©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे
आज रागिणीचा सिक्स्थ सेन्स तिला काहीतरी वेगळेच इशारे देत होता. सकाळपासुन काहीतरी अनुचित घटना घडणार आहे,असे तिला वाटत होते.ती पोलिस स्टेशनला जायला निघाली. खरं तर हा सिक्स्थ सेन्स रागिणीला स्वतःच्या प्रोफेशनमध्ये सतत निष्ठेने प्रावीण्य मिळवल्याने अवगत झाला होता.
ती मुंबईतील एक प्रख्यात पोलिस कॉन्स्टेबल होती. आपल्या क्षेत्रात आजवर तिने खूप मन लावून काम केले होते आणि गुन्हेगारांना पुरून उरणारी ती एकमेव तडफदार कॉन्स्टेबल होती. म्हणून तिचे नाव ऐकताच भल्या भल्या गुंडांना घाम फुटत असे.
तिचा प्रत्येक गुन्ह्याच्या मुळापर्यंत जाऊन दोषींना शिक्षा देण्यात हातखंडा होता.
का कुणास ठाऊक पण आज तिचा लोकल ट्रेनने प्रवास करण्याचा मूड बनला. सर्व आवरून ती निघाली.
वातावरण तसे चांगले होते. सर्व प्रवासी आपापल्या विश्वात दंग होते.कोणी फळांची टोपली व्यवस्थित करत होतं, कोणी भाजीपाल्यावर हलकेसे पाणी भिरकावून फ्रेश ठेवण्याचा प्रयत्न करत होतं, कोणी आपल्या घरातील पोरांच्या करामती सांगण्यात दंग होतं तर कोणी ऑफिसमधील गॉसिप फोनवर सांगण्यात व्यस्त होतं.
मध्येच शाळकरी मुलांच्या गाण्यांचा आवाज ट्रेनमधील वातावरण लयबद्ध करत होतं. मुंबई लोकलचं वैशिष्टयच खास. सगळे प्रकारचे लोक भेटण्याची,त्यांना जवळून न्याहाळण्याची एक पर्वणीच खरं तर.
रागिणी हे सारे वातावरण पाहून मंत्रमुग्ध झाली होती. आज शिक्षण संपल्यावर एवढ्या दिवसांनी लोकलचा प्रवास आपल्याला करावा वाटला याचे खरं तर तिला आश्चर्य वाटतच होते. सोबत आनंदही होत होता.
ते काहीही असो आज हा प्रवास एन्जॉय करायचा असे तिने मनोमन ठरवले होते कारण तिच्या महाविद्यालयीन जीवन काळात लोकल ट्रेन प्रवास म्हणजे एक अविभाज्य घटक होता. आपल्या जुन्या आठवणींत मन गुंतलेले असतानाच आपल्याला मुलुंड स्टेशनला उतरायचे आहे हे तिला लक्षात आले आणि ती भानावर आली.
अशातच १० मुलींचा एक गट ट्रेनमध्ये चढला.
एक मनुष्य त्यांना सारखे बोलत होता,’ ए इकडे तिकडे पाहू नका,सोबत रहा,नाहीतर बघा मी काय करतो ते.’
रागिणीला ते सर्व थोडं विचित्र वाटत होतं.त्यातील एक मुलगी तिच्या अगदी जवळ उभी होती.
रागिणीने ईशाऱ्याने त्या मुलीला,’ काय झाले आहे? कुठे चालले आहात तुम्ही सगळे?’ असे विचारले असता त्या मुलीने पटकन मान खाली घातली.
रागिणीला मात्र काहीतरी गडबड आहे हे आता स्पष्ट झाले होते. तिने त्या गटातील दुसऱ्या मुलीला विचारण्याचा प्रयत्न केला,पण तीही खाली बघू लागली. अशातच अजून ४ जण ट्रेनमध्ये दुसऱ्या स्टेशनवर चढले आणि असे एकूण ५ जण त्या मुलींना धाक दाखवत शांत बसा, खालीच पहा,सोबत राहा असे सांगत होते.
