©® धनश्री दाबके.
लेक्चरमधून बाहेर पडल्यावर मीताने बॅगमधून मोबाईल बाहेर काढला. बघते तर नंदा आजीचे चार चार कॉल्स येऊन गेलेले. इतके कॉल्स.. काय झालं असावं? काहीतरी मेजर गोंधळ झाला असेल.. नाहीतर नंदा आजी इतके कॉल्स करणार नाही..मीच तर नाही ना काही माती खाल्ली.. गेल्या वेळेसारखा परत नळ तर चालू नसेल राहिला माझ्याकडून?
मीताने घाईघाईने फोन लावला पण नंदा आजी फोन उचलेना.
अरे अशी काय ही? आता काय करू?”ए मीता.. चल ना .. का थांबलीस? अगं पंधरा मिनिटात पोचायचंय आपल्याला नाहीतर स्टार्ट चुकेल..चल चल..” म्हणत प्रिया मीताचा हात ओढत म्हणाली..
“अगं हो हो.. जाऊ या ग.. पण जरा थांब ना.. ही नंदा आजी फोन उचलत नाहीये..” परत फोन लावत मीता म्हणाली.
ते ऐकून प्रिया तडकलीच..”आली का तुझी नंदा आजी ! जाऊ दे मला काही बोलायचंच नाही.. जेव्हा बघावं तेव्हा नंदा आजी, नंदा आजी करत असते..ए चला ग आपण जाऊ.. ही येईल हिच्या आजी बरोबर..”
प्रियाचं बोलणं ऐकून सगळ्याच हसायला लागल्या आणि मीताला ‘चालू चालू दे तुझं’ म्हणून पुढे निघाल्या.
आज मीताचा मैत्रीणींबरोबर मूव्ही नाईटचा प्लॅन होता. आधी ऋतिकचा नविन मूव्ही बघायचा, मग जवळच्याच डीमार्टला जाऊन घरातल्या सामानाची खरेदी करायची व त्यानंतर प्रियाच्या रूमवर जाऊन पिझा पार्टी करून उद्या सुट्टी असल्याने तिथेच ताणून द्यायची. सकाळी निवांत उठून आपल्या घरी जायचं असं ठरलं होतं.
पण नंदा आजी फोन उचलत नाही म्हंटल्यावर मीताला कळेना मूव्हीला जावं की सरळ घरी जावं..
शेवटी नंदा आजीबद्दल वाटणारी ओढ ऋतिकवरच्या प्रेमापेक्षा वरचढ ठरली आणि ‘मी तुम्हाला मूव्हीनंतर भेटते ग’ असा मेसेज गृपवर टाकून मीताने घरी जाण्याकरता रिक्षा पकडली..
संध्याकाळची वेळ असल्याने रस्ते ट्रॅफिकने फुलून गेले होते.. सगळेच आपापल्या घरट्याकडे निघाले होते. आता पोचायला किती वेळ लागणार कोण जाणे या वैतागातच मीता रिक्षात बसली.
परत एकदा फोन ट्राय केला पण नंदा आजीने उचलला नाही. मग मीताला काळजी वाटायला लागली. आजी ठीक असेल ना ??
तिला तिची आणि नंदा आजीची पहिली भेट आठवली.
त्या दिवशी सकाळपासूनच मीताचं डोकं जड झालं होतं. ओटीपोटात आणि कंबरेत कळाही सुरू झाल्या होत्या. हिलाही नेमकं आजच यायचं होतं. घरी असते तर आई आणि आजीला सळो की पळो करून सोडलं असतं पण इथे कोण आहे आपले नखरे सहन करायला? इतकी मोठ्ठी फी भरून बाबांनी इथे शिकायला पाठवलंय, तेव्हा दर महिन्यात असं दोन दिवस कॉलेज बूडवून चालणार नाहीये. मीता बाई चला उठा आता आणि कामाला लागा.
आज आराम कर म्हणत स्वतःचे लाड करून घ्यायला सोकावलेल्या मनाला ताळ्यावर आणत मीता कॉलेजला गेली.
