पुनश्च ( भाग 1)

This entry is part 1 of 4 in the series पुनश्च

© धनश्री दाबके
बर्‍याच वेळापासून शालिनी कपाटासमोर उभी होती, कुठली साडी नेसावी या विचारात. एकतर आज खूप दिवसांनी साडी नेसायची होती आणि अनेक वर्षांनी शंतनू बरोबर एकत्र कुठेतरी जायचं होतं.
शेवटी अमेयने गेल्या वर्षी तिच्या वाढदिवासाला घेतलेली साडी शालिनीने निवडली आणि छानपैकी तयार होऊन शालिनी ठरलेल्या वेळेला शंतनूच्या ऑफिसमधे पोचली. 
इतक्या वर्षांनी शालिनीला असं ऑफिसमधे पाहून शंतनूला एकदम त्यांचे लग्न नवं असतांनाचे दिवस आठवले.

‘तेव्हाही ही अशीच संध्याकाळी ऑफिस सुटायच्या वेळी यायची आणि मग दोघं कधी लॉंग ड्राईव्हला, कधी मूव्हीला तर कधी शॉपिंगला जायचो. काय सुरेख दिवस होते ते ! मंतरलेले! एकमेकांच्या सहवासासाठी आसुसलेले, सहजीवनाची स्वप्नं रंगवणारे, एकमेकांत विरघळलेले दोन जीव.. किती सुखी होतो..काय काय ठरवलं होतं तेव्हा, खूप काही करायचं होतं हिच्यासाठी, आपल्यासाठी, पण पुढे सगळं वेगळंच घडलं..असो’ मनातले हे विचार झटकून शंतनूने तिला पाहून त्याचं नेहमीचं मंद स्मित केलं.

खरंतर शालिनीलाही तेच जुने दिवस आठवत होते.
तिनेही फक्त हसून त्याच्याकडे पाहिलं आणि दोघं गाडीने निघाले.
अर्धा पाऊण तासांचा ड्राईव्ह होता अमिताच्या घरी जाण्याकरता.
अमिताने ॲड्रेस व्हॉट्स अप केला होताच. मॅपवर ॲड्रेस टाकून दोघं निघाले. कारमधे एकदम शांतता होती. मधेच एका दुकानासमोर शंतनूने गाडी थांबवली.

“त्यांच्याकडे द्यायला काहीतरी घ्यावं लागेल ना? मी मिठाई आणतो” असं म्हणून शंतनू स्वीट्सच्या दुकानात शिरला. काऊंटरवरच्या मुलाला अर्धा किलो काजूकतली पॅक करायला सांगतांना शंतनूची नजर समोरच ठेवलेल्या रसमलईकडे गेली.
शालिनीला आवडते म्हणून त्याने रसमलईही पॅक करून घेतली.
“दोन दोन?” शंतनूच्या हातातल्या पिशव्यांकडे बघून शालिनीने विचारलं.
“हो एक अमिताकडे द्यायला. अमेय म्हणाला होता ना तिला काजूकतली आवडते म्हणून..आणि दुसरा तुझ्यासाठी..तुझी  आवडती रसमलई आहे त्यात.”

“तुझ्या लक्षात आहे म्हणजे अजून, मला वाटलं विसरला असशील..”
“मी काही विसरलो नाहीये शालू..”
“___”
“ओह! आय मीन शालिनी. मला तुझा मूड घालवायचा नव्हता शालिनी, but it just happened..sorry. अमेयचं लग्न लागेपर्यंत आपण एक टीम आहोत असं ठरवलंय ना आपण.. so chill now.. तुझा मूड ठीक कर. please? अमेयसाठी?”
काही न बोलताच शालिनीने परत खिडकी बाहेर नजर वळवली आणि शंतनूने गाडी सुरू केली.

तासाभरात दोघं अमिताच्या घरी पोचले. अमितानेच दार उघडले आणि “या या” म्हणून गोड हसून त्यांचं स्वागत केलं.
“आई sss अमेयची ममा आणि डॅड आलेत ग.” म्हणत जोरात आईला वर्दीही दिली.
“अगं हो हो..आलेच” म्हणत अमिताची आई, चारू बाहेर आली. तिनेही “या या.. बसा ना” करत शालिनी आणि शंतनूला आत यायला जागा करून दिली.  
इतक्यात अमिताचे बाबा आले, शंतनूशी हात मिळवत म्हणाले, “हॅलो.. मी अजित साठे.”
“हाय.. मी शंतनू गोखले.. आणि ही शालिनी, अमेयची आई..”

