नातं

©️®️सायली जोशी.
तास उलटून गेला तरी वरुण एका कॅफेमध्ये बसून प्रियाची वाट पाहत होता.
“सर, प्लीज काहीतरी ऑर्डर द्या. तुम्ही समोरची पाटी वाचली नाही का अजून?  कामाव्यतिरिक्त इथे जास्त वेळ  बसण्यास मनाई आहे.” 
वेटर तिसऱ्यांदा येऊन सांगून गेला. चेहऱ्यावरून तो पार वैतागलेला वाटत होता.
इतक्यात प्रिया घाईघाईने येताना दिसली. तिला पाहून वरुणच्या कपाळावरच्या आठ्या सैल झाल्या.

“सॉरी वरुण, ऑफिसचे काम खूप होते. शिवाय त्यात ट्रॅफिक! उगीचच तासभर तुम्हाला वाट पाहावी लागली. खरंच सॉरी.” 
प्रिया मनापासून म्हणाली.
“ठीक आहे, चालायचंच. मी कॉफी घेईन.  प्रिया, तुम्ही काय घ्याल, कॉफी की आणखी  काही?” वरुण गडबडीने म्हणाला.
“मला कॉफी चालेल.” ती थोडी रिलॅक्स होत म्हणाली.
अगदी काही वेळातच मगाचसा वेटर गालातल्या गालात हसत कॉफी घेऊन आला.
“प्रिया, माझा होकार मी आधी तुम्हाला कळवला आहे. आता तुमच्याकडून उत्तर येणं अपेक्षित आहे.” 
वरुण कॉफीचा घोट घेत म्हणाला.

“हम्म..” प्रिया इकडे तिकडे बघत होती खरी, पण डोळ्यांच्या कोपऱ्यातून वरुणकडे पाहत होती. लहानसे पण सिल्की केस, बारीकशी राखलेली दाढी, व्हाईट शर्ट, ब्लॅक जीन्स असा पेहराव केलेला स्मार्ट वरुण! ती उगीचच लाजली.
कॅफेचं वातावरणही अतिशय छान होतं. काही जोडपी उंच टेबलावर बसून कॉफी पित होती तर काही नुसतीच हातात हात गुंफून, एकमेकांच्या सहवासात बसली होती. प्रत्येक टेबलावर कपल्सच्या प्राईव्हसीसाठी छान योजनाही केलेली दिसत होती.

“खरं सांगायचं तर माझी आई आजारी असते. ती नेहमीसारखी काही कामं करू शकत नाही.  थोडक्यात बेडरीडन आहे ती. 
असं असलं तरी एक मावशी रोज कामाला येतात. त्या घरचं सारं पाहतात आणि आईची काळजीही  घेतात. मलाही सगळा स्वयंपाक येतो बरं.. म्हणजे एखाद्या वेळेस मावशी नसल्या तरी काही अडत नाही आमचं. हे पहिल्याच भेटीत सांगणं मला योग्य वाटलं नाही म्हणून आज इथे पुन्हा तुम्हाला बोलावलं मी.” वरुण प्रियाचा अंदाज घेत म्हणाला.

थोडा वेळ शांततेत गेला. प्रिया काहीच बोलत नाही हे पाहून तो पुढे म्हणाला,”आजवर या कारणासाठी मला नऊ मुलींनी नकार दिला आणि आता नकार देणाऱ्या तुम्ही दहाव्या असाल.”
“पण मी अजून नकार दिला नाहीय तुम्हाला.”  प्रियाने संपलेला कॉफीचा मग खाली ठेवला.
“म्हणजे?” वरुणचा चेहऱ्यावर मोठे प्रश्नचिन्ह होते.
“म्हणजे..माझा होकार आहे लग्नाला.” प्रिया छान हसून म्हणाली.
“काय! काय म्हणालात तुम्ही?” वरुणला आपण काय ऐकले यावर विश्वास बसेना. त्याच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता.

“हो वरुण, माझा मनापासून होकार आहे या लग्नाला. तुमच्या आई आजारी असल्या म्हणून काय झालं? मी सारं घर सांभाळेन. अर्थात पहिल्यांदा सगळचं जमणार नाही. मदतीला तुम्ही आहात आणि मावशी आहेतच की.
एक सांगू का वरुण, मी लहानपणापासून अनाथ आश्रमात वाढले. आई बाबा अपघातात गेले, तसे मामाने  मला  आश्रमात आणून ठेवले. खरंतर तिथे राहायची माझी अजिबात इच्छा नव्हती.
पण नशिबात तेच लिहिलं होतं, त्यामुळे पर्याय नव्हता. शिवाय मामीने मला घरात राहू दिलं असतं की नाही, माहिती नाही.
नंतर मामा कधीतरी भेटायला यायचा. मात्र जसजशी मी मोठी होत गेले, तसा तो यायचा बंद झाला. कारण त्याला माझ्या लग्नाची 
जबाबदारी नको होती. 

माझी मावशीही याच शहरात असते. पण तीही आता भेटायला येत नाही. थोडक्यात माझी जबाबदारी घ्यायला कोणीही तयार नाही.
असो, पण मी तुम्हाला होकार देण्याचं कारण म्हणजे मला ही हरवलेली नाती मनापासून अनुभवायची आहेत, जपायची आहेत. या नात्यांची वीण अनुभवायची आहे.” प्रियाच्या डोळ्यांत अश्रू होते आणि उत्सुकताही होती.
“पण हे असं असेल तर तुम्हाला माझ्यापेक्षाही एखादं चांगल स्थळ मिळू शकेल ना? तिथं तुम्हाला फारसं ऍडजेस्ट करावं लागणार नाही.” वरुण आपली नाराजी लपवत म्हणाला.
“कदाचित मिळेलही. पण मला मनापासून आवडला आहात तुम्ही आणि एकदा का नाती जुळली की सगळं काही आपोआप ऍडजेस्ट होत जातं, नाही का?” प्रिया पुन्हा छान हसली.

