योगा

©️ कृष्णकेशव
बराच वेळ झाला वैशाली ह्या कुशीवरून त्या कुशीवर लोळत पडली होती..आज तिला बेडवरून उठावसं वाटतं नव्हतं.. अर्धवट डोळे उघडून तिनं उशाखाली ठेवलेला मोबाईल काढून किती वाजले ते बघितलं ..सकाळचे साडेआठ झाले होते..! बाप रे..!
कालच तिनं  ‘फिटनेससाठी योगा’चा आठ दिवसांचा ‘क्रॅश कोर्स’ पुर्ण केला होता..आणि तिच्या इन्स्ट्रक्टरनी आजपासून महिनाभर रोज सकाळी लवकर उठून करण्याचा एक ‘एक्सरसाईज चार्ट’  बनवून दिला होता.
एवढंच नाही तर रोजचा किमान एक आसनांचा व्हिडिओ तरी त्यांना कंपल्सरी पाठवायचा होता..!
आणि आज पहिल्याच दिवशी अशी ही माशी शिंकली होती..!

तिच्या ‘ स्मार्ट वूमन’ ह्या गृपमधलीत तिची खास मैत्रीण असलेल्या दिव्यानं पंधरा दिवसांपूर्वी तिला सिक्रेटली सांगितलं होतं..
“अंजू..अग आपल्या गृप मधली  भावे आणि तिची फ्लॅट नं. ४०१ मधली मैत्रीण सुधा तू कॉमेडी शो मधल्या भारतीसिंगसारखी दिसतेस म्हणून तुझ्यावर  कॉमेंट्स करुन हसत होत्या..मला नाही आवडलं ते..म्हणून म्हटलं एकदा तुझ्या कानावर घालावं.. पण तू काहीं विचारायला जाऊ नकोस हं त्यांना..!!”
एकाच गृपमध्ये असल्या तरी मिसेस भावेचा आणि तिचा छत्तीसचा आकडा.! 
मागच्या वर्षी पेठेत झालेल्या कुठल्या तरी ‘मिसेस पुणे’ या सौंदर्य स्पर्धेत त्यांनी भाग घेतला होता (निवड झाली नव्हती हा भाग वेगळा.!) 

पण तेव्हापासून त्या स्वत:ला सोसायटीतील आपण सगळ्यात सुंदर महिला आहोत असं समजायला लागल्या होत्या आणि सोसायटीतील प्रत्येकीला नाव ठेवायला लागल्या होत्या..! 
त्या भावेला एकदा चांगलंच सटकावायचं असं तिनं मनातल्या मनात ठरवलं आणि त्याक्षणी तिनं ‘स्लीम एंड फिट” होण्यासाठी हा  ‘क्रॅश कोर्स’ जॉईन करण्याचा निर्णय घेतला होता..!
विजू.. मी योगसाधना मंडळाचा ‘फिटनेससाठी योगा’चा क्रॅश कोर्स जॉईन करणार आहे.. तिथल्या  मॅडम खूप छान ट्रेनिंग देतात असं माझ्या दोन तीन मैत्रीणीनी मला सांगितलंय..”

मागच्या रविवारी नाष्ट्याच्या वेळी पहिली बर्गरची डीश संपवून दुसरी समोर ओढत वैशाली म्हणाली..
” माझी मैत्रीण उषा बडवे तुला माहित आहे ना.. तिनं योगसाधना मंडळाचा योगा आणि वेटलॉसचा हा स्पेशल कोर्स केला.. एंड सरप्राईज..! नव्वद केजीचं तिच वजन दोन महिन्यात सिक्सटीवर आलयं..!”
“वैशु.. पण असे दोन दोन बर्गर एका वेळी ‘क्रॅश’ झाले तर जगातला कुठलाही क्रॅश कोर्स तुला  ‘झीरो फिगर’ करणार नाही..” विजय बर्गरच्या दुसऱ्या डिशकडे बघून हसत म्हणाला..

