तिचं घर कोणतं?

©️®️सायली जोशी.
माहेरी आल्या आल्या शरूने आपलं सगळं सामान आपल्या खोलीत टाकलं आणि रडतच ती आईच्या मागोमाग स्वयंपाकघरात आली.
“आता मी पुन्हा सासरी जाणार नाही.”
हे ऐकून तिच्या आईचं धाबं दणाणलं.
“काय झालं?” आपल्या चेहऱ्यावरची भीती लपवत अरुंधती ताई तिच्याजवळ बसत म्हणाल्या. त्यांच्या चेहऱ्यावर कुतूहल दाटून आलं होतं आणि सोबतच एक भयाची छटा देखील उमटली होती.

“आई.. सासरी मी काहीही करायला गेले तरी सासुबाई म्हणतात, हे तुझं घर नाही. माझ्या आवडीचं जेवण बनवायला घेतलं तरी त्यांचं हे वाक्य ठरलेलं असतं. तूच सांग, माणसाला कधीतरी बदल हवा असतो ना? रोज मी प्रत्येकाला विचारून जेवण बनवते. मग एक दिवस माझ्या आवडीचा स्वयंपाक मी केला तर काय हरकत आहे? आणि मोठी गोष्ट म्हणजे, सासुबाईं पुढे कोणाचं काही चालत नाही.”
“बस्, इतकंच ना?” अरुंधती ताईंनी उसासा सोडला.” मला वाटलं, आणखी काही वेगळं सांगतेस की काय? पण तुझे सासरेबुवा यावर काही बोलतात की नाही?”
“सांगितलं ना, आईंपुढे सर्वेशचं काय तर सासऱ्यांचं सुद्धा काहीही चालत नाही आणि हे इतकंच पुरेसं नाहीये का?

आई, त्या घरात जाऊन मला वर्ष होऊन गेलं. तरीही ते माझं घर नाही? एखादा निर्णय घेण्याची वेळ आली किंवा माझ्या आवडी -निवडीचा प्रश्न आला तर सासर हे माझं घर नसतं! त्या घरावर माझा हक्क, अधिकार नसतो? की इतरांनी दिलेल्या सूचना पाळत, खाली मान घालून मी तिथे वावरावं अशी अपेक्षा असते?” शरू अस्वस्थ मनाने म्हणाली. 
“आई, स्वयंपाक घरातल्या, हॉलमधल्या काही गोष्टी जरा इकडे तिकडे ठेवल्या तरी त्यांच्या मनाप्रमाणेच त्या आहेत तशाच लावून ठेवायच्या. तेवढंही स्वातंत्र्य एका सुनेला का असू नये?”
तिच्या डोळ्यांतले अश्रू पाहून अरुंधती ताईंना गलबलून आलं. पण खरी परिस्थिती समजल्याशिवाय त्या तिची किंवा तिच्या सासरच्या लोकांची बाजू घेणार नव्हत्या.

“आत्ता तू रागात आहेस त्यामुळे लगेच कुठलाही निर्णय घेऊ नकोस. तुझे बाबा संध्याकाळी जेव्हा घरी येतील तेव्हा आपण या विषयावर चर्चा करू.” अरुंधती ताई आपल्या लेकीच्या आवडीचा स्वयंपाक करायला आत निघून गेल्या. 
‘काल -परवापर्यंत तर सारं काही ठीक होतं. आता हे काय नवीनच?’ ताईंना काही कळत नव्हतं.
त्यांना आपले पूर्वीचे दिवस आठवले. त्यांच्या सासुबाईंनी लग्न झाल्यावर आपल्या सुनेच्या हातात सगळी जबाबदारी देऊन टाकली. अरुंधती ताईंना मदत करत सासूबाई अतिशय शांतपणे त्यांच्या संसाराला हातभार लावत राहिल्या.
“शरू, अगदी खरं -खरं सांग. तुझी काही चूक झालीय का?” ताई आतून ओरडून म्हणाल्या.

