पुनश्च ( भाग 2 )

This entry is part 2 of 4 in the series पुनश्च

भाग 1 इथे वाचा
लग्नानंतरही शालिनी वडलांबरोबर काम करतच राहिली. हळूहळू शालिनीवर जबाबदारी टाकत वडलांनी त्यांच्या वाढत्या वयाच्या मागणीनुसार बॅक सीट घेतली.
शालिनीला कामात जसं जसं यश मिळत गेलं तस तसा agency चा व्याप वाढला. Recruitment assistants वाढले. मग दोन तीन वर्षांतच शालिनीला आपल्या लोकल agency ला ग्लोबल करण्याची स्वप्नं पडू लागली.
पण ते करायचं असेल तर मार्केट ट्रेंड्सनुसार आधी आपल्याला स्वतःला अपडेट करावं लागेल आणि मग आपल्या assistants ना ट्रेन करावं लागेल. हा सगळा विचार करून शालिनीने Human Resources Management मधे post graduation करायचं ठरवले.

आपल्या लेकीला इतक्या आत्मविश्वासाने पुढे जातांना पाहून शालिनीचे आईवडील खूपच आनंदात होते. पण तरीही शंतनूचा तुझ्या शिक्षणासाठी पाठिंबा असेल तरच तू पुढे जा असं तिला वडलांनी सांगितलं.
कदाचित शालिनी पुरेसा वेळ देऊ शकत नाही म्हणून शंतनूचं नाराज असणं त्यांना जाणवलं असावं.
शालिनीने मास्टर्सचा विषय काढल्यावर शंतनूच्या मनात हाच पहिला विचार आला की कशाला हवीये हिला ही मास्टर्स डीग्री वगैरे? आहे ते छानच तर चाललंय की! नव्या नवलाईच्या दिवसांत कुठे हे मास्टर्स आणि बिझनेस expansion वगैरे..

आता लग्नाला तीन वर्ष झाली होती. त्याला खरंतर आता बिझनेस ऐवजी फॅमिली expansion ची स्वप्नं पडत होती. आपल्याला शालिनीसारखीच एक गोड मुलगी असावी असं त्याला वाटायला लागलं होतं.
पण शालिनीच्या मनात सध्या फक्त मास्टर्सचेच विचार घोळत होते.
शंतनूने तिला समजवलं की थोडे दिवस ती शांत व्हायची आणि मग परत त्याला मास्टर्ससाठी विचारायची. या कारणामुळे दोघांत वादावादी व्हायची. आधी वाद मग अबोला मग परत मनधरणी.. थोडे दिवस सगळं ऑलबेल की परत वाद.. हे चक्र सुरूच राहायचं.

त्यावेळी दोघांच्या नात्यात प्रेम आणि एकमेकांबद्दलची ओढ यांचं पारडे जड असल्याने ते वाद बेडरूममधे गेल्यावर मिटायचे.
अशी वादावादी बरेचदा होत राहिली आणि शालिनीची ही इच्छा दाबण्यात काही अर्थ नाही हे ओळखून शंतनूने तिच्या मास्टर्सला गो अहेड दिले.
शंतनूने तयारी दाखवल्यावर शुभस्य शीघ्रम म्हणत शालिनी तयारीला लागली आणि तिची  पुढली दोन अडीच वर्ष agency आणि पार्ट टाईम कॉलेज यातच गेली.
सुरवातीला शालिनी निवांत अशी कधी आपल्यापाशी नसतेच याचं शंतनूला खूप वाईट वाटायचं. तो तिला कधी कधी तसं बोलूनही दाखवायचा.

