तथास्तु

©® सौ. वृषाली आशिष शिरूडे.
माईनी रात्रीच आपल्या मनाशी निर्णय घेतला कि, उ‌द्या सकाळी उठल्याबरोबर बॅग भरायची आणि यात्रेला निघायचं. आपल्याला शांततेची गरज आहे. परत आल्यावर काय ते बघु आणि निर्णय घेऊ.
त्यांना मनावर संयम ठेवणं कठीण जात होत, कारण वेगवेगळ्या प्रश्नांनी त्यांचे डोकं भणभणायला लागले होते. त्यांना सतत डोळ्यांसमोर स्वयंपाकघरात रंगलेल्या तिघींचा गप्पाच आठवत होत्या.
नीता आणि सुषमा, माईना कधी आपल्या सुना वाटल्याचं नव्हत्या. कारण आण्णा गेल्यानंतर माईचा एकटेपणा त्यांनीच दूर केला होता. त्यांनी माईची घेतलेली काळजी, दिलेले प्रेम या सगळ्यामुळे कडक, शिस्तबद्ध, काटकसरी आणि नियमांना धरून असणाऱ्या माईना थोडं का होईना बदललं होतं.
माईंना या सगळ्यांची आता खूप सवय झाली होती. आपल्या सुना-मुलांनापण आपली सवय झालीये अशा भ्रमात असतानाच त्यांच्या कानावर असं सगळं पडलं होतं.

त्या मनातल्या मनात स्वतःशी म्हणाल्या, सहा-सहा महिने का होईना पण माझ्या सुनांना माझापासून मोकळीक हवीये आणि कदाचित माझ्या मुलांना पण का?
कारण नीता, सुषमा बोलत असताना ते दोघे एका शब्दाने काही बोलले नाही म्हणजे ते दोघेपण त्यांच्याशी सहमत असतील का? कि त्यांचे नाराज चेहरे वेगळेच काही सांगत होते अशा खूप साऱ्या प्रश्नांनी त्यांचा रात्रीचा एक-एक मिनिट एक-एक तासासारखा पुढे सरकत होता.
दिवाणखाण्यात नीता आणि सुषमाची स्वप्नांची चर्चा मात्र चांगलीच रंगली होती स्वप्नांतल्या घराची.
सुषमा म्हणाली, “ताई काल मी माझ्या मैत्रिणी कडे गेली होती, काय आलिशान बंगला आहे डोळ्यांचे पारणेच फिटले माझे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्या दोघांचेही ऑफिस तिथून अगदी जवळच आहे. ना ते लोकलचे धक्के ना ती गर्दी त्यांना सहन करावी लागते. सगळं कसा जवळपास भाजी, किराणा, एका फोनवर अगदी कामे होतात.”

नीता त्यावर म्हणाली, “हो गं सुषमा माझं अगदी लग्नाच्या आधिपासून स्वप्न होतं. आपला जो कोणी जोडीदार असेल त्याचं शहरातल्या ऊच्चभ्रू सोसायटीत घर असावं. तिथे आजुबाजुला मोकळी जागा असावी जिथे मी फळांची, फुलांची बाग सजवू शकेल. पण.. कदाचित आपले स्वप्न स्वप्नच राहतील का गं? कि माई सोबत आपल्याला पण अण्णांचा आठवणी जपत बसण्यासाठी या चाळीस वर्ष जुन्याच घरात राहावं लागेल?” असं म्हणतच दोघीही आपापल्या खोलीत झोपायला गेल्या.
सुषमा विजयला म्हणाली, “विजय पण एक मात्र नक्की हं, माईना सहा महिने तुम्ही आमच्यात आणि सहा महिने ताईंकडे राहत जा असं सांगताना मला खूप वाईट वाटलं हं आणि मला आता ह्या दोन वर्षात नाही म्हटलं तर खूपच सवय झालीये त्यांची. संध्याकाळी आल्या बरोबर माई ज्या हास्यमुद्रेने दरवाजा उघडतात आणि तो लागलीच चहाचा कप हातात देऊन ज्या आमचा गप्पा रंगतात ना काय सांगू, ते मी नाही हं विसरू शकणार.”