“नमस्कार” शालिनीने हसून नमस्कार केला.
“अमेय आणि अमिता यांच्या भेटीगाठी हल्ली एवढ्या वाढल्यात की आता आपणही भेटायला हवं असं आम्हाला वाटलं.” अजित हसत हसत म्हणाला.
“हो, बरंच झालं तुम्ही आज आम्हाला इथे बोलावलत ते.. नाहीतरी मी अमेयला म्हणणारच होते की अमिताच्या आईवडलांशी ओळख करून दे म्हणून. कारण हल्ली आमच्याही घरात अमिताशिवाय दुसरा काही विषयच नसतो ना” शालिनी हसत हसत म्हणाली आणि वातावरण एकदम मोकळं झालं.

“म्हणजे तसं अमेयला आम्ही गेली दोन तीन वर्ष ओळखतोय पण आपल्या भेटीचा योगच आला नाही कधी.” चारू म्हणाली.
“हो ना !  क्लासनंतर हिला इथे सोडूनच अमेय घरी यायचा ना. त्यामुळे तुम्हाला अमेयला ओळखत असणारच. मीच नव्हते भेटले कधी अमिताला!” म्हणून शालिनीने हसून अमिताकडे पाहिलं.
“अमेय डायरेक्ट ऑफिसमधून येतोय ना!” चारूने विचारलं.
“हो, आता नोकरी लागल्यापासून इतका बिझी झालाय अमेय की काही बोलायची सोय नाही. रोज उशीरानेच येतो घरी. आजही मला लेट होईल तर तू डॅड बरोबर ये, मी डायरेक्ट तिकडेच येतो असा फक्त एक मेसेज केलाय त्याने दुपारी. त्यानंतर काहीच मेसेज नाहीये त्याचा. तुला बोललाच असेल ना ग अमिता, किती वाजता येतोय ते? ” शालिनीने विचारलं.

“हो.. येतच असेल तो आता..थोड्यावेळापूर्वीच निघालाय ऑफिसमधून” अमिताने अपडेट दिलं.
“या ना तुम्हाला घर दाखवते..” म्हणत चारूने दोघांना आत बोलावले.
प्रशस्त दिवाणखाना, त्याला लागूनच स्वैपाकघर, मग मागे मोठी तरीही अगदी आखीव रेखीव बाग. एकदम शिस्तीत कापलेले लॉन, त्यावर मध्यभागी ठेवलेले वरती छत्री असलेले  टेबल, भोवताली नाजूक डीझाईनच्या खुर्च्या, आयताकार लॉनच्या दोन्ही बाजूला लावलेली शोभेची आणि गुलाब, जास्वंद व इतर फुलांची झाडं. आपल्या विविध रंगांनी बघणाऱ्याच्या मनाला प्रसन्न करून टाकणारी ती बाग शालिनीला खूप आवडली.

स्वैपाकघरातल्या ओट्यावरची लांबच्या लांब खिडकी बागेत उघडत होती.. त्यामुळे स्वैपाकघरात भरपूर उजेड आणि खेळती हवा होती. भिंतीवरल्या टाईल्सही छान फळाफुलांच्या चित्रांच्या पॅटर्नच्या होत्या. अगदी उठून दिसणाऱ्या.
एकंदरीतच घरातल्या रंगसंगतीचा चॉईस छान होता. वरच्या मजल्यावर तीन मोठ्या बेडरूम होत्या.
गावाबाहेर असलेला हा साठ्यांचा बंगला फारच छान आणि प्रशस्त होता आणि त्यांनी तो जपलाही तितकाच छान होता.

बंगला बघून आल्यावर शालिनी आणि चारू स्वैपाकघरात गप्पांमधे रमल्या.
अजित आणि शंतनू परत सोफ्यावर स्थिरावले.
चारूने बोलता बोलता एकीकडे चहा टाकला आणि दुसऱ्या गॅसवर भजी तळायला घेतली.
इतक्यात अमेयही येऊन पोचला.  
शंतनू व शालिनीला असं एकत्र आणि रिलॅक्स्ड बघून त्याला फार छान वाटलं. मग चहा आणि भज्यांसोबत मस्त गप्पा रंगल्या.

दोन्ही फॅमिलींची बॅकग्राऊंड, नातेवाईक, अमिताचे पुढचे मास्टर्स करण्याचे प्लॅन..बरेच विषय डिस्कस झाले. नुकतीच डीग्री मिळवून डिस्टिंक्शनने पास झालेली चुणचुणीत अमिता  शालिनीला आवडली.
शिवाय चारू आणि अजितही फॅमिली व्हॅल्यूज आणि सस्कांरांची जाण असलेले, डाऊन टू अर्थ कपल वाटले.
अमिता आणि अमेयची घट्ट मैत्री, त्यांच्या वागण्यातली सहजता, एकमेकांविषयी असलेली ओढ, अंडरस्टॅन्डिंग हे सगळं सगळं खूप छान आहे आणि दोघं पुढे नक्कीच सुखाने नांदतील अशी खात्री वाटली.

