झुंज

©® दिपराज दत्ताराम माने.
विक्रांत दावणीची गुरे सोडत होता. तोच विठ्ठलराव गोठ्यात आले. सर्जा जवळ जाऊन त्याच्या पाठीवरून मायेचा हात फिरवला.
” विक्या पुढच्या महिन्यात देव दिवाळीच्या दिवशी आपल्या सर्जाची झुंज ठरलेय. झुंज सड्यावर होणार आहे. मुरांबे गावच्या संग्राम पाटलाच्या बैला सोबत. तेव्हा आपल्या सर्जाला चांगला तयार कर. सकाळी संध्याकाळी पेंड भुशी खायला घालत जा. जितका खाईल तेवढा ओला हिरवा पाला खायला घाल. रानात गेल्यावर दम लागेपर्यंत पळव. उद्या झुंज खेळताना दमायला नको. आज संध्याकाळी वाण्याच्या दुकानातून पेंड घेऊन ये. मी वाण्याला सांगून ठेवतो‌. सर्जेराव यंदा तुम्ही झुंज खेळायची आणि जिकांयची.” सर्जाच्या पाठिवर थाप मारत विठ्ठलराव म्हणाले.

सर्जा हा विठ्ठलरावांच्या घरच्या गाईचा गावठी बैल. तरुण धिप्पाड आणि ताकदवान होता. संपूर्ण शरीराला तांबडा गडद रंग. चार साडेचार फूट उंच, सरल उभी शिंगे, झुपकेदार लांब शेपटी, पाठीवर  डौलदार वाशिंद असा हा सर्जा दिसायला हत्तीसारखा होता. गावातील इतर बैल सर्जाला पाहून लांबून जायचे.
झुंज ही सर्जा साठी काही नवीन गोष्ट नव्हती. आजवर सर्जाने गावातील अनेक बैलांसोबत झुंजी खेळल्या होत्या आणि जिंकल्याही होत्या. पण असं असलं तरी पहिल्यांदाच तो गावाबाहेरील बैला सोबत झुंज खेळणार होता.
यापूर्वी विठ्ठलरावांच्या दोन-तीन बैलांनी बाहेरच्या गावातील बैलांसोबत झुंज खेळल्या होत्या. परंतु सर्जाची ही पहिलीच वेळ होती. सर्जाला तशी संधी मिळाली नव्हती. यावर्षी मात्र देव दिपावळीच्या निमित्ताने होणारी झुंज आणि तिचा मान सर्जाला होता. 

झुंज हा शब्द कानावर पडल्या बरोबर विक्रम खूप खुश झाला होता. विक्रम हा विठ्ठलरावांकडे गुराखी म्हणून काम करत होता. विठ्ठलरावांनी झुंजीचा विषय सांगितल्या पासून विक्रमच्या मनात सर्जाला झुंजीसाठी कसे तयार करायचे याचा विचार चालू होता.
आता झुंज होईपर्यंत सर्जाची जास्तीत जास्त काळजी घ्यावी लागणार होती. सकाळी भुशी पेंड दुपारी रानात फिरवणे, संध्याकाळी हिरवा पाला रात्री पुन्हा पेंड भुशी खायला घालायची असा खुराक आणि त्याची वेळ त्याने ठरवली होती.
सर्जा लवकरात लवकर धष्टपुष्ट व्हावा यासाठी त्याने योग्य नियोजन केले होते. 
संध्याकाळी विक्रांत गावातील वाण्याच्या दुकानावर गेला. भुशी पेंड घेतली. दुकानावर गावातील इतर मंडळींची गर्दी असल्याने त्याला थोडा उशीर झाला होता.

