©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे
“नेहा, ए नेहा..”
“काय गं आई?”
“बेटा जरा आजोबांना हे एवढे थालीपीठ आणि चटणी दे ना.”
“ए आई तूच दे .मला जायचं आहे कॉलेजला, ऑलरेडी मी लेट झाले आहे.”
“बरं..ठीक आहे.देते मी तू जा.अगं पण तुझा डब्बा घेतलास ना? आज तुला वडाकांदा आणि चपाती दिलीये.”
“हो गं आई घेतला डबा.चल बाय..”
“बाय बेटा..हळूच जा.”
वैशालीने पटकन गरम थालीपीठ सासू सासऱ्यांना दिलं. थोडा वेळ वैशाली पेपर चाळत बसली, की लगेच अहोंचा आवाज आला.
” वैशू चहा झालाय का गं माझा?”
” हो हो ..आणते लगेच.तुम्ही फ्रेश तर व्हा आधी.”
वैशालीने चटपटीत पोहे आणि चहा नवरोबांच्या पुढ्यात मांडले.
“चिन्मय उठला का गं?”
“हे काय त्यालाच उठवायला चालले. अरे चिनू, उठ बेटा.बघ मी आज तुला मस्त ब्रेड सँडविच बनवणार आहे,डब्ब्यात पण हवेत ना तुला बेटा,चल आवर पटकन.”
” वाव आई! सँडविच? मस्त! मी लगेच अंघोळ करून तयार होतो.”
वैशालीने मस्त गरम सँडविच चिन्मयसाठी बनवले आणि त्याचा डब्बाही भरला. सारे आपापले आवरून बाहेर पडले.
दुपारी पुन्हा वैशाली स्वयंपाकाला लागली. भेंडी फ्राय,खिचडी, गरम गरम चपाती यावर सासू सासऱ्यांनी ताव मारला आणि ते तृप्त झाले.
सकाळपासून काहीही न खाल्लेली वैशाली निवांत जेवायला बसणार तेवढ्यात सासूबाई म्हणाल्या,” सूनबाई, अगं आज एकादशी आहे, त्या सरोदेबाई मला सांगत होत्या. तू तरी धर गं बाई आजचा उपवास! आम्ही आता म्हातारे झालोय, आम्हाला काही उपास तापास सहन होत नाही. बाकी घरातलं तर कोणी धरणार नाही, तेव्हा तू तरी हे पुण्य कर्म कुटुंबासाठी करावं म्हणून उपवास कर बाई.”
वैशालीने पुढ्यात घेतलेले गरम गरम ताट तसेच बाजूला सारले आणि हिरमुसला चेहरा करत ती म्हणाली,” हो आई.. धरते मी एकादशी !”
खरं तर वैशाली देवाची पूजा अर्चा ,उपास तापास खूप करत असे पण मागचे दोन्ही दिवस तिने ऑलरेडी उपवास केलेला होता. म्हणून आज ती जेवणावर मस्त ताव मारणार होती पण सासूबाईंनी एकादशीची आठवण केली आणि देवासाठी तसेच घरच्यांच्या भल्यासाठी इच्छा नसताना तिने एकादशी धरली.
खरं तर एकीकडे ती जरा नाराज झाली होती, पण दुसरीकडे बरं झालं सासूबाईंनी आज आठवण करून दिली आणि आपली एकादशी वाचली, नाहीतर जेवण करून आपण हा पुण्याचा उपवास मोडला असता, असा विचार करत तिने कच्चे शेंगदाणे आणि गूळ तोंडात टाकला. एव्हाना एवढे सारे पदार्थ इतरांसाठी करून पुन्हा स्वतःसाठी पापडी,वेफर्स तळायचे तिचे जाम जिवावर आले होते. खूप भूक लागलेली असल्याने तिने एक राजगिरा लाडू खाऊन जरा अंग टाकले.
तिला चांगलाच डोळा लागला.
कॉलेज सुटल्यावर नेहा घरी आली. तिने आपली स्कूटी दारासमोर लावली आणि बॅग घेऊन ती दाराजवळ आली.
‘अरे आज दार उघडच कसं काय? आत्ता तर ४ वाजलेत. मी तर रोज याच वेळेत घरी येते. बंद असलेले दार आई रोज उघडते. मग आज असं कसं काय झालं? आई झोपली, तेही दार उघडे ठेऊन?’
नेहा स्वतःशीच पुटपुटत होती. ती आत गेली तेव्हा आई बेडरूममध्ये झोपलेली होती आणि आज्जी आजोबा त्यांच्या खोलीत झोपलेले होते.
नेहाने आईच्या अंगाला हलकेच हात लावला तेव्हा आईला ताप असल्याचे तिला समजले. तिने दुसऱ्या खोलीत जाऊन तडक फॅमिली डॉक्टरला(सुनीता) फोन केला आणि ती वैशुला तपासण्यासाठी आली.
सुनीता आल्याची अजूनही वैशुला चाहूल लागलेली नव्हती.
“ आई, सुनीता ताई आली आहे. उठ बरं..” नेहा आईला म्हणाली.
” अरे सुनीता तू? कोणी बोलवले तुला? सगळे बरे आहेत ना घरात? बापरे! मला आज एवढी कशी झोप लागली?”
” सगळे ठणठणीत आहेत आई घरात!” नेहा.
“ नेहा काय झालंय? सांगशील का नीट? ”वैशू
“आई, तू पण माणूसच आहेस हे कसे काय विसरते गं तू? खूप थकल्यावर आणि आजारी असल्यावर झोप लागणारच ना!”
