कौतुक 

©️®️सायली जोशी.
“आई, भाजी कशी झाली आहे?” मनाली आपल्या सासुबाईंना विचारत होती. पण सासुबाईंचे लक्ष होतेच कुठे? मनालीचा नवरा महेश आणि सासरे न बोलता, खाली मान घालून जेवण करत होते आणि वनिता बाई जेवता जेवता त्या दोघांचा अंदाज घेत होत्या. 
‘अजून ‘हे’ काही बोलले नाहीत म्हणजे भाजी छान झालेली आहे! नाहीतरी एरवी ही कसली भाजी केली? म्हणून नाक मुरडतात. पण आता काही बोलणार नाहीत.. कारण त्यांच्या नव्या, लाडक्या सुनेने भाजी केली आहे म्हंटल्यावर छानच झाली असणार.’ वनिता बाई मनातल्या मनात बोलत होत्या. 
“तशी ठीक झाली आहे भाजी. पण ‘मी ‘अशी नाही करत. त्यामध्ये बारीक कांदा चिरून घालते आणि वरून शेंगदाण्याचे कूट पेरते. तशी भाजी छान लागते.” सासुबाई आपल्या ‘मी’ या शब्दावर जोर देत म्हणाल्या.

“बरं आई. मी पुढच्या वेळेस तुम्ही सांगितल्या प्रमाणे करेन.” मनाली आपले ताट वाढून घेत म्हणाली. 
“सुनबाई, थोडी भाजी असेल तर वाढ अजून.” सासरे म्हणाले आणि मनाली त्यांना आणखी भाजी वाढायला गेली.
“छानच झाली आहे भाजी.” असे म्हणत महेशने सुद्धा आपले ताट पुढे केलं.
हे पाहून सासुबाईंचा जळफळाट झाला. पण चेहऱ्यावर तसं न दाखवता त्या निमूटपणे जेवत राहिल्या.
पण काल आलेल्या सुनेचे कौतुक सासुबाईंना सहन झाले नव्हते म्हणून थोडं फार जेवण करून त्या पानावरून उठल्या.

“आई, तुम्ही काहीच जेवला नाहीत? आवडला नाही का स्वयंपाक?” मनाली सासुबाईंना म्हणाली.
“आवडला. पण आम्ही दोघांनी पुन्हा भाजी घेऊन तुझं जे मूकपणे कौतुक केलं, ते तिला आवडलेलं दिसत नाही.” मनालीचे सासरे हसत म्हणाले.
“अहो, काहीतरीच काय? आवडला गं स्वयंपाक. पण आज जास्त भूक नाहीय.” वनिता बाई रागाने आपल्या नवऱ्याकडे पाहत म्हणाल्या आणि बाहेर हॉलमध्ये जाऊन बसल्या. 
‘काय मेलं ते इतकं कौतुक करायचं? साधी भाजी तर होती. मीही केलंच ना इतकी वर्षे, तेव्हा कोणी कौतुकाचा एक शब्दही तोंडातून काढला नाही आणि आता मात्र सुनेचे नको तितके लाड अन् कौतुक! जाऊ दे म्हणा. आपल्याला काय करायचं?’ सासुबाई मनातल्या मनात बडबड करत होत्या. पण त्यांचा चेहरा खूप काही बोलत होता.

इतक्यात मनालीचे सासरे बाहेर आले.
आपल्या बायकोचा चेहेरा वाचल्यासारखे म्हणाले, “अगं, नवीन आहे ती आपल्या घरात. कौतुकाने माणूस सुखावतो आणि मनापासून काम करतो. तिला सांभाळून घेणं आपलं काम आहे. तूही मनापासून तिचं कौतुक कर. बरं वाटेल तिला.”
नाही म्हटलं तरी मनालीच्या कानावर सासऱ्यांचे शब्द पडलेच. “आई चिडल्या आहेत का? मी त्यांना न विचारताच स्वयंपाक केला म्हणून?” ती महेशला म्हणाली.
“नाही गं. आता सासुच्या भूमिकेत तिचा नव्याने प्रवेश झाला आहे ना, म्हणून आपलं जरा..इगो दुखावला असेल. पण तू नको काळजी करू. ते ताईच्या घरीही असं कधीतरी व्हायचं, तेव्हा ती आईला सगळं सांगायची.”