तो दुकानातून बाहेर पडला. त्यावेळी अंधार झाला होता. पौर्णिमेच्या चांदण्यात रस्ता स्पष्ट दिसत होता. अंगाला थोडी थंडी जाणवत होती. रस्त्या जवळच्या पारावर गावातील पुरुष मंडळी घोळका करून जमलेली होती. म्हातारी माणसे शेकोटी करून धक घेत होते. त्यांच्या इकडच्या तिकडच्या गप्पा रंगल्या होत्या. काही जण पत्ते खेळण्यात व्यस्त होते. तरुण मुलांचा पत्ते खेळणारा वेगळा गट  होता. दोन्ही गट शेजारी शेजारीच बसले होते.
जवळच हाकेच्या अंतरावर शिक्षण घेणाऱ्या पाच-सहा मुलांचा गट कोणत्यातरी विषयावर चर्चा करत होता. त्यामधील एकाची  नजर झपाझप पावले टाकत चालणाऱ्या विक्रांतवर पडली.
त्याने त्याच क्षणी विक्रांतला आवाज दिला.

“ये विक्या एवढ्या उशीरा कुठे गेला होता?” 
“भुशी आनया वाण्याच्या दुकानावर गेला व्हता. सर्ज्याची झुज हाय ना.” चालता चालता थांबत विक्रांत म्हणाला. 
झुंज हा शब्द कानावर पडताच सगळ्यांच्या माना विक्रांतच्या दिशेने वळल्या.
शेकोटी जवळ धक घेणाऱ्या एका म्हाताऱ्याने बसल्या जागेवरूनच प्रश्न केला, “कादवा झुंज आहे रे?” 
देव दिवालीच्या दिवशी मुरांब्याच्या  संग्राम पाटलाच्या बैला बराबर.” विक्रांत म्हणाला. 
“विठ्ठलरावाचा खयचा बैल? म्होरा बैल  काय?” दुसऱ्या म्हाताऱ्याने प्रश्न केला.
” नाय आबा, उभ्या शिंगाचा तांबडा बैल सर्जा त्याचे बराबर हाय. ” विक्रांत म्हणाला.

“तसं नाय मागचे यलस त्या  म्होऱ्या बैला संग शिवा नलावड्याच्या बैलाची झुज व्हती. सड्यावरच झुज व्हती. मी बगया गेला व्हता.
त्या म्होऱ्या बैलान साधी टक्कर पन घेतलान नाय. तसाच शेपटा वर करून पलत सुटला. झुज झालीच नाय. उगाच जा- जा  य- य झाला नुसता. तवा आताच्याला सर्जाला चांगला तयार कर. संग्राम पाटलाचा बैल डरकालीस  घाबरया हवा.” हातातले पत्त्याचे पान टाकत  म्हाताऱ्याने सल्ला दिला.
“संग्राम पाटलाचा बैल तुला साधा सुद्धा वाटला काय? कसला रेड्यावानी दिसतो. नावापरमान वजीर हाय. आजवर खायच्या बैला संग झुज हरलीला नाय.” तिसऱ्या म्हाताऱ्याने वजीरचे गुणगान गायले. 

” हा व्हय रे खर हाय. मागचं यलस त्या वजीरची मुरांब्यालाच झुज व्हती. चांगली तासभर झुज झाली. जरा बी माग नाय हटला.  काय ढोपरा घालून झुज खेलला.  झुज जिंकला पट्ट्या.” आणखी एकाने वजीरची माहिती दिली.
“बाल्याशेठचा म्हातारा बैल राजा. काय झुज खेलयाचा रे….” असे म्हणत पुढच्या माणसांने बोलण्यास सुरुवात केली.
तोच ज्या मुलाने विक्रांतला  आवाज देऊन थांबवले होते, त्याने विक्रांतकडे पाहिले.
तो डोक्यावरचे ओझे घेऊन तसाच जागेवर उभा होता. त्याने विक्रांतला आवाज दिला.      
“विक्या  तुला जायला उशीर होईल निघ तू. “
“व्हय व्हय चला यता. ” असे म्हणत विक्रांत पुढे निघून गेला.

