©️®️ सायली जोशी.
“अगं, हे काय..अजून तयार झाली नाहीस?” सुष्मिताच्या सासुबाई तिच्या खोलीत येत म्हणाल्या. ती आपल्याच नादात मोबाईलमध्ये तोंड खुपसून बसली होती.
“सुष्मिता, लक्ष कुठे आहे तुझं?”
“हं..आई, काय म्हणालात?” तिने आपला मोबाईल बाजूला ठेवला.
“अगं, सोसायटीच्या हळदी -कुंकू समारंभासाठी जाणार आहेस ना?” मेधाताई जरा वरच्या आवाजात म्हणाल्या. “आता तू आवरणार कधी आणि जाणार कधी?”
“हो. माझ्या लक्षातच राहिलं नाही. मी आवरते पट्कन.” सुष्मिताने एक छानसा पंजाबी ड्रेस कपाटातून बाहेर काढला.
“हे घालून जाणार आहेस?” सासुबाई डोळे मोठे करत म्हणाल्या. “अगं, तुमचं लग्न होऊन फक्त चार महिने झाले आहेत. जरा नव्या नवरी सारखं वाग.” मेधा ताईंनी कपाट उघडून दोन-चार साड्या बाहेर काढल्या.
“यातली कुठलीही साडी नेसून तयार हो.”
या वाक्यावर सुष्मिता मेधा ताईंकडे नुसतीच बघत राहिली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, आपल्या सुनेला अजून नीट साडी नेसता येत नाही.
“सुष्मिता, साडी अंगाभोवती गुंडाळायला तरी येईल? का ते कामही मलाच करावं लागेल?”
सासुबाईंच्या बोलण्याने सुष्मिता वरमली.
“नको. मी नसते साडी आणि आई, प्लीज मला सुष्मिता नका ना म्हणू. नुसतं सु§§ष म्हणा. मला तेच आवडतं.” सुष्मिता आपल्या नावावर जोर देत म्हणाली.
“तसलं काही मला जमायचं नाही. तू आवरायला घे. मी आलेच इतक्यात.” मेधाताई लगबगीने आपल्या खोलीत आल्या. आपलं मेकअप, हेअर स्टाईलचं सामान, पिना असा सगळा जामानिमा घेऊन पुन्हा त्या सुष्मिताच्या खोलीत आल्या.
तोपर्यंत सुष्मिताने खरोखरच साडी नुसती अंगाभोवती गुंडाळली होती. आपल्या कपाळावर हात मारून घेत मेधा ताईंनी तिला व्यवस्थित साडी नेसून दिली. ती नको म्हणत असताना सुद्धा तिच्या छोट्याशा केसांचा अंबाडा बांधून त्यावर छानसा गजरा माळला.
“तुझं मोठं मंगळसूत्र कुठं आहे?” मेधा ताई तिच्या कपाटात शोधाशोध करत म्हणाल्या.
“ते मी लॉकरमध्ये ठेवलं. पण हे छोटं, नेहमीचं मंगळसूत्र आहे ना गळ्यात.” सुष्मिता चेहरा पाडून म्हणाली.
“काय म्हणावं या पोरीला? इथून पुढे मला विचारल्याशिवाय कुठलाही दागिना लॉकरमध्ये ठेवायचा नाही.” मेधा ताई हताश होऊन म्हणाल्या.
“बांगड्या तरी आहेत का? अगं, कुठलीही स्त्री भारतीय पेहरावात उठून दिसते. निदान कार्यक्रम, सणावाराला तरी असा पेहराव करावा गं.”
“हो. बांगड्या आहेत.” सुष्मिताने कुठल्या तरी चोर कप्प्यातून बांगड्या काढून दिल्या.
“आता माझ्याकडे कशाला देतेस? तुझ्याच हातात घालायच्या आहेत त्या.” मेधा ताई चिडून म्हणाल्या.
सुष्मिताने बांगड्या पटकन आपल्या हातात घातल्या. कपाळावरची छोटी टिकली काढून मोठी टिकली लावली. मॅचिंग कानातले, गळ्यात छोटासा खड्यांचा हार, सासुबाईंचे लक्ष नाही हे पाहून तिने हळूच पायात जोडवी सरकवली. चेहऱ्यावर लाईट मेकअपही केला.