“अरे देवा, हे असंही असतं का? मी आता आईंना विचारुन करत जाईन सगळं.” मेघना जेवता जेवता म्हणाली खरी. पण तिला टेन्शन येऊ लागलं.
आता सगळ्याच गोष्टी ती सासुबाईंना विचारुन करू लागली.
पहिल्यांदा सासुबाईंना बरं वाटलं, माझी सून मला विचारल्याशिवाय काही करत नाही, म्हणून त्या सुखावल्या. हळूहळू मात्र त्यांना याचा कंटाळा येऊ लागला. 
“सगळं काय विचारतेस? तुझ्या मनाने कर जा काहीतरी.” असेही म्हणू लागल्या. आता मनालीला मात्र कळेना, नक्की वागायचे तरी कसे?

काही दिवसांनी सोसायटीत हळदी -कुंकवाचा कार्यक्रम होता. सगळ्या बायका नटून -थटून सोसायटीच्या हॉलमध्ये जमा झाल्या. मनाली ऑफिसच्या कारणाने थोडी उशीरा पोहोचली, तर वनिता बाई कधीच्या हजर झाल्या होत्या. 
नटून -थटून आलेल्या मनालीला पाहून साऱ्या बायका तिच्याभोवती जमा झाल्या. “कित्ती सुंदर दिसतेस! तुझी साडी खूपच छान आहे, असे म्हणत तिचे कौतुक करू लागल्या. कोणी तिच्यासोबत सेल्फी काढू लागल्या. हे पाहून अचानक सासुबाईंच्या पोटात दुखू लागलं, म्हणून त्या तडका फडकी घरी निघून आल्या. 
‘काय ती साडी आणि काय ते कौतुक? जेव्हा बघावं तेव्हा हिचाच सोहळा. आम्हाला काही किंमतच नाही मुळी.’ वनिता बाई मनातल्या मनात चरफडत बसल्या.

काही वेळाने मनाली घरी आली आणि दारात मैत्रिणींशी बोलत उभी राहिली. बराच वेळ झाला तरी यांच्या गप्पा काही संपेनात. तशा सासुबाई बसल्या जागेवरून ओरडल्या, “हसणं – खिदळणं झालं असलं, तर आत या आणि कामाचं बघा.”
हे ऐकून मनाली आत आली आणि फ्रेश होऊन स्वयंपाकाला लागली.
‘मी घरी असताना कोणी येत नाही. सोसायटीत धड कोणी बोलतही नाहीत. ही मात्र आल्या, आल्या सर्वांची लाडकी झाली. केव्हा बघावं तेव्हा आजूबाजूची लहान मुलं देखील ताई, ताई म्हणत हिच्याभोवती फिरत असतात. आम्ही कोणाचं घोडं मारलंय, हेच कळत नाहीय.’ 
वनिता बाईंचं विचार चक्र पुन्हा सुरू झालं.

तासाभराने सगळे जेवायला बसले. जेवताना सुद्धा त्या काही ना काही चुका काढत होत्या. पानातले बरेचसे पदार्थ त्यांनी बाजूला काढून ठेवले.
“मनाली,आमटीमध्ये डाळ दिसायला हवी, भाजीत तिखट – मीठ प्रमाणात असायला हवं. पोळ्या कशा फुगलेल्याच असाव्यात. घरच्या बाईला या सगळ्या गोष्टी काळायला हव्यात. आम्ही सांगायची गर
जच काय!” 
अशा नाना तऱ्हेच्या सूचना देऊन एकदाचं त्यांनी जेवण संपवलं. हे ऐकून मनाली मात्र रडवेली झाली. “आई, मला तुमच्या पद्धतीचे जेवण बनवता येत नाही. मी हळूहळू शिकेन. पण रोज रागावू नका, सारख्या चुका नका ना काढू.”

आता सासरेही मनालीच्या बाजूने उभे राहिले. “ती जे करते ते छान करते. तिचे कौतुक करायचे सोडून सारखे बोल लावणे चांगले नव्हे. अशाने ती घाबरून जाईल. तुझ्याच मनाचे सारे करायचे का तिने? तिचाही संसार आहे. तुला तिला मदत करायची नसेल तर समजावून सांग. पण ही वागण्याची पद्धत नव्हे.” 
“माझी समजावण्याची पद्धतच तशी आहे. ज्यांना ऐकायचे त्यांनी ऐका, नाहीतर सोडून द्या. सारखे काय कौतुक करायचे तिचे? अशाने डोक्यावर चढून बसेल ती.” सासुबाई चिडून म्हणाल्या.
आता मात्र मनालीचा बांध फुटला. आपल्याबद्दल सासुबाईंच्या मनात इतका राग का आहे? हेच तिला कळेना. कशीबशी जेवण करून ती आपल्या खोलीत गेली. 

