परिवर्तन

©️®️ सौ.हेमा पाटील.
“सरिता..ऐ सरिता ! कुठल्या विचारात एवढी हरवली आहेस”?
सरिताने भानावर येत स्वतःला सावरले, “अगं काही नाही गं असंच”…
“नाही.काहीतरी मेजर आहे..गेले चारपाच दिवस मी पहातेय तुझे काहीतरी बिनसलेय.मिलिंदमध्ये अन् तुझ्यात काही वाद झाला आहे का? मी बोलू का मिलिंदशी”?
“नाही गं..तसं काहीच नाही.जरा माझीच तब्येत बरी नाही”.
“काय गुड न्यूज देतेयस की काय”…
यावर काहीच न बोलता सरिता कसनुसं हसली.दोघीही वेळ झाल्याने आपापले लेक्चर घेण्यासाठी आपापल्या क्लासरुमकडे गेल्या आणि तो विषय तेवढ्यावरच थांबला म्हणून सरिताला हायसे वाटले.

सरिता शहरातील एका नामांकित काॅलेजमध्ये मराठीची प्राध्यापिका होती.
मिलिंदचे व तिचे ॲरेंज मॅरेज होते.सुशिक्षित अन् वेलसेटल्ड फॅमिली असल्याने व मिलिंद एका मल्टीनॅशनल कंपनीत मॅनेजरच्या हुद्यावर असल्याने सरिताच्या कुटुंबातील सर्वांनी या स्थळाला पसंती दर्शवली होती.
लग्नानंतर त्याच शहरात रहाणार असल्याने ती ही आनंदी होती. काही काळातच तिने मिलिंदच्या घरी गृहलक्ष्मीच्या रुपात गृहप्रवेश केला होता.
नवीन घरी आल्यावर सर्वांनी तिचे प्रेमाने स्वागत केले.सर्वांच्या आपुलकीमुळे तिला आपण सासरी आलो आहोत असे वाटलेच नाही. हसतखेळत, चेष्टामस्करीत एक वर्ष कसे निघून गेले सरिताला समजलेच नाही.

मिलिंदही मनमिळाऊ होता.घरातील सर्वजणच तिची खूप काळजी घेत.दर रविवारी नाटक सिनेमा किंवा एखादा सांस्कृतिक कार्यक्रम ठरलेलाच असायचा.शाॅपिंग हा महिलांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय.. महिन्यातून एकदातरी सासू सुना आणि मिलिंदची एकुलती एक लाडकी बहिण रेवा शाॅपिंगसाठी बाहेर पडायच्या.
कधी किचनमधील खरेदी असायची, कधी वैयक्तिक खरेदी असायची. पण परत आल्यावर तिघींची चिवचिव ऐकून घरात चैतन्य पसरायचे. असे हसतखेळत दिवस चालले असतानाच तिला दिवस गेल्याची जाणीव झाली.
ही गोड बातमी तिने सर्वात आधी मिलिंदला सांगितली.मिलिंदला खूप आनंद झाला.त्याने तिला उचलून आपल्या कवेत घेतले व गोल फिरवले.”अरे अरे असे काय करतोस?आता असा धसमुसळेपणा अजिबात करायचा नाही”.असे सरिता म्हणाली.

त्याने हे ऐकून हळूच तिला बेडवर ठेवले व तिच्या शेजारी बसला. दोघेजण भविष्याच्या स्वप्नरंजनात बुडून गेले.आपण दोघे अन् आपले मात्र एकच अपत्य असेल असे दोघांनी ठरवले. कारण दोघेही नोकरी करत असल्याने दोन मुलांची जबाबदारी म्हणजे तारेवरची कसरत आहे हे ते दोघे जाणून होते.
दोघांनी मिळून घरात ही गोड बातमी सांगितली आणि सगळ्यांना खूप आनंद झाला. सासूबाईंनी देवाजवळ साखर ठेवली.आता स्वतः ची व्यवस्थितपणे काळजी घ्यायची असे सासुबाईंनी बजावले.
बोलण्याच्या ओघात तिने सासुबाईंना त्या दोघांनी एकाच अपत्याला जन्म द्यायचा असे ठरवल्याचे सांगितले.ते ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले, पण त्या काहीच बोलल्या नाहीत.