त्यावर विजय तिचा हातात हात घेऊन प्रेमाने म्हणाला, “राणी मग एवढ सगळं असताना आपण एक काम करु ना, कशाला ते नवीन घर आणि कशाला ती माईची सहा- सहा महिन्याची वाटणी? आपण इथेच राहू ना. कारण माई नाही ऐकणार हे घर विकण्यासाठी, कारण माई अण्णा दोघांनी खूप कष्ट करून हे घर बांधलय. त्यांचा आयुष्याचे सगळे रंग इथे भरले आहे. एक एक पै जोडून त्यांनी हे घर बांधलय मला अजूनही चांगला आठवतंय तेव्हा मी आणि दादा अगदी लहान होतो. तेव्हा अण्णांचा आजार पहिल्यांदा समजला. डॉक्टरने सांगितले वेळीच उपचार घेतले तर रोग मुळासकट नाहीसा होईल. पण त्यासाठी खूप पैसे लागणार होते, ते त्यावेळेस शक्य होणार नव्हते आणि लवकरात लवकर उपचार नाही मिळाले तर आजार जीवघेणा सुद्धा ठरेल, हे सगळ ऐकून माईचे तर डोळ्यातले पाणी थांबता थांबेना. त्यावर उपाय म्हणून माईने घाबरतच अण्णांना विचारले, अहो माझा जरा ऐकणार असलात तर एक गोष्ट सुचवते, आपण हे घर विकून टाकू आणि तुमचे उपचार पूर्ण करू.

त्यावर आण्णांना खूप संताप आला त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली त्यांचे डोळे रागाने लाल झाले आणि ते आईला म्हणाले, मी मेलो तरी चालेल, मला उपचार नाही मिळाले तरी चालेल, माझ्या आयुष्याची दोरी जेवढी असेल तेवढे मी नक्की जगेल. पण माझं घर मी कोणाच्याही ताब्यात देणार नाही जोपर्यंत या घराच्या भिंती जिवंत आहेत. माझे चंद्र आणि सूर्य सुद्धा तुला यासाठी भाग पाडणार नाही याची मला खात्री आहे. त्यावर आईने डोळे पुसतच संध्याकाळची दिवाबत्ती केली.”
हे सगळे ऐकल्यावर सुषमाने विजयचा हाताला जोरात झटका दिला आणि तिचा हात त्याच्या हातातून काढून घेतला आणि ती त्याला म्हणाली, “एक मिनिट विजय. मला माईंबद्दल काहीही वाटत असलं तरी आणि तुमचं हे घरकुल तुम्हाला कितीही प्रिय असलं तरीही मी माझ्या मतावर कायम आहे.” ती रागातच बोलली.
त्यावर विजय म्हणाला, “म्हणजे तुला नक्की काय म्हणायचं आहे?”

सुषमा म्हणाली, “तुला चांगलच समझलंय मला काय म्हणायचे आहे ते. हे बघ विजय मला ना आता खूप कंटाळा आलायं रोजच तेच तेच रुटीन माईचे ते नियम, त्यांची जीवनशैली आणि अजून बरच काही.”
“म्हणजे नक्की कशाबद्दल बोलतेय मला समजेल का?” विजय म्हणाला.
सुषमा म्हणाली, “सांगतेना माईचे फार नियम आहेत प्रत्येक गोष्टीचे. सकाळी अंघोळ करुनच स्वयंपाकघरात आलं पाहिजे. काही सणवार असतील तर अजूनच त्यांचं कौतुक असतं ते तर विचारायलाच नको रे बाबा. आमच्याकडे अशा पद्धतीने आणि असे नियम आहेत, असे सणवार, असे कुळाचार आहेत आणि ते चार दिवस तर मला नको नको होऊन जातं. इथे हात लावू नको, तिकडे जाऊ नको. आता मला हे सगळं नको नको झालंय.”
विजय सगळं काही शांतपणे ऐकून घेत होता, कारण माई नेहमी म्हणायच्या, “संसारात एक रागावला ना तर दुसऱ्याने शांततेत घ्यायचं असत म्हणजे वाद वाढत नाही” आणि तो तेच करत होता.

