© कांचन सातपुते हिरण्या
स्टडी टेबलवर कॉफीचा मग ठेवून आई जाण्यासाठी वळली .
अवनीनं पटकन हेडफोन काढून येऊन आईचा हात घट्ट धरला ,
” आई थांब ना गं . रागावलीस ना खूप सॉरी . ते दुपारी मी..”
” बरोबरच बोललीस तू दुपारी अवनी ..आईला काही म्हणजे काही समजत नाही .”
आईच्या आवाजातला कोरडेपणा अवनीला सहनच झाला नाही आता .
घट्ट मिठी मारली आईला रडतच.
” नको ना गं असं तुटक बोलूस आई . नाही सहन होत..”
” मी करायचं का सहन तू बोललेलं , तूला जरासुद्धा काही वाटलं नाही का गं अवनी आणि मी मात्र तूझ्या प्रामाणिकपणाचे दाखले देत होते अगदी अभिमानाने माझ्या मैत्रिणींना .
अवनीनं आईला बाल्कनीत नेलं .
“बस इथं वाऱ्यावर जरा . शांत हो प्लीज .”
” मी शांतच आहे गं अवनी . तू भानावर ये वेळीच .”
” आई पुन्हा खरंच नाही असं काही होणार माझ्याकडून .प्रॉमिस , नाही जाणार मी नेहाच्या घरी . तू म्हणशील तसंच वागेल . खोटं तर अजिबात बोलणार नाही.”
” हे सगळं माझ्यासाठी करणार आहेस तू . अजिबात करू नकोस तसं असेल तर .”
आई खूप हर्ट झालीय , हे अवनीच्या आता चांगलंच लक्षात आलं आणि त्याला कारणही तसंच घडलं होतं .
अवनीची आई आणि तिच्या दोघी मैत्रिणींनी आज खूप दिवसांनी दुपारी भेटायचं ठरवलं आणि त्या भेटल्यासुध्दा .
त्या तिघींनी दुपारी मॉलमध्ये शॉपिंग केली .
अवनीच्या आईनं तिच्यासाठीही काही कुर्ते , टॉप्स , कॉस्मेटिक्स घेतले .
बरेच दिवसांनी भेटल्या म्हटल्यावर खाऊपार्टी तर व्हायलाच हवी .
मग मॉलशेजारीच असलेल्या रेस्टॉरंटमध्ये तिघी आल्या .
दोघी मैत्रिणींनी पिझ्झा , सँडविचची ऑर्डर दिली .
अवनीच्या आईला हे असलं फार आवडत नाही म्हणून तिने फक्त कोल्ड कॉफी मागवली .
घर , मुलं , मुलांचं करियर हेच विषय होते तिघींच्या गप्पांचे .
” आज कालची मुलं सांभाळणं आणि त्यांना समजावणं म्हणजे दिव्यच झालंय अगदी . त्यांना समजून घेणं कठीणच आहे बाई . कधी काही सांगायला जावं तर तुम्हांला काही कळतच नाही असा भाव .त्यांचं खाणंपिणं , राहणं , वागणं , केवढा फरक पडलाय नाही का गं आपल्या वेळेपेक्षा आत्ताच्या पिढीत .”
मैत्रिणीच्या या बोलण्यावर अवनीची आई म्हणाली , “हो खरंच गं . हल्ली काय काय ऐकायला वाचायला मिळतं . बापरे कठीणच झालंय सगळं .त्यामानाने माझी अवनी खूपच समंजस आहे . कधी काही लपवत नाही माझ्यापासून . सगळं सांगत असते .”
” लकी आहेस बाई तू , नाही तर आजकाल मूलं बोलता बोलता सहज घोळात घेतात आईवडिलांना . कॉलेजच्या नावाखाली हिंडणं फिरणं ..त्यांचं हे बोलणं चालू असतानाच मागच्या टेबलवर चार जणांचा ग्रुप येऊन बसला .