फक्त अमिताला पुढे मास्टर्स करायचंय आणि अमेय मात्र पुढे न शिकता नोकरीच करायची आहे म्हणतोय हा एवढाच मुद्दा तिला खटकत होता. शिवाय अमिताला मास्टर्स करायचंय हे ऐकल्यावर काही क्षणांपुरता का होईना पण शंतनूचा बदललेला चेहरा तिच्या नजरेतून सुटला नव्हता.
मग चारूच्या पाककलेचं कौतुक करत करत सगळ्यांनी मटर पनीर, पराठे, पुलाव आणि गुलाबजाम हा अमेयच्या खास आवडीचा बेत फस्त केला. जेवून खावून प्रसन्न चित्ताने ‘पुढे भेटतच राहू आता’ असं ठरवूनच शालिनी, शंतनू आणि अमेय बाहेर पडले.

शालिनी आणि अमेय अमेयच्या गाडीतून घरी आले आणि शंतनू त्याच्या गाडीने त्याच्या घरी निघून गेला.
पण निघतांना त्याने आठवणीने संध्याकाळी घेतलेला तो रसमलईचा बॉक्स अमेयकडे दिला.
“ममा कशी गेली संध्याकाळ?” गाडीत बसल्यावर अमेयने विचारले.
“अरे छानच.. चांगली आहेत माणसं. अमिताही गोड आहे अगदी. हुशारही आहे, शिवाय तुला पसंत आहे ना मग काय ! घरही मस्त आहे रे त्यांचं.” शालिनी मनापासून बोलत होती.

“हो..अमिताच्या आजोबांनी बांधून घेतलेला बंगला आहे ना. त्यामुळेच इतका ऐसपैस आहे. ममा, अमिता कशी वाटली?”
“अरे म्हणाले ना चांगली आहे म्हणून.. आता किती वेळा सांगू?”
“तसं नाही.. पण तुला मनापासून पसंत आहे ना ती? की माझं तिच्यावर प्रेम आहे म्हणून तू हो म्हणतीयेस? मी डॅडलाही हे विचारणार आहेच.. पण तरी तुला काय वाटतं ते माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे.”

“मलाही ती पसंत आहेच रे.. नाही म्हणण्यासारखं काही नाहीच तिच्यात. पण अमेय, ती पुढे शिकायचं म्हणतेय.. तेही परदेशी वगैरे जाऊन. म्हणजे अजून दोन तीन वर्ष तर जातीलच त्यात. आणि मग She will be more educated.. “
“ममा, मला कळतंय तुझ्या मनात काय चाललंय ते.. पण माझी खरंच काही हरकत नाहीये त्याला. तिला करायचय तर करू दे ना मास्टर्स. आणि असंही आत्ता आम्ही फक्त तेवीस वर्षांचे तर आहोत. त्यातही अमिताने मधे एक प्लेसमेंट ईयर केलं म्हणून नाहीतर तीही मागच्या वर्षीच BE झाली असती माझ्याबरोबर आणि एव्हाना गेलीही असती कुठल्यातरी लांबच्या देशात.. आणि ममा अजून पुढच्या गोष्टींना, लग्नाला कितीतरी वेळ आहे.

पुढे जाऊन नक्की काय करायचय ते माझं स्वतःचंही काही ठरलं नाहीये अजून.. त्यामुळे मी आधीच अमिताला ही आजची मीटींग खूप लवकर होतेय असं म्हणत होतो. पण तिच्या आईवडलांना तुम्हाला भेटायचच होतं. मग माझा नाईलाज झाला.””अरे बरोबर आहे त्यांचंही. तुम्ही दोघं रात्री उशीरापर्यंत बाहेर फिरता. मग त्यांना वाटणारच ना”
“हम्म.. all parents are same.” अमेय हसत म्हणाला आणि त्याने गाडीचा वेग वाढवला.
आत्ता संध्याकाळ सारखा जास्त ट्रॅफिक नसल्याने दोघं पाऊण तासात घरी पोचले देखील.