“हम्म..आता कशी दिसते मी?” सुष्मिता मध्येच आपल्या सासुबाईंना विचारत होती.
‘पोर दिसायला अगदी सुंदर आहे. पण राहणीमान सगळं परदेशी! बाईच्या जातीने थोडं तरी नटायला हवं म्हणजे मूळचं सौंदर्य खुलून येतं. ही नेहमी अशी राहायला लागली तर माझा लेक रोज नव्याने हिच्या प्रेमात पडेल.’ मेधा ताई आपल्याच विचारात बुडाल्या होत्या.
“चहा आलाय. दार उघडा बघू.” सुष्मिताचे सासरे खोली बाहेर चहाचे कप घेऊन उभे होते. आवाजासरशी मेधा ताईंनी दार उघडलं.
“अरे, ही कोण नवीन मुलगी आली घरात? आणि किती सुंदर दिसते ही!” आलोक काका आत येत म्हणाले.
“बाबा, काय हो चेष्टा करता? तुमची सून आहे मी.” सुष्मिता चहाचा कप हातात घेत म्हणाली. तिने पुन्हा एकदा स्वतःला आरशात न्याहाळून पाहिलं.
‘खरंच आज मी एकदम वेगळीच दिसते आहे. अगदी सुंदर!’ तिला आरशातली स्वतःची छबी खूप आवडली.
‘हा असा अवतार फक्त लग्नाच्या दिवशी केला होता आणि त्यानंतर आज. तशी मला कधी नटायची आवड नव्हती. लग्नात नटले, तेही सगळ्यांच्या आग्रहामुळे. नाहीतर आपला आवडता पेहराव, जीन्स आणि टॉप. कोणी आग्रह केला नसता तर कदाचित लग्न त्यावरच लागलं असतं.’
“वा, वा! सुषमा बाई, आज काय हळदी – कुंकवाचा कार्यक्रम आहे वाटतं?”
“हो. बाबा, सुषमा बाई काय म्हणता? त्यापेक्षा सुष्मिता बरं. आई, तुम्ही येणार नाही? जा ना आवरून घ्या.” सुष्मिता सासुबाईंना म्हणाली.
“मी येणार आहे. पण फक्त पाच मिनिटांसाठी. तिकडे ताई आणि भिशीचा ग्रुप माझी वाट बघत आहे. तिथलं हळदी -कुंकू पार पाडून मगच मी इकडे येईन म्हणते.
“म्हणजे माझ्यासोबत तुम्ही येणार नाही? मी एकटीने त्या पन्नास -साठ बायकांत मिसळायचं? मला स्टेटस् वगैरे काही आहे की नाही?” सुष्मिताला आश्चर्य वाटलं.
नाही म्हटलं तरी ऑफिसमधल्या मोठ्या पदाचा काहीसा का होईना तिला गर्व होता.
“त्याला काय होतंय? ऑफिसमध्ये पन्नास -साठ लोकांना ट्रेनिंग देताना काही वाटतं? नाही ना? मग इथे सगळ्या आपल्याच बायका आहेत. तीही सवय तुला व्हायला हवी. त्यानिमित्ताने सगळ्यांची ओळख होईल आणि प्रत्येक ठिकाणी मी सोबतीला येणार नाहीय.”
“हे बघा, तुमची काही हरकत नसेल तर मी जातो सुष्मिता सोबत. तेवढ्याच नट्टापट्टा केलेल्या बायका पाहता येतील.” आलोक काका गमतीने म्हणाले.
“बाबा, समोर तुमची बायको उभी आहे. आणखी काही बोललात तर आपल्या दोघांनाही बोलणी खावी लागतील.” सुष्मिता हसत हसत चहाचे कप घेऊन बाहेर आली.
इतक्यात अमर दारातून आत यायला एकच गाठ पडली.