सर्व १० मुली खूप घाबरलेल्या,तणावग्रस्त वाटू लागल्या आणि त्यात एकही मुलगी काहीही सांगत किंवा वर बघत नसल्याने तिला काहीच कळत नव्हते.
रागीणीला शंका अशी होती की ही कदाचित शाळेतील उपक्रमाअंतर्गत असलेली क्षेत्रभेट असेल, नाहीतर मग एखादी छोटेखानी सहलही असेल. कारण हे ५ ही पुरुष शर्ट – टाय मध्ये शिक्षकासारखे भासत होते आणि प्रत्येकाच्या गळ्यात ओळखपत्र होते.परंतु त्यांची ह्या मुलींप्रती असणारी वागणूक मात्र रागिणीला खूप खटकत होती.
ती बराच वेळ वाट बघून होती त्यांच्या हालचालींची. त्यानंतर खूप स्टेशन्स गेले तरीही एकही व्यक्ती त्या ग्रुपमध्ये आला नाही, तसेच मुलीही त्याच हावभावात तिथे वावरत होत्या.
रागिणी खुप विचार करत होती, पण त्या मुलींबद्दल माहिती मिळवणे तिला अशक्य वाटत होते कारण रागिणीची ओळख तिला कोणालाही माहीत होऊ द्यायची नव्हती.
रागिणीने आपले ओळखपत्र खिशात ठेवले. तिचे मुलुंड स्टेशन आले होते तरीही ती उतरली नाही,कारण या मुलींचं प्रकरण तिला वेगळंच भासत होतं. ती जागेवरून उठली.
त्या बोगीतून बाहेर येत,हळूच दारापाशी जाऊन तिने खिशातून मोबाईल काढला आणि एक फोन घुमवला.
हळू तरीही स्पष्ट आवाजात, “ हॅलो, रानडे?”
“ येस मॅडम?”पलीकडून प्रत्युत्तर आले.
“ मला आज पोचायला थोडा उशीर होईल.”
“ ओके मॅडम.”
ठाण्यात तर तिने असे कळवले. पण आता आपल्यालाच या प्रकरणाच्या खोलात जाण्यासाठी काहीतरी करावं लागेल नाहीतर या मुलींचं काही खरं नाही असे तिला वाटले.
रागिणीने एका मुलीला हटकले आणि ती म्हणाली, “ किती गोड आहेस गं तू,नाव काय तुझं?”
तिने असे विचारताच त्या ५ जणांमधील एक व्यक्ती तिला म्हणाला, “ओ मॅडम, तुम्हाला काय करायचंय, गुपचूप स्टेशन आलं की उतरून घ्या,समजलं?”
आता मात्र रागिणीचा संशय खात्रीत बदलला. या मुलींसोबत हे लोक काहीतरी वाईट नक्कीच करणार आहेत हे तिला समजले.
काही वेळ गेल्यावर पुढे एका स्टेशनवर एक चहावाला आत आला.
त्या पाचही जणांचे लक्ष्य नाही असे पाहून रागिणीने तो चहावाला जवळ बोलवला आणि ती म्हणाली, “भैय्या एक चाय देना.”
चहावाला चहा देण्यासाठी खाली बसला तेवढ्यात तीही हळूच खाली वाकली अन् तिने त्याला हळू आवाजात सांगितले,
” या ५ ही जणांना (जे शर्ट- टाय मध्ये आहेत) काहीही करून ५ कप चहा वेगवेगळ्या कपांमध्ये पाज. बाकीच्यांना दुसरे कप दे. हे धर.( खिशातून एक पावडर काढत). त्यांच्या चहात मिक्स कर. नंतर तुला मी योग्य बक्षीस नक्की देईल.जा.”