 “आईला सारं सांगावं का?” आईच्या आठवणीने कासावीस होऊन तिने आईला फोन लावला. 
“कशी आहेस मनू?” आपल्या आईचा आवाज ऐकून तिला खूप बरं वाटलं. पण इकडच्या तिकडच्या गप्पा मारून तिने फोन ठेवून दिला.
“ताईंना फोन करावा का? निदान मन तरी मोकळे होईल म्हणून तिने आपल्या नणंदेला फोन लावला.
“काय गं वहिनी? आत्ता कसा काय फोन केलास? सारं ठीक आहे ना?” ताई.
“हो. तर. सगळं उत्तम आहे. खूप दिवस झाले आपले बोलणे झाले नाही, म्हणून फोन केला. ताई येऊन जा एकदा. मनासारख्या गप्पा होतील.” मनाली आपल्या नणंदेला म्हणाली. आणखी गप्पा मारून तिने फोन ठेऊन टाकला. आपल्या सासुबाईंबद्दल त्यांच्याच मुलीला सांगावं, हे काही तिला पटेना. 

हळूच ती महेशला म्हणाली, “आईंचं वागणं मला कळतच नाहीय रे. त्यांचं वागणं अगदी घटक्यात बदलतं! त्या कधी अगदी गोड वागतात, तर कधी चिडतात. जरा म्हणून माझे कौतुक नाहीय त्यांना.”
“जाऊ दे गं. इतकं मनावर नाही घ्यायचं. जिथल्या तिथे गोष्टी सोडून द्यायच्या.” महेश तिला समजावत म्हणाला.
आता मनाली सतत तणावात राहू लागली. आपल्या सासुबाईंशी बोलायचं म्हणजे तिला टेन्शन येऊ लागलं. 
————————
एक दिवस वनिता बाईंनी आपल्या माहेरच्या नातेवाईकांना बोलावलं. 
“मी सांगेन तसाच व्हायला हवा स्वयंपाक.” असं म्हणत त्यांनी सगळा स्वयंपाक मनालीला करायला सांगितला. 

हे ऐकून मनाली कामाला लागली आणि त्याही तिला मदत करू लागल्या. कधीही स्वयंपाक घरात न येणाऱ्या सासुबाई आज मदतीला आलेल्या पाहून मनालीला खूप आश्चर्य वाटलं.
पाहुणे आले तसे मनालीला पानं वाढायला सांगून सासुबाई स्वयंपाकघरातून बाहेर आल्या.
जेवणं झाली. पाहुण्यांना जेवण फार आवडले. सर्वांनी मनालीच्या जेवणाचे कौतुक केले. 
तशा वनिता बाई म्हणाल्या, “माझ्या हाताखाली सगळं शिकली ही. नाहीतर आजकालच्या मुलींना काय येते? स्वयंपाकघरात पाऊल म्हणून ठेवत नाहीत त्या.” 
मनाली मात्र आपल्या सासुबाईंकडे ‘ हे काय नवीनच?’ अशा नजरेने पाहत राहिली.

पाहुणे गेले आणि वनिता बाई चेहरा पाडून बसल्या.
आता मात्र मनालीचा संयम सुटला. 
“मला सगळा स्वयंपाक येतो. पण आईंना सगळं त्याच्या मनाप्रमाणं लागतं. इतरांच कौतुक त्यांना सहनच होत नाही आणि आपल्या सुनेशी बरोबरी करू नये हे सुध्दा समजत नाही. आईंचं करणं छानच असतं. पण मलाही त्यांच्यासारखं जमावं ही अपेक्षा का? मी स्पष्टच सांगते आई, मला सगळं तुमच्यासारखं जमणार नाही.” 
इतकं बोलून मनाली आपल्या खोलीत निघून गेली. 

“तू चुकतेस. आपल्या सुनेशी स्पर्धा करण्याचं वय तरी आहे का तुझं? आपल्या लेकीपेक्षा लहान आहे ती, निदान याचं तरी भान ठेव. इतकी वर्षे तुझ्या म्हणण्यानुसार या घरचे पान हलत होते. आता सगळा कारभार आनंदाने सुनेवर सोपवून रिकामी हो.” सासरे मनालीच्या बाजूने बोलून आपल्या खोलीत निघून गेले.
आणि..’तिच्यासोबत माझंही कौतुक व्हावं, असं वाटत असेल तर माझं काय चुकलं?’ याचा विचार करत वनिता बाई तशाच बसून राहिल्या.
समाप्त.
©️®️सायली जोशी.
सदर कथा लेखिका सायली जोशी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखिकेची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी. कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ ( नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

1 thought on “कौतुक ”

Leave a Comment

error: Content is protected !!