“हे काय पाहतो आहे मी! ही आमच्या आई साहेबांची कमाल दिसते. नाहीतर माझ्या बायकोचं डोकं एवढं कुठलं चालतं? आणि इतकं नटून -थटून कुठे निघालीस?” अमर सुष्मिताची वाट अडवत म्हणाला.
“आपल्या सोसायटीमध्ये हळदी- कुंकवाचा कार्यक्रम आहे. वाट सोड हं अमर, आपल्या खोलीत आई-बाबा आहेत. ते कधीही बाहेर येतील.”
सुष्मिता म्हणाली तसा अमर बाजूला झाला.
“अगं, थांब ना. खूप छान दिसतेस.” अमरने सुष्मिताचा हात हातात घेतला.
“थँक्स. हात सोड अमर, आई -बाबा कधीही येतील रे.” सुष्मिता लटक्या रागाने म्हणाली.
“असू दे. लग्न झालंय आपलं.” अमर.
इतक्यात आलोक काका बाहेर आले. “अरे, तू कधी आलास? आणि इथे काय करताय दोघं?” काका गालातल्या गालात हसत म्हणाले.
“ते आपलं.. तिच्या हातातले कप घेत होतो.” अमरने सुष्मिताचा धरलेला हात पटकन सोडून दिला. तशी ती लाजून स्वयंपाकघरात निघून गेली.
“चालू दे. मी काहीही बघितलं नाही.” आलोक काका डोळ्यांवर हात ठेवत आपल्या खोलीत गेले.
काही वेळाने सोसायटीतल्या बायका सुष्मिताला बोलवायला आल्या. मेधाताई सोसायटीत पाच मिनिटांची हजेरी लावून आपल्या भिशी ग्रुपला कधीच जॉईन झाल्या होत्या.
सुष्मिता हळूहळू कार्यक्रमात रुळत गेली. सुरुवातीला तिला थोडं अवघडल्यासारखं वाटलं. हळूहळू एकेकीची ओळख होत गेली. त्यातल्या काही जणी बिझनेस करत होत्या. बऱ्याच जणी मोठ्या ऑफिसच्या स्वतः मालक होत्या तर काही सुष्मिता सारख्याच मोठ्या पदावर कामाला होत्या. सगळ्या अगदी मनमोकळ्या, हसतमुख, एकमेकींची काळजीने, प्रेमाने विचारपूस करणाऱ्या अगदी ‘डाऊन टू अर्थ’ होत्या.
मोठ्या पोस्टवर असूनही इथे सगळ्याजणी सारख्याच होत्या.
सुष्मिताला वाटलं ,आपण या आधीच सर्वांशी ओळख करून घ्यायला हवी होती. मोठ मोठ्या पदावर असून देखील इथे सगळ्याजणी किती साध्या वागतात. मला वाटायचं, आपण कमी वयात इतक्या उंचीवर पोहोचलो ही खूप मोठी गोष्ट आहे! पण इथे अगदी घरगुती पद्धतीचं वातावरण आहे.’
सगळ्याच बायकांच्या अंगावर साडी असून छान नटून-थटून त्या इकडून तिकडे फिरत होत्या. ‘कित्ती गोड दिसत आहेत सगळ्या! ऑफिसमध्ये कोणी साडी नेसायची म्हंटल तरी कोणी मनावर घेत नाही. आता आपणच मनावर घ्यायचं. उद्यापासून जमेल तितके दिवस ऑफिसला साडी नेसून जायचं. आता लग्न झालंय आपलं.’
मनोमन तिने आपल्या सासुबाईंचे खूप आभार मानले. ‘आज त्यांनी आग्रह केला नसता तर मी अशी तयार झाले नसते.’
स्वतःकडे एक नजर टाकून सुष्मिता पुन्हा सर्वांच्यात मिसळली. जणू आज तिला नव्याने स्वतःची ओळख पटली होती.
‘कुठलीही स्त्री भारतीय पेहरावात छानच दिसते’ हे सासुबाईंचे वाक्य तिच्या मनात बराच वेळ घोळत राहिलं.
समाप्त.
©️®️ सायली जोशी.
सदर कथा लेखिका सायली जोशी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखिकेची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी. कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ (नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.