पण त्याच्या नाराजीची तीव्रता कधी शालिनीपर्यंत पोचायचीच नाही.
तिचं मन सतत तिचं काम आणि कॉलेजच्या असाईनमेंट्स, प्रेझेंटेशन्स यातच असायचं.
तिने लाडाने शंतनूच्या मिठीत शिरून त्याला गळ घातली की त्याची नाराजी दूर व्हायची. पण हळूहळू शंतनू मनाने तिच्यापासून दूर जाऊ लागला.
त्याने त्याचं पूर्ण लक्ष त्याच्या करीअरवर केंद्रित करून टाकलं.
तोही Eagle Infotech मधे करिअरच्या एकेक पायऱ्या चढत गेला.
कामाच्या व्यापात त्याने स्वतःला बुडवून घेतलं. दोघांच्या नात्यात एक अव्यक्त दुरावा निर्माण झाला.

शालिनीचे मास्टर्स पूर्ण झाल्यावर अमेयच्या येण्याची चाहूल लागली. अमेयच्या येण्याने परत एकदा दोघांच्या नात्याला नवं वळण आणि प्रेमाचा ओलावा मिळाला.
अमेयच्या बाळलीलांनी घरावर आनंदाचा वर्षाव केला.
अमेयच्या जन्मानंतर शंतनूचे आईवडील शंतनूकडे राहायला आले.
शंतनूच्या आईने अमेयला सांभाळायची जबाबदारी आनंदाने स्वीकारली आणि शालिनी नव्या जोमाने परत तिचं काम पाहू लागली.

काळ वेगाने पुढे सरकला आणि काळाच्या पुढे धावणारी नवी नवी टेक्नॉलॉजी जन्म घेऊ लागली. प्रत्येक नवी टेक्नोलॉजी तितक्याच वेगाने आत्मसात करणे शंतनूसाठी चॅलेंजिंग ठरू लागले. काळाप्रमाणे त्याचे सहकारीही बदलले.
काही पुढच्या प्रगतीसाठी Eagle Infotech सोडून गेले तर काहींनी झपाट्याने स्वतःला अपडेट केले.
पण आता शंतनूला पूर्वी होता तसा सपोर्ट राहिला नाही.
जी नवी पीढी कंपनीत आली त्यांच्या ॲप्रोचशी त्याला जूळवून घेता येईना. जिथे इतकं मन लावून दिवसरात्र काम करून स्वतःची जी एक पोझिशन शंतनूने निर्माण केली होती तिलाच धक्का लागेल की काय अशी भिती आता त्याला वाटू लागली.

आणि असं काही होण्याआधीच आपण कंपनी बदलावी या विचाराने शंतनूने नवी कंपनी जॉईन केली.
जिथेही त्याचं मन रमलं नाहीच.
एक प्रकारचं नैराश्य त्याच्या मनामधे ठाण मांडून बसलं, ज्याने पुढच्या दुष्टचक्राची सुरवात केली.
शालिनीने मात्र तिच्या बिझनेसमधे खूप मजल मारली.
तिच्या पोस्ट ग्रॅज्युएशनचा तिला खूप फायदा झाला.
आपल्या करीअरला ब्रेक लागतोय आणि शालिनीची घोडदौड मात्र जोरात सुरू आहे ते पाहून शंतनूला हारल्यासारखं वाटू लागलं. घरात ‘सब कुछ शालिनी’ असं चित्र त्याला दिसायला लागलं.

मी अयशस्वी आणि फक्त शालिनीच यशस्वी असा समज करून घेत तो शालिनीशी कडवटपणे वागू लागला.
दोघांच्या नात्यात आता अहंकाराचं पारडं जड होऊ लागलं ज्याने त्यांच्यातल्या प्रेमाला हारवायचा सपाटा लावला.
विषय कुठलाही असो दोघांनी तोंड उघडलं की फक्त वाद आणि वादच होऊ लागले.
आपल्या ममा आणि डॅडची सततची भांडणं बघून अमेय एकदम कंटाळून गेला.
पूर्वीचं त्यांचं हसतं खेळतं जग कुठेतरी हरवून गेलं.

