चिऊताई भुssर्र

©®सौ. प्रतिभा परांजपे.
हर्षु ला जाग आली तीच  कूंssकूंs आवाजाने. त्याने घाबरून पांघरुण डोक्यापर्यंत घेतले तरी मधून मधून बारीक बारीक  कूंsकूंsअसा आवाज येत होता.
काना वर उशी ठेवून थोड्यावेळ हर्षू पडून राहिला. पण तरीही आवाज ऐकू येतो होता.
कोsण आहे बरं ??असा विचार करत हर्षु ने पांघरूण फेकून दिलं व बाहेर आला.
एक छोटासा कुत्र्याचा पप्पी दारात थंडीने थरथरत उभा होता मधून मधून तो कूंsकूं करत होता..
‘अरे बापरे  किती गोड आहे, काळाभोर त्यावर पांढरे गोळे. भूक लागली असेल कां पप्पी ला?’ असे हर्षु च्या बाल मनात आले.

त्याने पाहिले आजी, आजोबा माॅर्निग वाॅक ला गेलेत , बाबा व आई फोन पाहत बसले आहे, काय करावे बरे ? पप्पी ला काहीतरी द्यावे असा विचार करत त्याने डब्यातून बिस्किट काढले व पप्पी ला द्यायला गेला.
हर्षु ला पाहताच पिल्लू घाबरून मागे सरकले. पण बिस्किटाच्या वासाने पुढे आले व बिस्किट खाऊ लागले.
“हर्षू बाहेर काय करतोय? ब्रश केला कां”? आईच्या आवाजाने पटकन दार लावून हर्षु घरात पळाला. 
दूध पिऊन बाहेर आला तेव्हाच आजी, आबा मॉर्निंग वाॅक करून परत आले.
‘चलाs झाडांना पाणी घालू’…. असे म्हणताच हर्षु आजोबांबरोबर बाहेर पळाला. त्याने इकडे तिकडे पाहिले पण पपी कुठेही दिसला नाही.

“चल पटपट आवर ,कपडे घाल आणी ऐक हर्षु, डबा नीट संपव बरं..”आईने शाळेचा डबा बॅगमध्ये ठेवत, हर्षु ला जोडे मोजे घालत सांगितले, ‘जा s लवकर….. बस येईलच’ म्हणताच हर्षु बस्ता, बॉटल घेऊन बाहेर पळाला.
बस स्टँड च्या वाटेत एक झाड आहे तिथं पप्पी आपल्या मम्मी कुत्री बरोबर बसलेला होता.
हर्षु ला पाहताच ते शेपूट हलवत हर्षु च्या पायात घुटमळू लागले, आता काय द्यावे ??असा विचार करत त्याने बॅगमध्ये हात घातला. हाताला टिफिन लागला त्यातून अर्धी पोळी काढून त्याने पपी ला दिली तेवढ्यात –बस चा हार्न ऐकू आला तशी धावत बस कडे गेला.
एक दिवस,–  हर्षू चा टिफीन रिकामा पाहून आई म्हणाली ‘अरे वाs हर्षु आज काल  टिफीन एकदम फिनिश असतो’

‘अग मोठा होतोय भूक लागत असेल ना…’  आजी म्हणाली. “उद्यापासून एक पोळी अजून ठेवत जा’.
पण एक दिवस पप्पी त्याच्या मागे मागे घरी आला तेव्हा हर्षु ला त्याला पोळी देताना आईने पाहिले.
‘अच्छा !म्हणून  टिफीन रिकामा होतो तर?’
‘अग आई .……पप्पी ची मम्मी ना त्याला दूध नाही पाजत…. तो जवळ गेला ना की त्याला चावते. मग मला त्याची दया येते. खूप दुष्ट आहे त्याची आई. आपण त्याला पाळायचे का बाबा?’ मी त्याला दूध पोळी देईन, गळ्यात पट्टा बांधुन रोज सकाळी फिरायला नेईन.
‘नाही हर्षू…. मला नाही चालणार …….आणि घरात जागा कुठे आहे त्याच्यासाठी??. आई रागात म्हणाली,. आणि कुत्र चावल की इंजेक्शन घ्यावे लागते… ! त्याला सुद्धा इंजेक्शन्स  द्यावे लागतात, काय ?’

इंजेक्शनचे नांव ऐकताच हर्षु घाबरला.  त्याला आठवलं मागे त्याच्या फ्रेंड राजूला कुत्रा चावला होता तेव्हा त्याला इंजेक्शन्स घ्यावे लागले होते .
थंडीचे दिवस असल्याने शाळांचे टाइमिंग बदलले. हर्षु ची शाळा आता नऊ वाजता लागेल.  जास्त झोपायला मिळणार याचा आनंद होताच पण मग पप्पी ला पोळी कोण देईल ही पण चिंता मनात वाटायला लागली, 
हर्षु ने आपला जुना टॉवेल शोधून बॅगमध्ये ठेवून घेतला, पप्पी ला थंडी वाजेल म्हणून , शाळेत जाताना पप्पी च्या अंगावर पांघरून दिला. 
शाळेतून परत येताना पप्पी त्याला दिसला नाही असेल इकडे तिकडे म्हणून झाडाखाली पोळी ठेवून हर्षु घरी आला ‌.
दोन दिवस झाले पप्पी कुठे दिसत नाही, तसं हर्षु च मन उदास झाले.