पारावर सुरू असलेले आतापर्यंतचे सर्व विषय थांबले होते. आणि नवीन विषय चालू झाला होता. तो म्हणजे झुंज.
प्रत्येक जण आपण पाहिलेली झुंज मोठ्या अभिमानाने रंगवून सांगत होता. दुसऱ्या दिवशी संपूर्ण गावभर झुंजीचा विषय पोहोचला. विक्रांत दिवस रात्र सर्जा ला तयार करण्यासाठी मेहनत घेत होता. विठ्ठलरावाही लक्ष देत होते.
लहानपणापासून चांगली मजबूत भर भक्कम शरीरयष्टी असलेला  सर्जा खुराक्याने अधिकच दांडगा झाला होता. त्याच्या आवाजाने आजूबाजूचा परिसर दुमदुमून जायचा.                            
झुंज उद्यावर आली होती. संध्याकाळी विक्रांत सर्जाला आंघोळ घालण्यासाठी नदीवर घेऊन गेला.  तो खुशी खुशीने सर्जाला धुवायला लागला. अगदी मनापासून साबण लावून सर्जाला डोक्याच्या शिंगापासून  शेपटीच्या झुबक्यापर्यंत धुतले.

नदीतून बाहेर घेऊन मोकल्या जागेत बांधले. दोन्ही शिंगांना भगवा रंग लावला. तो सारखा सर्जाला गोंजारत होता. त्याच्या पाठीवरून हात फिरवत होता कधी एकदाची झुंज होते असे त्याला झाले होते.                   
झुंजीचा दिवस  उजाडला. विक्रांतला रात्रभर झोप लागली नव्हती. तो पहाटे उजडायच्या आधीच उठला.  भराभर गोठा झाडून आपली सगळी कामे आटपली.  सर्जाला गोठ्यातून बाहेर काढले.
विठ्ठलराव कधी वाडयातून बाहेर येतील आणि सर्जाला घेऊन चल म्हणतील असे त्यांना झाले होते. विक्रांत मनातून कधी झुंज सुरु होईल आणि आपला सर्जा झुंज जिंकेल. याचे स्वप्न रंगवत होता.  इतक्यात विठ्ठलराव घरातून बाहेर पडले. त्यांनी विक्रांतला आवाज दिला. 

“ये विक्या चहा नाष्टा करायला ये रे.”
विक्रांत नाष्टा करायला आला. आज नाष्टाला आंबोळी होती.  मालकीण बाईंनी प्लेट मध्ये चार आंबोळी आणि पेला भरून चहा दिला. विक्रांतने मोठ्या खुशीने भराभर आंबोळ्या संपवल्या. ढेकर देत उठला. 
घड्याळात आठ वाजले होते.
बळवंतशेठ पांढऱ्या रंगाचा सदरा आणि लेंगा घालून सर्जाच्या दिशेने आले. त्यांच्या मागोमाग मालकीणबाई नवीकोरी नऊवारी  साडी नेसुन हातात आरतीचे ताट घेऊन आल्या. 
त्यांनी सर्जाला ओवाळले. कपाळावर गुळालाचा मोठा टिळा लावला तांदूळ फुले टाकली. तोंडात आंबोळी भरवली.

विठ्ठलरावांनी दोन्ही शिंगांना गोंड्याच्या फुलांचा गुच्छ बांधला. गळ्यात घंटा बांधली. नायलॉनची दोरी गळ्यात बांधून त्याच दूसरे टोक विक्रांतच्या हातात दिले. सर्जाच्या  पाठीवरून तीन चार वेळा मायेने हात फिरवला.  सर्जाला  घेऊन चालत चालत  निघाले.
रस्त्याने चालताना त्यांना- गावातील अनेक माणसे मिळत होती. तेही त्यांच्या मागोमाग झुंज पाहण्यासाठी येऊ लागले.
तीस चाळीस मिनिटे चालल्यानंतर झुंजीच्या मळ्यात पोहोचले. आधी पासुनच आजुबाजुच्या गावातील माणसांनी झुंज  पाहण्याकरिता गर्दी केली होती.
भातशेतीच्या मळ्यात झुंज होणार होती. सध्याचं भाताची कापणी झाली होती. जमीनीत अजूनही ओलावा होता. विठ्ठलराव आणि विक्रांत सर्जाला घेऊन मळ्याच्या मध्यभागी आले.