” वाटलंच मला तू असं काहींतरी बोलशील म्हणून.. बायकोनं काहीं करायचं ठरवलं तर वाकड बोललंच पाहिजे का..? ” बर्गरची डिश लांब ढकलत वैशाली तणतणली.. 
” अग.. तसं नाही वैशू..  अशा महागड्या कोर्सवर आणि शिबिरावर पैसे खर्च करण्यापेक्षा आपणचं आपल्या खाण्यापिण्याची काळजी घेतली आणि सगळी काम बायका लावून आणि ऑनलाईन करण्यापेक्षा काहीं स्वतः केली की वेगळा एक्सरसाईज करण्याची गरज पडत नाही.. मी बघितल्या.. आजकाल वरच्या  किरकोळ कामाला सुद्धा बाई लावलेली असते..!  आणि तुला तर नवनवीन पदार्थ करुन सगळ्यांना खाऊ घालण्याची आणि स्वतः खाण्याची खूप आवड आहे म्हणून मी तसं गमतीनं म्हटलं..पण तुला राग आला असेल तर सॉरी..!” 

वैशाली थोडीशी शांत झाली.. विजूचं म्हणणं तिला काहींस पटलं होतं.. 
” ओके.. पुढच्याच आठवड्यात मी ‘योगा’ जॉईन करतेय..तू बघशील आणि महिन्याभरात मला म्हणशील.. ‘वैशाली.. क्या बात है.. मान लिया तुम्हें..! “
दुसऱ्या दिवशी तिनं उत्साहाच्या भरात अप्पा बळवंत चौकात जाऊन पुस्तकाच्या दुकानातून बी के एस अय्यंगाराचं ‘लाईट्स ऑन योगा’ हे पुस्तकं विकत आणलं आणि दुपारचं जेवणं झाल्यावर वाचायला सुरवात केली.. 
पण कसबसं पंधरा मिनिटे वाचल्यानंतर  तिला बोअर व्हायला लागलं आणि थेअरीपेक्षा प्रॅक्टिकल जास्त महत्वाच असतं अशी स्वतःची समजूत घालून ती झोपी गेली.. 

हा कोर्स करणं आपल्याला जमेल की नाही याचा विचार करण्यात  दोन दिवस घालवले..पण मिसेस भावेनं तिच्यावर केलेल्या कॉमेंट्स तिला पुन्हा आठवल्या आणि कोणत्याही परिस्थितीत हा क्रॅश कोर्स करायचाच असं ठरवून तिनं काल हा कोर्स पुर्ण केला होता.. आणि  कोर्सनंतर आज पहिल्याच दिवशी लवकर जाग न आल्यामुळं ती स्वतःवरचं चिडली होती..
तिनं गॅसवर चहा ठेवला.. 
शेजारी विजू अजून घोरतं पडला होता.. त्यानं आज कॅज्युअल लीव्ह घेतली होती.. वैशालीनं एकदा त्याच्याकडे वैतागून पाहिलं आणि  ‘उठल्यावर चादरी आणि रजईच्या घड्या करून ये’ असा व्हाट्सअपवर मेसेज टाकून ती किचनकडे निघाली..!

कोर्स मध्ये डॉ. दिक्षीत आणि ऋतुजा दिवेकर यांचे ‘आहार नियंत्रणावरचे दोन दिवस ऑनलाइन  लेक्चर पण ठेवलेले होते पण कालच्या शिल्लक राहिलेल्या भाताचा फोडणीचा ‘रावणभात’ करायचा की उरलेल्या पोळ्यांचा ‘मलिदा’ करायचा हा प्रश्न  असल्यामुळे  लेक्चरमधला डाएटचा प्रोग्राम तिला आज तरी सुरु करता येणार नव्हता..!
आणि दिक्षीतांचा फक्त दोनवेळा भरपूर जेवायचं आणि नंतर चहासुद्धा घ्यायचा नाही ह्या डाएटपेक्षा दिवेकर मॅडमचा चार वेळा थोडं थोडं खायचं  ‘चार्ट’ तिला जास्त मानवणारा होता..!

