ब्रेकअप

© धनश्री दाबके
गेल्या दोन तीन आठवड्यांपासून शरयू रोहनच्या बदललेल्या वागण्याने खूप काळजीत होती. शरयू आणि शंतनूचा एकुलता एक लेक रोहन आर्किटेक्चरच्या पहिल्या वर्षात शिकत होता. रोहन स्वभावाने अतिशय मोकळा आणि मनमिळाऊ होता.
मनात असेल ते पटकन बोलून टाकणारा रोहन हल्ली मात्र खूप गप्प गप्प असायचा. इतर वेळी रोहनची शरयूपाशी सतत बडबड सुरु असायची पण आता अभ्यासाचे कारण सांगून रोहन जास्तीत जास्त वेळ स्वतःच्या खोलीतच घालवायचा. काही विचारलं तर कॉलेज, क्लासेस, अभ्यास आणि ट्रेनच्या प्रवासाने दमलोय हे कारण पुढे करायचा.

कॉलेजच्या ह्या वयात मुलांच्या स्वभावात बदल होतो आणि सतत आई आई करणारी मुलं थोडी अबोल होतात. ह्या वयात मुलांना आईवडलांपेक्षा मित्रमैत्रीणी जास्त जवळचे वाटतात हे शरयूला समजत होते आणि तसा रोहनचा मित्रमैत्रीणींकडचा  ओढा तिला तो नववी, दहावीत असल्यापासूनच जाणवतही होता.
आता अठराव्या वर्षात पदार्पण केलेला रोहन आपल्याला जरी लहान वाटत असला तरी मोठा झालेला आहे आणि त्याचे आपल्यापासून लांब जाणे सहाजिकच आहे हेही तिला मान्य होते. पण तरीही सध्या त्याचं कुठेतरी काहीतरी बिनसलय आणि तो ते आपल्याशी शेअर करत नाहीये ह्या काळजीने शरयूला ग्रासले होते.

नुसताच एकलकोंडा झालाय असं  नाही तर आजकाल रोहनचे खाण्यापिण्यातही फारसे लक्ष नाहीये. फार वेळ मोबाईलवर घालवतोय का? मित्रांबरोबर फिरणे, पार्ट्या किंवा खूप वेळ घराबाहेर रहातोय असं होतय का? किंवा कोणा मैत्रीणीशी त्याची जवळीक वाढतेय का? असे शरयूला जे शक्य होते ते सगळे चेक्स लावून आणि तर्कवितर्क लढवून झाले होते. आणि त्यात वावगं असं काही आढळतही नव्हतं. 
शंतनूला काही सांगितलं की तो म्हणायचा ‘अगं मोठा झालाय तो आता. सारखी त्याच्या मागे मागे राहू नकोस. सगळ्याच मुलांच्या आयुष्यात ही फेज येते. आपलेच कॉलेजचे दिवस आठवना जरा. आपण कसे वागत होतो तेव्हा? आपल्याही आईबाबांना अशीच काळजी वाटली असेल.
मी तर सतत तुझ्याच विचारांत हरवलेला असायचो. सगळ्यांमधे असून नसल्यासारखा. कित्येकदा असं व्हायचं की आई काहीतरी विचारायची जे मला समजायचंच नाही. मग काय रे लक्ष कुठेय तुझं असं तिने जोरात विचारल्यावर मी भानावर यायचो. तेव्हा काळजी करु नकोस. होईल सगळं ठीक.’

