©® मनिषा ठाणगे जाधव
गावाबाहेर शेताच्या कडेला राधाबाईची झोपडी होती. राधाबाई म्हणजे एक सत्तर वर्षाची म्हातारी.सगळे तिला राधाई म्हणायचे. वय झालेलं असलं तरी शरीरयष्टी मजबूत होती. राहणीमान सुद्धा नीटनेटके.
दिवसभर स्वतःची कामे स्वतः च करायची. झोपडी आणि आजूबाजूचा परिसर देखील अगदी झाडून पुसून स्वच्छ ठेवायची. झोपडीसमोर मस्त फुलझाडांची बाग फुलवली होती. त्यातलीच काही फुलं तिच्या लाडक्या बाळकृष्णाच्या पूजेला असायची. सकाळच्या राम प्रहरी झोपडीतून निघणाऱ्या धुराबरोबर राधाईच्या ओव्यांचे सूर वातावरणात मिसळून जायचे आणि सारा परिसर प्रसन्न करायचे.
राधाईचा आवाज फार गोड. दिवसभर सतत काहीतरी गुणगुणत असायची. तिची गवळण, विठ्ठलाचं भजन आणि जात्यावरच्या ओव्या ऐकण्यासाठी सर्वच आतुर असायचे.
पण हळूहळू वाढत्या वयानुसार आवाज थरथरायला लागला तसेच शरीर सुद्धा थकत चाललं होतं आणि राधाईचे सूर कुठेतरी हरवायला लागले. रोजच्या कामातला तिचा उत्साह कमी व्हायला लागला. अंगणातील तुळशीबरोबरच फुलझाडं सुद्धा सुकायला लागली होती. एरव्ही रुबाबात दिसणारी राधाई आता मात्र मलीन वाटू लागली होती.
लोक म्हणतात की तरुणपणी या राधाईचा रुबाब एखाद्या पाटलीनबाईच्याही वर होता. पण नवरा गेला आणि सारं होत्याचं नव्हतं झालं. राधाईला तशी कशाची कमी नव्हती. तिच्या नवऱ्याने भरपूर जमीन जुमला कमवून ठेवला होता.
गावात तिचा मोठा वाडा होता.दिमतीला नोकर चाकर होते.आपलं म्हणायला एक छानशी मुलगी होती.पण वंशाला दिवा नाही याची तिला नेहमी खंत वाटायची.
तशातच नवऱ्याचा अकाली मृत्यू झाला आणि तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. तरीसुद्धा तिने स्वतः ला सावरलं. मुलगी वयात आली होती म्हणून मग थोड्याच दिवसात लांबच्या नात्यातला एक मुलगा बघून राधाईने मुलीचे लग्न मोठ्या थाटामाटात लावून दिले.
आता राधाई एव्हड्या मोठ्या वाड्यात एकटी पडली होती. हा एकटेपणा तिला खायला उठायचा. कितीतरी वेळा लेकीने आणि जावयानें तिला त्यांच्याबरोबर येऊन राहण्याचा आग्रह केला. पण राधाईच्या स्वाभिमानी मनाला ते पटले नाही.
राधाई नेहमी म्हणायची काहीही झाले तरी माझा शेवट इथेच होईल.जावयाच्या दारात जाऊन मी राहणार नाही. लेक आणि जावई वरचेवर भेटायला यायचे.
राधाईच्या पाठीमागे तिच्या संपत्तीचा आयता मालक होता येईल या लालसेने जावई सुखावत असे. पण राधाईच्या डोक्यात मात्र वेगळाच विचार चालू होता.
थोड्याच दिवसात राधाईने जवळच्या नात्यातला एक मुलगा दत्तक घेतला आणि सारा जमीन जुमला त्याच्या नावावर केला. तीला वाटले या मुलाचा आपल्याला म्हातारपणात आधार होईल तसेच आपल्या लेकीचं माहेरही शाबूत राहील.
पण असे काहीही झाले नाही.
लेकीला काहीही न ठेवता सगळं वतन लोकाच्या नावावर करून दिले म्हणून जावयाने राधाईबरोबरचे सबंध कायमचे तोडले. लेकीलाही तिला भेटायला बंदी घातली होती. पण तरीसुद्धा लेक नवरा कधी बाहेर गावी गेला की पटकन संधी साधून आईला भेटायला यायची. तिचे खुशाली विचारायची आणि पटकन निघून जायची.
राधाई म्हणायची “एक रात्र तरी थांब ना ग..!”
