त्या घरची रीत

© सौ. प्रतिभा परांजपे
शोभाताईंच्या ‌मुलीला, नीताला माहेरी येऊन आठ दिवस झाले, लग्न होऊन दोनच वर्षे झाली, त्यामुळे माहेरी येण्याची ओढ होती.  . आई, बाबा सर्व जण आपापल्या परीने नीता चे लाड पुरवत होते. वहिनी रेखा कामाला हात लावू देत नव्हती.
” माहेरपण अंगावर दिसू द्या कि” असे म्हणत तिच्या हातात ले काम काढून घेत होती. 

“काय हवं आज?” कधी आई, तर कधी आजी विचारत.
बाजार,माॅल फिरून झालं. आवडले ते ड्रेस मिळाले. नीताला आवडते ती भेळपुरी, रबडी,तर कधी चायनीज खाऊ घातलं. 
“आमच्या कडे असा टेस्ट नसतो ग! तिकडे नुसतं तिखट जाळ मिळतं सगळं.” नीता ने तक्रार केली.

“बाहेर खायला जाता कां?”
“हो ग. शनिवारी किंवा रविवारी. फिरायला जातो तेव्हा खाऊन च येतो. जाताना आई म्हणतात, खाऊन येणार असाल तर फोन करून सांग आणि जाताना  तू मला सांगून जात जा असं म्हणतात. “
“कां बरे?”
“काही तरी सामान आणायचे असते न !” नीता हिरमुसून म्हणाली.
“चालायचंच ग. असतो विचित्र स्वभाव एकेकाचा” शोभाताई म्हणाल्या.

असेच दिवस मौजमजा करण्या त गेले नीताचे आणि काल नीता दुपारच्या गाडीने सासरी परत ही गेली.
शोभाताईंना घर अगदी सुनंसुनं वाटत होते. मुलीच्या आठवणी ने डोळे भरून येत होते.
सून  रेखा म्हणाली पण,” आई आज तुम्हाला बर वाटत नसेल तर आराम करा इतके दिवस खूप दगदग झाली”.
“हो ग — नीता गेली सासरी ,अंगातल त्राणच गेल्या सारख वाटत.”

दुसरे दिवशी  शोभाताई काम आटोपून बाहेर हॉलमध्ये आल्या तेवढ्यात त्यांच्या फोन वाजला,  नीता चा त्यांच्या मुलीचा फोन होता.
‘किती वाजता पोहोचला ग— गाडी लेट तर नव्हती? वगैरे विचारपूस झाली.
“वड्या आवडल्या का ग तुझ्या सासूला? शोभाताईंनी मुद्दामच नीताला विचारले.’
“हं” नीता चा स्वर काही फारसा आनंदी वाटला नाही.

“सांगितलं नाही कां कि तू बनवल्यात”? 
“हो– सांगितलं.”
‘ मग’?
‘नारळाच्या वड्या कां? छान आहे’ असं म्हणाल्या.
‘म्हणजे काय? अंबावडी आहे कळलं नाही कां? हं– वाटलंच मला, काsही कौतुक नाही तुझ्या सासूला’.
बरं जाऊ दे आपण फार अपेक्षा ठेवू नये, वगैरे वगैरे बोलून शोभाताईं नी फोन ठेवला.

संध्याकाळी सुभाषराव नीता चे बाबा, मुलगा आनंद घरी आले त्यांनाही वडी दिली.
“पहा बरं कशी झालीये ?आपल्या नीता ने केलीये, बरोबर खाऊ म्हणून घेऊन गेली. तिला माझ्याकडून शिकायची होती.”
“छान आहे पण–आंबा कमी नारळ जास्त जाणवतो.”
“हो– पण पटकन जमायला हवी ना, म्हणून घातला. नीता घेऊन गेली आहे त्यांना आवडली की नाही माहित नाही.
तिच्या सासूबाई फारच नखरेल आहेत कधी कौतुक म्हणून नाही आपल्या मुलीच. बरंच काही सांगत होती नीता.” शोभाताईंनी आपली व्यथा सांगितली.

“असं काही नाही गं. थोडाफार असतो स्वभाव तू इतका विचार करू नको ,सुखात आहे ती.” सुभाषराव म्हणाले. “आर्थिक चणचण नाही हो,जावी पण सुस्वभावी आहे.”
“हो, पण.”
इतका वेळ त्यांच्या गोष्टी मुलगा आनंद व सासूबाई ऐकत होत्या.
“मला तर त्या चांगल्या वाटतात ग स्वभावाने” सासूबाई म्हणाल्या.

“हो आई  गेलो होतो ना दोन दिवस मी व रेखा आम्ही दोघेजण नीताच्या वाढदिवसाला. तिला काहीही काम करून दिले नाही तिच्या सासूबाईंनी, म्हणाल्या आज तुझा दिवस आराम कर. तुला काय आवडतं ते सांग”, सर्व केलं त्यांनी आणि एक ड्रेस पण  दिला ओवाळून.” आनंद म्हणाला.
“तसं करतात रे– पण नीता  सांगत होती काय काय होतं ते? सारख्या चुका काढत असतात तिच्या .आता शिकते आहे एकदम कसे येणार  तिला सगळ.आणि त्यांच्याकडची आणि आपली पद्धत थोडी वेगळीच.