पण वरवर शंतनू शरयूला जरी समजावत असला तरी रोहनमधला हा बदल त्यालाही जाणवत होता. नेहमी आनंदी, उत्साही असणारा रोहन आता खूप वेगळा वागतोय. त्याला नक्कीच काहीतरी खुपतय.
पण तरीही आत्ता लगेच त्याला काही विचारण्यापेक्षा अजून थोडा वेळ जाऊ द्यावा. त्याचा मूळ स्वभाव बघता तो फार वेळ गप्प राहाणार नाही आणि आपल्याला सांगेलच त्याच्या मनात जे काही चाललय ते असा विचार शंतनू करत होता.
इकडे रोहन मात्र मनाने पार कोलमडला होता. ज्याला कारण होते त्याची अकरावी पासूनची मैत्रीण ईशा. ईशा आणि रोहन अकरावी बारावीची दोन वर्षे एकाच वर्गात होते आणि आता आर्किटेक्चरही दोघं एकाच कॉलेजमधून करत होते. तसे त्यांच्या बारावीच्या गृपमधले अजूनही दोन तीन मित्र त्यांच्या बरोबर होते. पण रोहन आणि ईशा एकमेकांच्या जास्त जवळ होते. दोघांची वेव्हलेंथ छान जुळत होती. ते सगळं काही एकमेकांशी शेअर करायचे.

गेल्या तीन वर्षांतल्या ईशाच्या सगळ्या गोष्टी रोहनला माहिती होत्या. अगदी ती कशी त्यांच्या बॅचमधल्या आदित्यच्या त्याला पाहाताक्षणी प्रेमात पडली तेही. मग तिची आणि आदित्यची मैत्री, प्रेम, एकमेकांना भेटणे, त्यांच्यात झालेली भांडणे, अबोला, रडारड, एकमेकांसाठी झुरणे हे सगळंच रोहन जवळून पाहात होता.
जवळजवळ गेले दीडेक वर्ष दोघं प्रेमात होते. बऱ्याचदा त्यांच्यात कशाना कशावरुन कुरबुरी व्हायच्या आणि मिटायच्याही . पण गेल्या तीन चार महिन्यांपूर्वी त्यांचे जे काही भांडण झालं ते खूप विकोपाला गेलं आणि दोघांनी ब्रेकअप केलं. रोहनने खूप समजावलं पण त्यांच्यातले गैरसमज वाढतच गेले आणि शेवटी त्यांनी त्यांच्या नात्याला पूर्णविराम द्यायचा निर्णय घेतला.

ह्या घटनेनंतर ईशा खूपच उदास राहू लागली आणि रोहन तिची समजूत काढता काढता नकळत तिच्या खूप जवळ गेला. तिला आधार देण्याच्या प्रयत्नात स्वतःच तिच्यात गुंतत गेला. तिच्या बाजूने जरी त्यांचे नाते आधीसारखेच असले तरी रोहनला मात्र स्वतःला सावरता आले नाही. ती आदित्यच्या प्रेमात होती हे माहिती असूनही तो तिच्याकडे खेचला गेला.
तिच्याशी असलेल्या गाढ मैत्रीमुळे असेल किंवा तिने रोहनवर ठेवलेल्या विश्वासाने असेल किंवा ती खूप दुखावली गेल्याने असेल ईशा नेहमी खुशच रहायला हवी हा एकच विचार रोहनच्या मनात घोळत असायचा. आपण ईशाच्या प्रेमात पडलोय हे जाणवल्यावर रोहनने लगेच आपले मन ईशासमोर मोकळे करायचे ठरवले.

पण नेमकी त्याचवेळी आदित्यने ईशाला परत एकदा भेटायची गळ घातली. ईशा आदित्यला भेटली. विरहात होरपळलेले ईशा आणि आदित्य दोघही परत एकमेकांकडे आकर्षित झाले आणि त्यांच्यात समेट झाला. ईशाने लगेचच खूप आनंदाने रोहनला सगळे सांगितले आणि तिचे परत आदित्य बरोबरचे आधीसारखे रुटीन सुरु झाले.
ईशा आणि आदित्यसाठी जरी हा मधला काळ भरुन निघाला असला तरी रोहनसाठी ईशाशी असलेल्या आधीच्या आणि आताच्या मैत्रीत खूप फरक झालेला होता. आता तो ईशात आपली जवळची विश्वासू मैत्रीण आणि भावी आयुष्याची जोडीदार बघत होता. आणि त्याचे हे स्वप्न भंगल्याने खूप अपसेट झाला होता.
ईशा आता परत आदित्यकडे गेलीये हे स्विकारणे त्याला खूपच जड जात होते आणि दिवसेंदिवस तो अजून अजून निराशेच्या गर्तेत बुडत होता. त्याला आता कशातच इंटरेस्ट वाटत नव्हता. आईबाबांशी बोलावे असे वाटत होते पण कसे ते कळत नव्हते.