रात्री आपले पतीदेव वसंतरावांपाशी त्यांनी या गोड गुपित सांगण्याबरोबरच त्या दोघांनी एकाच अपत्य जन्माला घालण्याचा निर्णय घेतला असल्याचेही सांगितले.
हे ऐकून वसंतराव म्हणाले, “आणि मुलगी झाली तर”? हे ऐकून सुमित्राबाईंनी वसंतरावांकडे पाहिले, पण त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. यावर वसंतरावच पुढे म्हणाले,” त्यांना एकच अपत्य हवे असेल तर तो त्यांचा निर्णय आपल्याला मान्य आहे..पण ते अपत्य मुलगा असावा हा माझा आग्रह आहे कारण आपल्या घराण्याला कुलदिपक हवा. मुली वाईट असतात असे मला म्हणायचे नाही, पण मुली लग्न होऊन आपल्या घरी गेल्या की तिकडच्याच होतात. मुलगाच खऱ्या अर्थाने आपला वंश पुढे नेतो. त्यामुळे तुम्ही याबाबतीत आपल्या चिरंजीवाशी बोला”.
सुमित्रा बाई म्हणाल्या,” अहो, असे काय करता? लिंगतपासणीवर कायद्याने बंदी घातली आहे ना”?

“हे तुम्ही मला सांगू नका. फक्त चिरंजीवाशी बोलून घ्या,बाकीची व्यवस्था मी पहातो”.
वसंतरावांचे बोलणे ऐकून आता मिलिंदशी या विषयावर कसे बोलायचे या विचारात सुमित्रा बाई गढून गेल्या.
सुमित्राबाई आधुनिक विचारसरणीच्या होत्या, तरीही पतीचे बोलणे ऐकून ते बरोबर आहे असेच त्यांना वाटले.आजवर कायमच वसंतरावांच्या हाताला हात लावून मम म्हणणे हेच त्या करत आल्या होत्या.
स्वत:ची निर्णयक्षमता त्यांच्यापाशी नव्हती किंवा आजवर त्यांनी कधीच वेगळा विचार केला नव्हता. त्यामुळे आत्ताही पतीच्या विचाराला त्यांनी नकळत अनुमोदन दिले.
मिलिंद एकटा असताना सुमित्रा बाईंनी त्याच्याजवळ हा विषय काढला.

सुरवातीला तर मिलिंद चांगलाच चिडला. मी याला तयार नाही असेच तो म्हणाला. पण वडिलांनी सांगितलेले सगळे त्या त्याच्याशी बोलल्या व म्हणाल्या,” आततायीपणा करु नकोस.चार दिवस शांतपणे विचार कर आणि मग मला सांग”. 
यावर मिलिंद काहीच बोलला नाही.
रात्री त्यांच्या बेडरुममध्ये तो अस्वस्थ आहे हे सरिताच्या लक्षात आले.
तिने मिलिंदला विचारले,”की काय झाले आहे”? यावर जे घडले ते सगळे मिलिंदने सरिताला सांगितले.ते ऐकून सरिता विचारात पडली. आपण कितीही शिकलो तरीही मुलगा मुलगी हा भेद विसरू शकत नाही ही शोकांतिका आहे हे तिच्या लक्षात आले.ती मिलिंदला म्हणाली,” आईंनी चार दिवस वेळ दिलाय ना? काहीतरी पर्याय निश्चितच निघेल. मला फक्त तुझे मत जाणून घ्यायचे आहे. तुझेही मत असेच आहे का”?