डोकं आणि कंबर दोन्ही दुखतच होतं. काही खायची इच्छाही नव्हती त्यामुळे दिवसभर तशीच फक्त चहा कॉफीवर राहिली आणि डोकं अजूनच चढलं.
संध्याकाळी घरी आली तर सोसायटीच्या बागेतल्या बेंचवर शेजारच्या फ्लॅटमधे राहणारी नंदा आजी बसलेली तिला दिसली.
ती नेहमीप्रमाणे मीताकडे बघून हसली पण मीताला नेहमीप्रमाणेच तिची दखलही घ्यावीशी वाटली नाही. उगीच आजूबाजूच्यांशी बोलायला जाऊ नकोस हा मैत्रीणींचा आणि आईचाही सल्ला मीताच्या डोक्यात फिट्ट बसला होता.
पण मीताची नसली तरी नंदा आजी शेवटी आजी होती. मीताची तब्येत ठीक नाहीये हे तिच्या अनुभवी नजरेने क्षणार्धात ओळखलं. जाऊन या मुलीची विचारपूस करावी, गरम काहीतरी खायला घालावं. आईवडलांपासून लांब राहाणारी एकटी पोर.. नंदा आजीच्या मनात माया दाटून आली पण लगेच लेकाचे शब्द आठवले.
“हे बघ आई, शेजारच्या अमितचा फोन आला होता. तो त्याचा फ्लॅट परत भाड्याने देतोय. त्याची भाडेकरू एक कॉलेज स्टुडंट असणारे. खरंतर गेल्यावेळच्या अनुभवावरून त्याला कुठल्याही कॉलेजला जाणाऱ्या एकट्या मुलीला जागा द्यायचीच नाहीये पण या मुलीचा मामा त्याचा खूप जवळचा मित्र आहे. त्याने गळ घातलीये म्हणून अमित तिला फ्लॅट देतोय तिला राहायला. ती एकटीच राहाणार आहे. शिवाय तिचा मामाही याच शहरात आहे. तो तिची काळजी घ्यायला समर्थ आहे. तेव्हा तू उगीच या येणाऱ्या शेजारणीची जबरदस्तीची काळजी घ्यायचा घाट घालू नकोस.” त्याने बजावलं होतं.
खरंतर मीताच्या आधी जी मुलगी राहायला आली होती तिच्या आईनेच घरी येऊन नंदाआजीशी ओळख करून घेतली होती. माझ्या लेकीकडे लक्ष ठेवा म्हणून गळ घातली होती. स्वतःचा नंबरही दिला होता. सुरवातीला सगळं ठीक होतं. गावातून शहरात राहायला आलेली ती मुलगी हळूहळू स्थिरावत होती. गरज लागेल तेव्हा नंदाआजीची मदत घेत होती. कामवाल्या मावशींना चावी देणं, तिच्यासाठी आलेला जेवणाचा डबा ठेवून घेणं, कधी बाहेर पडलं तर तिच्यासाठी काहीतरी खाऊ आणणं, तिला घरी केलेले तिच्या आवडीचे लाडू देणं. नंदाआजी सगळं प्रेमाने करत होत्या.
पण हळूहळू त्या मुलीला शहराचं वारं लागलं. तिचं राहाणीमान बदललं. लेटेस्ट फॅशन, लेट नाईट पार्टीज, मित्रांशी जवळीक हे सगळं प्रमाणाबाहेर वाढत गेलं आणि आईवडलांशी असलेल्या घट्ट नात्याचे पदरही हळूहळू सुटत गेले.
त्यांचे फोन टाळणं, लपवाछपवी करणं, घरी नसतानाही घरीच आहे असं धडधडीत खोटं बोलणं असं सगळं सुरू झालं. ती मुलगी अंतर्बाह्य बदलली आणि तिची आई नंदाआजीच्या अजून जवळ येत गेली.
