानावर फोटो असणारी युवती उभी होती. क्षणभर तो बावचळला. कारण शहरात बंदी असूनही बारमध्ये बारबालांचा व्यवसाय छुपेपणाने आजही चालतो हे तो ऐकून होता.
उगाच नसते लचांड मागे नको म्हणून तो जाण्यासाठी उठला, तेवढ्यात ती युवती म्हणाली, राजू,चहा घेऊन ये.
ते शब्द ऐकून तो परत खाली बसला. राजू येताच ती युवती गल्ल्यावर जाऊन बसली.

त्याने चहाकडे पाहिले. चहाचा सोनेरी कलर अगदी परफेक्ट उतरला होता. घट्टसर दिसणाऱ्या चहाचा त्याने डोळे मिटून वास घेतला. वेलची,आल्याचा चहात मिसळल्यानंतर येणारा स्वर्गीय सुगंध..वाह! क्या बात है..या सुगंधाचा तर तो वेडा होता.
चहाचा एक घोट घेतला.अशा अप्रतिम चवीचा चहा पिण्यासाठी मी रोज इथे येऊ शकतो असा विचार त्याच्या मनात आला,अन् तो स्वतः शीच हसला.
आपल्या चहाच्या वेडेपणाचे किस्से त्याला एकेक करुन आठवले अन् तो त्या स्मृतींमध्ये रमून चहाचे चवीचवीने घोट घेत होता.
जसजसा कपातील चहा कमी कमी होत होता,हाॅटेलमधील लाईटस् मंद होत आहेत असे त्याला जाणवले.आपल्याला काहीही भास होत आहे असे त्याला वाटले.
त्याने चहाचा शेवटचा घोट घेतला अन् कप टेबलवर टेकवला तेवढ्यात हाॅटेलमध्ये मंद दिवे लागले व बहुतेक कोपऱ्यात टेपरेकॉर्डर असावा,तिथून गाण्याचा आवाज ऐकू येऊ लागला.

“आयेगा..आयेगा..आयेगा आने वाला..आयेगा”..हे लताचे महल सिनेमातील गाणे ऐकून तो शांतपणे डोळे मिटून ते स्वर्गीय सूर कानात साठवू लागला. त्याच्या डोळ्यांसमोर स्वर्गीय सौंदर्य लाभलेली मधुबाला उभी राहिली. अशी आपल्यासारखी रसिकता असणारी पत्नी लाभायला हवी होती असे त्याला त्याक्षणी प्रकर्षाने वाटले. पण तिला त्या टिव्ही वरील रटाळ मालिकांचीच गोडी होती.आणि रोज रोज त्याच मालिकांमध्ये डुंबून गेल्यामुळे हळूहळू तिचा स्वभावही तसाच बनत चालला होता.
आपल्या सभोवताली जसे वातावरण असते त्याचा कळत नकळत आपल्यावर परिणाम होतच असतो.अशी जुनी गाणी लावावी अन् दोघांनी एकमेकांच्या डोळ्यांत पहात ती ऐकावी.तिने गाणी ऐकत जवळ बसून त्याच्या खांद्यावर डोके टेकवून स्वरांमध्ये भिजावे व त्यालाही आपल्या सहवासाने धुंद करावे असे त्याला वाटे.पण ती तर सिरियलच्या चक्रव्यूहात अडकली होती.यातून तिची सुटका होणे जवळजवळ अशक्य आहे हे त्याला समजून चुकले होते..