यावर मिलिंद म्हणाला,” नाही.मला मुलगा असो वा मुलगी काहीही फरक पडणार नाही.त्यासाठी लिंगचाचणी करुन मुलगी असेल तर तिची गर्भातच हत्या करणे अतिशय क्रूरपणाचे आहे असे माझे मत आहे”.
“मग झाले तर..यावर आपले दोघांचे एकमत आहे ना? मग यावर काय मार्ग काढायचा ते आपण शांतपणे विचार करुन ठरवू.आता जरा हस बघू.बाळाला आवडणार नाही त्याच्या बाबांना असे चिंताक्रांत अवस्थेत पहायला”….
हे ऐकून मिलिंद मनापासून हसला व तिच्या पोटावर हात ठेवून म्हणाला,”तू कुणीही अस..मला खूप प्रिय आहेस”.असे म्हणताना त्याच्या डोळ्यात पाणी आले. त्याचे डोळे पुसताना सरिताने त्याच्या गालावर आपले ओठ टेकवले.
तिला आपल्या मिठीत घेत मिलिंदने आवेगाने आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवत, “जाऊदेत. तो विषय आता बंद कर”.असे हळूच सुचवले. “अच्छा, मग कुठला विषय सुरु करायचा आहे आता बाबांना”? यावर तिच्या डोळ्यांत पहात त्याने मिश्कीलपणे डोळे मिचकावले…

हे सगळे सरिताला याक्षणी आठवले.
गेले चार दिवस ती याविषयी गंभीरपणे विचार करत होती.तिचे सासरे वसंतराव हे प्रतिष्ठित व्यावसायिक असून सामाजिक कार्यातही कार्यरत असत.अनेक सेवाभावी संस्थांचे कार्यकर्ते कामानिमित्त नेहमी त्यांना भेटण्यासाठी घरी येत असत तेव्हा त्यांची चाललेली चर्चा तिच्या कानावर सहजच पडत असे.
त्यावरुन अनेक अनाथआश्रमांना आपले सासरे आर्थिक मदत करत असतात तसेच शहरातील वृद्धाश्रमात दर सहा महिन्यांनी ते शहरातील नामवंत डॉक्टरांचा कॅंप आयोजित करतात हे तिला माहीत होते.
अर्थातच आपल्या सासऱ्यांबद्दल तिला आदर होता. पण आत्ता त्यांनी धरलेला मुलासाठीचा हट्ट तिला मानवत नव्हता. बाहेरच्या जगात वावरताना वेगळा न्याय आणि घरासाठी वेगळा न्याय हे तिच्या पचनी पडत नव्हते.त्यामुळेच ती गोंधळून गेली होती.

गेले वर्षभर या घरी लग्न होऊन आल्यापासून सर्वांनी तिला ज्या प्रेमाने आणि ममतेने सामावून घेतले होते ते पहाता आपण या घरातील मुलगीच आहोत असेच तिला वाटायचे.आणि मिलिंदच्या बहिणीला कधी या घरात मुलगी आहे म्हणून दुय्यम वागणूक दिली जाते असेही तिच्या कधी निदर्शनास आले नव्हते. मग सासरे मुलाचा हट्ट का धरतायत हे तिला समजत नव्हते.
आज काॅलेज सुटल्यावर आईकडे जाऊया..तिला फोनवर ही गोड बातमी सांगितली तेव्हा तिने घरी येऊन जा असे सांगितले आहे. तिला भेटणेही होईल आणि या विषयावर चर्चेतून काही तोडगा निघाला तर पाहू असा विचार करून तिने सकाळी सासुबाईंना सांगितले की, “दुपारी काॅलेजमधून मी आईकडे जाणार आहे. आज रात्री तिथेच राहीन.चालेल ना”?
यावर सुमित्रा ताई म्हणाल्या,” अगं अवश्य जा.नोकरीमुळे शहरातच माहेर असूनही तुला कुठे जाता येते? तुला जास्त दिवस रहायचे असेल तरी रहा. अशावेळी आईजवळ जावेसे वाटते”.

