मी घरीच तर असते…!

©️®️ अनुराधा पुष्कर.
सकाळ ची रविकिरण खिडकीतुन डोकावू पहात होती. वंदना उठून फ्रेश होवून दोन मिनिट खिडकीतुन आकाशाकडे बघत होती. ताजी हवा, प्रसन्न वातावरण बघुन संपूर्ण दिवस पुरेल इतकी ऊर्जा स्वतः मध्ये साठवून घेत होती..
“चला आवरून घ्याव पुन्हा उशीर होईल इथे थांबल तर..”असा विचार करत तिची पावले स्वयंपाक घराकडे वळली कारण रोजचीच कामं, स्वयंपाक, डब्बा, शाळेची घाई आणि त्यातच आई पण येणार होती, मग काय लगबगीने कामाला लागावं म्हणत तिने सगळं पटापट आवरलं.
सासुबाई सासरे संध्याकाळीच येणार होते. सगळं आटोपून सोफ्यावर बसलीच की बेल वाजली.
आईच असेल म्हणतं तिने दार उघडलं…”ये ग आई, आताच आवरलं बघ.. बैस”

“अग वंदू ,काय हा अवतार? बघ जरा आरश्यात. केस सगळी विस्कटलेली, नुसता अंबाडा, काय ही साडी ..वंदू काय हे ? कशी राहतेस ? जरा तरी स्वतःकडे लक्ष दे ..”-आई.
“लक्ष दे म्हणजे काय करू ग? अग इतकी घाई असते सकाळपासून की काही विचारू नको. मुलांची शाळा, ह्यांचा डब्बा, सासूबाईंचा चहा नाश्ता सगळं करता करता उशीर होऊन जातो. पुन्हा मुलांची यायची वेळ होते आणि असाच दिवस संपतो.. आणि तसंही मी घरीच तर असते.”- वंदनाने आपला विचार सांगून टाकला.
आई ने नुसतीच मान हलवली….
वंदना एक बायको, एक आई आणि एक सून (आदर्श सून) मध्यम वर्गीय कुटुंबातील… वंदनाच लग्न राजेशसोबत १३ वर्षापूर्वी झालं होतं. राजेश कंपनीत मॅनेजर होता आणि वंदना गृहिणी.

सुखी संसाराचा वेल बहरत होता दोघांचा आणि पुजा आणि वरुण ही दोन फुले त्या वेलीवर उमलली होती. वरुण ११ वर्षांचा तर पुजा ९ वर्षांची. दोघेही समजदार होते. वंदना एक वाणिज्य शाखेतील पदवीधर होती पण तरीही तिने घर सांभाळण्याचा निर्णय घेतला होता. ती आनंदाने सर्व कर्तव्य पार पाडत होती. ह्या सगळया जबाबदाऱ्या पार पाडताना ती स्वतःला जणु विसरूनच गेली.
स्वतःच स्वतःला गृहीत धरू लागली.
कधीही बाहेर फिरायला निघाली तर पटकन अंगावरची साडी नीट करून केसांचा अंबाडा बांधून निघत असे. कधीही छान असा वेळ देऊन तयार होउन निघत नसे.

त्या दिवशीही मुलांसोबत बाहेर त्यांच्या खरेदीला गेली. मुलांसाठी खूप काही घेतलं, पण स्वतःसाठी काहीच नाही.
पुजा म्हणाली “आई ही पर्स घ्यायची का तुला? बघ किती छान आहे..”
“नको ग, मला काय करायची आहे पर्स? मी कुठे जास्त बाहेर जाते. मी घरीच तर असते..” वंदू च पुन्हा तेच.
वंदना नेहमी असंच करायची… नेहमी हेच म्हणायची मी घरीच तर असते.. काही ही घ्यायचं म्हटल तरी हेचं…
तीला स्वतः ला गृहीत धरण्याची सवय झाली होती. तिने स्वतःला एक कुंपण घालुन घेतल होत..
आज तिचा वाढ दिवस होता.. मुलांचं चालू होतं सरप्राइजचं. पण ती मात्र जणु हे विसरूनच गेली होती.
सकाळी सासूबाईंनी शुभेछा दिल्या. राजेशने पण दिल्या.