रोहनच्या अशाच उदासीनतेत अजून एक आठवडा गेला आणि मग मात्र शरयू आणि शंतनूने त्याच्याशी बोलायचे ठरवले. ह्यावर्षी रोहनचे गावाहून आलेल्या घरच्या आंब्यांकडेही लक्ष नव्हते. दरवर्षी गावाहून आंबे आले की ते कधी एकदा खातोय असे रोहनला व्हायचे. आंबे खायला तयार होइपर्यंतही त्याला दम निघायचा नाही. यंदा मात्र तो कसलाच हट्ट करत नव्हता.
शेवटी शंतनूनेच शरयूला आमरस पुरीचा बेत करायला लावला आणि जेवतांना थेट विषयाला हात घालत रोहनला गमतीत विचारले ” काय रे रोहन. हल्ली मी बघतोय तू खूप शांत शांत आहेस. उदासही आहेस. इतका उदास की तुला आता आमरसही गोड लागत नाहीये. कोण आहे तरी कोण ती समवन स्पेशल जी तुझ्या आणि तुझ्या लाडक्या हापूसच्याही मधे येतेय. आम्हालाही कळू देत की. आम्हीही ह्या सगळ्यातून गेलोय बरं. तेव्हा निसंकोचपणे सगळे सांग. आम्हाला तुझे फ्रेंड्स समजून सांग. जे काही असेल ते सगळे स्पष्ट.”

शंतनूने असा डायरेक्ट प्रश्न केल्याने रोहन चमकला. ” बाबा तुम्हाला कसे कळले?”
“अरे, तुझा बाबा आहे मी. मला कसं नाही कळणार? अशीच खऱ्या प्रेमाची अस्वस्थता मीही झेललीये. तुझी आई आणि मी ह्याच वयात तर भेटलो. आधी फेंड्स, मग bff, मग लव्हर्स आणि आयुष्यभराचे जोडीदार. तेव्हा त वरुन ताकभात ओळखता येतो आम्हाला. मी फक्त तू स्वतःहून सांगशील असं वाटून आधी गप्प होतो. तेव्हा आता कसला विचार करत बसू नकोस आणि तुझं मन आमच्यापाशी मोकळं करुन टाक. Don’t worry. We will not judge you. आता जेवण करुन घेऊ आपण आधी आणि मग बोलू” असं म्हणून शंतनूने त्याला बोलतं केलं.

रोहननेही मग काहीही न लपवता जे झालं ते सगळं मोकळेपणाने दोघांना सांगितले.
त्याचे सगळे ऐकून शरयू म्हणाली ” रोहन, तू किती दिवस हे सगळं मनात ठेवून कुढत होतास रे ? अरे आधीच मन मोकळं करायचस ना. हल्ली मुलामुलींचे ब्रेकअप काय नी डिप्रेशनं काय. इतके एकेक प्रकार कानावर येतात ना की खूप काळजी वाटते रे. मला तर काही सुचतच नव्हतं. बरं झालं आजतरी स्पष्टपणे सगळं सांगितलस.”
“मलाही तुमच्याशी बोलावसं वाटत होतं ग आई. पण मी गोंधळून गेलो होतो. लहानपणापासून मी तुमच्या दोघांमधलं खरं प्रेम, विश्वास,  understading आणि तुम्ही सतत एकमेकांना दिलेली साथ बघत आलोय. तुमच्या दोघांच्या कॉलेजपासूनच्या मैत्रीचे किस्से तुमच्या फ्रेंड्स कडून ऐकलेत.