सुषमा पुढे म्हणाली, “ते तर जाऊदे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काहीही करायचं असेलना किंवा कुठेही जायचं असेल तर त्यांची परवानगी घ्या. माई असे चाललं का? तस करू का?, आणि त्यांना फक्त संधीच मिळायला हवी लगेच त्यांचं काटकसरीचं भागवत सुरु होतं. मी असे कष्ट केले, तसं केलं, एक वेळ उपाशी राहून दिवस काढले. त्या आणि उपाशी राहतील का? कसं शक्य आहे दिवसातून चारदा खातात त्या का तर म्हणे मला शुगर आहे.”
आता मात्र विजयला खूप राग यायला लागला. तो मनातल्या मनात म्हणाला काल पर्यंत माझ्या आईचा आदर करणाऱ्या सुषमाच्या मनात माईबद्दल असं काही असेल मी विचार पण नाही केला. पण तरीही तो शांतच होता. सुषमाचे तोंड मात्र चांगलेच सुटत होते आणि हळूहळू विजयच्या मनावरचा ताबा सुटू लागला. तो पण तिला आता उत्तर देऊ लागला.

“दर महिन्याला पाळी आली, सांगितलं की माईंचं एक वाक्य ठरलेलं, आता तरी गोड बातमी मिळेल असं वाटत होतं, या महिन्यात तरी पाळणा हलेल अस वाटलं होतं. परमेश्वरा नातवंड बघण्याआधीच माझे डोळे मिटतील कि काय असं वाटायला लागलाय. अरे ते काय माझ्या हातात आहे का ? तुच सांग मला.”
विजय म्हणाला, “अगं हि प्रत्येक आजीची अपेक्षा असते. तशीच तीची पण आहे. यात चुकीचं काय ते?”
सुषमा म्हणाली, “बर मला एक सांग रोज आपण दोघे सोबत नोकरीसाठी निघतो आठ वाजता मग त्या तुझ्याबरोबर माझा पण डबा करतात. ती काही खूप विशेष गोष्ट आहे का? कोणीही घरी पाहुणे आले का त्यांचं सुरु आज ना त्यांना डब्याला हे दिले ते दिले. आळुवडी केली, आमक केलं ढमक केलं, काय गरज आहे लोकांना सांगायची?”
विजय म्हणाला, “बरं मग एक काम कर उ‌द्यापासून लवकर उठल जा आणि तू सगळं करत जा म्हणजे तिने काही बोलण्याचा प्रश्नच नाही.”
सुषमा म्हणाली, “हो मी दिवसभर ऑफिसमध्ये मरते आणि सकाळी उठून हे सगळं करत बसते.”

विजय म्हणाला, “हो आणि हे सगळ्याच बायकांना करावे लागते. नोकरी करून घर संसार अगदी छान सांभाळतात त्या. इथे उगाच माई आहे म्हणून तुला घरात काहीच बघावं लागत नाही हे लक्षात ठेव !”
सुषमा म्हणाली, “हो सांभाळतात ना चार कामांना चार बायका लावून आणि इथे तर काय म्हणे फक्त भांड्याना बाई आहे. ते पण माई चारवेळेस ऐकवतात ती एवढे पैसे घेते तरी नीट भांडी घासत नाही. त्यापेक्षा आपणच थोडे थोडे घासून घेतलेले काय वाईट. मग करावं त्यांनी एवढाच अंगात जोर आहे.”
तर विजय म्हणाला, “तोंड सांभाळून बोल सुषमा. आज मला खूप पस्तावा होतोय की मी अशा मुलीवर प्रेम केला कि जिला मोठं घर हवयं, पण त्या घरात माणसे नकोय, माणसं असली तरी मॅडमला स्वतःचे राज्य हवयं. मनाप्रमाणे वागता यावे त्यासाठी सासू सहा महिने का होइना नकोय. म्हणजे तुला तुझं स्वातंत्र्य भोगता येईल असच ना सुषमा। तुझ्यापेक्षा एखा‌द्या गरिबाघरच्या मुलीशी लग्न केलं असतं तर आज हा दिवस नसता बघावा लागला. तिने माझ्या आईला निदान दोन वेळेचा चहा, जेवण तरी आयतं दिल असतं आणि आमचं तर काय म्हणे मी नोकरी करते, कमावते. आई बापाने सगळं तुला वेळेच्या आधीच दिले ना म्हणून तू माजलीये.”
“ए एक मिनिट तू आता अति बोलतोय हे Go to Hell ! माझ्या आई बाबांना मुळीच मध्ये आणायचे नाही खबरदार तुझ्यापेक्षा मला जास्त पस्तावा होतोय. मी त्यांनी सांगितलेल्या मुलाशी लग्न करायला हवं होत यापेक्षा नक्किच चांगलं आयुष्य जगली असती !!”