मध्यंतरी शंतनूचे वडील गेले आणि तेव्हापासून त्याच्या आईच्या मागेही दुखणी लागली. घरातलं सगळं चित्रच बदललं.
एक स्त्री किती सहजपणे नवऱ्याच्या प्रगतीत आनंद मानून घेते आणि त्याला अजून पुढे जायला प्रोत्साहन देते.. पण एक पुरूष मात्र स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून आपल्या बायकोची प्रगती आनंदाने, सहजतेने स्वीकारू शकत नाही.. आणि तोही आपल्यावर जीवापाड प्रेम करणारा शंतनूसारखा कर्तृत्ववान पुरूष.. जो कधी काळी आपल्या याच हुशारीवर भाळला होता..हाच का तो ज्याच्यावर आपण एवढं प्रेम केलं !
शंतनूच्या वागण्यामुळे शालिनी खूप दुखावली होती..

तर हिला आता स्वतःपुढे इतर कोणी दिसतच नाही.. सतत माझ्याशी वाद घालते.. ही स्वतःच्या यशाने हुरळून गेली आहे.. असा विचार शंतनू करत होता.
दुर्दैवाने दोघांच्या याच भावना प्रबळ होत गेल्या आणि  ‘आपण आता नाहीच एकमेकांशी जुळवून घेऊ शकत’ या विचाराने दोघांच्याही विवेकबुद्धीवर ताबा मिळवला.
शेवटी अमेयला घेऊन शालिनीने घर सोडले.
पुढे कालांतराने दोघांनी घटस्फोटही घेतला.
तेरा वर्षांच्या एका सुरेख नात्याला ग्रहण लागले.

वेगळे झाल्यापासून इतर कोणाचा विचारही दोघांच्या मनात आला नाही कधी. लांब राहूनही अमेयच्या बाबतीतली प्रत्येक जबाबदारी मात्र दोघांनीही व्यवस्थित पार पाडली.
त्याची शाळा, क्लासेस, इतर ॲक्टीव्हीटीज, कॉलेज या सगळ्या बाबतीत दोघांनी जातीने लक्ष घातले.
अमेयच्या बाबतीत जरी दोघं समजूतदारपणे वागले तरी एकमेकांच्या बाबतीतला कठोरपणा मात्र त्यांनी जराही सोडला नाही.
अमेय त्याला वाटेल तेव्हा शंतनूकडे जाऊन राहायचा. शंतनू त्याला वाटेल तेव्हा अमेयला बाहेर बोलावून भेटायचा. अमेय अशा तऱ्हेने आईवडलांच्या प्रेमात मोठा झाला.

चांगली डीग्री मिळवून मोठ्या कंपनीत नोकरीला लागला. आता तर त्याने त्याच्या आयुष्याची जोडीदारही शोधली.
विचार करत करत शालिनी परत एकदा तिच्याच आयुष्याचा रिकॅप बघून आली.
‘आता एकदा अमेयचं लग्न झालं की मी मोकळी.. देवा सगळं नीट होवू दे रे बाबा.. आता अमिताही मास्टर्स करायचं म्हणतेय.. तेही परदेशी जाऊन.. अमेय तसा समजूतदार आहे पण त्याच्यात शंतनूचेही गुण आहेतच. शंतनू त्या काळात जसा होता अगदी तसाच अमेय आत्ता आहे.

आत्ता जरी मोठं मन दाखवत असला तरी पुढे त्याला अमिताची प्रगती आनंदाने स्वीकारता येऊ दे.
अमिता आजच्या पीढीची, स्वतंत्र विचारांची बुद्धीमान मुलगी आहे.. ती अमेयसाठी कितपत स्वतःच्या आशा आकाक्षांना मुरड घालू शकेल हाही एक प्रश्नच आहे..
हे देवा दोघांना सद्बुद्धी दे रे.. घडून गेलेल्या घटना पुनश्च घडू देऊ नकोस रे बाबा..अशी प्रार्थना करत शालिनीला झोप लागली..

