नथीचा भार

©मुक्ता बोरकर – आगाशे
रेवाशी आलोकचे लग्न ठरले त्यामुळे होणारी सून म्हणून तिला अन् तिच्या परिवाराला त्यांच्या मूळ गावी एका लग्नालाआमंत्रण दिले गेले.
लग्नात सगळ्या सजल्या, धजल्या ,दागिन्यांनी मढलेल्या सगळ्या स्त्रिया पाहून तिला फारच गुदमरल्यासारखे झाले सगळ्या दागिन्यांमध्ये तिचं लक्ष वेधून घेतले ते  त्यांच्या नथिनेे.
आजवर तिनी कित्येक दागिन्यांनी मढलेल्या स्त्रिया पहिल्या होत्या पण एवढ्या मोठल्या विविध आकाराच्या नथी घातलेल्या स्त्रिया मात्र ती पहिल्यांदाच बघत होती.

बरं असं नाही की फक्त घरच्याच स्त्रिया तर त्या समारोहात असणाऱ्या  कुटुंबातील सगळ्याच स्त्रियांची नथ वैशिष्टय पूर्ण होती.
नाकापेक्षा मोती जड म्हणजे काय ते तिला आज कळत होते.
एवढी मोठी नथ घालून मिरवतांना उडणारी त्या स्त्रियांची तारांबळ अन्  तिला धक्का लागताच त्यांच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या वेदना !खूप काही बोलत होत्या.
पण आता मात्र या नथ प्रकाराबद्दल तिला भारीच कुतूहल वाटायला लागले आणि नेमके ह्याच्या मागचं काय लॉजिक असावं याचा ती विचार करू लागली.

तेवढ्यातच समोरून येणाऱ्या राजबिंड्या आलोक वर तिची नजर गेली आणि ती पुन्हा मनाने भूतकाळात गेली.
उच्चशिक्षित रेवा आज एका कंपनीच्या इंटरव्ह्यू साठी आलेली. कंपनीचे MD होते मुलाखत घ्यायला.  तेच त्या कंपनी चे सर्वेसर्वा होते. कंपनी चा पसारा खूप मोठा नसला तरी कंपनी नावाजलेली होती.
आतापर्यंत MD मनोजकुमार यांनी अगदी छोटी मुहूर्तमेढ रोवून आज एवढा मोठा उद्योगाचा पसारा उभा केला होता.

आता तर त्यांचा मुलगा सुद्धा उच्चशिक्षित, सुविद्य झालेला. त्यामुळे आता पुढे कंपनीचा पसारा थोडा वाढवावा असं त्यांना वाटू लागलं होतं. त्यासाठीच त्याला मदत व्हावी या उद्देशाने नव्या लोकांची नेमणूक करण्याचा घाट त्यांनी घातला होता.
अगदी  तडफेने अन् योग्य उत्तर देणाऱ्या रेवाचा परफॉर्मन्स पाहून ते फारच प्रभावित झाले होते.
कंपनीला पुढे न्यायला अशाच दृष्टी असलेल्या अन् खमक्या उमेदवाराची गरज होती. मनोमन तिला सिलेक्ट करायचं ठरवून टाकलं त्यांनी.

अगदीच पहिल्यांदाच आवडीची मॅच खेळायला जावं अन् सिक्सर लावून यावं असं काहीसं झालं होतं रेवाचं! अगदी खुशीतच बाहेर पडली ती केबिनच्या अन् थबकलीच आलोकला बघून.
“तू इथे ? ” दोघांनीही एकमेकांना एकाच वेळी प्रश्न केला.
“इंटरव्ह्यू साठी आले होते.” रेवा बोलली.
“मस्त राहिला परफॉर्मन्स, अगदी आशा ठेऊन होते मी पण तुला इथे पहिलं अन् आशा डगमगली बघ!” हसतच रेवा बोलली आणि दोघेही दिलखुलास हसले.

” डोन्ट वरी यार, मी नाही आलोय इंटरव्ह्यू ला,असच सहज काही पर्सनल काम होतं.” आलोक.
” चल चहा घेऊ यात ना!” आलोक
रेवा आणि आलोक ग्रॅज्युएशन पासून  सोबतच शिकलेले. दोघेही स्कॉलर .दोघेही खूप  जवळचे मित्र नसले तरी दोघांनाही एकमेकांच्या गुणवत्तेबद्दल प्रचंड आदर !
आज पर्यंत कोणत्याही मुलासोबत चहा प्यायला न गेलेली रेवा आज मात्र आलोक सोबत आनंदाने गेली.