आता मात्र विजयला खूपच वाईट वाटले. आपण ज्या मुलीवर जीवापाड प्रेम केलं. सात जन्म सोबत राहण्याचं स्वप्नं बघितले आज ती फक्त घराच्या स्वप्नासाठी, मोहापाई माझ्याशी भांडतेय. यावर तो पण तिला रागातच म्हणाला, “तू अजून पण तसं करू शकते तुला माझी परवानगी आहे”. आता मात्र सुषमाच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले.
मग ती पण रागातच म्हणाली, “ठीक आहे मग विजय एक गोष्ट लक्षात ठेव, मी नोकरी करते मला गरज नाही.” असं म्हटल्या बरोबर विजयने खोलीचा दरवाजा उघडला बऱ्यापैकी रात्र झाली होती नि तो दिवाणखान्यात येऊन बसला.
इकडे जय आणि नीता यांच्या गुजगोष्टी रात्र संपली होती तरी संपल्याचं नव्हत्या. जय आणि नीता शाळेत असल्यापासूनचे चांगले मित्र मैत्रीण होते आणि बघता बघता कधी त्यांच्यात प्रेम फुलले हे त्यांना समजलेच नव्हते. आज माईच्या निमित्ताने का होईना पण त्यांचे ते जुने दिवस जागे झाले होते.
नीता म्हणाली, “मी आज मनापासून तुझे आभार मानते कारण आज तुझ्यामुळे मला माईसारखी सासू नाही तर आईच मिळाली आणि ती त्यांच्या खां‌द्यावर डोके ठेऊन रडू लागली “.

जय म्हणाला, “ऐ वेडाबाई यात रडण्यासारखं काय आहे मग?”
नीता म्हणाली, “मी माझ्या घरच्यांचा विरोध पत्करून तुझ्याशी लग्न केले तर किती दिवस माझे आई बाबा माझ्याशी बोलले नाहीत. त्यावेळेस माईनी मला खूप आधार दिला समजावून सांगितले त्या म्हणायच्या. अगं, नीता तू ऐवढा विचार करु नको थोडा वेळ गेला ना मग सगळं ठीक होईल बघ. किती आधार वाटायचं बघ तेव्हा मला त्यांचा. त्या अजुन असं पण मला म्हणायच्या तुमचे दोघांचे गुलाबी दिवस ते आनंदात घालवा, मजा करा, रडण्यात नाही. त्यांनी सतत प्रयत्न केला माझा नि आई-बाबांचा संपर्क घडवण्याचा आणि त्यात त्या यशस्वी झाल्या. तुला आठवतंय जय, मला लग्नानंतर लगेच दिवस गेले होते. मला धड संसाराचा अर्थपण कळलेला नव्हता पण माई मात्र आनंदाने वेड्या झाल्या होत्या कारण त्यांना खात्री होती आण्णा परत येतील. मला खूप त्रास होत होता पण त्यांनी मला खूप समजून घेतलं. माझे सगळे डोहाळे त्या पुरवत होत्या अगदी हौसेने, मी सारखी झोपायचे पण त्या मला कधीच म्हटल्या नाही इतर सासवांसारख्या आम्हालापण पोरं झाली आम्ही नाही केली इतकी नाटकं पण हल्लीच्या पोरींचा नाजूकपणा जास्त याउलट त्यांनी मला खूप समजून घेतलं आणि वेळ पडली तर माझ्या खोलीतपण साजूक तुपातली खिचडी आणून भरवली पण होती. पण कदाचित देवाला मी आई होण्यास पूर्णपणे तयार नाही अस वाटलं असेल म्हणून त्याने ते माझ्या पदरात दिले नाही आणि तेव्हापासून कदाचित नातवाची अपेक्षा त्या सुषमा कडून करू लागल्या.