मिलिंदला सांगून ती बाहेर पडली.आता तिने स्कुटी चालवणे बंद करावे असे रात्रीच मिलिंद म्हणाला.”त्याऐवजी तू फोर व्हीलर घेऊन जात जा” असे त्याने सांगितले. पण आज ती स्कुटी वरुनच निघाली.
आईला फोन करून आज ती घरी येतेय हे सांगितले.
आईला खूप आनंद झाला आहे हे तिच्या फोनवर बोलतानाच्या आवाजानेच तिला समजले आणि कधी एकदा आईच्या कुशीत शिरते असे तिला झाले,पण आठ तास तरी तिला वाट पहावी लागणार होती…
दुपारी ती जेव्हा माहेरच्या घरी पोहोचली तेव्हा आई तिची वाट पाहत बाहेरच येरझारा घालत होती. ती आईला रागावली,” एवढ्या उन्हात बाहेर कशासाठी वाट पहात थांबली आहेस? तू बाहेर थांबलीस म्हणून काय मी लवकर येणार होते का”?

हे ऐकून आई हसली व म्हणाली,”बरं! समजेल आता तुला ही लवकरच”…
यावर ती आईच्या कुशीत शिरली.
आईनेही प्रेमाने तिला जवळ घेतले व “बबडे, कशी आहेस”असे प्रेमाने ओथंबलेल्या स्वरात विचारले. ती फक्त हसली.आत जाऊन ती फ्रेश झाली व घरातील कपडे घालून किचनमध्ये गेली तर आईने गरमागरम शिऱ्याची प्लेट तिच्या हातात दिली.
तिने त्याचा सुवास घेतला आणि एक घास तोंडात टाकला. साजुक तुपात केळे परतून लवंग व वेलदोडे घालून केलेल्या आईच्या हातच्या शिऱ्याची तीच चव तिच्या तोंडातून तिच्या मुखावर तरळली आणि ते पाहून आईला समाधान वाटले.
“आई खूप छान झाला आहे शिरा…अगदी तस्साच..मला आवडतो तस्सा” ! यावर आई फक्त हसली.
मग बाबा आले, दादा आला आणि तिचा चिवचिवाट सुरू झाला.

आपल्यापुढील प्राॅब्लेम ती विसरुन इथल्या वातावरणात रमून गेली. गप्पा मारण्यात वेळ कसा गेला तिला समजले ही नाही. दरम्यान मिलिंदने घरी पोहोचल्यावर तिला फोन केला व ती नसल्याने घरात करमेना अशी लाडीक तक्रार केली.
“पण आजचा दिवस तू तुझ्या मर्जीने एंजॉय कर, उद्या येतेयच मी” असे म्हणून तिने फोन ठेवला.
फोन ठेवल्यावर तिच्या मनात पुन्हा विचार घोंगावू लागले.आई जेवायला चला सांगायला आली तेव्हा तिचा विचारमग्न चेहरा पाहून तिने विचारले,”बबडे..काय झाले गं? इतका कसला विचार करतेयस? काही अडचण आहे का”?
“नाही गं! विशेष काही नाही.रात्री बोलू.चल जेवायला”…
हसतखेळत जेवणे पार पडली.आईने तिच्या आवडीची बासुंदी केली होती.सोबत बटाट्याची भजी, फ्लाॅवर मटारची रस्साभाजी आणि मसालेभात.. खूप दिवसांनी आईच्या हातचे जेवून ती तृप्त झाली. सुमित्राताईही सुगरण होत्या.पण बालपणापासून आईच्या हातच्या चवीची सवय अजून सुटली नव्हती एवढेच!

बाहेर सोफ्यावर बाबा, दादा सोबत अवांतर गप्पा सुरू असतानाच आतले आवरुन आई बाहेर आली.आई आल्यावर मात्र सरिताने थेट विषयालाच हात घातला.
सगळे ऐकल्यावर आई व बाबांनी एकमेकांकडे पाहिले.यावर काय सोल्युशन काढावे हे पटकन त्यांच्या लक्षात आले नाही.यावर दादाने विचारले,”बाबा, असाच प्रसंग माझ्या बाबतीत घडला तर तुमचा काय निर्णय असेल? तुम्ही ही भावोजींच्या पप्पांसारखाच विचार कराल का”?
यावर बाबा म्हणाले,” मुळात आपल्याला मुले किती हवीत हा निर्णय सर्वस्वी तुमचाच असेल.आणि त्याचे सगळे परिणामही तुम्हालाच भोगावे लागतील, त्यामुळे तुमच्या निर्णयात मी ढवळाढवळ करुच शकत नाही “.