दुसऱ्या दिवशी ऑफिस आटोपल्यावर अमेय शंतनूकडे गेला.
त्यालाही त्याने तोच प्रश्न विचारला, “डॅड, कशी वाटली अमिता आणि तिचे आईवडील?”
“अमिता? चांगलीच आहे की रे.. तुला शोभते आहे अगदी..हुशार आहे.. तिचे आईवडीलही पहिल्या भेटीत तरी चांगलेच वाटले.
काय रे ? त्यांना आमच्याबद्दल सांगितलच आहेस ना तू? म्हणजे मी आणि शालिनी सेपरेटेड आहोत ते?”
“हो डॅड.. अमिताला माहीत होतंच आणि तिने घरी सांगितलच असेलच”

“नाही म्हणजे तसं ते आमच्याशी जपूनच बोलत होते त्यावरून वाटलंच मला.. पण तरी आपल्या बाजूने सगळं क्लीअर असलेलं बरं.. आणि तसंही तुमच्या लग्नात आम्ही एक टीमच असणारोत.. so dont worry..”
“डॅड, तुम्ही आणि ममा माझ्यासाठी कायमच एक टीमच आहात हो.. त्याची काळजी नाहीच मला. मला फक्त अमिताबद्दल तुम्हाला काय वाटलं ते विचारायचं होतं.”
“अमेय, एक वेगळीच चमक आहे तिच्या डोळ्यात..She will definitely go a long way.. तू फक्त तिला साथ दे..आयुष्यभरासाठी.. जी चूक मी केली ती करू नकोस..” शंतनू मनापासून म्हणाला.

“Sure dad.. dont worry.. एक विचारू डॅड?”
“अरे विचार की? तुला कधीपासून परवानगी लागायला लागली माझ्याशी बोलतांना?”
“नाही तसं नाही.. पण..”
इतक्यात अमेयचा फोन वाजला.
ऑफिसचं काहीतरी अर्जंट काम आल्याने त्याला परत ऑफिस कॉल जॉईन करावा लागणार होता.
त्यामुळे आधीचं बोलणं तसंच राहिलं आणि अमेय घरी जायला निघाला.

घरी पोचल्यावर अमेय जो कामात बुडाला ते एकदम लेट नाईट पर्यंत.
त्यामुळे त्याला आज अमिताशाही बोलता आलं नाही.
*******
अमिताला मात्र अमेयचे डॅड आणि ममा खूपच आवडले होते.
“काय सॉलिड आहेत रे ते दोघंही.. एकत्र खूप छान दिसतात.. अगदी made for each other” असं तिने खूप वेळा अमेयला बोलूनही दाखवलं.
बघता बघता सहा सात महिने सरले आणि अमिताची जर्मनीतल्या एका युनिव्हर्सिटीमधे मास्टर्सची ॲडमिशन कंफर्म झाली.  एक वर्षाचा फुल टाईम कोर्स होता तिचा.

अमिता आता आपल्याला वर्षभर तरी भेटणार नाही या विचाराने अमेय अपसेट होता.
अमिताचीही तीच अवस्था होती. तिचं तर जगच बदलणार होतं. पहिल्यांदाच ती घर सोडून बाहेर राहाणार होती. तेही इतक्या लांब जिथून कितीही वाटलं तरी लगेच भेटायला येता येणार नव्हतं.
त्यात अमेयचा विरहही नकोसा वाटत होता.
दोघंही खूप भावूक झाले होते.
“तू तिथे गेल्यावर मला विसरणार तर नाहीस ना अमिता?” अमेयने विचारलं.

“अरे काहीतरीच काय? तुला कशी विसरेन? तू तर श्वास आहेस माझा” म्हणत अमिता त्याच्या मिठीत शिरली.
“आणि तू?”
“कधीच नाही” अमेयने मिठी अजूनच घट्ट केली.
शेवटी तो दिवस आला आणि अमिता जर्मनीला जाणाऱ्या विमानात बसली.
मनात अमेय आणि आईबाबांचे प्रेम, सगळ्यांच्या काळजीयुक्त सूचना आणि भविष्याची खूप सारी स्वप्नं घेऊन..