ती घरी आहे का हे नंदाआजीकडून कन्फर्म करण्यासाठी, तिच्या मित्रांबद्दल चौकशा करण्यासाठी ती नंदाआजीला फोन करू लागली. आई आणि नंदाआजीच्या मैत्रीबद्दल त्या मुलीला कळताच त्यांच्यात खूप वादावादी झाली.
बदलेल्या जीवनशैलीला सोकावलेल्या त्या मुलीला कोणाचीही ढवळाढवळ परवडणारी नव्हतीच म्हणून तुमचे शेजारी माझ्यावर वॉच ठेवतात आणि माझ्या घरच्यांना माझ्याबद्दल खोटंनाटं सांगतात असा अमितकडे कांगावा करत तिने ती जागा सोडली.
अमितला नंदाआजीचा स्वभाव चांगलाच माहिती असल्याने त्याने झाल्या प्रकाराकडे लक्ष दिले नाही. पण तरी नंदाआजीच्या डोक्याला ताप झालाच.
आधीचा हा अनुभव होताच आणि त्यात मीताच्या आईने शेजारी येऊन साधी ओळखही करून घेतली नव्हती. सुरवातीला आठ दहा दिवस आई मीताबरोबर राहिली होती. गॅलरीतून एकमेकींना पाहूनही मीताच्या आईने कधी स्माईलसुद्धा दिली नव्हती. पण तरी आजचा मीताचा चेहरा नंदाआजीला स्वस्थ बसू देत नव्हता..
शेवटी थोड्यावेळाने डब्यात गरम वरण भात भरून नंदाआजीने मीताची बेल दाबलीच. अतिशय त्रासिक चेहऱ्याने मीताने दार उघडले. समोर शेजारच्या आजीला पाहून तिचा चेहरा अजूनच वाकडा झाला..
‘काय हवंय तुम्हाला?’ अगदी तिरसटपणे तिने विचारलं.
‘अगं मला काही नकोय बाळा… तुझी तब्येत बरी नाही असं वाटलं म्हणून आले. खाल्लं आहेस का काही? काळजी वाटली तुझी म्हणून आले ग मी. तुझ्यासाठी गरम वरण भात घेऊन.”
नंदा आजीचा प्रेमळ स्वर ऐकून मीताला एकदम भरून आलं. तिची आजीच समोर उभी आहे असं वाटलं आणि तिने पटकन दार पूर्ण उघडून “या ना आजी आत या” म्हणत नंदा आजीला आत घेतलं.
आजी तुम्हाला सांगू आज मला माझ्या आजीची खूप आठवण येत होती. मला बरं नसलं ना की आजी माझी खूप काळजी घ्यायची, सतत माझ्या आजूबाजूला राहायची. इथे मला खूप एकटं वाटतं हो.. मीताने मन मोकळं करायला सुरवात केली.
नंदा आजीनेही तिचं ऐकून घेता घेता तिला समोर बसवून गरम भात खायला लावला. आजीशी बोलता बोलता पोट आणि मन दोन्ही शांत होत गेलं आणि मीताला शांत झोप लागली.
त्या दिवसापासून मीता आणि नंदा आजीची गट्टी झाली. लेकाने सुरवातीला विरोध केला पण आई काही ऐकणार नाही हे माहिती असल्याने त्याने या बाबतीत काही बोलणं बंद करून टाकलं..
मीता नंदा आजीच्या घरी येऊ जाऊ लागली. घरातल्या सगळ्यांशीच तिची मैत्री झाली. दिवसभरातल्या घटना, मित्र मैत्रीणींमधली गुपितं सगळं सगळं मीता नंदाआजीशी शेअर करू लागली. नंदाआजीकडून आवडीचे पदार्थ शिकू लागली.