दोघे मुलं दोन मुली .
त्यांचं एकंदर बोलणं ऐकून अवनीची आई खूप डिस्टर्ब झाली कारण त्यातला एक आवाज ..
“अगं मी आईला बरोबर सांगते समजावून , अभ्यासाला जातीय नेहाकडे . आजची रात्र तिचे आई-बाबा बाहेरगावी गेलेत सांगते . छान पार्टी करू . मस्त एन्जॉय करू . आईला काही समजत नाही .”
अवनीची आई आणि तिच्या मैत्रिणी निघाल्या तेवढ्यात अवनीने आईला बघितलंच आणि चांगलीच घाबरली .
ती तशीच आईच्या मागे धावत बाहेर आली .
“आई तू इथे कशी ..”
पण आई तिच्याशी काही न बोलता मैत्रिणींबरोबर रिक्षातून निघून गेली .
अवनीला कळालं होतं तिच्याकडून केवढी मोठी चूक झालीय खोटं बोलण्याची .
ती सुद्धा आईपाठोपाठ घरी आली घाईघाईत .
आईने तेव्हापासून रात्री जेवण होईपर्यंत घरात बाबांना , अवनीच्या आजी आजोबांना जाणवूनही दिलं नाही काय झालंय ते .
हीच अवनीसाठी मोठी शिक्षा होती . आईचं गप्प राहणं .
आणि म्हणूनच आता तिला आईशी बोलायचंच होतं . रडवेलीच झाली .
“आई अगं तू समजतेस तसं काही नाही . आम्ही फक्त जेवण ऑर्डर करून गप्पा वगैरे मारणार होतो . खरंच विश्वास ठेव .”
” मग अडखळतीयेस का अवनी ? लाज वाटली नाही दुपारी खोटं बोलताना . आता सफाई कशासाठी .एकेकाळी आई हेच जग असणार्या आईला काही समजत नाही असं मूलं म्हणतात तेव्हा काय होतं हे तुला आत्ता नाही कळणार .आणि विश्वास ठेव म्हणतीयेस मग विश्वासात घेऊन आईला सांगावं असं नाही वाटलं का गं .”
” आई अगं एकदा विश्वास ठेव फक्त . मी पुढे कधीच कोणती चूक करणार नाही . माझा कोणताच वाईट हेतू नव्हता गं . हि पहिली आणि शेवटची चूक प्रॉमिस . वाटल्यास मी बाबा आणि आजी आजोबांना ही सगळं सांगते .”
” ते तर तुला करावं लागेलच . कारण खोटं लपवाछपवी तिला आपल्या घरी जागा नाही . हे तूला ठाऊक आहे .बोलणं सोपं आहे पण वागणं खूप कठीण आहे अवनी . चार भिंतींच्या बाहेरच्या जगात खूप सावध राहून वावरावं लागतं . या वयात मित्र मैत्रिणी जवळचे वाटायला लागतात , त्यांचा सहवास त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट बरोबर आणि आईवडील शत्रू सगळ्याला नाही नाही म्हणणारे , हो ना .
पण एकदा का पाऊल वाकडं पडलं ना कि पुन्हा सावरणं सोप्पं नसतं गं अजिबात .आमच्या मनातली ही काळजी, कळकळ तुम्हांला आत्ता नाहीच कळणार . पण आता या मोहाच्या वाटेवर कसं वागायचं? कसं सावरायचं स्वतःला, हे पूर्णपणे तुझ्या हातात आहे . तुला गरज असेल तेव्हा मी असेलच पाठीशी पण काही चांगलं करणार असशील तरच, एवढं मात्र लक्षात असू दे . झोप आता रात्र खूप झालीय .”
असं म्हणून वरवर शांत पण आतून अस्वस्थ झालेली आईही झोपायला गेली.
समाप्त
*******
© कांचन सातपुते हिरण्या