काळ पुढे सरकत राहिला. अमिता जर्मनीतल्या नव्या वातावरणात छान रूळली.
संध्याकाळच्या वेळात कधी शाळेतल्या मुलांच्या ट्यूशन्स घे, तर कधी वीकेंड्सना मोठ्या मोठ्या शॉप्समधे कस्टमर टेक्निकल ॲडवायजर म्हणून काम कर तर कधी इव्हेंट मॅनेजर म्हणून असिस्ट कर, अशी वेगवेगळी कामं करून लर्निंग बरोबरच थोडंफार अर्निंगही करू लागली.
अमिता मुळातच लाघवी आणि जीव लावणारी मुलगी होती.
अमेयकडून शालिनीचा नंबर घेऊन ती शालिनीच्याही टचमधे राहात होती. तिला जर्मनीतले अपडेट्स देत होती, फोटो पाठवत होती. दोघींमधे एक छान बॉंड तयार होत होता. एक यशस्वी बिझनेस वूमन म्हणून अमिताला शालिनीचा अभिमान वाटत होता.

इकडे अमेयलाही त्याच्या कंपनीत प्रमोशन मिळालं. एकंदरीत सगळं छान चाललं होतं.
आता अमिताच्या आईवडलांशी ओळख झाल्याने शालिनी आणि शंतनूचं सणावाराच्या निमित्ताने त्यांना भेटणं होत होतं.
यावर्षी दिवाळीला शालिनीने अमिताच्या आईवडलांना घरी बोलावलं होतं.
तेव्हा अमेयने आग्रह करून शंतनूलाही यायला लावलं होतं. शालिनी त्याबद्दल फारशी उत्सुक नसली तरी तिने त्यासाठी विरोधही केला नव्हता.
हळूहळू का होईना पण दोघांमधल्या तणाव आताशा जरा कमी होतोय असं अमेयला वाटत होतं.

आपले आई बाबा आणि अमेयचे ममा, डॅड यांना एकत्र पाहून अमिता तर खूपच खुश होती.
बघता बघता वर्ष पटापट निघून गेलं. अमिताचा कोर्स पूर्ण झाला.
तिला आता भारतात परतायचे वेध लागले आणि तिच्या आईवडलांना तिच्या लग्नाचे.
आल्यावर थोडे दिवस आराम करून, अमिता नोकरीसाठी प्रयत्न करू लागली.

त्याच दरम्यान अमेयने अजून चांगल्या पगारावर दुसरी कंपनी जॉईन केली.
ही नवी कंपनी त्याला प्रोजेक्टसाठी अमेरिकेला पाठवणार होती.
अमिता जर्मनीहून आली तर अमेयची अमेरिकेला जाण्याची चिन्हं दिसायला लागली.
आता मात्र दोघांचे लग्न लावून द्यावे आणि अमिताने अमेरिकेत जाऊनच नोकरी बघावी असं सगळ्यांचं मत पडलं. जे दोघांच्या भविष्याच्या दृष्टीने योग्यच होतं.
पण अमेयला एवढ्यात लग्नाच्या बंधनात अडकायचं नव्हतं…….
क्रमश:
काय होतं अमेयच्या मनात? अमेरिकेला जाण्यापूर्वी, लग्न का नव्हतं करायचं त्याला? या प्र्श्नांची उत्तरं वाचा पुढील भागात…
© धनश्री दाबके
या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून शेअर करतांना कृपया नावासकटच शेअर करा.
या कथेचे कुठल्याही स्वरूपाचे व्हीडीओ बनवण्यास लेखिकेची परवानगी नाही, इतरांच्या कथांवर यू ट्यूब चॅनेल चालवणार्‍या व्हीडीओकारांनी याची नोंद अवश्य घ्यावी.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Series Navigation<< पुनश्च ( भाग 1)पुनश्च ( भाग 3) >>

Leave a Comment

error: Content is protected !!