कधी नव्हे ते अनोळखी ठिकाणी आपला बॅचमेट बघून आज तिलाही आनंद झाला होता. आणि आता आपण विचारांनी प्रगल्भ झालो याची जाणीव सुद्धा!
काही वेळानी रेवा गेली आणि आलोक मनोज कुमार यांच्या केबिन मधे गेला.
त्यांनी  आजच्या सगळ्या घडामोडी त्याच्याशी शेअर केल्या आणि रेवा बद्दल सांगितलं. ते खूपच इंप्रेस  झाले होते तिच्या एकंदरीत व्यक्तिमत्त्वाने! तिला उद्याच्या उद्या ऑफर लेटर पाठवायचा मनोदय सांगितला त्यांनी.

“आलोक तू हवा होतास तेव्हा,किती व्हिजन असलेली ,हुशार आणि कॉन्फिडेंट मुलगी आहे ती कळलं असतं तुला. अगदी अशीच असिस्टंट शोधत होतो मी तुझ्यासाठी. अन् ती मिळाली सुद्धा!”
“पापा  मी ओळखतो रेवाला. माझी बॅच मेट आहे ती. आताच भेटली मला बाहेर.” आलोक”
“अरे मग घेऊन यायचे की आत .पुन्हा नव्याने ओळख झाली असती तिच्याशी तुझी मैत्रीण म्हणून.”
” नाही पापा ,मी तिला माझी ओळखच नाही सांगितली .कारण ती खूप स्वाभिमानी मुलगी आहे. तिला आज ही नोकरी तिच्या  टॅलेंट मुळे मिळते आहे पण मी इथल्या मालकाचा मुलगा आहे हे कळल्यावर ती दया वाटेल तिला.” आलोक

मनोजकुमार यांनासुद्धा आलोकच्या बोलण्यात तथ्य आहे असं वाटत होतं.
एका भेटीतच रेवाने तिच्या व्यक्तिमत्वाची चुणूक दाखवून दिली होती.
मिळालेल्या जॉब मुळे रेवा अतिशय खुश होती.
अपॉइंटमेंट नंतर तिला कळले की तिला त्या फर्मच्या ज्युनिअर मालकासोबत काम करायचे आहे.
खूप एक्सायटेड वाटले तिला. कोण असेल हा ज्युनिअर मालक?

जेव्हा तिच्या बॉस शी तिची ओळख करून देण्यात आली तेव्हा मात्र तिच्या आश्चर्याला पारावार उरला नाही.
तिला जेव्हा आलोकने आधी त्याची ओळख कां नाही दाखवली याचे कारण कळले तेव्हा तिचा त्याच्याबद्दलचा आदर अजूनच दुणावला.
आलोक आणि रेवा सारखे दोघेही टॅलेंटेड लोक जेव्हा एकत्र काम करतात तेव्हा त्यांच्या गुणांनी ,मेहनतीने यशाचे शिखर गाठतातच! याचीच प्रचिती कंपनीला काही दिवसातच आली.
मनोजकुमार या नव्या एम्प्लॉइ वर अत्यंत खुश  होते.

त्यातच त्या दोघांच्या मैत्रीत सततच्या सहवासाने अजूनच जवळीक वाढल्याचे त्यांच्या अनुभवी नजरेला जाणवले होते.
मग एक दिवस दोघांच्याही मनाचा कल घेऊन , रेवाच्या आई ,वडिलांना भेटून जात, पात ,धर्म,प्रदेश या सगळ्या  गोष्टींना फाटा देत मनोजकुमारांनी रीतसर तिला आलोक साठी मागणी घातली.
रेवाचे स्वतंत्र विचार,तिची तडफ,तिचा स्पष्टवक्तेपणा याची जाणीव त्यांना होती. पण ते विचारांनी प्रगल्भ होते त्यामुळे ही सर्व चाकोरी सोडून त्यांनी रेवाला आपल्या मुलासाठी मागणी घातली. अन् आज तिची सर्व कुटुंबीयांसोबत ओळख व्हावी म्हणून घरच्या लग्नाचे हे अगत्याचे आमंत्रण तिच्या परिवाराला दिले.