समोरुन संग्राम पाटील त्याचा बैल वजीरला घेऊन पुढे आला.  विठ्ठलराव आणि संग्राम पाटील यांनी हात मिळवणी केली. आपापल्या बैलांना सोडण्याचे आदेश दिले. विक्रांतने सर्जाच्या गळ्यातील घंटा सोडली आणि दोरीही सोडून  घेतली. मैदानातून बाहेर आले. दोन्ही बैल डुकरत डुकरत एकमेकांसमोर उभे राहिले.
एका बाजुला धष्टपुष्ट तांबड्या रंगाचा सर्जा तर दुसऱ्या बाजुला तेवढ्याच ताकदीचा उभी समोरच्या बाजूला थोडी झुकलेली शिंगे  असलेला काळ्या रंगाचा कधीही झुंज न हारलेला वजीर. 
दोन्ही बैलांनी मोठा आवाज केला. एका पायाने माती उकरली. शिंगाना माती लावली. फुसकारत फुसकारत एकमेकांच्या अंगावर धावून गेले. 
बैलांचे मस्तक मस्तकाला भिडले. झुंज बघायला जमलेल्या  लोकांनी जोरात ओरडायला सुरवात केली. मध्येच होणाऱ्या शिट्यांच्या आवाजाने वातावरण अधिकच उत्साही बनले होते.

झुंज पाहण्यासाठी जमलेली लोक आपल्याला जागा मिळेल त्या ठिकाणी उभे राहून झुंज पाहत होते. कोणता बैल कोणत्या बैलावर हल्ला चढवतो. हे पाहण्याकरिता सर्वजण आतुर होते. दोन्ही बैल आपली ताकद लावून  एकमेकांना मागे ढकलण्याचा प्रयत्न करत होते. परंतू कोणताच बैल मागे हटत नव्हता.
थोडा वेळ एकाच जागेवर शांतपणे एकमेकांना टक्कर देत ढकलाढकली चालू होती.  शांत असलेल्या सर्जावर वजीरने अचानक  जोरदार हल्ला केला. सर्जाला दहा-बारा पावले मागे हटवले. सर्जाने आपली सगळी ताकद पणाला लावत वजीरला प्रतिकार केला.  वजीरला सात- आठ पावले मागे हटवले. पुन्हा वजीरने  सर्जावर चाल करत मागे रेटले. सर्जाने ही वजीरला मागे रेटले. असे तीन-चार वेळा झाले. दोघेही वर्चस्वासाठी लढत होते. 

प्रतिस्पर्धी बैलाला अडगळीच्या ठिकाणी ढकलून त्यावर जोरदार हल्ला करणे ही वजीरची खेळी होती. असाच खेळ करत करत वजीरने सर्जाला अडगळीच्या जागी आणले.  आणि संधी साधून जोरदार धक्का दिला.
सर्जाचा उजव्या बाजुचा मागचा पाय मळ्याच्या बांधावरून खाली सरकला. सर्जा हडबडला. मागच्या पायांना ताकदीने उभा राहण्यासाठी न मिळणारा आधार आणि समोरून होणारा प्रहार यामुळे सर्जा मागे हटला. सर्जा आता झुंज हरणार. अशी स्थिती निर्माण झाली.  मुरांबे गावच्या मंडळीनी जोरदार जल्लोष सुरू केला.
पण पुढच्याच क्षणी सर्जाने स्वतः ला सावरले. पुढे पुढे चाल करणाऱ्या वजीरला एका जागेवर थांबविले.  सर्जाच्या पायाला खरचटले होते. अचानक झालेल्या हल्याने गडबडून गेला होता.