आज प्रिया खूप सुंदर दिसत होती. खांद्यापर्यंत रुळणारे केस, कानात चेहऱ्याला शोभतील असे इअररिंग्ज, ब्लू जीन्स, त्यावर व्हाईट कुर्ती.. हे पाहून वरुण पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडला. अगदी पहिल्या भेटीत पडला होता तसाच. 
लवकरच औपचारिकता नाहीशी झाली आणि बराच वेळ दोघे बोलत राहिले.
——————————————
“आई..प्रियाने होकार दिला.” वरुण घरात आल्या आल्या आईच्या खोलीत आला.
“खरं की काय?” हे ऐकून उषाताई धडपड करत उठून बसल्या.
“तू आपल्या घरची परिस्थिती नीट समजवलीस ना तिला? काही खोटं बोलला नाहीस ना? मला हल्ली टेन्शन येतं रे.”
“नाही आई. मी का खोटं सांगेन? प्रियाला सगळं माहिती आहे आणि तरीही तिचा होकार आहे या लग्नाला. उद्या तुला भेटायला येणार आहे ती.”
वरुणच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. 

हे पाहून उषाताईंना खूप बरं वाटलं.
“गेले कित्येक महिने या दिवसाची वाट पाहत होते मी. घरात हक्काची सून येणार, मी सासू  होणार! वरुण, मला भेटायचे आहे तिला. माझी सून कशी आहे रे? 
मला डोळे भरून पाहायचे आहे तिला. ऐकलंस का सरिता? अगं, प्रियाने होकार दिला म्हणे.” उषाताई उत्साहाने बोलत राहिल्या.

लेकाचं लग्न ठरलं म्हणून उषाताई खूप आनंदात होत्या.
“आज मी धडधाकट असते ना? तर बरंच काही केलं असतं गं.” अनेक दिवसांनी उषाताईंना असे आनंदात पाहून सरिता मावशी खुश झाल्या.
“ताई, धडधाकटच आहात तुम्ही. ते डॉक्टर म्हणाले नाहीत का? तुमचं दुखणं मानसिक आहे म्हणून. आता सून येणारं म्हणून अगदी लवकर तुम्ही बऱ्या होणार आहात.”
“तसं झालं तर खूप उत्तम होईल. मला सुनेसाठी खूप काही करायचं आहे गं. तिचे लाड करायचे आहेत. दागदागिने, साड्या, तिची हौस -मौज सगळं कसं रीतिनुसार करायचं आहे. पण हे शरीर साथ देत नाहीय गं.” उषाताई नाराज होत म्हणाल्या.

“असं नाराज होऊन कसं चालेल? मी बरी होणार हा विचार मनात पक्का करा म्हणजे झालं.” सरिता उषाताईंना धीर देत म्हणाली.दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळी प्रिया घरी आली. उषाताईंनी तिला अगदी आपल्या जवळ बसवून घेतलं. प्रियाला थोडंसं अवघडल्यासारखं झालं. नव घर, नवी माणसं. शिवाय आपल्या होणाऱ्या सासुबाईंचा स्वभाव कुठे माहिती होता तिला? पण सगळ कसं छान होतं.
दोघींत मनमोकळा संवाद झाला आणि उषाताईंना आपली होणारी सून खूपच आवडली.
निघताना उषाताई तिला म्हणाल्या, “प्रिया, मला आजपासून ए आई म्हणशील? आपलं नातं कसं मनमोकळं हवं. अगदी माय –
लेकीसारखं. त्यात कपट, कटकारस्थान, वादविवाद याला जराही जागा नको.

वरुणचे वडील गेले नि सगळ्या नातेवाईकांनी आम्हाला आधार दिला. अगदी कोलमडून गेले होते मी. त्यातच हे दुखणं मागं लागलं.
हळूहळू काळानुसार सारं काही ठीक झालं. पुढे वरुणला चांगली नोकरी मिळाली. अजूनही सारे नातेवाईक नियमाने घरी येतात, प्रेमाने वागतात. 
तुला मात्र हे सारं सांभाळावं लागेल.”
“आई, एक बोलू का? मला सारी नाती हवी आहेत. अगदी मनापासून ही नाती सांभाळायचा प्रयत्न करेन मी.  नाती जपणं काय असतं? हे मला माहीतच नाही.
त्या नात्यातला गोडवा, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी सारं सारं अनुभवायचं आहे मला.” प्रियाचं बोलणं ऐकून उषाताईंना समाधान वाटलं.

थोड्या वेळाने प्रिया गेली आणि उषाताई विचार करत राहिल्या, ‘आजकाल कोणाला जबाबदारी नको असते. 
हल्ली मुलींना सासू -सासरे जवळ सुध्दा नको असतात. घरची जबाबदारी नको असते.  पण प्रियाच्या रूपाने अशी नाती जपणारी सून मिळाली हे भाग्यच म्हणायचं.’ उषाताईंनी आपल्या नातेवाईकांना फोन लावला, वरुणचे लग्न ठरल्याची बातमी सांगायला!
त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. अखेर सासू म्हणून त्यांना पद मिळणार होतं, ते नातं त्या मनापासून जगणार होत्या.
समाप्त.
©️®️सायली जोशी.
सदर कथा लेखिका सायली जोशी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखिकेची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी. कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ (नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!