बरं ते सगळं ठीक आहे अरे पण माझे ऐवढंच म्हणणं आहे कि आतापर्यंत त्या राहिल्याना या घरात अण्णांच्या आठवणी जपत आता है घर विकून जे पैसे येतील ते दोघा मुलांमध्ये वाटून द्यावेत त्यातून ज्याला जिथे हवा तिथे तो फ्लॅट घेईन. आणी मग सहा-सहा महिने त्या दोघांकडे राहतील. तुच बघ किती जुनं वाटायला लागलाय ते घर आज चाळीस वर्षे झालीत या घराला किती जीव घेणार आपण त्या भिंतीचा? साधे ऑफीसमधल्या जरी कोणाला बोलवायचे तरी लाज वाटते आणि माझे पण ऐक स्टेटस आहे ऑफिसमध्ये. किती दिवस चालेल अस हे?”
जय म्हणाला, “अगं मला तुझं सगळं म्हणणं पटतंय पण माझी अशा हिंमत नाही माईला असं म्हणायची कि तू घर विकून टाक, कारण आम्ही स्वतः बघितलं आहे अण्णांना या घरासाठी जीव टाकतांना.”
“अरे पण एकदा विषय घ्यायला काय हरकत आहे! बरं बाई उद्या तसही रविवार आहे विजय आणि सुषमा पण घरीच आहे मी त्यांच्याशी बोलतो मग चौघे मिळून माईशी बोलून घेऊ.”
“ठीक आहे झोपायचे का मग आता, झाले ना तुझ्या मनासारखं?” जय म्हणाला.
ती आनंदी होऊन त्याच्या मिठीत शिरली आणी म्हणाली हो हो हो आणि LOVE YOU जय असं मोठ्याने म्हणाली आणि झोपली.

सकाळचे सहा वाजून गेले होते माईचे लक्ष खिडकीकडेच होते पक्षांचा किलबिलाट सुरु झाला होता. सूर्याचे किरण डोके वर काढू लागले होते माई उठल्या त्यांचं सगळं आवरलं, देवपूजा केली आणि दिवाणखान्यात आल्या बघता तर काय विजय तिथेच झोपला होता. माईने त्याला उठवले आणी डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, “काय रे बाळा बरं नाहीं का, इथे का झोपलास?”
“काही नाही माई सहजचं, आणी तू कुठे निघालीस ऐवढ्या सकाळी?”
माई म्हणाली “हो मी तुला बोलावून सांगणारच होती. बघ मी आपल्या गावचा यात्रेला निघते. चार दिवस तिथेच राहीन म्हणते. नंतर अप्पा काका आणि नीरु आत्या कधीचेच बोलवताय तर त्याचेकडे पण थोडे दिवस राहीन म्हणते.”
“अगं. माई असं अचानक काहीच बोलली नाहीस ते,” विजय म्हणाला.
“अरे, तुम्ही चौघे रोज सकाळी ऑफिस ला गेले की रात्री येतात आणि जेवले की झोपतात बोलायला वेळच नाही” माई म्हणाली.

“माई, नक्की यात्रेलाच चाललीस ना? अजून दुसर काही कारण नाही ना?”विजय म्हणाला. त्यावर माई म्हणाली, “नाही रे बाळा तसं काही नाही. चल निघते, त्यांना पण सांग आणि आल्यानंतर एक मोठ सरप्राईझ देणारे मी तुम्हांला” माई बॅग उचलून चालू लागल्या.
जय आणि नीता आवरून खाली आले तेवढ्‌यात विजय त्यांना म्हणाला, “काय रे दादा माई च आणि तुझ काही बोलणं झाला होतं का? माई अचानक गावाकडे यात्रेला गेली आणि जाताना म्हणाली की, मी आल्यावर एक सरप्राईझ देणार आहे.”
जय पण विचारात पडला असा अचानक काय झाल?
त्यावर नीता लगेच म्हणाली, “जय भाऊजी माईंनी काल रात्रीची आपली चर्चा नसेल ना ऐकली?”
“छे मी पाणी पिण्यास गेलो तेव्हा माई झोपली होतीं त्यामुळे ते शक्यच नाही.”
“नाही रे आपण गप्पांमध्ये रंगलेर्लो असताना अचानक काहीतरी पडण्याचा आवाज आला होता, आठवल का? मग तो माईचा खोलीतून तर नाही” विजय म्हणाला.
“तेवढ्‌यात जय म्हणाला बरं ते जाऊदे. माई आल्यावर काय ते समजेलच. पण ती आल्यानंतर घराबद्दल काय तो विषय घेऊ आणि माईला समजावलं तर ती समजून घेते. आपल्यासाठी तिने स्वतःला खूप बदलले आहेच ना.” बरं बघू माई आल्यावर, विजय म्हणाला. तेव्हड्यात नीता म्हणाली, “भाऊजी सुषमा अजून उठली नाही का? दहा वाजत आले.”
नाही माहित असे विजय म्हणाला.