“छे!मी नाहीये आजारी!” उठायचा प्रयत्न करत असतानाच वैशू तोल जाऊन पडली.
“तुम्हा दोघींचं झालं असेल तर मी बोलू?” डॉक्टर सुनीता. वैशू आणि नेहा डॉक्टर सुनीता यांच्याकडे पाहू लागल्या.
“ हो, हो. ” नेहा
“ मी आधी वैशुताईला तपासते मग कळेल काय झालंय ते!” डॉक्टर सुनीता.
डॉ.सुनीता यांनी स्टेथोस्कोप काढला. पडून असलेल्या वैशुताईला चेक केले. तिचे अंग गरम असल्याने ताप देखील मोजला.
“वैशुताई,तुला ताप आहे. अंगात कणकण जाणवते का? थकवा आहे का?”सुनीता
“हो,पण हे असं एकाएकी कसे काय झाले कुणास ठाऊक?”वैशु
” डॉक्टर ,माझी आई दोन दिवसापासून सलग उपवास करतेय.त्यामुळेच ती आजारी पडली आहे..”नेहा
“ मग? आज कुठला उपवास आहे?”सुनीता
“ आज एकादशी आहे.”वैशू
” वाह आई . तू आमचे जेवण साग्रसंगीत बनवत जा बरं का ? आणि स्वतः मात्र अशीच उपाशी राहत जा. नेहमीप्रमाणे गूळ शेंगदाणे, राजगिरा लाडू एवढेच खाल्ले असेल हो ना?”नेहा
“नेहाचा होणारा त्रागा मला समजतो आहे. वैशूताई, डॉक्टर या नात्याने मला तुमच्या धार्मिक भावना न दुखावता महत्वाचे असे सांगायचे आहे की अतिउपवास शरीरास घातक ठरू शकतो. बरं तुम्हाला उपवास करायचाच असेल तर भरपूर फळे,ज्यूस,पौष्टिक लाडू असा आहार घेणे योग्य ठरते पण पूर्ण वेळ असे उपाशी राहून स्वतःकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. मी या गोळ्या देते पण आधी तुम्हाला पोटभर जेवण करावे लागेल.”सुनीता
” हो डॉक्टर. मी जेवते आता.”वैशू
“ गूड.बरं येते मी.”सुनीता
डॉ सुनीता निघून गेली.
“ सुनीता ताईने सांगितलं ते कसं लगेच ऐकलंस? मी सांगते तेव्हां मात्र माझ्याकडे सरळ दुर्लक्ष करतेस!”नेहा
“नेहा प्लीज!शांत होतेस का तू ?”वैशू
“ मग माझे ऐकत जाशील का तू?”नेहा
“ ऐकेन गं बाई तुझेही!” वैशू
“ आता मी ताट करून आणते.तेवढं सगळं संपवायचं , गोळ्या घ्यायच्या आणि झोपायचं. समजलं?”
“ झोपून कसं चालेल मला?” वैशू
” आई तू आज काहीच करायचं नाही.फक्त आराम करायचा.आज्जी आणि मी बघून घेऊ किचनचे काम आज.”नेहा
” अगं पण तुम्हाला जमेल का?”
” हो जमेल गं!तू बस.मी आलेच .”
नेहाने आज्जीची मदत घेऊन उपवासाची छान बटाटाभाजी आणि राजगिरा पराठा बनवला. ताटात यासोबतच सफरचंद,दही, केळी शिक्रन असे पदार्थ वाढले.
लेकीच्या हातचे एवढे जिन्नस चाखतांना वैशूला अश्रू दाटून येत होते.
नेहा वैशुला शांत होऊन निवांत जेवण कर असे सांगत होती.
संध्याकाळची वेळ होती. सारे जण टीव्ही बघत होते,तेव्हा नेहा म्हणाली, ” आई आज तुला अचानक ताप आला कारण मागील तीन दिवसापासून तू नीट जेवली नव्हतीस. आमची आवड जपता जपता तू स्वतःकडे सदैव दुर्लक्ष करत आली आहेस. म्हणून तू आजारी असलीस की आणि रविवारी सुद्धा आज्जी आणि मी किचन सांभाळत जाऊ. तू तेव्हा फुल आराम करायचा. तुला काय पदार्थ खावा वाटतो ते सांगायचं. मग मी आणि आज्जी बनवत जाऊ. हो की नाही आज्जी?”
” बरोबर बोलतीये नेहा, वैशू..आम्हाला तू तुझी खूपच सवय लावली आहेस. आम्ही देखील ऐकलं सुनीताचं बोलणं. तुलाही आराम हवाच आणि हो उपास तापास पण मोजके धर बाई. माझं आज जरा चुकलंच..मी उगाच तुला आठवण करून दिली एकादशीची. पण असो या दिवशीसुद्धा पैष्टिक अशी फळं, केळीचे शीक्रन,दही,शेंगदाणे गुळ लाडू,उपवासाची भाजी भाकरी खायची बरं का. देवाला केवळ भाव महत्वाचा आहे.”
” चालेल आई.” असे वैशू म्हणाली,आणि नेहा वैशुच्या कुशीत शिरली.
सोबतच वैशूचे सासरे आणि अहोंनीही या सुखद बदलाचा स्वीकार केला.
अशा रीतीने नेहाने आपल्या आईला सावरत, घरात मोठा बदल घडवत वातावरण हलके फुलके केले.वैशूची एकादशी आज खऱ्या अर्थाने फळास आली होती.
©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे.
सदर कथा लेखिका सौ. प्रियंका शिंदे बोरुडे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.