मीताच्या आईला आणि मामाला ही जवळीक फारशी रूचली नव्हती पण तिची आजी खूप खुश होती. फोनवर दोन्ही आजींच्या गप्पाही होत असत. प्रियाचा मात्र या मैत्रीला कडाडून विरोध होता. शेजारी फक्त आपल्यावर वॉच ठेवायला आणि आईवडलांना आपल्याबद्दल नको नको ते सांगतात हे ती वारंवार मीताला बजावत असायची. ते काही अंशी बरोबरही असलं तरी नंदाआजी त्या शेजाऱ्यांसारखी नाही याची खात्री असल्याने मीता प्रियाकडे दुर्लक्ष करायला शिकली.
बघता बघता तीन वर्ष सरली. मीताचं हे शेवटचं वर्ष होतं. गेल्या वर्षी नंदाआजीचा मुलगा, सून आणि नातू दोन वर्षांकरता परदेशी गेले. त्यामुळे नंदाआजीही मीतासारखीच एकटी राहू लागली. आता नंदाआजीच्या सूनेला मीताचा आधार वाटू लागला. दोघींमधले बंध अजून घट्ट झाले.
हल्ली हल्लीच नंदाआजीला बीपीचा त्रास सुरु झाला होता. आजी मनाने तशी स्ट्रॉंग होती. मी आणि हे नाही का गावाहून इथे शहरात आलो आमच्या प्रगतीसाठी आईवडलांना गावी सोडून, तसंच आता माझा मुलगा परदेशी गेलाय त्याच्या करिअरसाठी, प्रगतीसाठी असं म्हणून मजेत राहायची. केव्हातरी काहीतरी व्हायचंच की या शरीराला असं म्हणून वेळेवर बीपीची गोळी घ्यायची. रोजचे रूटीन, एकटी असली रोज साग्रसंगीत स्वैपाक, घरातली टापटीप सगळं अगदी चोख ठेवायची. संध्याकाळचा फेरफटका न चुकता मारायची..
स्मार्ट फोनही व्यवस्थित वापरायची. अमेरिकेच्या वेळा लक्षात ठेवून मुलाशी WhatsApp वर बोलायची. किती सॉर्टेड आहे ना नंदा आजी ! नंदा आजीबद्दल विचार करत करतच मीता घरी येऊन पोचली.
बघते तर नंदा आजी बागेतल्या बाकावर बसलेली.
“अगं काय झालं आजी? इतके फोन केलेस मला आणि माझा एकही फोन उचलला नाहीस !” मीताने विचारलं.
पण नंदाआजी मीताकडे अनोळखी नजरेने बघत राहिली. जणू ती मीताला ओळखतच नाही.
“अगं आजी ! मी काय विचारतेय? लक्ष कुठे आहे तुझं! चल बरं वरती” मीताला खरंतर धक्का बसला होता. हिला काय झालं कोण जाणे असा विचार करत मीताने नंदाआजीला उठवलं आणि वरती घरी घेऊन गेली. पाणी पाजलं.
तीन चार मिनिटात नंदा आजी नॉर्मल झाली.
“अगं तू आलीस लवकर? उद्या सकाळी येणार होतीस ना? प्रियाकडे झोपणार होतीस ना आज?”
नंदाआजीने सुसंबद्ध प्रश्न विचारलेले पाहून मीताला हायसं वाटलं.
“अगं हो.. आमचा प्लॅन चेंज झाला म्हणून आले लवकर. पण तू मला कॉल का करत होतीस ते सांग बरं.”
“मला डीमार्ट मधून रवा हवा होता ग! उद्या करंज्या करायचा विचार करत होते. पण तुझं कॉलेज सुरू असेल हे लक्षातच नाही आलं बघ आणि तू फोन केलेला कळला नाही मला. कदाचित बॅटरी डाऊन असेल.”
खरंतर नंदाआजीच्या तब्येतीची बॅटरी डाऊन आहे हे मीताच्या लक्षात आले पण ते तसं न दर्शवता नीता नेहमीसारख्या गप्पा मारत राहिली.
“एवढचं ना. देते मी तुला रवा आणून. उद्या करू आपण करंज्या मी आहे ना तुझी असिस्टंट. दोघी मिळून करू. उगीच त्या करंज्यांच टेंशन घेऊ नकोस.”