“काय मग आज काय विशेष करायचं?”राजेश
“काही नाही, विशेष काय त्यात, मुलांना आवडतं म्हणून एखादा पदार्थ करू आणि संध्याकाळी टेकडीवरच्या मंदिरात जाऊन येऊ. बस.. उद्या पुन्हा शाळा आहे त्याची तयारी करायची आहे.” वंदना.
राजेश मान डोलवून बाहेर गेला. संध्याकळपर्यंत सगळं शांत होत.
वंदू अन् राजेश मंदिरात गेले आणि आल्यावर बघतात तर काय सगळं चित्रच बदलून गेले होते.
घरात तिचे आई बाबा, भाऊ, वाहिनी मुलं सगळे तिची वाट बघत होते.
ती आल्यावर सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या आणि तिला बसवून केक कट केला.

तिचे मन आनंदाने भरुन आले. सर्वांनी एक एक करून भेटवस्तू व शुभेच्छा द्यायला सुरवात केली.
“हॅप्पी बर्थडे बायको, हे तुझ्यासाठी… जरी तू घरीच असते तरी… कारण तू असतेस म्हणूनच मी निर्धास्त पणे बाहेर काम करु शकतो.” राजेशने हळूच हसत तीच पर्स दिली जी की, मुलांनी त्यादिवशी पसंत केली होती .
तिला खूप आनंद झाला. नंतर भाऊ आणि वाहिनीने साडी दिली तर आई बाबांनी भरभरुन आशिर्वाद दिले.
नंतर सासऱ्यांनी तिला एक पाकिट दिलं आणि सासु बाईंनी एक सुंदर असा ड्रेस दिला व म्हणाल्या,”हे तुझ्यासाठी, जशी तू आधी राहायची न तशीच पुन्हा राहण्यासाठी. आम्हाला कसलीच काळजी नसते, घर एकदम व्यवस्थित असतं कारण तु घरी असतेस…

तू इतके वर्ष ह्या घराला आणि घरतल्या माणसांना जपलं कारण तू आमच्यासाठीच घरी असते हे माहीत आहे आम्हाला.. आता जरी घरी असलीस तरी हव ते बदल कर आणि जशी होतीस तशी पुन्हा हो.”
वंदना ला काय बोलू आणि काय नको ते कळतच नव्हते.
तेवढ्यात दोन्ही लेकरं पुढे आली आणि तिला भेटकार्ड दिलं “आई, आम्ही सगळं करु शकतो कारण तू घरी असतेस, आम्ही मज्जा करतो, आम्हला छान छान खाऊ मिळतो, आम्ही शांत झोपतो कारण आम्हाला काळजी नसते कशाची, कारण तू घरी असते. आमच्यासाठी म्हणून तू स्वतःला विसरते आमंच सगळं वेळेवर करून देते पण स्वतःला वेळ देत नाही, कारण तू घरी आमच्यासाठी असतेस.. आम्हाला तू खूप खूप आवडते आई.. आय लव यू आई..”- पुजा आणि वरुण.

वंदनाने पटकन आपल्या पिल्लांना मिठीत घेतले.
मैत्रिणींनो, आपल्यापैकी बऱ्याच महिला घरीच असतात, स्वतःच सगळं विसरून घरच्या जबदऱ्या पार पाडतात. बऱ्याचणींचा हा समज असतो की नोकरी करणाऱ्या बायकाच खूप काही आहेत त्यांना समाजात खूप सन्मान आहे. पण आपण घरी आहोत तर आपण काहीच करत नाही आहोत असं नाही. घरच्या जबाबदाऱ्या पार पाडणे, घरची काम करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि हे तर सगळ्यांना करावंच लागतं. पण असं नसतं बाहेर नोकरी जरी नाही केली तरी अख्ख घर शांत ठेवणं आणि उभं करणं हे खूप मोठं काम आहे, जे बऱ्याच आजच्या नव्या पिढीला जमत नाही.
घरात काम करणाऱ्या बाईचं म्हणा किंवा आईचं सासूच आणि बायकोचं म्हणा , त्यांचा सन्मान ,मोबदला हा खूप जास्त असायला हवा कारण ती 24 तास आपल्यासाठी राबत असते. घरासाठी झटत असते. ती घरात असते म्हणून घराचा पाया भक्कमपणे वर्षानुवर्षे उभा असतो.