समोर आलोकला बघताच रेवाची तंद्री भंग झाली.
अगदी कमी आभूषण परिधान केलेली ,साधी ,सुंदर रेवा त्या सगळ्या  अलंकृत बायांपेक्षा  कितीतरी आवडली आलोकला!
आलोक जवळ येताच पुन्हा तिच्या डोक्यात तो नथीचा प्रश्न उभा राहिला. आलोकने मात्र उत्तरासाठी तिला त्याच्या मोठ्या काकांच्या मुलीच्या सुपूर्त केलं.
दीदीने मग रेवाला सांगितलं की त्या भागातली प्रथा आहे  की नवऱ्याच्या पोझिशन वर त्याच्या पत्नीच्या नथीचा आकार  ठरतो. त्याच्या धंद्यात, व्यापारात बरकत झाली किंवा त्याचा पगार वाढला,प्रमोशन झालं की त्याच नथित अजून सोनं टाकून तिचा आकार वाढवला जातो. त्यामुळे ज्याची पोझिशन मोठी त्याच्या पत्नीच्या नाकात मोठी नथ.

नकळतच  रेवाला आलोकच्या आईच्या नकातली सगळ्यात  मोठी नथ आठवली आणि मग माझ्या नाकात केवढी नथ असेल? विचार करूनच तिला गरगरायला झालं.
नाकात अद्याप नसलेल्या नथिचा भार आता तिला तिच्या नाकाला जाणवायला लागला.
आताच यातून काहीतरी मार्ग काढायला पाहिजे नाहीतर हा नथीचा भार जन्मभर आपल्या नाकाला सोसावा लागेल असा विचार करून रेवाने तडक आपला मोर्चा मनोज सरांकडे नेला.

तिला अचानक त्यांच्याकडे आलेली बघून सर आश्चर्यचकीत झाले.
” पापा ,माझ्या दोन मागण्या पूर्ण होतील तरच मी हे लग्न करणार! “तिचं बोलणं ऐकून सर आणी तिथे असलेले सगळेच स्तब्ध होतात.
ही इथे नवी होणारी सून म्हणून आलीय अन् काय हे नवे नाटक? सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रश्न चिन्ह!
पण  पापा मात्र विचलित न होता तिचं ऐकून घेतात.
“कोणत्या  मागण्या बेटा?”

“एक ,मी नथ घालणार नाही आणि घालेन तर  माझ्या आवडीच्या आकाराची!” रेवाचे बोलणे ऐकून सगळ्यांचेच डोळे विस्फारले जातात.
पण सर मात्र तिला ठाम विश्वास देतात अन् दुसरी मागणी विचारतात.
” यापुढे घरच्या कोणत्याही स्त्रीला नथीची सक्ती नसेल. फक्त जिला आवड असेल तीच फक्त योग्य आकाराची नथ घालेल.”
रेवाच्या दोन्ही मागण्या सर आनंदाने मंजूर करतात. कारण ते विचारांनी प्रगल्भ असतात.
खरं तर त्यांच्या पत्नीला होणारा नथीच्या भाराचा त्रास त्यांना चांगलाच अवगत असतो.त्यांना स्वतः लाच ही प्रथा आवडत नसते.
अन् आज रेवाने अगदी ही प्रथा मोडायाचे धारिष्ट्य दाखवले असते.

त्यांच्या निर्णयाला विरोध करण्याची ताकद कुटुंबात कुणाचीच नसते.
रेवाची दुसरी मागणी ऐकून इतरही बायांच्या  चेहऱ्यावर  आशेची एक नवी चमक दिसते.
त्यांनाही त्यांचा नथीचा भार अकस्मात हलका झाल्याचे जाणवते.
रेवाने धीटपणाने आज एक चौकट तोडलेली असते, तोडलं असते चाकोरी नावाचं रिंगण जे चक्रव्यूह बनून तिला ग्रासणार असते .
त्या चाकोरी चा फास गळ्याभोवती आवळण्या आधीच रेवा तिची त्या दुष्ट चक्रातून सुटका करून घेते…..
आणि तिचे सासरे आणि पतीही तिची साथ देतात तिला या चाकोरी बाहेर जगण्यासाठी…..!
समाप्त
© डॉ.मुक्ता बोरकर – आगाशे
मुक्तमैफल
सदर कथा लेखिका डॉ.मुक्ता बोरकर – आगाशे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

3 thoughts on “नथीचा भार”

Leave a Comment

error: Content is protected !!