गाण्याच्या सुरांमध्ये चिंब भिजत त्याची अशी तंद्री लागली असताना किती वेळ गेला हे त्याला समजले नाही,अन् अचानक गाण्याचा आवाज बंद झाला.त्याने डोळे उघडले अन् तो नखशिखांत हादरला. त्या हाॅटेलमध्ये सगळीकडे पूर्ण अंधार होता, भयाण शांतता पसरली होती,अन् पूर्ण हाॅटेलमध्ये आपण एकटेच बसलो आहोत असे त्याला जाणवले.
त्याने खिशातून मोबाईल काढला व त्याच्या टाॅर्चचा प्रकाश सुरु केला अन् तो दुसऱ्यांदा घाबरला. मगाशी पाहिलेली युवती त्याच्या टेबलपाशीच उभी होती व गर्द अंधारातही त्याच्याकडेच एकटक पहात होती.
तिची ती थंड नजर पाहून त्याची भितीने बोबडी वळली. डोळे हे जुल्मी गडे असे त्याचे लाडके मत होते. कारण डोळ्यात पाहूनच माणसाची पारख होते हा त्याचा माणसे ओळखण्याचा आवडता आडाखा होता.तो समोरील व्यक्तीच्या डोळ्यात आरपार पहात असे.त्या व्यक्तीने नजर मिळवली की तो समोरील व्यक्तीच्या स्वभावाबाबत अंदाज बांधत असे..आणि ९९% हे अंदाज अगदी योग्य असत.

पण या युवतीच्या डोळ्यांकडे पहाताना तिथे निर्जीव गारगोटी चे डोळे बसवले आहेत का असा त्याला भास झाला.पण तरीही त्या डोळ्यांत पहाताना ते खोल विहीरीसारखे असून अंतहीन आहेत आणि आपण त्या डोळ्यांत नेहमीप्रमाणे एकटक पाहण्याचा प्रयत्न केला तर त्यात खोलखोल बुडत चाललो आहोत असे त्याला वाटले.
निग्रहाने प्रयत्न करत त्याने आपली नजर तिच्या डोळ्यांवरुन हटवली.पण तिथे असणारा थंडगारपणा अनुभवून त्याच्या अंगावर भीतीने काटा उभा राहिला.
त्याने असहाय्यपणे सभोवताली नजर फिरवली पण तिथे कुणीही नव्हते.
आता त्याच्या हृदयाची धडधड त्यालाही ऐकू येऊ लागली.भितीने त्याचे हातपाय लटपटू लागले.जीभ लटकी पडली होती.ती युवती तशीच त्याच्याकडे एकटक बघत उभी होती.त्याच्या तोंडातून कसेबसे शब्द बाहेर पडले,”कोण आहेस तू”?

हे ऐकून ती मोठ्याने हसली.”मला ओळखत नाहीस तू? माझ्या हाॅटेलमध्ये बसून हा प्रश्न विचारतोस? मी राणी ! माझे हाॅटेल वैशिष्ट्यपूर्ण चवीसाठी प्रसिद्ध आहे”.
“पण आत्ता काही मिनिटांपूर्वी सगळी टेबल्स माणसांनी भरलेली होती,अन् अचानक सगळी एकाचवेळी कुठे गायब झाली”?
तो असे म्हणताच हाॅटेलमध्ये परत आधीचेच दृश्य दिसू लागले.सगळ्या टेबलवर माणसे दिसू लागली.त्याने जरा निरखून पाहिले, तेव्हा त्याच्या लक्षात आले,ही आपल्यासारखी सर्वसामान्य माणसे नाहीत.
त्याने शेजारच्या टेबलवरील एका व्यक्तीच्या खांद्यावर हात ठेवला ,त्या व्यक्तीने त्याच्याकडे वळून पाहिले,ती थंडगार नजर पाहून तो जागीच थिजला.
अन त्याचवेळी त्याच्या लक्षात आले,सगळ्याच टेबल भोवती बसलेल्या सगळ्याच व्यक्तींची नजर आपल्यावर रोखलेली आहे.