“नाही आई. काही किरकोळ चुका होत राहतात. त्या सोडल्या तर अशी कुठलाही मोठी चूक माझ्या हातून अजून तरी झालेली नाही. हवं तर मी देवाची शपथ घेऊन सांगते आणि आई, मी तुझ्याशी खोटं का बोलेन?” शरूच्या नजरेतून तिचा खरेपणा व्यक्त होत होता.
“तसं नाही बाळा, मी खात्री करून घेण्यासाठी विचारलं. तसा माझा माझ्या लेकीवर विश्वास आहे.” ताई तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या. “यावर जावई बापू काय म्हणतात?”
सर्वेशच्या आठवणीने शरुच्या डोळ्यांत पाणी आलं. “तो काहीच बोलत नाही आई.” ती फुरंगटून म्हणाली.
“बरं, मग तू बोलत जा. आपली बाजू तिसऱ्याने मांडण्यापेक्षा आपणच बोललेलं चांगलं नाही का? शरू, तू आणखी काही लपवत तर नाहीस ना?” जणू तिच्या मनातली खळबळ चेहऱ्यावर व्यक्त होत होती आणि आईने ती बरोबर हेरली.

“काही नाही.” आईची नजर चुकवून शरू पुन्हा हॉलमध्ये येऊन बसली.
खरंतर आपला सारखा होणारा अपमान आता तिला सहन होत नव्हता. नाही म्हटलं तरी माहेरच्या मानानं तिचं सासर खूपच सधन होतं. मग सासरकडची मंडळी तिच्या माहेरचा सतत गरीब म्हणून उल्लेख करत असतील तर कोणत्या मुलीला हे आवडेल? आणि याबाबतीत ती आईला तरी काय सांगणार होती? ही गोष्ट आईच्या मनाला कायम लागून राहणार हे तिला पक्क ठाऊक होतं. 
पहिले सहा महिने गोड गोड वागणाऱ्या सासूबाई अचानक आपलं वागणं कसं काय बदलतात! हे एक मोठा कोडंच होतं. 
शरू नक्की कुठे कमी पडते? हे अरुंधती ताईंना उमगत नव्हतं. कारण एकुलती एक मुलगी असल्याने ताईंनी तिचे फारसे लाड न करता पडेल त्या सगळी कामं करण्याची सवय लावली होती. सासरी जाणाऱ्या मुलींनी कुठेही कमी पडू नये अशी त्यांची धारणा असल्याने ताई तशा सक्तीनेच आपल्या लेकीशी वागल्या होत्या.

इकडे शरूने बराच वेळ सर्वेशच्या फोनची वाट पाहिली. पण त्याचा फोन आला नसल्याने तिची चिडचिड आणखीनच वाढली. आईने आपल्या आवडीचा केलेला स्वयंपाक पाहून मात्र शरूचा राग बराचसा कमी झाला. दुपारी दोन तास झोप काढल्यानंतर तिला खूपच फ्रेश वाटायला लागलं. कितीतरी दिवसांनी अशी विश्रांती तिला मिळाली होती.
“सासुबाई खूप काम लावतात का गं?” अरुंधती ताई तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या.
“हम्म. त्या काहीही काम करत नाहीत. माझ्या घरची काम करायला माझी काहीच हरकत नाहीय. पण आधी ते घर मला आपलंसं, स्वतःचं तरी वाटू दे आणि आई, मी एखाद्या गोष्टीला नाही म्हटलं तरी आईंचा राग अगदी शिगेला पोहोचतो. सगळं कसं त्यांच्या म्हणण्यानुसार आणि त्यांच्या रीतीनेच व्हायला हवं असा त्यांचा अट्टाहास आहे.”

बोलता -बोलता शरूने चहा केला आणि आवरून काही वेळातच दोघी माय -लेकी फिरायला म्हणून बाहेर पडल्या.
आज बऱ्याच दिवसांनी शरूला माहेरी आलेलं पाहून गल्लीतल्या सगळ्या बायका तिच्याभोवती जमा झाल्या. 
“आज कशी काय वाट चुकली?” साठे बाई शरुला कोपराने ढोसत म्हणाल्या. “तुझ्या आईला तुझ्याशिवाय अजिबात करमत नाही हं. सारखी तुझी आठवण काढते आणि सर्वेशराव काय म्हणतात? हे ऐकून शरू नुसतीच हसली.
साठेबाई निघून गेल्या आणि अरुंधती ताई शरूला म्हणाल्या, “तू इथे येऊन सहा -सात तास उलटून गेले तरी सर्वेशरावांचा फोन कसा काय आला नाही?”
“त्यांच्या आईने त्यांना आपल्या बायकोला फोन करू नकोस म्हणून सांगितलं असेल.” बोलता बोलता शरूने आपली जीभ चावली.

