बालविवाह 

©®सौ.दिपमाला शशिकांत अहिरे. 
“अंग ते बघ मम्मी किती लहान आहेत ते सर्व मुलं मुली आणि इथे एकटे जमुन सर्व छान पार्टी करतायेत.”
झोपाळ्यावर बसलेली मुक्ता आपल्या आईला हाताने खुणावत सांगत होती.
मुक्ता ने लांबलेल्या बोटाच्या दिशेने जेव्हा सुधा ने पाहिले तर तिलाही जरा आश्चर्यच वाटले.. आणि ती आपली मुलगी मुक्ता ला म्हणाली, “अगं हो खरंच की,किती लहान आहेत ती सारी मुलं असतील ना ती पाचवी सहावीच्या वर्गातील?”
सुधा आणि तिची नववीच्या वर्गात असलेली मुलगी मुक्ता दोघीही सायंकाळी फिरण्यासाठी घराजवळच असलेल्या एका बगिच्यात रोज यायच्या. बगिचा छान मोठा आणि सुंदर होता. तिथे लहान मुलांना खेळण्यासाठी मोठमोठे झोके , घसरगुंडी, वेगवेगळ्या प्रकारच्या खेळणी होती. म्हणून सायंकाळी तिथे बरीच वर्दळ असायची.

काही बायका आपल्या लहान लहान बाळांना खेळण्यासाठी, फिरवण्यासाठी घेऊन यायच्या..बगिच्या बराच मोठा होता..त्याच्या एका बाजूला एक कॅन्टीन होती. छोटीच होती..पण चांगले दहा बारा टेबल, खुर्ची होते. त्याशिवाय नाश्ता साठी बरेच वेगवेगळे पदार्थ होते.. लहान मोठे सर्वांना खाता येतील असे सर्व व्हरायटी उपलब्ध होते, चहा, कॉफी, शीतपेये, आईस्क्रीम सर्व मिळत होते. म्हणुन काही कॉलेजात जाणारी मुलं मुली ही तिथे यायची..
पण आज जरा नवीनच गोष्ट पहायला मिळाली होती.. 
पाचवी ते सहावीच्या वर्गात शिकणारी छोटी छोटी दहा ते वीस मुलं मुली त्या कॅन्टीन मध्ये जमली होती.. त्यांच्या पैकी एका मुलीचा वाढदिवस होता.. आणि तो साजरा करण्यासाठी ती सर्व मुलं तिथे जमली होती.. सर्वांचा एकच कल्लोळ आणि गोंधळ होता.

ओरडणे काय नी गाणे म्हणने काय, नुसता उत्साह संचारला होता जणु त्यांच्यात..सर्वांनी छान सुंदर सुंदर कपडे घातले होते. त्यांच्यापैकी जी बड्डेगर्ल होती, तिनेही छान ड्रेस घातला होता. तिचे सर्वे मित्र मैत्रिण तिला शुभेच्छा देत होते.. तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता..त्या सर्व गर्दी मध्ये मुलांची संख्या जास्त होती त्यामानाने मुली अगदीच पाच सहा होत्या.. बाकी सर्व मुलं होती..
सर्वांनी मिळून तिच्या साठी सरप्राइज केक अरेंज केला होता. आणि थोड्याच वेळात तो केक आला होता…तो केक पाहून मुक्ता आपल्या मम्मी ला म्हणाली, “वॉव रेड वेलवेट केक कित्ती छान आहे ना मम्मी? तिचे फ्रेंड खरंतर खूप छान आहेत. त्यांनी तिच्या साठी इतका सुंदर केक मागवला आहे.”

लगेचच केक कटिंग झाली आणि बड्डे गर्ल ला केक खाऊ घालण्यासाठी सर्वांची एकच घाई उडाली.. नंतर सर्वांनी काही तरी छान स्नॅक्स मागवले.. गप्पाटप्पा आणि हासी मजाक करुन सर्व छान आपल्या पार्टी चा पुरेपूर आनंद घेत होते.. आणि तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता…
त्यांना सर्वांना एवढे खुश पाहुन शेवटी मुक्ता आपल्या मम्मी ला प्रश्न विचारू लागली.
ज्याचा अंदाज सुधाला आधीच होता.. आणि आता तिला मुक्ताच्या काही शंकांचे निरसन करायचे होते हे सुधाला लक्षात आले होते.
“मम्मी बघ ना किती लहान मुलं आहेत ती.तरी किती एन्जॉय करताहेत बघ..एकटेच आले आहेत ना ते पण आपल्या फ्रेंड च्या बर्थडे पार्टीला..मी तुला कधीही विचारले मी माझ्या फ्रेंड्स सोबत जाऊ का पार्टी ला, फिरायला, बर्थडे ला तु नेहमीच मला नाहीच म्हणते. मी तर एवढी पण लहान नाही ना. ते बघ सर्व पाचवीचे मुलं आहेत. मी तर आता दहावीला जाणार आहे. पण तु आहेस की,अजुनही मला एकटीने कुठे ही जाऊ देत नाही..सारखी आपली नाही नाही म्हणतेस..आता हे मुलं मुली बघ ना आलेच आहेत ना? त्यांच्या पॅरेंट्सने दिलीच असेल ना परमीशन त्यांना..”