त्या सर्वांचे ते फक्त पांढरी बुबुळे असलेले गारगोटी सारखे डोळे पाहून त्याच्या हृदयाचे पाणी पाणी झाले..इथे धोका आहे हे त्या ही परिस्थितीत त्याच्या लक्षात आले.जीव वाचवण्यासाठी इथून बाहेर पडले पाहिजे याची नोंद त्याच्या मेंदूने घेतली.अगदी जीवाच्या आकांताने पळताना त्याला पळता भुई थोडी झाली.त्याने तिथून बाहेर पडण्यासाठी दाराच्या दिशेने धूम ठोकली,पण दार बंद होते.त्याने दार उघडण्याचा खूप प्रयत्न केला,पण दार उघडले गेले नाही.घाबरुन तो दाराजवळ बसला, आपल्या अगदी जवळ आपल्याभोवती रिंगण केलेले अन् आपल्यावरच रोखलेले गारगोटी सारखे असंख्य डोळे त्याला दिसू लागले. अन तेवढ्यात झोपाळ्याचा कर्र कर्र आवाज ऐकू येऊ लागला व त्या झोपाळ्यावर बसून ती युवती गाणे गाऊ लागली.”आयेगा..आयेगा..आयेगा आने वाला..आयेगा”..हे दृश्य पाहून त्याची शुद्ध हरपली.

“कोण आहे रे गाडीत? ऐ..उठ ! इकडे एवढ्या रात्री काय करतोयस”? गाडीच्या बाॅनेटवर बराचवेळ पोलीस काठी आपटत होता.” च्यायला ! उठतोस का फोडू गाडीची काच”? 
बधिर झालेल्या डोक्याला हात लावत त्याने कसेबसे डोळे उघडले. गाडीबाहेर कुणीतरी उभे आहे एवढेच त्याला जाणवले,अन् तो घाबरला. पण गाडी बाहेरील व्यक्ती पोलीस असून आपल्याला रागावत आहे हे पाहून त्याने स्वतःला चिमटा काढला.
आपण जिव़ंत आहोत याचा त्याला आनंद झाला. त्याच आनंदात त्याने गाडीचे दार उघडले व तो बाहेर आला.
पोलीसाने त्याचे लायसन्स मागितले.त्याने दिले‌‌.पोलीसाने पुढे येऊन गाडीची तपासणी केली,गाडीत काहीच नाही हे पाहून तो म्हणाला,”काय राव, सभ्य आणि सुशिक्षित दिसताय! रात्रीबेरात्री घरात झोपायचे सोडून का असे बो़ंबलत फिरता” !

यावर त्याने काहीच उत्तर दिले नाही. तेवढ्यात त्याचे लक्ष समोरील त्याच हाॅटेलकडे गेले.
त्याने पोलीसाला विचारले,”या समोरील हाॅटेलमध्ये कधी गेला आहात का”?
पोलीसाने त्या हाॅटेलकडे नजर वळवली.”या? हे तर गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. हाॅटेलची मालकीण असलेल्या इराणी युवतीने प्रेमभंग झाल्याने याच हाॅटेलमध्ये गळफास लावून घेतला होता.ती अजूनही कधीकधी कुणाकुणाला दिसते असे म्हणतात.तुम्हांला दिसली नाही ना”?ह्या पोलिसाच्या प्रश्नावर जोरजोरात नाही नाही अशी मान हलवत तो धावतच गाडीकडे आला व स्टेअरिंगवर बसून सुसाट वेगाने घराकडे निघाला.
याला अचानक काय झाले या विचारात पडलेल्या पोलीसाकडे त्याने ढुंकूनही पाहिले नाही.

घरी गेल्यावर दार उघडून जेव्हा तो आत शिरला तेव्हा त्याच्या जीवात जीव आला.तसाच तो कपडेही न बदलता बेडवर जाऊन पडला.आपण जे पाहिले ते सत्य होते की भास या विचारातच मानसिक थकव्यामुळे त्याला ग्लानी आली अन् तो झोपेच्या आधीन झाला.
समाप्त
सौ.हेमा उवाच.
©️®️ सौ.हेमा पाटील.
सदर कथा लेखिका सौ.हेमा पाटील यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखिकेची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी. कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ ( नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!