म्हणून मग नीता तिच्या खोलीकडे जायला निघाली, दाराजवळ जाताच तिला सुषमाचा फोनवर रडत बोलण्याचा आवाज आला, हॅलो आई अगं तुझी खूप आठवण येतेय. असं म्हणत तिला खूप रडायला आले आणि तिने फोन ठेऊन दिला.
तेव्हढ्यात नीता आत गेली आणि तिची विचारपुस केली तर तिला अजूनच रडायला यायला लागलं.
ती म्हणाली, ” काही नाही ताई आज आईची खूप आठवण येतेय तर दोन दिवस जाऊ का मी आईकडे? तिथूनच जाईन म्हणते ऑफिससाठी”
“अगं, मग विचारते काय ! ये जाऊन भाऊजींशी बोललीस ना पण.”
ती त्यावर काहीही बोलली नाही. उठली आवरुन खाली आली विजयकडे बघितल आणि येते असे म्हणून निघून गेली.
दारावरची बेल वाजताच सुषमाच्या आईने दार उघडले, तिला बघताच त्या आश्च्यर्याने चकित झाल्या कारण गावातच माहेर असलं तरी दोन तासाच्या वर आणि न कळवता सुषमा कधीच आली नव्हती.

आईला बघताच सुषमा आईच्या गळ्यात पडून रडू लागली. खूप वेळानंतर आई म्हणाली,” झाले का राणी रडून? बोल आता काय झालं?”
खूप वेळ काहीच बोलली नाही सुषमा. आईने हळूच विचारले, “विजयराव नाही का आले?”
त्यावर सुषमा म्हणाली, “मी आले ना मग तो कशाला हवाय तुला?”
“मग आईला समजले नवरा-बायकोचे भांडण दिसतंय. “बरं चल पटकन जेवायला बस. तुझ्या आवडीचाच आहे आज स्वयंपाक.” तिलापण खूप भूक लागली होतीच आणि आज खूप दिवसांनी आईच्या हातचं जेवायला मिळणार होते म्हणून ती पटकन उठली पोटभर जेवली आणि मायलेकी पटकन स्वयंपाकघर आवरून झोपाळ्यावर गप्पा मारण्यास गेल्या.
ती सुषमाची आवडती जागा होती. जिथे तिले बन्ऱ्याचदा आईजवळ मन मोकळे केल होतं. सुषमा लाडाकोडात वाढलेली ऐकूलती एक संस्कारी घरातली मुलगी होती. तिच्या आईने अगदी विचारपूर्वक जीवनावश्यक गोष्टी तिला शिकवल्या होत्या. आता मुख्य विषयाला सुरुवात झाली. सुषमाने झालेला सगळं भांडणाचा विषय आईला सविस्तरपणे सांगितला.
“मला एक सांग मोठे घर हवे तुला चार भिंती असणारे कि घराला घरपण आणणारी चार माणसे घरात हवी?”

“अगं पण आई, तू बघ ना केवढी वर्ष जुने आहे ते घर, दिवसासुद्धा लाईट लावावा लागतो, पुरेश्या सुविधापण त्यात नाही, छोट्या छोट्या खोल्या.”
“ते सगळे जाऊ दे बाकी काही नसलं तरी चालेल पण त्या घरात माझ्यापेक्ष्यापण जास्त प्रेम करणाऱ्या माई आहेत.”
“अगं, पण आई त्यांचे ते नियम, ते विचार ! सोड जाऊ दे मला कंटाळा आलायं” सुषमा म्हणाली.
त्यावर तिची आई म्हणाली, “अगं प्रत्येक नात्याला एक वेळ द्यायला हवा म्हणजे ते नियम, नियम वाटत नाही. आपल्या चांगल्यासाठी सांगितली गेलेली गोष्ट वाटते.”
“आई मुख्य म्हणजे स्वातंत्र्य अजिबात नाही. म्हणून म्हटले निदान सहा महिने तरी शांती.”
त्यावर आई म्हणाली “स्वातंत्र्य नाही कसे म्हणते. तुझे बाबा हॉस्पिटलमध्ये असताना त्यांच्याकडे कुळाचार असतानासुद्धा त्यांनी तुला इथे राहण्यास सांगितले. अजून काय असते स्वातंत्र ? मी तर म्हणते माईनी बाराही महिने तुझ्यातच राहावं कारण माणूस घरात असलेले वाया नाही जातं. कितीही मोठी संकटे आलेत ना त्याचे भय नाही वाटतं. तुझ्या जाऊबाईचं बाळ गेल्यावर त्यांनी किती छान सांभाळलं होतं ना.”