सर्जाने आता आपली खेळी सुरू केली. खाली मान घालून मुसुंडी मारली. आपल्या दोन्ही शिंगामध्ये वजीरची मान पकडुन वर उचलली. वजीर आपली मान सोडवण्याच्या नादात थोडा मागे हटला. याच संधीचा फायदा घेत सर्जाने जोरदार हल्ला चढवला. पण मैदान सोडेल तो वजीर कसला. वजीरने आपली मान  सर्जाच्या शिंगातून सोडवली. सर्जावर प्रतिहल्ला चढवला. सरजाही मागे हटायचे नाव घेत नव्हता. त्यानेही आपली सर्व ताकद पणाला लावून वजीरला एकाच जागेवर धरून ठेवले.
दोघांनाही थोडा दम लागला होता. मस्तकाला  मस्तक लावून दोघेही एकाच ठिकाणी उभे होते. वजीर स्वतःहून चार पावले मागे सरकला. आणि लगेचच पुढे येत सर्जाच्या मस्तकावर जोरदार प्रहार केला. सर्जा वजीरची ही खेळी आधीच ओळखून होता. त्याने मोठ्या शिफारतीने आपल्यावर चाल करणाऱ्या वजीरला रोखले.

दोन्ही गावातील सगळी मंडळी मोठ्या उत्साहाने डोळयात तेल घालून झुंज पाहत होते. एका क्षणाक्षणाला खेळ पलटी होत होता. आपल्या गावातील बैल मागे हटला की, तोंडात बोटे घालणारे विरोधी पार्टीचा बैल  मागे हटला की, जीवाच्या आकांताने किंचाळत होते. तीस चाळीस मिनिटे चाललेल्या झुंजीमध्ये कोणता बैल कोणावर भारी पडेल हे अजून तय झाले नव्हते.
सगळे जमलेले गावकरी आपापल्या बैलांनी प्रोत्साहित करत होते. दोन्ही बैल एकमेकांना ढकळत – ढकळत सगळ्या मळ्याभर फिरत होते. अखेरीस ज्या मळ्यात झुंजीला सुरवात झाली होती त्याच मळ्यात आले. दोघेही दमले असले तरिही मान खाली घालुन एकमेकांना हुसकावत होते.
प्रेक्षक मंडळी थोड्या वेळासाठी शांत झाली. वजीरने फुसकारत सोडत दम सोडला. इतक्यात सर्जाने सर्व ताकदीने वजीरच्या  मस्तकावर प्रहार केला.  चाल करून त्याला मागे ढकलले. दमलेल्या वजीर कडे या हल्ल्याचे उत्तर नव्हते.

वजीर लडखळत प्रतिकार करत होता. आक्रमक सर्जाला आवरणे अवघड झाले होते. सर्जानेही वजीरला हल्ला चढवण्याची संधी दिली नाही. शेवटी वजीरने शेपटी वर करून मळ्यातून पळ काढला. सर्जा विजयी झाला. मोठ-मोठ्याने डुकारु लागला. 
विठ्ठलरावांनी मळ्यात फटाके फोडले. दुसरीकडे  सर्व गावकऱ्यांचा जोरदार जल्लोष सुरू होता. विठ्ठलराव हसत हसत सर्जा जवळ पोहोचले. सर्जाच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली. गळ्यात दोरी बांधली. आणि विक्रांतच्या हातात दिली.
पायाला खरचटल असून सावकाश  घेऊन येण्यास सांगितले. सगळी मंडळी आपल्या वाटेने गावच्या दिशेला लागली.  विक्रांत मोठ्या हौशीत अभिमानाने सर्जाला घेऊन निघाला. त्याच्या मागोमाग झुंज पाहण्याकरिता आलेली गावातील मंडळी निघाली.

रस्त्याने चालताना सर्वजण सर्जाने खेळलेल्या झुंजीचे तोंडभरून कौतुक करत होते. गावाची हद्द सुरु होताच प्रत्येकजण आपापल्या घरी गेले. विक्रांत , विठ्ठलराव सर्जाला घेऊन घरी पोहोचले.
विजयी होऊन परतलेल्या सर्जाचे मालकीणबाईंनी आंबोळी भरवून कौतुक केले. विक्रांतने सर्जाच्या पायाला मलमपट्टी केली. विठ्ठलरावांनी सर्जा झुंज जिंकला म्हणून विक्रांतच्या हातात शंभर रुपयाची नोट बक्षीस म्हणून दिली.
दिपराज दत्ताराम माने.
समाप्त
©® दिपराज दत्ताराम माने.
सदर कथा लेखक दिपराज दत्ताराम माने यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!