“बाबा, माझे सासरे ही एक अपत्य असावे या आमच्या निर्णयात ढवळाढवळ करत नाहीत… फक्त ते अपत्य काय असावे याबाबत ते आग्रही आहेत”.
“असू नये..याबाबतही त्यांनी आग्रही असू नये.तुमचा निर्णय तुम्ही घेतला आहे.कुटुंबाला वारस मुलगाच हवा हा विचार मनातून दूर सारला पाहिजे”.
“बाबा मला पटतेय…पण पिढ्यानपिढ्या चालत आलेली मानसिकता अशी बदलत नाही.त्यांचे समाजकार्य,त्यांचे समाजातील प्रतिष्ठित स्थान हे पाहता त्यांच्या मनात असा काही विचार येईल असे मलाच काय मिलिंदलाही वाटले नव्हते.पण त्यांना न दुखावता यावर सोल्युशन काढायचेय मला ! बघा तुम्ही काही मदत करु शकता का”?

यावर तो विषय तिथेच थांबला. इतर गप्पा रंगल्या.
थोड्यावेळाने दादा म्हणाला,” मला एक कल्पना सुचली आहे. बाबांचा साठावा वाढदिवस पुढच्या आठवड्यात येतोय. तो आपण अनाथाश्रमात साजरा करुयात का? तुमच्या सगळ्या कुटुंबाला बोलावू या.
तिथे मुलगा मुलगी भेद करु नये असे सहजपणे बोलता बोलता परक्या कुणी सांगितले तर ? माझ्या एका डाॅक्टर मित्राला मी बोलावतो. बाबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुलांची शारीरिक तपासणी करण्यासाठी त्याला बोलावले आहे असे सांगता येईल म्हणजे आपण हे मुद्दाम करतोय असे त्यांना वाटणार नाही. ते ऐकून आणि त्याचवेळी त्या अनाथ मुलांना भेटल्याने कदाचित त्यांचे विचार परिवर्तन होईल”.
हे ऐकून सरिता विचारात पडली.तसे तर वसंतराव अधूनमधून अनाथाश्रमात देणग्या देतच असतात. पण अशा पद्धतीने विषय त्यांच्यासमोर मांडला गेला तर कदाचित ते पुनर्विचार करतील असे तिला वाटले. दुसरा कुठला पर्याय तिला दिसत नसल्याने तिने याला होकार दर्शवला.

वाढदिवसाच्या आदल्या दिवशी सर्वांना आमंत्रण देण्यासाठी दादा स्वतः जातीने सरिताच्या सासरी आला.सर्वांनी उद्या संध्याकाळी नक्की यायचेय असे आमंत्रण देऊन तो गेला.
दुसऱ्या दिवशी सरितासह सासरचे सगळे कुटुंबीय कार्यक्रम स्थळी पोहोचले. तेथील व्यवस्थापकांनी वसंतरावांना सन्मानपूर्वक नमस्कार करून त्यांना संपूर्ण आश्रमातून जातीने फिरवून आणले.
कार्यक्रम सुरु झाला. सर्वांनी बाबांचे औक्षण केले. अनाथाश्रमातील मुलांसाठी मोठा तीन लेयरचा केक आणला होता. तो कापला आणि मुलांसाठी आणलेला खाऊ व केकच्या डिशेस सर्वांना देण्यात आल्या.
डाॅक्टरसाहेब आलेच होते..मुलांचे खाऊन झाल्यावर मुले खेळायला गेली.उपस्थित पाहुणे व मित्रमंडळी आणि अनाथाश्रमाचे कामगार व व्यवस्थापक यांच्या गप्पा रंगल्या.