मुक्ता च्या या बोलण्यावर काय उत्तर द्यावे सुधाला हा मोठा प्रश्न पडला होता…कारण आजकालच्या मुलांप्रमाणे आपली मुलगी आभ्यासा व्यतीरीक्त इतर गोष्टींकडे आकर्षित होऊ नये आणि त्यामुळे तिच्या भविष्यावर, करीअर वर कुठलाही वाईट परिणाम होऊ नये असेच सुधाला वाटायचे.. म्हणून ती मुलीला नेहमीच समजावत असायची.
हे वय नाही बेटा या सर्व गोष्टी करण्याचे हे आभ्यासाचे,शिकण्याचे वय आहे.. मुक्तालाही आपल्या मम्मी च्या सर्व गोष्टी पटायच्या.. आणि ती ऐकायची सुध्दा..
पण आज जो प्रश्न होता. त्याचे योग्य उत्तर देणे एक आई म्हणून सुधासाठी जरा कठीण होते…म्हणून ती थोडावेळ शांत बसली. पण मुक्ता च्या प्रश्नांना योग्य उत्तर तिला द्यायचेच होते.. तिच्या डोक्यात पुर्ण वेळ तोच विचार चालू होता.

काही वेळानंतर मुक्ताच्या बाजुला असलेल्या रीकाम्या झोपाळ्यावर एक मुलगी येऊन बसली..
मुलगीच होती ती ‌पण लग्न झालेली. जवळपास ती मुक्ता च्या वयाचीच वाटत होती..तिने हातभार लाल बांगड्या घातल्या होत्या.. आणि लालभडक साडी नेसली होती..हातावरची मेहंदी पहता असे वाटत होते की, आत्ताच सात आठ दिवसांपूर्वी लग्न झाले असेल…
झोपाळा पाहुन तिला झालेला आनंद तिच्या चेहऱ्यावर अगदी तसाच दिसत होता.
जसा तो रेड वेलवेट केक कापतांना मघाशी त्या बर्थडे गर्ल च्या चेहऱ्यावर होता..तोच अल्लड पणा.. आणि आनंदात ती जोराने झोका घेऊ लागली. समोरून येणाऱ्या इसमाला पाहुन तिने झोक्याचा वेग कमी केला आणि आपल्या डोक्यावरचा पदर सावरु लागली.
आता मात्र ती हिरमुसली होती..

तिच्या चेहऱ्या वरचा आनंद कुठल्या कुठे पळून गेला होता. तो इसम जवळ आला आणि येऊन समोरील बाकावर बसला.. तिच्या पेक्षा सहा सात वर्षांनी मोठा वाटत होता..
सुधा आणि मुक्ता तिचे केव्हा पासून निरीक्षण करताहेत हे तिच्या अजुनही लक्षात आले नव्हते..
सुधाकडे बघुन ती स्मित हसली…
सुधाने हसतच तिला विचारले “काय नाव गं तुझं?”
“रंजना” ती म्हणाली.
सुधा तिच्या शी बोलु लागली “तुझं लग्न कधी झालं बाळा, आणि ते तिथे बसलेत,ते तुझे मिस्टर आहेत का?”