असंच एक छान आणि आयुष्यभरासाठीचं मौल्यवान नातं मला ईशाशी जोडायचं होतं. बाबा मलाही तुमच्यासारखच ‘one woman man’ व्हायचं होतं. पण नाही जमलं. हल्ली हेच विचार मनात येत रहातात. अर्थात ह्यात ईशाची काही चूक नाहीये. माझ्याकडूनच आमच्या मैत्रीच्या सीमा पार झाल्यात. तिच्याकडून कसलीच गल्लत नाहीये. तीही अशीच ब्रेकअपच्या दुखात होती तेव्हा मी तिला खूप फंडे द्यायचो. पण आता जेव्हा स्वतःवर तीच वेळ आलीये तेव्हा मात्र मला त्यातून बाहेर यायला जड जातय.”
रोहनचे बोलणे ऐकून शरयू आणि शंतनू दोघही विचारात पडले. त्याच्या मनातली तगमग दोघांनाही समजली.

रोहनच मग पुढे म्हणाला ” आता तसं म्हंटले तर हे ब्रेकअपचे प्रकरण फक्त माझ्याच बाबतीत आहे का? तर नाही. माझ्या आजूबाजूच्या जगात सगळीकडे हेच सुरु आहे. कपड्यांप्रमाणे गर्लफ्रेंड/ बॉयफ्रेंड बदलणारी मंडळी आहेत. ये नही तो कोई और सही हाच मूलमंत्र आहे. आणि सगळेजण त्या बाबतीत तेवढेच cool आहेत. पण मला वाटतं की मीच ह्या बाबतीत weak आहे. मला नाही जमते हे सगळं सहजतेने घ्यायला”
घरातले एकनिष्ठ प्रेमाचे, विश्वासाचे जग आणि बाहेरचे क्षणभंगुर आकर्षणालाच खरे प्रेम मानणारे जग. ह्या दोन जगातल्या तफावतीत आपला लेक गोंधळलाय.  त्याला ह्या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी जरा वेळ द्यायला हवा. आणि कसलीही शेरेबाजी न करता त्याला समजून घ्यायला हवे. ह्या विचाराने शंतनूने बोलायला सुरुवात केली.

तो म्हणाला ” रोहन तुझ्या मनाचा जो गोंधळ उडालाय तो मला समजतोय. तू आमच्या नात्याकडे पाहून एक स्वप्न रंगवले होतेस जे पूर्ण नाही होऊ शकले. आणि त्याबद्दल वाईट वाटणे सहाजिक आहे. त्यामुळे तू तुला इतरांसारखा इझीली ते स्विकारता येत नाहिये ह्याचा ताण अजिबात घेऊ नकोस. तुझ्या genuine भावना आणि त्याबद्दल तुला वाटणारी अस्वस्थता आधी स्विकारून टाक आणि मग त्यातून बाहेर पडायचा मार्ग शोध. तुला आमच्या दोघांचे आनंदी नाते दिसतेय पण आमचे प्रेम प्रत्यक्षात उतरवतांना त्यामागे झालेली आमची होरपळ दिसत नाहीये.
आमच्या वेळेची चॅलेंजेस वेगळी होती. ती काय होती त्या विषयात मी आत्ता जात नाहिये. मी फक्त तुला एवढेच सांगेन की प्रत्येक पीढीसाठी घरातल्या सुरक्षित चांगल्या जगाचे संस्कार आणि बाहेरच्या जगाचे नियम ह्यात फरक हा असतोच. हा आता तुझ्या काळात हा फरक तुमच्या जवळच्या नात्यांवरच पडतोय आणि तो ही एकदम फास्ट पेसमधे.