मुलगी म्हणायची “नको ग आई…नवरा यायच्या अगोदर घरी पोहोचले नाही तर तो मला खूप मारेल” म्हणून मला आग्रह नको करू मी परत येईल कधीतरी”
असे काही दिवस बरे गेले पण त्यानंतर काही दिवसांनी राधाई आणि तिच्या दत्तक मुलामध्ये खूप वाद व्हायला लागले. सुन सुद्धा तीच्याबरोबर रोज काहीतरी कारण काढून भांडायची. कुणाला काही सांगायला जावं तर लोक म्हणायचे “राधाई तुला अगोदर कळायला हवं होतं.कितीही केलं तरी ते दुसऱ्याचं रक्त आहे.त्याला तुझ्याबद्दल प्रेम कसं वाटणार?तू मुलीला सगळं दिलं असत तर आता हक्काने तिनं तुला सांभाळलं असतं.”
राधाईला आता कोणीच वाली राहिला नव्हता.सगळे तिच्या फक्त चूका दाखवायचे. मनात असूनही ती लेकीला तिच्या घरी जाऊन भेटू शकत नव्हती.
मग एक दिवस तिने लेका – सुनेच्या त्रासाला कंटाळून तो वाडा कायमचा सोडला आणि शेताच्या कडेला झोपडी बांधून राहू लागली. बाळकृष्णाच्या पूजेत आपला वेळ आनंदाने घालऊ लागली.मुलगा आणि सून त्यांची सगळी जमीन विकून कोणालाही न सांगता कुठल्यातरी लांबच्या शहरात कायमचे निघून गेले.
राधाईला आता तिची चूक कळली होती. झाल्या गोष्टींचा तिला फार पश्चाताप होत होता. वंशाचा दिवा असावा या हव्यासापोटी तिची लाडकी लेक मात्र कायमची परकी झाली होती. पण आता विचार करून काहीही फायदा नव्ह्ता.
राधाईच्या आयुष्यात आता परतीचा प्रवास सुरु झाला होता. ती अंथुरणाला खिळून होती. गेल्या दोन दिवसांपासून तर तिने अन्न पाणी सोडले होते. गावातील काही प्रेमाची माणसं तिच्याजवळ बसून होते. पण दोनदा निरोप पाठवला तरी राधाईची लेक अजून आली नव्हती. राधाई डोळ्यांत प्राण आणून तिची वाट पाहत होती.
तिच्या लेकीने सुद्धा येण्याचा खूप प्रयत्न केला पण नवऱ्याच्या धाकापुढे तीचे काहीही चालेना. पण शेवटी ती सगळं बळ एकवटून नवऱ्यासमोर उभी राहिली आणि बेधडकपणे बोलली.”तुमची बायको होण्याअगोदर मी तिची मुलगी होते…आजपर्यंत मी तुमचा प्रत्येक शब्द पाळला हे माझ्या आईनेच माझ्यावर केलेले संस्कार आहेत.मी परत आल्यावर तुम्ही मला मारून टाकले तरी चालेल पण आता मला अडऊ नका.माझ्या माऊलीचे शेवटचे दर्शन मला घेउद्या..” असं बोलत असताना तीचे अश्रू अनावर झाले.
तिची ही अवस्था पाहून तिचे सासू सासरे देखील तिच्या बाजूने भक्कमपणे उभे राहिले आणि त्यांच्या मुलाला समजावून राधाईला भेटण्यासाठी सर्वजण निघाले.
राधाईला बघताच मुलीने मोठ्याने हंबरडा फोडत तिच्याकडे धाव घेतली. वाट पाहून सुकलेल्या राधाईच्या डोळ्यांमध्ये आता चमक आली. डोळ्यांतून गंगा यमुना दुथडी भरून वाहू लागल्या.
माय – लेकीची ही ह्रदयस्पर्शी भेट पाहून सर्वजण भावुक झाले होते. लेकीच्या मांडीवर डोके ठेऊन राधाईने तिला बराच वेळ डोळे भरून पाहिले आणि समाधानाने प्राण सोडले. तिच्या देहाला अग्नी मुलीनेच दिला.
अंत्यविधीसाठी जमलेल्या सगळ्यांच्या तोंडात हेच शब्द निघत होते की “राधाईने आयुष्यभर वंशाच्या दिव्याचा विचार केला परंतु शेवटी ही मुलगीच कामी आली.”
वंशाचा दिवा तर सर्वजण जपतच आहात.जरूर जपा पण आपल्या सहवासाने “सासर – माहेर “या दोन्ही घरांना जोडून अखंड तेवत राहणाऱ्या आपल्या समईला सुद्धा हळुवारपणे जपा.
समाप्त
©® मनिषा ठाणगे जाधव
सदर कथा लेखिका मनिषा ठाणगे जाधव यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.