ती म्हणाली “हो तो माझा नवरा हाय..दहा बारा दिवस झालेत आमच्या लग्नाला.मला झोपाळ्यावर बसायला,उंच उंच झोके घ्यायला खुप आवडतं..मी माझ्या नवऱ्याला बोलले होते. म्हणुन ते घेऊन आलेत मला इथे..पण थोड्याच वेळासाठी..लगेच जावं लागणार मला स्वैपाक करायचा हाय ना म्हणून.”
सुधा -“तु शाळा शिकली आहेस का गं रंजना, आणि तुझ्या आईवडिलांनी तुझं लग्न एवढ्या लवकर का केले?”
रंजना – “माझा बा हातमजुरी करतु,आई लोकाची धुणीभांडी करती..पण आईनं मला शाळात टाकलं होतं..तिची लय इच्छा हुती मी शिकुन काही तरी नवकरी करावी..आता मी दहावीच्या वर्गात व्हती.. पण आमच्या बापानं माझं लगीन लावुन दिलं.ते बी माला न ईचारता.. आईचं कायीबी आयकलं नाही त्यांनं..मला बी शिकायचं व्हतं आणि शाळेतली मास्तरीण बनायचं होतं..पण बा नं शाळातुंन उठवून घेतलं आणि लगीन लावुन दिलं…”

रंजना च्या डोळ्यात अश्रू आले.. समोर बसलेल्या तिच्या नवऱ्याने तिला हाताने खुणावले आणि ती लगेच झोक्यावरुन खाली उतरून आपल्या डोक्यावरील पदर सावरत खाली मान घालून त्याच्या मागे चालू लागली..
मुक्ता आणि सुधा तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे एकसारख्या पहात होत्या..
सुधाने मुक्ता कडे वळुन पाहिले..तर मुक्ता रंजना कडे च पहात होती.. मुक्ता कडे बघता सुधाला असे वाटत होते जणु मघाशी पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मुक्ता ने स्वतः च शोधले होते.. तरीही सुधाने आपल्या लेकीला सांगितले.
“ही बघ बेटा ही रंजना जिला शिकायचे होते. शिक्षीका बनायचे होते. पण लग्नाचे वय नसतांनाही तिचे लग्न लावून दिले.. हातातील पुस्तक काढून घेऊन शिक्षण बंद केले..अशा अनेक रंजना आहेत.ज्यांना शिकण्याची खुप इच्छा असुनही शिक्षण सोडावे लागते.. एकाच वेळी पाहिलेल्या या दोन वेगवेगळ्या घटना बघ ना तू ती एवढीशी मुलं आपल्या मित्रमैत्रिणींसोबत पार्टी करताहेत.आणि ही एवढ्या कमी वयाची मुलगी लग्नाच्या बेडीत अडकुन पडली..

तिची ती लाल साडी बघ तिच्या अंगावर किती जिवघेणी वाटते आहे… तिच्या कडुन तो पदरही सावरला जात नाहीये. ती संसार काय सावरणार? तिच्या दृष्टीने विचार केला तर तिच्या साठी आजच्या घडीला काय महत्वाचे असेल बरं, पार्टी एन्जॉय करणं की तिच्या हातुन सुटलेलं तिचं पुस्तक.. आपण कसं असतो ना जे चांगलं आणि एन्जॉय करण्यासारखं असेल त्याच्याच कडे जास्त आकर्षित होतो. पण अजुनही काही गोष्टी अशा आहेत ज्यांच्याकडे दुर्लक्ष करतो.. जसा रंजना चा झालेला बालविवाह. आपल्याला एवढं तरी स्वातंत्र्य आहे की, आपण आपल्या मर्जीने शिकु शकतो, जे पाहिजे ते बनुन आपल्या पायावर उभं राहु शकतो, आत्मनिर्भर आणि सक्षम बनु शकतो. जे एका मुलीसठी, बाईसाठी खुप गरजेचे आहे आणि ते मिळवण्यासाठी आपल्याला योग्य वयात योग्य मेहनत घ्यावीच लागते..

मला वाटतं मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. आता तुझं तु ठरव तो रेडवेलवेट केक चा आनंद मोठा की, रंजनाच्या लाल साडीचे दुःख मोठे… थोड्या वेळापुरता आनंद देणारी ती बालपार्टी चांगली की, लाल बांगड्या परीधान केलेल्या रंजना च्या बालविवाह च्या आयुष्यभर भोगाव्या लागणाऱ्या यातना मोठ्या..”
एकंदरीत मुक्ता च्या चेहऱ्याकडे पाहून सुधाला वाटत होते की, तिला तिच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली होती. आता दोन्ही मायलेकी हातात हात घेऊन घराकडे निघाली होती. आणि पश्चिमेला सुर्य ही अस्ताला आला होता.. त्याच्याही लालीमा सोडणाऱ्या छटा जणु सांगत होत्या.. “बालविवाहाचे होरपळणे नको… नको ते लाल साडीत वावरणे”.
©®सौ.दिपमाला शशिकांत अहिरे. 
सदर कथा लेखिका सौ.दिपमाला अहिरे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही. या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखिकेची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी.
कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ ( नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
धन्यवाद.!!!
📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!