“म्हणजे?”
“सासुबाईंना वाटतं, मी त्यांच्या मुलाला त्यांच्यापासून लांब केलंय. त्यांना वाटतं, सर्वेशने अजूनही त्यांचा पदर धरून राहावं.”
हे ऐकून ताईंनी कपाळावर हात मारून घेतला.
“अगं, बऱ्याच सासवांना असं वाटतं.” ताई तिचा अंदाज घेत म्हणाल्या.
हे ऐकून अरुंधती ताईंच्या जीवाला घोर लागून राहिला. आता आणखीन काय ऐकायचं राहिलं आहे? हा विचार करून त्यांच्या चेहऱ्यावर काळजी पसरली. या प्रकरणाच्या मुळाशी जायला हवं असं त्यांनी मनोमन ठरवलं. शेवटी एका आईचा जीव आपल्या लेकीच्या काळजीपोटी कासावीस होणारच.

संध्याकाळी अशोकराव घरी आल्यानंतर शरूचं सामान पाहून काहीतरी बिनसलं आहे, याची त्यांना जाणीव झाली. अरुंधती ताईही शांतच होत्या. सोक्षमोक्ष लावण्यासाठी सर्वेशरावांना इथे बोलावून घ्यावं, असा विचार त्यांच्या मनात येऊन गेला. पण अशोकरावांशी बोलून मग पुढे निर्णय घेता येईल म्हणून त्या शांत बसल्या. 
“शरू? आज इतक्या दिवसांनी माहेरची आठवण आली म्हणायची?” अशोकराव आपल्या लेकी जवळ बसत म्हणाले.
“बाबा..” शरू त्यांच्या कुशीत शिरली.
“काय झालंय? तुम्ही दोघी काही सांगणार आहात की मीच खोदून विचारायचं? आल्यापासून बघतो आहे मी, तुमच्या दोघींचे चेहरे अगदी पडलेले दिसतात.”

“लेकीच्या सासरी काही ठीक नाही.” ताई म्हणाल्या.
“बाबा, लग्न झालं की माहेरची लोकं सासर हेच तिचं घर असं सांगून तिला सासरी पाठवतात आणि सासरची लोकं जर ‘हे तुझं घर नाही ‘असं वारंवार म्हणत असतील तर? मग नेमकं तिचं घर कोणतं?” शरूने बाबांना प्रश्न केला.
हा प्रश्न कोड्यात टाकणारा होता खरा. पण थोडा विचार करत अशोकराव पुढे म्हणाले..
“मग सासर हेच माझं घर असं ठणकवून सांगावं. आई – वडिलांनी लेकीच्या संसारात लक्ष घालणं चुकीचं असल्याने तूच स्वतः साठी उभं राहणं महत्त्वाचं आहे. हेही तुझंच घर आहे बेटा. पण एकदा का मुलगी सासरी गेली की तिने ते घर आपलंस करायचं असतं. सगळ्याच गोष्टी मनावर घ्यायच्या नाहीत. पण आपली बाजू ही तितक्याच शांतपणे, ताकदीने मांडवी. कुठलाही राग मनात न धरता शांतपणे वावरायवं. ” बाबांचं बोलणं ऐकून शरुला जरा बरं वाटलं. “तू सर्वेशरावांना फोन कर आणि उद्या येते म्हणून सांग.” 

“अहो?” 
“त्यांचाच फोन आला होता मला. सगळं काही सांगितलं वर माफीही मागितली त्यांनी. अरुंधती, आपण लेकीच्या संसारात कधीच ढवळा -ढवळ करायची नाही. हे व्रत तेवढं नीट पाळायचं. कारण आई -वडीलांमुळे मुलीचा संसार मोडला, असं व्हायला नको. सासु -सुनेतल्या किरकोळ गोष्टी आपण मध्यस्थी केल्याने उग्र रूप घेऊ शकतात. शिवाय यामुळे नवरा – बायकोच्या नात्यावरही परिणाम होऊ शकतो. पुढे तिला जास्त त्रास झाला तर तेव्हाचा निर्णय तेव्हा घेऊ. “अशोकरावांच्या बोलण्याने अरुंधती त्यांच्या मनावरचं ओझं काही प्रमाणात का होईना पण हलकं झालं.
शरूलाही आपल्या बाबांचा म्हणणं पटलं.
तिने सर्वेशला फोन लावण्याआधीच त्याचा फोन आला आणि सासरी जाण्याचा उत्साह हळूहळू तिच्या चेहऱ्यावर तरंगू लागला.
समाप्त.
©️®️सायली जोशी.
सदर कथा लेखिका सायली जोशी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखिकेची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी. कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ (नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!