मीताने मग दोघींसाठी चहा केला. चहा पिता पिता नंदाआजीनेच विचारलं, “काय ग मीता, मगाशी तू आलीस तेव्हा मी काहीतरी गडबड केली ना? मला नक्की आठवत नाही पण बहुतेक माझा गोंधळ झाला काहीतरी. मी ओळखलं नाही ना तुला चटकन?”
नंदाआजी स्वतःहूनच विचारते आहे म्हंटल्यावर मीताने तिला सांगितलं नेमकं काय झालं ते.
संध्याकाळी मीता नंदाआजीला डीमार्टला घेऊन गेली. दोघींनी खरेदी केली आणि थोडसं फिरून घरी दोघी घरी आल्या. बाहेर फिरून आल्यावर नंदाआजीला जरा फ्रेश वाटलं.
दुसऱ्या दिवशी मीताने नंदाआजीच्या मुलाला फोन करून नंदाआजीच्या तब्येतीबद्दल सांगितलं. तोही आईशी बोलला आणि त्याने त्यांच्या डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली. मीता नंदाआजीला डॉक्टरकडे घेऊन गेली.
विशेष काही झालेलं नाही. हा वयाचा परिणाम आहे. कधी कधी मेंदूला रक्त पुरवठा नीट होत नाही आणि त्यामुळे असं होतं. काळजी करण्याचं काही कारण नाही. पण तरी आपण एकदा पूर्ण चेक अप करून घेऊ असं डॉक्टरांनी सांगितलं.
मीताने मग तिच्या मामालाही यात involve केलं. आधी थोडे आढेवेढे घेत शेवटी मीताच्या आग्रहामुळे तो मीता आणि नंदाआजीला घेऊन आजीच्या लेकाने जिथे अपॉइंटमेंट घेतेली होती त्या हॉस्पिटलला गेला. नंदाआजीचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले. कधीतरी क्वचित नंदाआजी गोंधळायची आणि तीन चार मिनिटात नॉर्मल व्हायची. पण हा त्रास वगळता तिची तब्येत व्यवस्थित होती. रोजचं रूटीनही चालू होतं.
मीताचं कॉलेज संपून नोकरी सुरू झाली होती. तिथल्याच तिच्यासाठी अगदी अनुरूप असलेल्या रोहनशी तिचे सूर जुळले होते. ऑफिसमधल्या गमतीजमती, रोहनबरोबरची लुटूपुटूची भांडणं, मग त्याने मीताची समजूत काढण्यासाठी केलेली धडपड हे सगळं सगळं मीता नंदाआजीला सांगायची.
मीतामुळे नंदाआजीची नव्या पीढीच्या नव्या जगाशी ओळख व्हायची. नव्या जुन्याचा सुंदर मिलाफ मीता आणि नंदाआजीच्या नात्यामधे होता.
नंदा आजीमुळे मीता आपल्या संस्कृतीशी असलेली पाळंमुळं टिकवून होती तर मीतामुळे नंदाआजीच्या एकसुरी आयुष्यात नाविन्याची फुलं उमलत होती. दोघींच्या मैत्रीचं रोपटं त्यामुळे सदैव फुललेलं आणि टवटवीत होतं.
काळ पुढे सरकत गेला. मीता आयुष्याच्या एकेक पायऱ्या चढत गेली. नंदाआजी काळाच्या पडद्याआड गेली. पण मीताच्या मनात मात्र तिची नंदाआजी आठवणींच्या रूपात कायमस्वरूपी जीवंत राहिली.
आजही रांगोळी काढतांना, लाडूसाठी रवा भाजताना, पुरणा वरणाचा स्वैपाक करताना, अगदी भाजी घेताना गवार मोडून बघतानाही मीताला नंदाआजी दिसते आणि तिच्या चेहऱ्यावर नकळत एक गोड स्माईल उमटते.
©® धनश्री दाबके.
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.