आताच्या ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीमुळे तुम्ही मुलं मुली वेगाने आणि सतत एकमेकांच्या जवळ येताय. तुमच्यातल्या कॉंफिडंसमुळे तुम्ही सगळे प्रत्येक बाबतीत व्यक्तही इतक्या लगेच होताय की नातं मुरायला, स्विकारायला वेळच मिळत नाही तुम्हाला. त्यामुळे आज ही तर उद्या ती अशा टेंपररी टेर्म्सवर तुमची प्रेमाची यात्रा सुरु आहे.
पण सध्या तरी आपल्या हातात हे जे काही आहे त्यात स्वतःला फिट करण्याशिवाय पर्याय नाही. ह्या सगळ्यांत ईशाची काहीच चूक नाही हेही तुला पटतय. तेव्हा मला वाटतं तिच्या बाबतच्या विचारांना मनापेक्षा बुद्धीशी align करणं हाच एक पर्याय तुझ्यासमोर आहे. कारण खरं चॅलेंज तर इथून पुढे आहे.

ती आणि तिचा तो आदित्य तुला रोजच कॉलेजमध्ये भेटणार आहेत. तेव्हा त्यांच्यापासून लांब पळून न जाता त्यांच्या बरोबर मैत्रीने राहूनच तुला स्वतःला ह्यातून बाहेर काढायचे आहे. तू जर असाच कुढत राहिलास तर त्याचा परिणाम तुझ्या अभ्यासावर आणि पर्यायाने करिअर वर होणार. आम्हाला आमच्या हुशार मुलाच्या बुद्धीवर त्याच्या निराश मनाने मात केलेली बघायची नाही. आणि हो,  बदल लगेच होणार नाही तेव्हा स्वतःला योग्य वेळ दे आणि विचारांना बुद्धीच्या ताब्यात आण. माझ्यासाठी हे सांगणे हे खूप सोपे आणि तुझ्यासाठी ते तितकेच कठीण असले तरी ते अशक्य मात्र नक्कीच नाही.
“शंतनूच्या बोलण्याची री ओढत शरयू म्हणाली ” हो रे राजा. सोपं नाहीये पण सावर स्वतःला. सगळ्यात आधी तू तुझे मन आमच्याजवळ मोकळे केलेस त्यासाठी तुला माझ्याकडून फुल मार्क्स. तू असाच काही न बोलता डिप्रेस्ड राहिला असतास तर माहिती नाही तुझ्या शिक्षणाचे काय झाले असते? पण जसं मी तुला नेहमी सांगते तेच आज परत सांगेन की जगात असा कुठलाच प्रॉब्लेम नाही जो आपल्याला सोडवता येत नाही. फक्त त्यासाठी आपली इच्छाशक्ती आणि प्रयत्न दोन्हीही पुरेपूर हवेत. तेव्हा बाबा म्हणाले तसे ईशा आपली फक्त मैत्रीण आहे हे स्विकारुन टाक आणि पुढे चालत रहा. मनाचा पगडा जड व्हायला लागला की बाबांचा सल्ला आठव. मला खात्री आहे तू लवकरच ह्यातून बाहेर येशील .”

“हो आई. मला कळतय ग सगळं. आज तुमच्या दोघांशी बोलल्याने खूप हलकं वाटतय मला. बाबा माझ्या भरकटलेल्या विचारांना तुम्ही योग्य वाट दाखवलीत. Thank you so much. I will try my level best. मी प्रॉमिस करतो की माझ्या मनाला आवर घालेन आणि आता फक्त माझी डीग्री पूर्ण करण्यावरच फोकस करेन” असं म्हणून रोहन अभ्यासाला गेला.
“मला तुझा खूप अभिमान वाटतो शंतनू… you are really great..as always… कसलाही  त्रागा न करता ज्या प्रकारे तू रोहनला समजून घेतलेस आणि समजावून सांगितलेस ते खरंच कौतुकास्पद आहे. सगळ्या मुलांना त्यांच्या पालकांसमोर जर असं मोकळेपणाने व्यक्त होता आलं ना तर हल्ली बळावलेले मुलांमधले हे डिप्रेशन्सचे सगळे आजार मुळापासून नाहीसे होतील. आपला रोहन नक्कीच ह्या मळभातून सहीसलामत बाहेर येईल.” असं म्हणून शरयू शंतनूच्या मिठीत शिरली.
******
समाप्त
© धनश्री दाबके
सदर कथा लेखिका धनश्री दाबके यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!