‘काय हर्षु काय झाले??’
‘बाबा माझा पप्पी दिसत नाहीये दोन दिवसापासून.’ मला त्याची आठवण येते आहे.
‘अरे कोणी घेऊन गेला असेल’ 
‘पण त्याची आई तर इथेच आहे. त्याला भिती वाटेल.’
संध्याकाळी हर्षु चे काका काकू आले. काय  हर्षू चालतो तिकडे रहायला? आणि हर्षु त्यांच्याबरोबर काका काकूंकडे राहायला गेला. त्याची चुलत बहीण चिंगी, दोन वर्षांनी मोठी तिच्याबरोबर त्याचे छान पटायचे.
चिंगीचा एक फ्रेंड आहे रौनक, त्यांच्याकडे पोपट पाळलेला आहे. आता हर्षू चा बराच वेळ पोपटाच्या  गमती पहाण्यात जात असे,‌… काय खातो?….. कसा बोलतो? रौनक चा पोपट त्यांच्या हातानी मिरची,पेरु खातो.

आपण ही पोपटच पाळूया, मग  तो पोपट ही आपल्या हातावर बसेल. असे ठरवून हर्षु घरी परत आला.
‘बाबा आपण पोपट पाळूया कां?? रौनकच्या घरी आहे तसा, तो खूप छान बोलतो, पेरू, मिरची खातो.’ आणि मिठ्ठू बोलतो पण , शिट्टी पण वाजवतो.’
‘बरं बरं…. पाहू, …. रविवारच्या बाजारातून पिंजरा आणावा लागेल आधी.’
संध्याकाळी चिंगीचा फोन आला,…..’अरे रौनक चा मिठ्ठू पळून गेला!!”…आं ssकसा ग ?’
‘अरे, पिंजर्‍याचे दार उघडं राहिलं ना ,मग खूप शोधला,…. पण बाबा म्हणतात  येऊ शकतो परत.’
झालं….हर्षु  उदास झाला.

‘आजी परत येतो का ग मिठ्ठू?’
‘अरे, त्याला पिंजर्‍यात राहून राहून, बाहेरच खायची सवय राहत नाही. मग भूक लागली कि येऊ शकतो पण असे  पोपट कधीकधी नाही जगत बाहेरच्या उघड्या जगात.’
शाळेमध्ये  हर्षु चे मन लागत नव्हते. आज शनिवार असल्याने बाल सभा होती.
त्या दिवशी मॅडमनी बाल सभेत  गोष्ट सांगितली आणि मग सांगितले कि सर्कशीत प्राणी कसे ठेवतात, व त्यांना चाबकाच्या धाकाने कसे शिकवतात.
शेवटी मॉरल म्हणून सांगितले कि प्राणी व पक्षी यांना पिंजऱ्यात कोंडू नये.त्यांना नेचर मधे रहायला मोकळे सोडावे. आपल्याला जर कोणी पिंजऱ्यामध्ये कोंडून ठेवले तर आपल्याला कसे वाटेल ?

रात्री झोपताना बाबा म्हणाले” हर्षु उद्या आपण पिंजरा आणू हं तुला पोपट पाळायचा आहे न?”
पण हर्षू ने फारसा उत्साह नाही दाखवला.
रात्री मध्येच हर्षु ला जाग आली, तेव्हा खूप भीती वाटत होती ह्रदयात धडधडत होते.. स्वप्नात त्याला एक मोठा पिंजरा दिसला त्यात हर्षु बसला होता पिंजर्‍याचे दार बंद होते बाहेर एक दुष्ट माणूस दांडा घेऊन बसला होता.
हर्षु ला खूप भूक लागली होती,… तर तो माणूस, एक सुकी पोळी आणि तिखट भाजी व एक भांडे पाणी देऊन निघून गेला. दिवसभर पिंजऱ्यात बसून हर्षु थकून व कंटाळून गेला.       
संध्याकाळी तो माणूस आल्यावर हर्षु ने मला सोडून दे म्हणताच तो मोठ्या मोठ्याने हसायला लागला व त्याने  गार पाणी  पिंजऱ्या वर ओतले. हर्षु घाबरून जोरजोरात रडायला लागला.

जाग आली  जवळच आई झोपलेली होती तो आईला जाऊन घट्ट बिलगला. मला नाही पिंजऱ्यात रहायचे असे बडबडू लागला
सकाळी बाबा बाजारात जायला निघाले, ‘हर्षु चलायचं पोपट आणि पिंजरा घ्यायला?’
 ‘नको बाबा, मला प्राणी,  पक्षी पिंजऱ्यात नाही ठेवायचं….. पोपटाला त्याचा खूप त्रास होतो पिंजऱ्यात, आमच्या मॅडमनी सांगितले कि पक्ष्यांना त्यांच्या मनाप्रमाणे उडू द्यावे, पिंजऱ्यात कोंडू  नाही.
‘हो हे बाकी खर आहे.’ मग काय हवं आहे?
तेवढ्यात आजोबांनी  आवाज दिला, ‘हर्षु, बघ पेरूच्या झाडावर चिमणीने घरटं बांधलय .आपण चिमण्यांसाठी दाणे आणि पाण्यासाठी मातीची भांडी ठेवूया कां?’
‘हो आबा, त्या खूप खुश होतील दाणा पाणी पाहून.  आपण रोज दाणा पाणी ठेवू’ असे म्हणत आनंदाने उडी मारून हर्षु बागेत धावत आला . 
इळी मिळिची गोष्ट सरो,
तुमचे आमचे पोट भरो !
समाप्त
©®सौ. प्रतिभा परांजपे
सदर कथा लेखिका सौ. प्रतिभा परांजपे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!