आज नाष्टा बनवण्याची कटकट नव्हती कारण रात्रीच विजूनं ‘ हॉटेल चैतन्य’ला तिच्या आवडत्या ‘मंच्युरीयन पराठ्यां’च्या होम डिलिव्हरीची ऑर्डर दिली होती आणि ती ऑर्डर आयत्या वेळी कॅन्सल करता येण्यासारखी नव्हती..
शेवटी डाएट आणि मंच्युरीयन पराठ्यांच्या या लढाईत तिच्या मनानं पराठ्याच्या बाजूनं कौल दिला आणि ‘चैतन्य’च्या डिलीव्हरी बॉयची ती वाट बघायला लागली..!
अर्ध्या तासानं डिलीव्हरी बॉय आला आणि टेबलवर डिश लावता लावता तिनं विजूला नाष्ट्यासाठी हाक मारली..
विजय अजून ट्राऊजर आणि बनीयनवरच होता.. 

तसाच तो उत्साहानं किचनमध्ये आला आणि हातातला मोबाईल तिला दाखवत म्हणाला..’वैशु डिअर..ग्रेट न्यूज..अगं आपला उद्या परवासाठी माथेरानच्या ‘हिल टॉप’ हॉटेलमधला सूट बुक झालाय..! आपला हा वीकेंड एकदम भन्नाट जाणार !..चल..तयारीला लाग..!!”
वैशाली आधीच आज सकाळचा योगा न झाल्यामुळे  वैतागली होती..”अरे असं काय करतोस..कालच मी योगाचा एवढा कॉस्टली कोर्स करून आलीय आणि आजपासूनच मला घरी योगाचा वर्कआऊट आणि डाएट स्ट्रीक्टली सुरू करायचा होता ..आणि आता तू हे माथेरानच्या ट्रीपचं काढलयस..! आणि सांगून ठेवते,  माझी हिलस्टेशनला जाऊन योगा आणि डाएट करण्याची मुळीच इच्छा नाही..!”

“अगं कोण तुला तिथं जाऊन डाएट कर म्हणतंय..नाहीतरी असा तसा आज गॅप पडलाच आहे..आणखी दोन दिवसं पुढे गेलंं तर काय फरक पडणार आहे..आणि हॉटेलचा तो सूट आपल्याला  लकी ड्रॉ मधून मिळालाय..परत असा चान्स मिळणार नाही..!”
वैशालीला त्यांचं म्हणणं तसं पटलं होतं..आताच तिच्या डोळ्यासमोर मा़थेरानच उद्याचंं ‘हॉर्स रायडींग आणि ‘सनसेट पॉईंट’चे सेल्फी तरळू लागले होते..!
तिसरा मंच्युरीयन पराठा संपवता संपवता ती म्हणाली “ओ के तू म्हणतोस तर ह्यावेळी मी माझा प्रोग्राम पोस्टपॉन करते ..पण सोमवारपासून मला सकाळी योगा करायचा असल्यामुळं आपला चहा आणि नाश्ता  तुलाच करावा लागेल..”

नाष्टा जास्त झाल्यामुळे वैशालीच्या डोळ्यांवर आता झापड यायला लागली होती. समोरचा मोबाईल घेऊन ती जडपणे उठली आणि बेडरूमकडे जाता जाता परत म्हणाली
” विजू अरे मागचे आठ दिवस माझी झोप नीट झाली नाहीयं..मी आता जरा रेस्ट घेणाराय..! प्लीज तेवढ्या डिश सिंक मध्ये टाकून दे ना..!. आणि मी काय म्हणते मला उद्याची तयारी पण करायची आहे..आज डिनर पण आपण बाहेरचं घेऊ..’दुर्वांकूर’ किंवा ‘श्रेयसला एक टेबल तू आताच  बुक करुन टाक..!!”
विजूनं तिच्याकडे एकदा आपादमस्तक पाहिलं ..
आणि आपणच योगाचा क्रॅश कोर्स केला असता तर बरं झालं असतं असा एक क्षीण विचार मनात येऊन काहीं न बोलता त्यानं समोरच्या टेबलवरच्या डिश गोळा करायला सुरुवात केली..!!
©️ कृष्णकेशव

सदर कथा लेखक कृष्णकेशव यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
या कथाही अवश्य वाचा
आईचं माहेर
सासर माझं सुरेख बाई
पुनश्च

Leave a Comment

error: Content is protected !!