तो चहावाला उठला. ते म्हणतात ना संकट तारण्यासाठी कुठल्या ना कुठल्या रुपात देव हजर होतो अगदी तसाच हा चहावाला अचानक इथे आला होता. गंमत म्हणजे काही तांत्रिक कारणास्तव ट्रेन इथे जरा जास्तच वेळ थांबली होती.
हातचलाखी दाखवत तो चहावाला पटकन ५ कप तयार करून त्या पाच जणांसमोर गेला.त्यातील एकासमोर चहा धरत तो म्हणाला,
“ साहेब,माझा मुलगा चांगल्या नोकरीला लागला. म्हणून फुकट चहा विकतोय आज.”
त्या ५ जणांतील एक म्हणाला,” ए आम्हाला नको चहा वगैरे. चल जा इथून.”
तेवढ्यात चहावाला म्हणाला,” अहो साहेब माझ्या मुलाच्या आनंदात सामील व्हायला एक चहा तुम्हाला जड झालाय? अन् तोबी फुकट वाटतोय मी तरीही? घ्या की लाजू नका.”
जरासे भांबवून त्याने इतर ४ जणांकडे पाहत चहा घेतला. त्याच्यामुळे बाकीच्यांनीही चहा घेतला.तो चहावाला नंतर सर्व लोकांना चहा वाटू लागला.
थोड्याच वेळात या ५ ही जणांनी खाली बसून घेतलं आणि ते सर्व झोपी गेले. त्या सर्वांची झोपेची खात्री होताच रागिणीने सर्व मुलींना सुरक्षिततेचा दिलासा देत, खरे बोलण्यास सांगितले.
तिने आपण स्वतः एक पोलिस कॉन्स्टेबल असल्याचा खुलासा करताच मुलींनी तिला सांगितले,की “ हे सर्व जण आम्हाला शाळेच्या गणवेशात ,कोणालाही संशय येऊ नये म्हणून एका व्यक्तीस विकणार होते.” ते ऐकून रागिणीचा पारा चढला.
तिने फोन लावून या पाचही जणांना पोलिस स्टेशनमध्ये नेण्याची सोय केली.
तिथे गेल्यावर शुद्धीवर येताच, पोलिसी खाक्या दाखवताच सारेच सत्य बोलण्यास तयार झाले आणि गुन्हा कबूल केला.
यांचा मेन म्होरक्या कोण आहे हे कळताच रागिणीने त्याची चांगलीच धुलाई केली.
“ तुझी मुलगी जर अशी दुसऱ्याला विकली तर कसे वाटेल तुला? “असे खडे बोल त्याला सुनावले.
तेव्हा तो चांगलाच शरमला. ते ५ जण आणि त्यांचा म्होरक्या गजाआड झाले.त्यांना कोठडीत डांबले गेले.
नंतर या सर्व मुलींना त्यांच्या घरी सुखरूप पोहचवले गेले आणि सारे काही सुरळीत झाले. या सर्वांत देवासारखा धावून आलेला चहावाला मात्र विशेष बक्षीसपात्र ठरला.
रागिणीने युक्तिवादाने प्रकरण सोडवले म्हणून तिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तीची खूप प्रशंसा केली.
तिने तिची निस्सीम भक्ती असलेल्या आपल्या स्वामींना नमन केले आणि वेळीच इशारा देण्याबाबत आभार मानले. अशा रीतीने एक चित्त थरारक रेल्वे प्रवास प्रकरण रागिणीने ‘शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ’ या पंक्ती प्रमाणे मार्गी लावले आणि निरागस लेकरांची या अंधकारमय विक्रीपासून मोठ्या शिताफीने सुटका केली.
खरंच तुम्हालाही म्हणावेसे वाटतेय का?
“रागिणी, सॅल्यूट तुझ्या या मर्दानगी हिंमतीसाठी..”
©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे.
सदर कथा लेखिका सौ. प्रियंका शिंदे बोरुडे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.