“Good night ममा” म्हणून अमेय झोपायला गेला. शालिनीही साडी बदलून अंथरूणावर पडली.आज अमेयच्या रिझल्टनंतर इतक्या महिन्यांनी शंतनू परत भेटला होता.
तेव्हापेक्षा आत्ता अजूनच बारीक वाटत होता. शुगर मेंटेंड ठेवतोय की नाही कोण जाणे.. नाहीतरी शंतनू स्वतःच्या खाण्यापिण्याकडे फारसा लक्ष देणारा माणूस नाहीच.
आधीही त्याच्या जेवायच्या वेळा सांभाळतांना नाकी नऊ यायचे.

किती चिडचिड करावी लागायची तेव्हा कामातून उठून यायचा आणि घाईघाईने दोन घास पोटात ढकलून परत कामाला लागायचा.
त्याच्यावर जबाबदारीच तेवढी मोठी होती म्हणा. त्याच्या ह्याच स्वतःला कामात झोकून देण्याच्या स्वभावावरच तर मी भाळले होते.. किती सुखात होतो तेव्हा दोघं.. पण पुढे पुढे सगळं चुकतच गेलं..
शालिनी भूतकाळात हरवली..
शालिनी देसाई.. एक हुशार, कॉंफिडंट आणि तितकीच देखणी, आई वडलांची एकुलती एक लेक.

शालिनीच्या वडलांची स्वतःची recruitment agency होती तर आई म्युनिसिपल हॉस्पिटलमध्ये क्लार्क होती.
खाऊन पिऊन सुखी आणि समाधानी कुटुंब होते. शालिनीने तिचं BA पूर्ण करून वडलांना जॉईन केलं.
डीग्री मिळाली की घरचीच agency जॉईन करायची हे तिचं आधीपासूनच ठरलेलं होतं.
त्यासाठी लागणारे स्किल्सही तिने कॉलेजच्या शिक्षणाबरोबरच इतर कोर्सेस करून आत्मसात केलेले होते. शिवाय शालिनीचे communication skills ही खूप चांगले होते.

कॅंडीडेट्सशी बोलून त्यांच्या नेमक्या experties आणि experience काढून घ्यायला शालिनीला बरोबर जमायचे.
हळूहळू शालिनी वडलांबरोबर त्यांच्या क्लायंट्स मीटीग्जही ॲटेंड करू लागली.
तशाच एका मिटींगच्या दरम्यान तिची शंतनूशी ओळख झाली.
शंतनू Eagle Infotech नावाच्या कंपनीत डिलेव्हरी लीड म्हणून काम करत होता.

Eagle Infotech ची सगळी recruitment शालिनीचे वडील बघत होते.
त्यामुळे कंपनीतल्या रोल्ससाठी कॅंडीडेट्स पाठवणे, मग शॉर्ट लिस्टेड कॅंडीडेट्सचे interviews ॲरेंज करणे, त्यासाठी शालिनी आणि शंतनूच्या मीटींग्ज, फोन कॉल्स व्हायचे.
शंतनूने बनवलेल्या job specifications साठी शालिनी बरोब्बर शोधून असे नेमके कॅंडीडेट्स पाठवायची की शंतनूचे अर्धे काम तिथेच व्हायचे.

पहिल्या एक दोन interactions मधेच शंतनूला शालिनीच्या बुद्धीची चुणूक दिसली.
सौंदर्य आणि बुद्धीमत्तेचा सुरेख संगम असलेली शालिनी त्याला आवडायला लागली.
शंतनूची हुशारी, त्याची जीव तोडून काम करण्याची वृत्ती आणि त्याची निर्णयक्षमता पाहून शालिनीही इम्प्रेस झाली होतीच. आधी फक्त कामापुरते औपचारिक बोलणारे शालिनी आणि शंतनू हळूहळू कामाव्यतिरिक्तही बोलू, भेटू लागले.

दोघांची मैत्री हळूहळू फुलत गेली. आपण एकत्र सुखाने पुढचे आयुष्य घालवू शकतो असा विश्वास दोघांच्याही मनात निर्माण झाला.
प्रेमाच्या आणाभाकांनंतर दोघं लग्नाच्या हव्याहव्याशा वाटणाऱ्या बंधनात अडकले आणि राजा राणीचा सुखी संसार सुरू झाला.
क्रमश:
एकमेकांच्या प्रेमात पडून सुरू केलेल्या शालिनी आणि शंतनूच्या संसाराची पुढची गोष्ट वाचा पुढील भागात…
© धनश्री दाबके
या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून शेअर करतांना कृपया नावासकटच शेअर करा.
या कथेचे कुठल्याही स्वरूपाचे व्हीडीओ बनवण्यास लेखिकेची परवानगी नाही, व्हिडीओकारांनी याची नोंद अवश्य घ्यावी.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Series Navigationपुनश्च ( भाग 2 ) >>

Leave a Comment

error: Content is protected !!