बोलण्याच्या ओघात व्यवस्थापकांनी सांगितले की,अनाथाश्रमात आणून सोडणाऱ्यांत मुलींची संख्या लक्षणीय आहे.तो मुद्दा पकडून डाॅक्टरसाहेबांनी सांगितले की, आजही मुलगा मुलगी भेद संपलेला नाही. चोरुन काही ठिकाणी आजही भरमसाठ पैसे घेऊन ही चाचणी केली जाते व मुलगी असल्यास गर्भपात केला जातो ही शोकांतिका आहे. खरं तर मुलगा मुलगी समानच आहेत.आजकाल मुलीच सगळ्या क्षेत्रात अग्रेसर आहेत असेच दिसते”.
यावर न राहवून वसंतरावांनी विचारलेच, “पण मुली सासरी निघून गेल्यावर काय? आईवडिलांकडे कोण पहाणार? यासाठीच मुलगा हवा”.
“माफ करा..पण विचार करा,आपण यात स्वार्थी विचार करतोय असे तुम्हाला वाटत नाही का? केवळ आपल्याकडे लक्ष देण्यासाठी, आपली म्हातारपणाची काठी व्हावी म्हणून आपण मुलींची गर्भातच हत्या करणे योग्य आहे का? आणि भविष्यात तो मुलगा चांगला निघेलच, तुमची काळजी घेईलच याची काय शाश्वती? मी आपणांस ओळखतो. आपणांस अनेकदा मी वृद्धाश्रमात पाहिले आहे. मी तपासणीसाठी जातो तेव्हा तुम्ही त्या वृद्धांशी गप्पा मारायला आलेले मी पाहिले आहे”.

“हो..त्या बिचाऱ्यांना मुलांनी वृद्धाश्रमात आणून टाकल्याने ते एकाकी झालेले आहेत. थोडा वेळ त्यांच्यासोबत काढला तर त्यांना बरे वाटते म्हणून जातो मी”…
“बघा..यातच उत्तर दडले आहे. मुलगा आईवडिलांची अडचण होते किंवा मते पटत नाहीत म्हणून त्यांची रवानगी वृद्धाश्रमात करतात. खरं सांगू याबाबत माझे मत असे आहे की आई वडील होण्यातील आनंद उपभोगण्यासाठी मूल होऊ द्यावे. मग तो मुलगा आहे की मुलगी याने फरक पडत नाही, फक्त आपण मुलांवर चांगले स़ंस्कार करण्यात कमी पडू नये. आपले मूल एक उत्तम माणूस बनले पाहिजे एवढीच अपेक्षा पालकांनी ठेवावी. आपल्या म्हातारपणाची सोय आपले आर्थिक नियोजन योग्य प्रकारे करुन आपली आपणच करुन ठेवावी”.
यानंतर वसंतराव काहीच बोलले नाहीत पण ते विचारात हरवून गेले होते हे नक्की!

घरी परतताना ते शांत शांतच होते. रात्रीही ते घरी गेल्यावर थेट आपल्या रुममध्ये गेले. सरिता काळजीत पडली. हे आपण ठरवून केलेय हे त्यांना समजले तर नसेल ना या विचाराने ती अस्वस्थ झाली.
दुसऱ्या दिवशी सकाळी किचनमध्ये डबा बनवत असताना सुमित्रा ताई तिला म्हणाल्या,”यांनी आपला विचार बदलला आहे बरं का! तुमचा निर्णय त्यांनी पूर्णपणे स्विकारलाय. लिंगतपासणी करायची आवश्यकता नाही असे त्यांनी सांगितले आहे”…
हे ऐकून सरिताला खूप आनंद झाला.
ही बातमी मिलिंदला सांगण्यासाठी ती बेडरुममध्ये आली.मिलिंदला हे सांगितल्यावर त्यालाही आनंद झाला. वडिलांना न दुखावता यातून तोडगा निघाला याचे त्याला बरे वाटले. दादाला “thanks” एवढाच मेसेज तिने केला..वेळ मिळाल्यावर निवांतपणे ती आभार मानणारच होती..कारण कुटुंबात मनभेद होणे टळले होते हे तिच्यासाठी खूप महत्त्वाचे होते..आता येणाऱ्या बाळाला सगळेजण आनंदाने स्वीकारतील या कल्पनेने ती खुश झाली होती.
इति हेमा उवाच
©️®️ सौ.हेमा पाटील.

सदर कथा लेखिका सौ.हेमा पाटील यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखिकेची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी. कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ ( नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!