आता सुषमाचे मत हळूहळू बदलू लागले, ती आईच्या बोलण्यावर विचार करू लागली आणि त्यातच तिला चक्कर आली, तसं तिला आठ दिवसांपासून बरं वाटतच नव्हतं. मग सुषमा आईला घेऊन डॉक्टरकडे गेले. त्यांनी काही टेस्ट करण्यास सांगितल्या. तर त्यात कळाले कि सुषमाला दिवस गेलेत. ती आनंदाने वेडीपिशी झाली.
तिने लगेच मोबाइल हातात घेतला विजयला सांगण्यासाठी सगळे भांडण विसरून आणि पुन्हा मोबाइलला ठेऊन दिला सरप्राईझ द्यावे असेम्हणून.
त्या दोघी पटकन घरी गेल्या तेव्हड्यात फोन वाजला. विजयाचा तो म्हणाला, “मी न्यायला येतोय तयार राहा”,
सुषमा त्यावर काहीच न बोलता I Love You So Much!! अस म्हटली आणि पटकन तयार झाली घरी जाण्यास आणि भांडण संपले. जाताना आईला खूप धन्यवाद दिले तिने. ती म्हणाली,” आई तू समजावले नसतेस तर मी माईना गमाऊन बसले असते.”
इकडे माईचा प्रवास चांगला चालला होता. त्यातच त्यांना प्रवासात एक जुनी मैत्रीण भेटली. विषयात विषय निघाला आणि माईनी मनातले सगळे त्या मैत्रिणीला सांगितले.

त्यावर त्यांची मैत्रीण एकाच म्हणाली, “हे बघ ऐक वेळेस जेवायचे ताट द्यावे, पण बसायचे पाट देऊ नये”. माईच्या मनात अजूनच प्रश्नांचे काहूर माजले. माई स्वतःशीच म्हणाल्या “बास्स आत्ता मी ठरवलंय काय ते”, असे म्हणत त्या परतीच्या प्रवासाला निघाल्या.
दारावरची बेल वाजली विजय आणि सुषमा तसहि माईंची वाट बघताच होते गोड बातमी सांगण्यासाठी.
दार उघडताच दोघांचे हसरे चेहरे बघून माईना बरे वाटले. चहापाणी झाला सगळ्या गप्पागोष्टी झाल्या मग माई सरप्राईझ वर आल्या. हे बघा बाळांनो, ” तुमचे सरप्राईझ मी तुम्हाला सांगणार आहे, त्या दिवशी जाण्यापूर्वी मी तुमची चर्चा ऐकली. मला दुःख नाही झालं पण वाईट मात्र वाटले”, तेव्हा ते चौघे एकमेकांकडे बघतच राहिले.
माई म्हणाल्या,” मी असे ठरवलंय वरच्या दोघी खोल्या भाड्याने द्यायच्या, त्या भाड्यावर मी आयुष्य जगेन. खाली मी एकटी राहील. तुम्हाला पूर्ण परवानगी वेगळं राहण्याची आणि जेव्हापण तुम्हाला वाटेल यावंसं या घराची दारं उघडेच असतील आणि जेव्हा तुम्हाला, माझी गरज असेल मी पण येईनच.”
त्यावर सुषमा म्हणाली, “गरज गरज तर मला आत्ताच आहे तुमची.”
का काय झालं त्यावर विजय म्हणाला, “माई अगं तू आजी होणार आहेस.” काय सांगतोस माई आनंदात सगळे विसरून गेल्या आणि खुप चर्चा झाल्यावर सर्वानुमते असे तोडगा निघाला कि, सगळ्यांनी आहे त्याच घरात एकत्र राहायचे, फक्त या घराचे नूतनीकरण करायचे, रंगरंगोटी करायची आणि ज्याला जशी हवी तशी त्याने आपली खोली सजवायची. यामुळे माईच्या घरासाठीच्या आणि अण्णांच्या आठवणीपण जपल्या जाणार होत्या.
सगळे आनंदी होऊन माईचा आशीर्वाद घेण्यास वाकले आणि माईनी त्यांना “तथास्तु !!!!” असा आशीर्वाद दिला.
©® सौ. वृषाली आशिष शिरूडे

सदर कथा लेखिका सौ. वृषाली आशिष शिरूडे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकाकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!