मी काही सारखी कामाल जुंपून ठेवली नव्हती मुलीला , अंगावर पडलं की येतच हळूहळू पण त्यांना पटायला हवं ना?” शोभाताईंची चिडचिड होत होती.
शोभाताईंच चौकोनी कुटुंब, सासूबाई ,शोभाताई, यजमान सुभाषराव, मुलगा आनंद ,आणि सून रेखा .
मुलीचं नीता च लग्न होऊन दोन वर्ष झाली होती. ती माहेर पण करून नुकतीच सासरी परत गेली होती.

संध्याकाळी शोभाताईंची सून इडल्या बनवत होती.
“आई चटणीमध्ये आमचूर  कि लिंबू पिळू,,?”
“अग ह्या चटणीत दही घालतात, काय बाई, एवढे तुला माहित नाही वाटतं.?”
बर-बर- म्हणत रेखा किचनमध्ये गेली.
तिचा उतरलेला चेहरा  पाहून मुलगा आनंद म्हणाला “आई त्यांची पद्धत ही वेगळी असेल, पण तू बोललीस, असंच कधीतरी नीताच्या सासूबाई बोलत असणार.

“अरे पण मग हिला नीट शिकवायला नको कां,? मी काही रेखा ला रागवत बिगवत नव्हते. आपल्याकडची पद्धत सांगत होते.” टीव्हीवरची मालिका पाहत पहात शोभाताई म्हणाल्या.
जेवता जेवता सासूबाई म्हणाल्या”  शोभा  तब्येत बरी नाही का तुझी? काय होतंय बी.पी तपासून घे बरं एकदा, आजकाल तुझी खूप चिडचिड होती आहे”. 
“बी.पी ठीक आहे हो माझं आई” पण—

“शोभा तुला आठवतं का? लग्न होऊन तू या घरात आली तेव्हा तुलाही कामाची मुळीच सवय नव्हती. मी बोलत असे तेव्हा तुलाही वाईट वाटे, पण आज तू माझ्यापेक्षाही तरबेज झाली. पुरणपोळी  , मोदक तर तू आता माझ्या पेक्षा ही छान करतेस.”
सासूबाईंचं बोलणं ऐकून शोभाताईंना आनंद झाला आणि ते दिवस आठवले.
लग्ना आधी आईसारखे रागवत असे, “शोभा ग जरा शिकून घे बाई घरकाम “पण –आपण फारसं लक्ष दिलं नाही.
इकडे आल्यावर मोठ्या सुनेचा मान मिळाला पण जबाबदारीही अंगावर पडली .
मग तारांबळ उडू लागली.

सासुबाई बरेचदा म्हणत” लक्ष कुठे असत तुझं ?एकावेळी एकच कामावर लक्ष दे.” बरेचदा पोळी करपत असे, किंवा कढी उतू जाई तेव्हा सासूच बोलणं फार जीवाला लागत असे.
माहेरी आईकडे गेल्यावर शोभा आई जवळ मनातला राग बोलून दाखवत असे. आई प्रेमाने आपले डोळे पुसत हसून म्हणायची “बर आहे त्या मुळे नीट करता येईल”.
एक दिवस आजी नी समजुत काढली व म्हणाली, “आई जवळ  मनमोकळ करावी पण सारख्या तक्रारीच करू नये, कधी तरी कौतुक ही सांगितले तर तू सुखात आहे हे पाहून तिच्या जीवाला समाधान वाटेल.

 “मला सांग तू सुखात नाही कां त्या घरी “?
‘तसं नाही ग आजी’  मला कामाची सवय नाही ,मी आधी फारसं लक्ष दिलं नाही त्यामुळे गडबड होते..त्यांना कामात व्यवस्थितपणा लागतो. 
‘अग मग चांगल आहे, तू शिक त्यांच्या पद्धतीने मग पहा कधी तरी कौतुक करतीलच.आजी च बोलण थोडंफार पटलं शोभा ला  आणि खरं ही वाटलं.
जसं जसं वय वाढलं तसं तसं सासूबाईंची शिकवण, रागावणे अंगवळणी पडलं, आणि पटायलाही लागलं.

 त्यांच्या धाकामुळे काम नीट करता येऊ लागले . आज त्याच कौतुकाने म्हणतात “माझ्यापेक्षा सुगरण आहे शोभा”
अशीच तर नीताची सासू ही तिच्या चांगल्यासाठीच रागवत असेल, आणि नीता चे वय, या वयात सहनशक्ती कमीच असते , पण आपण तिच्या या स्वभावाला खत पाणी न घालता दुर्लक्ष करायला हवे .
हळूहळू ती त्या घरात रुळेलच नी मग त्या घरच्या रीतीने सर्व करायला लागेल त्या घरची सुगरण ही होईल. असा विचार करत करत शोभाताई झोपी गेल्या.
*********
समाप्त
© सौ. प्रतिभा परांजपे
सदर कथा लेखिका सौ. प्रतिभा परांजपे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

1 thought on “त्या घरची रीत”

  1. खूपच सुंदर आहे कथा पण अजून पुढे निताच व तिच्या भावजयी विषयी वाचायला आवडले असते

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!