एका झाडाची मूळ जितकी खोलवर आणि भक्कम असतात तेवढ्या लॉंग टर्म पणे ते झाड उभं असतं. तसेच काहीच घरातल्या बाईचं असतं घरातल्या आईच असतं. घराला एक संघपणे बांधून ठेवणे ,घरातल्या लोकांच्या नावडी आवडी जपणे, हवं नको ते बघणे आणि दुखणं खुपण करणे हे सगळं ती तिच्या खांद्यावरती एकटीने पेलत असते त्यामुळे तिला मिळणाऱ्या सन्मान, प्रेम यामध्ये कधीच कशाचीच कमतरता नसायला हवी. आपण जेव्हा वेळोवेळी तिला विसरतो गृहीत धरायला लागतो तेव्हा तिला सुद्धा स्वतःला गृहीत धरण्याची हळूहळू सवय व्हायला लागते आणि ती स्वतः ला गृहीत धरू लागते.. साधी साडी घ्यायची म्हटली तरी ती विचार करते आधी आहे त्या वापरू, घरीच तर असते मी, मेकअप सामान घ्यायच ठरवलं तरी घेत नाही का तर घरीच असते मी, अश्या बऱ्याच गोष्टी… पण घरी जरी असलो तरीही हवं तस करावं आपण. हा लेख फक्त स्वतःला गृहीत धरणाऱ्या आई, बाई ,ताई साठी आहे स्वतःला कृपया गृहीत धरू नका .तुम्ही घरात आहात म्हणजे तुम्ही काहीच करत नाही सामान्य आहात असं नाहीये तुम्ही घरी आहात म्हणजे तुम्ही खूप विशेष आहात स्वतःच कौतुक करा. स्वतः सजा स्वतःसाठी, हवं ते सगळं करा प्रत्येक क्षण जगा कारण या घराला लोकांना समाजाला बांधण्याचं मुख्य काम हे आपलेच आहे तुमचंच आहे,
कारण आपण घरी असलो की घर बांधून ठेवतो, ते घरकुल उभ राहत मग आपण छान राहिलो तर बिघडलं कुठे?

काय पटतय ना? तुम्हाला हे पटत असेल तर नक्की नम्रपणे ही विनंती आहे की आपल्या आजूबाजूच्या सभोवतालच्या सगळ्या आई, मैत्रिणी, ताई ,आजी या सर्वांसोबत हा लेख शेअर करा त्यांना हा मुद्दा पटवून सांगा कारण आयुष्य एकदच मिळत त्यातला अर्धा आयुष्य जेव्हा आपण घर उभा करण्यासाठी घालवतो तेव्हा कमीत कमी उरलेलं अर्ध तरी स्वतः कडे थोड लक्ष देण्यात घालवाव,कारण गेलेली वेळ पुन्हा येत नाही… राहून जातात त्या फक्त आठवणी… क्षण हे जगायचे असतात निसटू द्यायचे नसतात.
मला नक्की सांगा तुम्हाला हा लेख कसा वाटला?
तुमच्या प्रतिक्रियांची मी वाट बघते आहे. हा लेख फक्त आणि फक्त स्वतःने स्वतःला गृहीत धरू नये ह्यासाठी आहे.
©️®️ अनुराधा पुष्कर

सदर कथा लेखिका अनुराधा पुष्कर यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही. या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखिकेची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी. कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ ( नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!